Sunita madhukar patil ( मधुनिता )

Horror Tragedy Crime

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Horror Tragedy Crime

बेस्ट फ्रेंड

बेस्ट फ्रेंड

12 mins
274


" लग्न म्हणजे काय गं, सुहानी. आजी म्हणत होती, आता तुझं लग्न होणार, तू नवऱ्याच्या घरी जाणार." 


" लग्न म्हणजे नेमकं काय? आता कसं सांगू तुला." वयाने पंचविशी पार केलेल्या पण बुद्धीने आठ दहा वर्षाच्या प्रणवला लग्न म्हणजे काय? याचं उत्तर काय द्यावं हे सुहानीला कळतं नव्हतं.


दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले 

भांडण, रुसवे, फुगवे,आनंद, सहजीवन,सहवास हे तर आहेच पण रक्ताच्या नात्यांपेक्षाही ज्या नात्याचं पारडं जड असं थोडं आंबट, थोडं गोड, थोडं कडू, थोडं तिखट असं हे एकदम खुसखुशीत, जबरदस्त आणि भन्नाट नातं. अशा या नात्याचं गमक प्रणवच्या बालबुद्धीला कसं समजावून सांगावं, समजावलं तरी त्याला ते कळेल का? याचा विचार सुहानी करत होती इतक्यात,

" बोल ना सुहानी, तू नवऱ्याच्या घरी जाणार?" प्रणवने पुन्हा प्रश्न केला.

" हो... प्रणव, पण मी येत जाईन हं! तुला भेटायला."

" म्हणजे तू मला सोडून जाशील?" प्रणवचे डोळे भरून आले.

" हे बघ तू रडू नकोस हं, नाहीतर मी तुझ्याशी कट्टी..." सुहानीलाही त्याच्या डोळ्यात अश्रू पाहून भरून आलं.

" मी गुड बॉय आहे. नाही रडणार पण तू माझ्याशी कट्टी नको करू."

" प्रणव, तू आता मोठा झाला आहेस, समजदार आहेस. माझा बेस्ट फ्रेंड आहेस. तूच जर असा रडत राहिलास तर आज्जीची काळजी कोण घेणार."

" मी मोठा झालो ना... हो ना. आज्जी म्हणाली मी मोठा झालो की माझं पण लग्न होणार. मी तुझा बेस्ट फ्रेंड पण आहे मग तू माझ्याशीच लग्न कर ना आणि माझी नवरी बनून माझ्या घरी ये. आपण मस्त मज्जा करू. खूप गेम्स खेळू. मी माझे सगळे फेवरेट टॉयज तुला देईन."


प्रणवच्या तोंडून हे ऐकून सुहानीला आश्चर्याचा धक्का बसला. ती स्तब्ध त्याच्याकडे एकटक पाहू लागली. तो नक्की काय बोलला! हे समजण्यातच थोडा वेळ निघून गेला. त्याला समजावण्यासाठी ती शब्दांची जुळवाजुळव करू लागली पण तिला शब्द सापडत नव्हते. शब्दच ते जे समजावणे आणि समजून घेणे दोन्हीही करतात. मनाच्या शांत सागरात उठणारे असंख्य मनकल्लोळही तेच जाणतात. विचारांच्या गर्तेतली दिशाहीन पाने शब्दच तर वेचतात. तप्त अग्निच्या क्षुब्ध ज्वालाही तेच शमवतात. मनाला सावरण्याच्या साऱ्या कला ते जाणतात याच शब्दांच्या जोरावर ती आजवर त्याला सावरत आली होती पण तेच शब्द आता कुठेतरी हरवले होते.


" प्रणव, अरे राजा! किती प्रश्न विचारशील तिला. किती उशीर झाला बघ बरं. सुहानीला घरी जाऊ दे. आई वाट पाहत असेल ना तिची." इतका वेळ लांबून दोघांचा संवाद ऐकणाऱ्या रेणुकाने प्रणवच्या जवळ जात त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला. 

" अगं पण आजी...मला अजून खेळायचं आहे."

" नाही प्रणव, पुरे आता. उद्या येईल हो ती परत."

सुहानीने दोघांचा निरोप घेतला आणि घरी जायला निघाली तोच रेणुकाने तिला हाक मारली.

" सुहानी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे."

" बोल ना आज्जी, काही काम होतं का?"

" हे पहा सुहानी, मी सरळ मुद्द्यावरच येते. आता तुझं लग्न ठरलंय आणि प्रणवची अवस्था तुला माहीतच आहे. त्यामुळे तू आता यापुढे इथं येणं आणि त्याला भेटणं हळूहळू कमी करावं असं मला वाटतं."

" हो आज्जी, आईसुध्दा काल हेच म्हणत होती." सुहानीचे डोळे परत भरून आले. तिने एकदा वळून प्रणवकडे पाहिलं आणि काही न बोलता निघून गेली.


नात्यांची अनेक रूपे असतात. काही बोलकी, काही अबोल, काही परिचित, काही जवळची, काही औपचारिक. नातं हे हृदयातून जुळतं, काळाने दुरावते किंवा अधिक घट्टसुद्धा होते .पण त्या नात्याच्या आठवणी मात्र हृदयाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात सहजपणे जपल्या जातात .             

चांगली नाती झाडासारखी असतात. सुरवातीला त्यांची काळजी घ्यावी लागते पण एकदा का ती बहरली की आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत सावली देतात आणि हेच सावली देण्याचं काम सुहानी मागील वीस वर्षांपासून अविरत करत होती.


" प्रणव बाळा, सुहानी सासरी गेल्यानंतर तुला सांभाळण माझ्यासाठी खूप कठीण होईल रे, किती जीव लावलाय त्या पोरीने तुला." 

गाढ झोपलेल्या प्रणवला पाहून रेणुकाचा जीव कासावीस झाला. त्याच्या भविष्याची काळजी तिला सतावू लागली. त्याच्या भविष्याचा विचार करता करता तिच्या मनात भूतकाळाची भुते फेर धरत होती.

रेणुकाला तो दिवस आजही लख्ख आठवत होता ज्या दिवशी तिनं आठ वर्षांच्या प्रणवचा हात पकडून उमेशच्या घरचा उंबरा ओलांडला होता. 


" उमेश, आजपासून तुझा माझा संबंध संपला. मी गावाकडंच घर आणि सगळी जमीन माझ्या नातवाच्या म्हणजेच प्रणवच्या नावे केलं आहे. त्यातली एक दमडी ही तुला मिळणार नाही."

" अगं पण आई, हे कसं शक्य आहे."

" का शक्य नाही, उमा सगळे पाश तोडून, पोटी एक मुलगा असताना तुला सोडून दुसऱ्याचा हात धरून जाऊ शकते आणि तू ही प्रणवची जवाबदारी झिडकारून दुसऱ्या बाईच्या नादी लागू शकतोस तर हे का शक्य नाही. उमा आणि तू कधीच चांगले आईबाप बनू शकला नाहीत पण मला माझ्या नातवाची काळजी आहे. तुम्ही दोघांनी त्याच्याकडे पाठ फिरवली म्हणून काय झालं. त्याची आजी अजून जिवंत आहे त्याची काळजी घ्यायला. मी आजच प्रणवला घेऊन आपल्या गावच्या घरी जातेय." 

" अगं पण आई प्रणवला इथे काय कमी आहे. सगळ्या गोष्टी तर पुरवतोय ना."

" पण प्रेम... आई बापाचं प्रेम त्याचं काय? उमा बाहेरख्याली निघाली आणि तू... तू तरी दुसरं काय केलंस. तू ही तसाच."

" आई, मी काय म्हणतोय..."

" आता तू काही बोलू नकोस. माझं ठरलंय आणि मी माझा निर्णय बदलणार नाही."

उमेशने रेणुकाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने त्याचं एक ऐकलं नाही. रेणुकाने सगळी आवराआवर केली आणि प्रणवला घेऊन तिने उमेशचं घर कायमच सोडलं.


खरंतर प्रणव सुरुवातीची दोन वर्षे सामान्य मुलांसारखाच होता पण जसे दिवस, महिने, वर्षे सरू लागली तशी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली की प्रणवचं वय तर वाढतंय पण त्याच्या मेंदूची वाढ मात्र फार कमी गतीने होतं आहे. पाच वर्षाचा झाला तरी त्याचं वागणं मात्र वर्षाच्या लहान मुलाप्रमाणे होतं. डॉक्टरांचे उंबरठे झिजवले. सरकारी दवखान्यापासून ते नामांकित न्युरोसर्जनचं मत विचारात घेतल गेलं. पण यावर उपाय काही सापडला नाही. उमा आणि उमेशला जाणवू लागलं होतं की यातून बाहेर पडण्याचा आता मार्ग नाही. डॉक्टरांच्या मते प्रणव एक स्पेशल चाईल्ड होता. त्याच्या मेंदूची वाढ अतिशय कमी गतीने होत होती. या सगळ्याचा मानसिक त्रास उमाला होऊ लागला. मग चिडचिड, भांडणं आणि याचीच परिणीती मग बाहेर सुख शोधणं यात झाली. परिणामी उमा आणि उमेशच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि एक दिवस कोणाला काहीही न सांगता उमा घर सोडून गेली. या सगळ्यात प्रणवची होणारी हेळसांड रेणुकाला सहन होत नव्हती. ती डोळ्यात तेल घालून त्याची काळजी घेत होती. एक दिवस उमेशसुद्धा उमाच्या पावलावर पाऊल ठेवत एका बाईला घरी घेऊन आला आणि रेणुकाच्या सहनशक्तीचा अंत झाला. तिने प्रणवला घेऊन गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या घरातुन बाहेर पडली ती कायमची. 


गाव सोडूनही तिला दहा वर्षं झाली होती. नवऱ्याच्या निधनानंतर ती उमा आणि उमेशसोबत पुण्यात राहत होती. या दहा वर्षात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. शेजारचे निमकर घर विकून दुसरीकडे गेले होते. त्या घरात आता दुसरंच कोणी राहत होतं. शेजापाजारी ओळखी असाव्यात, अडीनडीला तेच उपयोगी पडतात म्हणून सारं स्थिरस्थावर झाल्यानंतर तिने शेजापाजारी ओळखी वाढवल्या. शेजारच्या निमकरांच्या घरात मागील दोन वर्षांपूर्वी नवीन बिऱ्हाड आलं होतं राहायला. सुहास, नंदिनी आणि त्यांची एकुलती एक गोड, चुणचुणीत लेक सुहानी! सुहानी पाच वर्षांची होती जेंव्हा ती प्रणवला पहिल्यांदा भेटली होती.


लवकरच दोघांची खूप चांगली मैत्री झाली. सुहानीचे आई-वडील सुशिक्षित होते त्यामुळे त्यानां प्रणव आणि सुहानीच्या मैत्रीत काही वावगं दिसत नव्हतं. हळूहळू दिवस सरत होते. दोघेही बराच वेळ एकत्र खेळत असत. सुहानी शाळेत गेल्यावर मात्र प्रणवला एकटं एकटं वाटायचं. अधीरतेने तो तिची वाट पाहत असायचा. सुहानी शाळेतून आल्यानंतर हात पाय धुवून लगेचच प्रणवसोबत खेळायला जायची. खेळता खेळता ती शाळेत शिकवलेल्या खूप काही गोष्टी त्याला शिकवण्याचा प्रयत्न करायची. प्रणव देखील ते सगळं उत्सुकतेने ऐकायचा. समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. प्रणवला एक चांगली मैत्रीण मिळाल्याने रेणुकाही खुश होती.


सुहानी आता बारा वर्षांची झाली होती. ती आपल्या वयाच्यामानाने बरीच समजूतदार होती. तिला आता कळत होतं की प्रणव इतरांसारखा सामान्य नाही. तिच्या हे ही लक्षात आलं होतं की सगळी मुलं प्रणव पासून दूर राहतात. ठराविक अंतर ठेवून वागतात. हे सगळं पाहून तिचं मन दयेने भरून येत असे. त्याच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे तिच्याकडे असायची. ती कधीच त्याला निराश होऊ द्यायची नाही.


एक दिवस सुहानी शाळेतून परत आली तर तो रस्त्यातच तिची वाट पाहत रडत उभा असलेला तिला दिसला. तिने प्रेमाने त्याची चौकशी केली तर तो रडत रडत म्हणाला,

" सुहानी, माझं फेवरेट टॉय तुटलं. आजीने ते कचऱ्यात फेकलं. ते माझं फेवरेट टॉय होतं ना. मला ते पाहिजे."

" अरे मग रडतोस काय? आपण नवीन आणू."

" नाही मला तेच पाहिजे..." 

तो मोठ्याने स्फुंदू लागला.

काही केल्या तो ऐकायला तयार नव्हता. सुहानीलाही काय करावं काही सुचेना. शेवटी तिने एक शक्कल लढवली. आज्जीला विचारून ते तुटलेलं खेळणं तिने मिळवलं आणि प्रणवला घेऊन घरामागील अंगणात गेली. तिथे खड्डा खणून त्यात ते खेळणं पुरलं आणि त्यावर एक झाड लावलं. 

" हे बघ प्रणव, हे आपलं नवीन सिक्रेट बरं. कोणालाही सांगायचं नाही. तुझं आणि माझं टॉप सिक्रेट. आता तुझं टॉय इथे सेफ आहे. इथून ते कुठेही जाणार नाही. आज्जीला सुद्धा ते सापडणार नाही. आणि ह्यावर जे झाडं लावलं आहे ना हे तुला नेहमी तुझ्या टॉयची आठवण करून देत राहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज याला पाणी घालायचं. तू दिलेलं पाणी पिऊन हे झाडं खूप मोठं होईल आणि मोठं झाल्यावर खूप सावली देईल, गोड गोड फ्रुटस देईल, आहे ना गंमत!"

" हो... सावली! टॉयची सावली." 

हे सगळं पाहून तो खूप खुश झाला आणि आनंदाने उड्या मारू लागला. या नंतर त्याला जणू छंदच जडला. प्रत्येक तुटलेल्या खेळण्याला जमिनीत पुरून त्यावर झाड लावण्याचा. घराच्या मागे अशी अनेक झाडे लावून त्या दोघांनी बागचं फुलवली होती.


दोघेही हळूहळू वयात येत होते. त्यांची मैत्री मात्र तशीच निरलस, निखळ होती. त्याची पंचविशी उलटली असली तरी त्याचं मानसिक वय हे अजूनही आठ-दहा वर्षाच्या मुला इतकंच होतं.

आजकाल सुहानीच्या आईची म्हणजे नंदिनीची चिंता वाढत चालली होती. प्रणवला सुहानीची खूपच सवय झाली होती. नंदिनीला आता ते आवडत नव्हते. शेवटी ती एका वयात आलेल्या मुलीची आई होती. उद्या सुहानीचं लग्न होईल ती हे घरच काय तर गाव, शहर, राज्य सोडून इतर ठिकाणी जाईल. ती गेल्यावर प्रणवचं काय होईल. ती गेल्यावर प्रणवचं मानसिक स्वास्थ्य बिघडू नये असं तिला वाटत होतं. त्यामुळेच ती सुहानीला प्रणवपासून दूर राहायला सांगत होती. हळूहळू मैत्री कमी करायला सांगत होती. सुहानीलाही तिचं म्हणणं पटत होतं म्हणून तिने तसे प्रयत्न देखील सुरू केले होते पण तिला ते खूप कठीण जात होतं आणि आज रेणुकाने ही तीच भीती व्यक्त केली होती. तीही प्रणवला आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न करत होती.


इकडे सुहानीच्या लग्नाची जय्यत तयारी चालू होती. लग्न महिन्यावर येऊन ठेपलं होतं. कपडे, दागिने, शॉपिंग, आमंत्रण, यात वेळ कसा निघून जात होता समजत नव्हतं. 

लग्न झाल्यानंतर सुहानिशी पुन्हा लवकर भेट होणार नाही म्हणून तिच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी एक छोटीशी पार्टी अरेंज केली होती. पार्टीहुन परतल्यावर येता येता प्रणवलाही भेटावं असं तिच्या मनात येऊन गेलं. त्याला उगीचंच टाळत असल्याचा अपराधबोध तिच्या मनात घर करत होता. दोन दिवस ती त्याला भेटली नाही तर तो कासावीस होऊन तिच्या घरी आला होता तिला भेटायला. त्यामुळे आज त्याला भेटून थोडावेळ त्याच्या सोबत घालवावा या विचारात ती होती. 


रात्रीचे नऊ वाजले होते. मौत्रिणींना भेटून सुहानी अजून घरी परतली नव्हती. नंदिनीला तिची खूप काळजी वाटू लागली. असं आधी कधी झालं नव्हतं. ती वेळेच्या बाबतीत खूप पक्की होती. 

" अहो, ऐका ना. मला खूप भीती वाटतेय. नंदिनी अजून कशी आली नाही. कोपऱ्यापर्यंत जाऊन पाहून येता का तुम्ही? तिचा फोन ही लागत नाही आहे."

नंदिनी काळजीच्या सुरात सुहासला म्हणाली.

" अगं येईल गं, किती काळजी करतेस. सगळ्या मैत्रिणी एकत्र जमल्या आहेत. गप्पांमध्ये वेळेचं भान राहीलं नसेल. थोडा वेळ वाट बघू." सुहासने नंदिनीची समजूत काढली.

रात्रीचे दहा वाजले होते तरी सुहानी परतली नव्हती. आता सुहासला देखील तिची काळजी वाटू लागली. त्याने तिच्या मैत्रिणींच्या घरी फोन करून चौकशी केली तर सुहानी सगळ्यांना भेटून तासाभरातच घरी परत जायला निघाली होती असं समजलं.

सुहास आणि नंदिनीला काय करावं काहीच समजेना. 

सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. शेजापाजारी चौकशी, मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना फोन पण कुठेच तिचा पत्ता लागत नव्हता. तिच्याबद्दल कोणाला काहीच माहिती नव्हतं. या सगळ्या गोंधळात रात्रीचे बारा वाजले. इकडे नंदिनीने रडून सारं घर डोक्यावर घेतलं होतं, देवांना पाण्यात ठेवून त्यांनाही संकटात टाकण्यात आलं. सुहासने आपले सगळे सोर्सेस वापरले पण काही उपयोग झाला नाही. नाईलाजाइने शेवटी त्याने पोलिसांकडे धाव घेतली. तो पोलीस स्टेशनात पोहचला. तक्रार नोंदवून घेणारा हवालदार त्रासलेल्या स्वरात म्हणला,

" नाव सांगा मुलीचं."

" सुहानी सुहास जमादार..." सुहास म्हणाला.

" फोटो आहे का?"

" हो, हा घ्या." सुहासने फोटो दिला.

" वय, रंग, बांधा, एखादा आयडेंटिफिकेशन मार्क सगळी महिती सांगा."

सुहासने सगळी माहिती पुरवली.

" पोरीचं बाहेर कुठं लफडं वगैरे, म्हणजे आजकालची पोरं बाहेर लफडी करतात आणि मनाविरुद्ध काही झालं की मग पळून जातात." हवालदाराने एक नजर सुहासला न्याहाळलं.

" अहो, काय बोलताय तुम्ही हे. माझी सुहानी अशी नाही."

" होय साहेब, सगळ्या आईबापांना असंच वाटत असतं.

आणि आमचं काम आहे हे, सगळ्या अँगल नी विचार करावा लागतो."

" तुम्ही लवकर तक्रार नोंदवून घ्या आणि लवकरात लवकर माझ्या सुहानीला शोधून काढा." सुहास कासावीस झाला.

" हो साहेब, आमचं कामच आहे ते. कधी एखादी बॉडी वगैरे सापडली तर ओळख पटवण्यासाठी यावं लागेल. तुम्हाला."

शेवटच्या वाक्याने सुहासच्या काळजात चर्रर्रर्र...झालं.

सुहास यावर काहीच बोलला नाही. त्याच्या मनाची तगमग त्या हवालदाराला समजणार नव्हती. त्यासाठी तेवढी विवेकबुद्धी असावी लागते. त्याने तक्रार नोंदवली आणि पोलीस उप निरीक्षकांना भेटून तो स्टेशनातून बाहेर पडला.

पोलिसात तक्रार नोंदवून आठवडा उलटून गेला होता. सुहासही आपल्या परीने शोध घेत होता.

इकडे नंदिनीची अवस्था फार वाईट होती. 

सुहानीच्या हरवण्याचा तिने धसका घेतला होता.नाही नाही ते विचार तिच्या डोक्यात येत होते. रेणुका तिला आईच्या मायेने सांभाळत होती. नंदिनीला तिचा खुप आधार वाटत होता. रेणुकाच्याही डोळ्यातलं पाणी आटत नव्हतं.


प्रणव तर ती हरवल्या दिवसापासून निःशब्द झाला होता. तो एकटाच तासनतास बसून राहायचा. त्याची बेस्ट फ्रेंड हरवली होती. त्याचं सारं जगचं कोणीतरी हिरावून घेतलं होतं. सुहानी हरवल्या दिवसापासून तो कुणाशी ही बोलत नव्हता. त्याचा सगळा वेळ त्या दोघांनी फुलवलेल्या बागेतच जायचा. त्याची ही अवस्था सर्वांना समजत होती.


हळूहळू दिवस सरत गेले. ज्या घरात लगीनघाई, लगबग सुरू होती तिथे आज भयाण शांतता होती. या घटनेला आता जवळपास एक महिना लोटला होता. सुहास आणि नंदिनीच्या शवागृहाच्या चकरा सुरूच होत्या. शवागृहाची जणू सवयच झाली होती त्यांना. कुठल्याच प्रयत्नांना यश येत नव्हतं.

बाहेर शेजापाजाऱ्यांच्यात कुजबुज सुरू होती. 

' पोरीचं बाहेर काहीतरी प्रकरण असावं.'

'आजकालच्या पोरांचं काही सांगता येत नाही.'

'आजकालची पिढी एकदम अविचारी. गेली असेल कोणाचातरी हात पकडून.'

लग्न जवळ आले होते त्यामुळे खरच ती आपल्या प्रियकरासोबत गेली असेल असे अंदाज बांधले जाऊ लागले होते.

सगळ्या गावात सुहानीच्या गायब होण्याची चर्चा रंगली होती. या सगळ्याचा सुहास आणि नंदिनीला खुप त्रास होत होता.  

पोलिसांच्या हातीही काहीच धागा दोरा लागला नव्हता. सुहास आणि नंदिनी पोलिसांकडे जाऊन जाऊन निराश आणि हतबल झाले होते. .

काहीही झालं तरी काळ काही कोणाला थांबत नाही. त्याचं चक्र अविरत फिरतच राहतं. महिन्यामागून महिने सरत होते.

आता तर सुहास आणि नंदिनीच्या डोळ्यातील अश्रूही सुकले होते. 

चुकून कधीतरी त्यांच्याही मनात हा विचार डोकावून जात होता की खरंच सुहानी एखाद्या मुलांबरोबर पळून तर गेली नसेल ना! पण ते दोघेही पटकन हा विचार मनातून झटकून टाकायचे कारण त्यांना त्यांच्या संस्कारावर पूर्ण विश्वास होता. त्यांचे मन कधीच हे स्विकारायला तयार नव्हते की सुहानी पळून गेली असेल.

नंदिनी दिवसरात्र सुहानीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायची. आता या गोष्टीला जवळपास वर्षभर उलटले होते. या वर्षभरात बऱ्याच गोष्टी कानावर आल्या, कोणी नाव ठेवली, तर कोणी सहानुभूती दाखवली, कोणी मदतीचा हात देखील पुढे केला तर कोणी मुलगी पळाली, पोरीनं नाक कापलं अशी दूषण देखील लावली. सुहास नंदिनीला खुप मनस्ताप सहन करावा लागला. बदनामी झाली ती वेगळीच. हे सगळं आता त्या दोघांसाठी असह्य होतं चाललं होतं. त्यामुळे त्यांनी हे गाव सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. रेणुकाने त्या दोघांना समजावण्याचा खुप प्रयत्न केला पण ते दोघे आपल्या निर्णयावर ठाम होते. इथलं सगळं विकून ते कायमचं दुसरीकडे जाणार होते. सुहानीची खोली आवरता आवरता सुहास आणि नंदिनी बेचैन झाले होते. भावनांचा आवेग थांबता थांबत नव्हता. डोळ्यांना अश्रूंचा पूर आला होता. त्या घराचं रिकमेपण आणि स्वतःचा एकटेपणा त्यानीं मनाच्या एका कोनाड्यात कैद केला आणि तिथून ते दोघे निघाले कायमचे...


जाता जाता जड अंतकरणाने त्या दोघांनी प्रणवच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीच न बोलता मार्गस्थ झाले. ते दोघे गेल्यावर प्रणव खूप रडला आणि निशब्द होऊन घरामागे बागेत एका झाडाजवळ येऊन बसला. त्या झाडाकडे पाहत तो खिन्न हसला आणि म्हणला,

" सुहानी, मी आपलं सिक्रेट कोणालाच सांगितलं नाही. मी गुड बॉय आहे ना! आता तू कोणालाच सापडणार नाही आणि तू मला सोडून कुठेसुद्धा जाणार नाहीस. नवऱ्याच्या घरी पण नाही. तू नेहमी माझ्याजवळ राहणार, एकदम सेफ! ह्या झाडाची सावली बनून."

त्याने त्या झाडाला घट्ट मिठी मारली, आता त्याच्या चेहऱ्यावर आत्मिक समाधान होतं.


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror