Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Thriller

4.3  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Thriller

दुर्ग

दुर्ग

3 mins
231


 जुन महिन्यातील संध्याकाळ, कोसळणाऱ्या पावसाच्या सरी मनाला धुंद करत होत्या. मनात अनेक मिश्र भावनांचे तरंग उमटत होते. एक हुरहूर, जिज्ञासा, अशी बरीच उलथापालथ मनात चालली होती. मनाला वेध लागले होते उद्याच्या रायगड ट्रेकचे. रायगड हा एक शब्दच मनात ऊर्जेचा स्रोत निर्माण करण्यास पुरेसा होता. ६ जून शिवराज्याभिषेक दिन आणि या पवित्र दिनी रायगडावर जाण्याचा योग म्हणजेच अहोभाग्य. आहाहा! विचार करूनच अंगात शिरशिरी जाणवली आणि मन शिवराज्याभिषेकाच्या दिमाखदार सोहळ्याच्या विचारांमध्ये हरवून गेलं.   


किल्ले रायगडाच्या सहवासाची कित्येक वर्षांची माझी मनीषा पूर्ण होणार होती. शिवरायांच्या किल्ले रायगडाच्या सहवासाच्या कल्पनेत मी हिंडत होते, अगदी स्वच्छंदपणे. बालपणापासून छत्रपती शिवरायांविषयी मला विलक्षण ओढ. मला बाळकडू मिळत गेले ते शिवरायांच्या कथांतून. वाचणाची आवड तशी फार जुनी, अगदी बालपणीची. शालेय जीवनात शिवाजीमहाराजांशी माझी घनिष्ठ ओळख झाली ती अभ्यासक्रमातील पुस्तकांमुळे. श्रीमान योगी, जेंव्हा रायगडाला जाग येते ही पुस्तकं अगदी काळजातली. लाल महाल, सिंहगड, पन्हाळा, रायगड या सगळ्यांना कवटाळावे अशी मला तीव्र इच्छा व्हायची आणि ती इच्छा आता पूर्णत्वास येणार होती.


पहाटे लौकरच निघाल्याने प्रवास संपवून आम्ही रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आणि काय सांगू, तेथील दगड, माती, पायवाट सारे मला ओळखीचे वाटू लागले. आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. या पायवाटेने राजे कितीतरी वेळा गड चढले असावेत, या विचाराने मन भारावुन गेले. महाराष्ट्राच्या स्वराज्यनिर्मितीत या पायवाटेचेही स्थान महत्त्वाचे होते. 


रायगडाचे स्थान खरोखरीच इतके रमणीय आहे की, कुणीही त्याच्या प्रेमात पडावे. गडाची चढण संपली आणि भुकेल्या नजरेने आम्ही त्या पवित्र वास्तूचे दर्शन घेण्यास निघालो. तेथील भिंतींवर हात फिरवताना जाणवलं की त्या काहीतरी बोलत आहेत. काही सांगू पाहत आहेत. इतक्यात कुठूनसा आवाज आला,


" ओळखलंत का मला?"


" कोण..." मी चमकून इकडे तिकडे पाहिलं.


" अरे नाही ओळखलस का? मलाच तर भेटायला आलीस ना! अगं सह्याद्रीच्या कड्याकपारी नाव माझे गुंजते

इतिहास दप्तरी अनेक नावे परी रायगड मज भावते.

असे अभिमान मी छत्रपतींचा, स्वाभिमान मी मराठी मनाचा

साक्ष मी शिव इतिहासाची, मान मज स्वराज्याच्या राजधानीचा.

पाहिली गुलामगिरी मी, पाहिली हुकूमशाही अन निजामशाही

परी भावली मनास माझ्या शिवबाची मराठेशाही

इथेच सोहळा शिव राज्याभिषेकाचा, 

इथेच दरबार शिव छत्रपतीचा

इथेच त्यागला देह माझ्या राजानं

अन इथेच घेतला श्वास अखेरचा." या शब्दांनी मी भारावून गेले.


" कोण? रायगड....." इतकेच शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले.


" हो, मी तोच किल्ले रायगड... आतापर्यंत कित्येकांच्या वाणीतून मी बोललो.कित्येकांनी मला लेखणीतुन व्यक्त केलं. हो...हो, मीच तो रायगड."


" अगं, माझ्या राजाच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार मी.

येथील प्रत्येक दगड शिव इतिहासाची साक्ष देतोय. याच ठिकाणी जिजाऊमातेने शिवरायाला आशीर्वाद दिले होते. अभिषेकाच्या प्रसंगी गागाभट्टाने म्हटलेले संस्कृत मंत्र इथल्या कणाकणात तुला ऐकू येतील. इथल्या दरबाराचे अवशेष सारा इतिहास तुला उलगडून दावेल."


या शब्दांनी आणि भावनेने भारावून जाऊन तेथील थोडी माती उचलून मी कपाळाला लावली. तोफखान्याची जागा पाहून मी पुढे सरकले. टकमक टोक, हिरकणी बुरूज ह्या जागा त्याग आणि धाडसाच्या कथा सांगत होत्या. शेवटी आम्ही त्या ठिकाणी आलो जिथे ते थोर जीवन संपले. ते स्थान पाहून गहिवरून आलं आणि पावले जड झाली. तिथे थोडा वेळ रेंगाळलेच होते की पुन्हा आवाज आला,


" अगं, निसर्गाने या पवित्र वास्तूवर जेवढे प्रहार केले त्याहूनही अधिक फोडतोड माणसांनी केलेली पाहून मन कष्टी होते. छत्रपतींच्या पावलांच्या स्पर्शाने पावन झालेलो मी कितीही बिकट परिस्थिती आली तरी डगमगलो नाही, हरलो नाही पण तो काळ आता संपला. आता अनेक अबालवृद्ध मला पहायला येतात त्यावेळी मी हरकून जातो. ६०-८० वर्षाची आजी कडा चढताना पाहून मला ‘हिरकणी' आठवते पण जेव्हा तरुण वयातील मुले नशेच्या आहारी जाऊन दारूच्या बाटल्या आणतात, माझ्यावर नावं लिहतात, अश्लील गाण्यांवर दंगा करतात त्यावेळी याच गडावरून त्यांचा कडेलोट करू वाटतो. माझी हात जोडून एक विनंती आहे तुम्हा मावळ्यांना की, गडावर आल्यावर माझं पावित्र्य तेवढं राखा. ऊन,वारा,पाऊस या माऱ्यापुढे मी झिजत चाललो आहे. तटबंदीवर उगवलेल्या झाडांमुळे माझा श्वास कोंडतो आहे पण दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्था फक्त गड पाहण्यासाठी न येता येथील पार्श्वभूमीचा अभ्यास करतात ना… तेंव्हा खरंच मी आनंदाने रडू लागतो. तुम्ही खरंच माझ्यावर प्रेम करता ना? मग माझ्यासाठी काहीच करणार नाही का? आहे या प्रश्नाचं उत्तर..."


या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नव्हतं पण त्याक्षणी मी एक प्रण केला की दुर्ग संवर्धनासाठी मी नक्कीच हातभार लावेन.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy