सुखाचं दान
सुखाचं दान
कानावर मधुर गीतांचे बोल पडले तशी तिची झोप चाळवली. पहाटेची वेळ, पाखरांचा किलबिलाट कानावर पडत होता. अंगाला झोंबणारा गार वारा. तिला अजिबात उठायची इच्छा होत नव्हती पण ते मधुर स्वर तिला भुरळ घालत होते आपल्याकडे खेचत होते. ती तशीच डोळे चोळत आवाजाच्या दिशेने निघाली. स्वयंपाकघराला लागून असलेल्या खोलीत माई ज्यातावर दळण दळत होत्या. जात्यावर दळता दळता त्यांच्या कंठातून मधुर सूर उमटत होते. ती तिथेच दाराला टेकून त्यांना न्याहाळू लागली.
वर्षभरापूर्वी तिने या वाड्यात पाऊल टाकलं होतं. पाऊल टाकताच तिला भुरळ घातली होती ती या वाड्याने आणि वेड लावलं होतं ते देखण्या माईच्या प्रेमळ स्वभावाने. माई म्हणजे कारखानीसांच्या वाड्याचा आत्माच होता.
या वाड्यात तिने पहिल्यांदा पाऊल टाकलं तो दिवस आजही तिच्या काळजावर जसाच्या तसा कोरला गेला होता.
" किती रे मोठं हे घर! मला भीती वाटतेय, माधव. सगळं ठीक होईल ना."
वाड्याच्या प्रवेशदारात पोहचताच तिने घाबरून माधवचा हात घट्ट पकडला होता.
" काही नाही होणार. तू काही काळजी करू नकोस माई आहेत ना, सगळं सांभाळून घेतील."
माधवने तिला धीर दिला. ते दोघे वाड्यात पाऊल टाकणार तोच...
" थांबा! खबरदार जर वाड्यात पाऊल टाकलं तर. आल्या पावली परत फिरायचं."
वाड्यात आबांचा गडगडाटी आवाज घुमला. ती घाबरून माधवच्या मागे जाऊन लपली.
" अहो पण आबा, आम्ही माईला..." माधव चाचपडत बोलत होता.
" माईला काय? आम्ही तुम्हाला शिक्षणासाठी शहरात पाठवलं होतं. ही, असली प्रेमाची थेरं करायला नाही. शिकून सवरून आईबापाचं नाव मोठं कराल असं वाटलं होतं. पण तुम्ही तर...!" आबा गर्जत होते.
" तुम्हाला काय वाटलं, तुम्ही दोघे कोर्टात सह्या करून एकमेकांना हार घालून याल आणि आम्ही तुमचे हसत स्वागत करू."
" आणि तुम्ही, तुम्ही असे माधवाच्या मागे काय लपताय. या असे समोर या. प्रेम करताना घाबरला नाहीत. मग आता आलेल्या परिस्थितीला तोंड देताना मागे का लपताय." आबा तिच्याकडे बोट करत तिला बोलत होते.
आबांच्या अशा बोलण्याने दोघांचीही पाचावर धारण बसली होती. खाली मान घालून दोघेही अपराध्यासारखे त्यांच्या समोर उभे होते.
" अहो, त्या दोघांना आधी आत तर येऊ द्या. दार अडवून काय उभे आहात तुम्ही. आत आले की मग काय आगपाखड करायची आहे ती करा." आबांच्या पाठीमागून माईंचा आवाज आला तसे सगळे त्या दिशेने पाहू लागले.
" तुमच्या असल्या मऊ बोलण्यानेच बिघडले हो आपले चिरंजीव, नाहीतर त्यांची काय बिशाद...! आम्हाला न विचारता एक पाऊल सुद्धा पुढे टाकण्याची." माईंच्या बोलण्याला विरोध करत आबा बोलत होते.
माईंच्या आवाजाने तिला थोडा धीर आला आणि ती माधवच्या पाठीमागून हळूच चोरपावलाने थोडं पुढे आली. पुढे येऊन तिने माईंना पाहिले आणि ती एकटक त्यांच्याकडे पाहतच राहिली.
हिरवकंच इरकली लुगडं, कपाळावर बंदया रुपायाच्या आकाराचं लालभडक, ठसठशीत कुंकू, हिरव्या रंगाच्या रेशमी बांगडयांनी गच्च भरलेले हात, नाकात नथ डोळ्यात वाहणारा वास्तल्याचा झरा...! ती माईंचं ते देखणं रूप भान हरपून पाहत होती. डोळ्यात साठवून घेत होती.
" राधा " अगं अशी बघतेस काय? अशी समोर ये जरा." माईंच्या मधाळ आवाजाने ती भानावर आली.
माईंनी माधव आणि राधाचं औक्षण केलं. त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि उंबरठ्यावरचं माप ओलांडायला लावून दोघांना वाड्यात घेतलं.
" अहो माधवाच्या माई, नुसतं औक्षण करून चालणार नाही हो. आता तयारीला लागा. देवाब्राह्मणांच्या साक्षीने साऱ्या गावासमोर दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊ. काय म्हणता...?"
आबांच्या या वाक्यावर माधव आणि राधा आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. इतका वेळ आकडतांडव करणारे आबा एकदम लग्नाची भाषा बोलू लागले होते.
" अरे, माधवा असा पाहतोस काय?" तुझा बाप आहे म्हटलं हो. आश्चर्याचे धक्के आम्हालाही देता येतात." म्हणत ते परत गडगडाटी हसले.
आबा आणि माई म्हणजे प्रतापराव कारखानीस आणि त्यांच्या धर्मपत्नी वैजयंती कारखानीस. गावातील बडं प्रस्थ. गावात मोठा ऐसपैस चौसोपी वाडा होता त्यांचा. कोरीव महिरपीनीं सजलेले दिमाखदार लाकडी खांब वाड्याच्या भक्कमतेची साक्ष द्यायचे. कोरीव काम केलेला शिसवी झोपाळा वाड्याची शान होता. लेकराबाळांनी भरलेलं कुटूंब जणू गोकुळच नांदत होतं त्या वाड्यात. सारा वाडा नेहमी गजबजलेला असायचा. वाड्याचा मध्यभाग मोकळाच होता. थोडा खोलगट असल्यामुळे खाली उतरायला चारपाच पायऱ्या होत्या. त्या जागेत मातीनं सारवलेलं मोठ्ठं तुळशीवृंदावन होत. त्याला समोरच एक छोटीशी दिवळी होती. सांजवेळेला त्यात पणती मंद तेवायची. सारं कसं प्रसन्न, भारावून टाकणारं वातावरण. एक आत्मिक समाधान लाभायचं त्या वाड्यात.
लग्न होऊन या वाड्यात आल्यानंतर माईंनी अंगणात लावलेला प्राजक्त चांगलाच बहरला होता. पहाटेचे सोनेरी आसमंत, मंद मंद वाहणारा गार वारा, कोवळे ऊन आणि त्यात अंगणात पडलेला प्राजक्ताचा सडा... आणि त्याचा मनमोहणारा सुगंध...! सगळच कसं मनमोहक आणि भुरळ घालणारं. अख्ख तुळशीवृंदावन प्राजक्ताच्या फुलांनी गच्च भरून जायचं. परसदारी डौलात उभा असलेला महाकाय निंबवृक्ष वाड्याचं आरोग्य निरोगी ठेवण्याचं काम निगुतीने पार पाडायचा.
शेतात काम करून दमून भागून परतलेल्या गडीमाणसांना पोटभर जेवण घालतांना माई स्वतःच तृप्त व्हायच्या त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान असायचं. कोणीही गरजवंत या वाड्यातून कधी रिकाम्या हाताने, विन्मुख परतला नव्हता. अनेक गरजवंताचे भरभरुन आशीर्वाद लाभलेला हा वाडा होता. वाड्याच्या एका एका कणात आणि वाड्यात राहणाऱ्या माणसांच्या मनात कणव आणि प्रेमाचं वास्तव्य होतं.
वल्लभ आणि माधव, माई आणि आबांच्या घराचे दोन कुलदीपक. वल्लभचं लग्न होऊन चार वर्षे उलटली होती. तो नोकरीच्या निमित्ताने बायको मुलासह मुंबईत स्थायिक झालेला होता.
शेंडेफळ माधव उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता. तिथेच त्याची भेट राधाशी झाली. आधी मैत्री झाली मग हळूहळू जवळीक वाढत गेली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. शिक्षण संपल्यानंतर त्याला तिथेच चांगली नोकरी देखील मिळाली होती.
राधा एका उच्चभ्रू ब्राम्हण कुटुंबातील लेक तर माधव मराठा. दोघांचं लग्न होणं अशक्यच होतं. प्रतापराव कारखानीस म्हणजे आबा खूप कडक स्वभावाचे आणि कट्टर होते त्यामुळे ते या आंतरजातीय विवाहाला कधीच तयार होणार नाहीत याची माधवला पुरेपूर खात्री होती.
माधव जेंव्हा वर्षभरापूर्वी थोड्यादिवसासाठी भारतात आला होता तेंव्हा त्याने माईला विश्वासात घेऊन राधाबद्दल सगळं सांगितलं होतं. हळव्या स्वभावाच्या माईंना आपल्या लाडक्या लेकाचं मन मोडायला जमणारं नव्हतं. त्यामुळे त्यांनी आबांना समजावून या लग्नाला तयार करण्याची सगळी जवाबदारी स्वतःच्या शिरी घेतली होती. थोडं अवघड काम होतं पण आबा देखील आपला शब्द कधी मोडणार नाहीत याची खात्री माईंना होती.
माईंनी संगीतल्याप्रमाणेच माधव राधाशी लग्न करून तिला या वाड्यात घेऊन आला होता. या लग्नासाठी आबांची परवानगी घ्यायला गेले तर आबा कधीच लग्नाला परवानगी देणार नाहीत हे माई चांगलंच जाणून होत्या. पण एकदा का हे लग्न झालं तर नंतर आबा काहीच करू शकणार नाहीत. आधी चिडतील, थोडा आकडतांडव करतील पण शांत झाल्यानंतर सारासार विचार करून ते हे लग्न मान्य करतील आणि आपले आशीर्वाद राधा आणि माधवला ते नक्कीच देतील या आशेवरच त्यांनी माधव आणि राधाला आबांच्या परस्पर लग्नाची परवानगी दिली होती. माईच्या संमतीनेच माधव आणि राधा कोर्टात लग्न करून आले होते आणि राधाचा या वाड्यात सून म्हणुन प्रवेश झाला होता.
राधाने वाडयात पाऊल टाकताच तिला प्रथम नजरेस पडला होता तो अंगणात बहरलेला प्राजक्त आणि त्याला पाहताच,
प्राजक्ताचा सडा अंगणी,
घाली माझ्या मना मोहिनी
हर्षित माझ्या मनास भासे
मौक्तिकें वर्षिली नभातुनी
आपसूकच या ओळी तिच्या ओठी आल्या. तिची पावले तुळशीपाशी जाताच रेंगाळली. माईंनी तिला सगळा वाडा फिरून दाखवला आणि या वाड्याने तिला मोहिनीच घातली. ती अमेरिकेत जरी राहत असली तरी गावच्या मातीशी नाळ जोडली असल्यामुळे गावच्या मातीची ओढ तिला होतीच.
माई आणि आबांनी परत एकदा साऱ्या गावासमोर थाटामाटात माधव आणि राधाच्या लग्नाचा बार उडवून दिला. लग्नानंतर देवदर्शन, पूजा, नव्या नवरीने घरच्या परंपरा, रीती रिवाज, शिकण्यात, समजून घेण्यात दिवस कसे पंख लावून भुर्रकन उडून गेले ते कळलंच नाही.
माईंच्या मायेने ओथंबलेल्या छत्रछायेत तिला अलभ्य सुखाचा खजिनाच गवसला होता.
एका महिन्याच्या गावच्या मुक्कामात ती भरभरून जगली होती. आपल्या प्रेमळ स्वभावाने तिने अल्पावधितच सगळ्यांची मने जिंकून घेतली. सुरवातीला विरोध करणारे आबा देखील आता राधा... राधा करता थकत नव्हते.
एका महिन्यानंतर अमेरिकेला परत जाताना तिचा पाय वाड्यातून निघत नव्हता. अश्रूंनी पापण्यांचे बांध कधीच ओलांडले होते. क्षणभर तिची पावले उंबरठ्यात अडखळली. तिने मागे वळून पाहिलं आणि पळत जाऊन माईंना मिठी मारली. त्यांच्या कुशीत शिरून तिने मनसोक्त रडून घेतलं होतं.
दिवस सरत गेले आणि एक वर्षानंतर राधा आणि माधव परत गावी परतले होते. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असलात तरी गावच्या मातीची ओढ कधी तुटत नसते, हे मात्र खरं.
पहाटेच माईंच्या जात्यावरील गीतांनी राधाला जाग आली आणि ती दाराला टेकून माईंच ते वात्सल्यरूप नयनी साठवत होती.
" काय गं राधा इतक्या लवकर कशाला उठलीस. अगं अजून तांबडं पण फुटलं नाही, झोपायचस ना अजुन थोडा वेळ. मला मेलीला सवयच आहे गं सकाळी लवकर उठायची."
माईच्या बोलण्याने राधा भानावर आली. वाडयात पाऊल ठेवल्यापासून आजवरचा प्रवास आठवताना तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. तिने माईंना वाकून नमस्कार केला.
महिनाभर गावी राहून आबा आणि माईंच्या प्रेमाच्या सावलीत विसावा घेऊन ती तृप्त होत झाली होती. सगळ्या सुखसोयी हाताशी असल्या तरी परदेशातलं जगणं म्हणजे कोरडा रखरखीत वणवा, मायेची ओलं नसलेला असं तिला वाटायचं. तिचं मन गावच्या मातीत गुंतत चाललं होतं. परसदारीच्या महाकाय निंबवृक्षाच्या गर्द छायेत तिचा वेळ कसा निघून जाई तिला कळायचंच नाही. तो निंबवृक्ष तिला आभाळासारखा, वाड्याचा आधार, राखणदार असल्यासारखा भासायचा.
" राधा, हे थोडे सांडगे, लोणचं, पापड, शेवाळ्या, कुरडया यांची पिशवी बांधून ठेवली आहे. जाताना आठवणीने घे हो."
अमेरिकेला परत जाताना माईंनी तिला आठवण करून दिली. माधव नको नको म्हणत असताना तिने ती पिशवी छातीशी घट्ट कवटाळून खूप प्रेमाने आपल्यासोबत नेली. परत जाताना ती परत माईंच्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडली होती.
वल्लभ आणि माधव घरी आले की वाडा गजबजून जायचा. हिरवकंच भरलेलं गोकुळ पाहून माईंचा जीव सुपा एवढा व्हायचा. ते परत गेले की वाड्यात माई, आबा, कामं करणारे गडी माणसंच इतकेच काय ते असायचे.
दिवस पंख लावून उडून जात होते. वल्लभ, आणि माधव वर्षा, सहा महिन्यातून घरी येतं. महिना, पंधरादिवस मुक्काम करून परत जातं होते.
सगळं सुरळीत चालू आहे असं जेंव्हा वाटत असतं त्याचवेळी नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत असतं. अश्याच बेसावध क्षणी ती आपला खेळ खेळते आणि सारं आयुष्यच बदलून जातं.
एक दिवस अचानक आबांच्या छातीत दुखायला लागतं. त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार सुरू करण्याआधीच सर्व काही संपलेलं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने घात केला होता. आबा देवाघरी गेले आणि माईंचं जगचं उध्वस्त होऊन गेलं. त्या एवढ्या मोठ्या वाड्यात एकट्या पडतात. सगळीकडे शुकशुकाट होता वाड्यात ही आणि माईंच्या मनातही.
या काळात राधा माईंचा आधार बनली होती. तिने सहा महिने माईंजवळ राहून त्यांना दुःखाच्या काळ्याकुट्ट डोहातून बाहेर पडण्यास, सावरण्यास मदत केली होती. माई थोड्या सावरल्यानंतर राधाला माधवकडे परत अमेरिकेला जायला तयार केलं. वाड्याची सगळी जवाबदारी दिवाणजीवर सोपवून ती परत अमेरिकेला निघून गेली.
आबांना जाऊन वर्ष देखील उलटलेलं नव्हतं तोवर नियती परत एकदा आपला डाव टाकते. एक नवीन वार करून जाते. एक नवीन आघात त्या थकलेल्या जीवावर करते.
एक दिवस अमेरिकेवरून बातमी येते. अपघातात माधवच्या मृत्यूची...
एकापाठोपाठ नियतीने केलेल्या या आघातामुळे माई पुरत्या खचून गेल्या होत्या. त्यांना आता जगणं असह्य झालं होतं. हे मानवी शरीर किती आणि काय सहन करू शकत याची कल्पनाच न केलेली बरी.
राधा तर पुरती वेडीपिशी झाली होती. माईंना तिचं दुःख पाहवत नव्हतं. ती खूप रडली होती. तरी तिच्या त्या आसवांनी तिच्या मनात पेटलेले निखारे विझणार नव्हते. माई तिच्या दुःखावर फुंकर घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत होत्या पण त्या फुंकरीने तिची जखम अधिकच पेटून उठत होती.
काळ हे सगळ्यात मोठं औषध आहे असं म्हणतात. सरत्या काळा बरोबर दुःख ही हळूहळू मागे पडू लागलं होतं. मनातली जळत्या निखाऱ्याची तप्त राख बाजूला सारून राधाने थोड्याच अवधीत स्वतःला सावरलं होतं.
अंगणातल्या प्राजक्ताला गळतीच लागली होती जणू. वाड्याचं सगळं चैतन्य ओसरलं होतं.
" राधा, आज मन जरा उदास आहे गं, कुठेच मन लागत नाही आहे."
एक दिवस माई कण्हतच राधाला सांगत होत्या.
" माई, मी तुमचं डोकं चेपून देते मग बरं वाटेल तुम्हाला." राधाने तेल लावून छान डोकं चेपून देताच त्यांना शांत झोप
लागली.
" अहो माई, आज किती वेळ झोपला आहात तुम्ही. तुम्ही इतका वेळ कधीच झोपत नाही. तुमचे सूर्य नारायण देखील कधीचे प्रकट झाले बघा. उठा आता. "
राधा सकाळी माईंना उठवत बडबड करत होती. तिने हळूच माईंना हलवलं. पण... माई झोपेतच गेल्या होत्या, कायमच्या... हे जग सोडून.
राधा आता पुरती कोलमडली. ती सर्वार्थाने एकटी पडली होती. मनाला ह्या दुःखाच्या चक्रव्युहातून बाहेर काढणे फार कठीण होतं तिच्यासाठी. एकापाठोपाठ दुःखाचे डोंगर कोसळले होते. वल्लभला आता गाव, वाडा, राधा या सगळ्यांशी काही देणं घेणं नव्हतं. त्याने गावी कधीच परत न येण्याचा निर्णय घेतला होता. तो मुंबईतच स्थायिक झाला कायमचा. एक भयाण जीवघेणी शांतता जाणवायची तिला वाड्यात.
तिने मनाशी काहीतरी निश्चय केला आणि वाड्याची जवाबदारी आणि वाडा दिवाणजीवर सोपवून ती अमेरिकेला परत निघून गेली.
काही दिवसातच ती परत गावी परतली. तिकडचे सगळे व्यवहार पूर्ण करून कायमची.. तिला गाव, वाडा, अंगणातला प्राजक्त खुणावत होता. आपल्याकडे ओढत होता. माई, आबा, माधव या सगळ्यांची अपुर्ण स्वप्नं आता तिला पूर्ण करायची होती. वाड्यात पाय ठेवतांना तिची पावले अडखळत होती, थरथरत होती.
नियतीने अनेक वार तिच्यावर केले होते. आता तिला नियतीवर पलटवार करायचा होता. तीला हरवायचं होतं. वाड्यातलं हरवलेलं चैतन्य तिला परत आणायचं होतं.
वाड्यात काम करणाऱ्या गडी माणसांकडून तिने सगळा वाडा स्वच्छ करून घेतला. अंगणात प्राजक्त हिरमुसला होता. परसदारचा महाकाय निंबवृक्ष तिच्या वाड्याचा राखणदार लागलेल्या गळतीमुळे निःशब्द झाला होता.
राधाचे डोळे भरून आले. डोळे भरुन ती प्राजक्ताला पाहत होती.
" आता मी आलेय. या वाड्याच्या कणाकणाला माईंच्या प्रेमळ हाताचा स्पर्श झालाय. त्यांचा वास या वाड्याच्या रोमारोमात, कानाकोपऱ्यात आहे आणि तो तसाच राहील आजन्म."
ती वाड्याच्या भिंतींवरून प्रेमाने हात फिरवत जणू त्यांना अभय देत होती. माईंचा दरवळ ती जागोजागी अनुभवत होती. श्वासात भरून घेत होती. त्यांच्या आठवणींनी व्याकुळ होऊन रडत होती.
" पोरी राधा, तू आता इथेच राहणार का..? ”
पाठीमागून दिवाणजींचा आवाज आला. त्यांच्या भरल्या ओल्याचिंब आवाजाने तिचं मन भरुन आलं.
“ होय दिवाणजी, या वाड्याचं आता माझ्याशिवाय आहे तरी कोण. त्याला ही आधार हवा आहे आणि मलाही. माईंचा हा प्राजक्त बघा कसा हिरमुसलाय. त्याला पुन्हा नव्याने बहर यायलाच हवा. माझ्या या वाड्याचा राखणदार बघा कसा निशब्द मौन उभा आहे. त्याच्यातही नवीन चैतन्य भरून त्याला बोलतं करायला नको का? ”
" माईं आणि आबांनी प्रेमाने उभा केलेला हा डोलारा याला ग्रहण लागू देऊन कसं चालेल. मला माझ्या माधवचं स्वप्न पण तर पूर्ण करायचं आहे. माझ्या उदरात अंकुरित झालेला त्याचा अंश थोड्याच दिवसात या वाड्याच्या अंगणात माधवचं रूप घेऊन दुडूदुडू लागेल. त्याच्या नाजूक पावलांना ममतेचा स्पर्श करायला या प्राजक्ताला पुन्हा नव्याने बहरावंच लागेल."
" नियतीने रित्या केलेल्या या माझ्या ओंजळीत त्या विधात्याला सुखाचं दान द्यावाचं लागेल."
अंगणातल्या प्राजक्ताकडे पाहत हाताची ओंजळ पुढे करून राधा बडबडत होती आणि इतक्यात एक वाऱ्याची झुळूक आली आणि राधाच्या रित्या ओंजळीत प्राजक्ताचं एक फुल येऊन विसावलं.
तिने धावत जाऊन प्राजक्ताच्या बुंध्याला घट्ट मिठी मारली.
काजळराती चांदाने त्या
पहा कशी चांदणी शिंपली
अंधाऱ्या वाटेवर माझ्या
सुखाची चांदनफुले सजली