सांजसावली
सांजसावली
तिचं चित्त आज थाऱ्यावर नव्हतं. मनात एक चलबिचल, कालवाकालव चालू होती. दिवेलागणीची वेळ झाली, तरी घरात दिवे लावले नव्हते. ही वेळही तशीच असते ना कातरवेळ, हळवं करून टाकणारी. ती ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसून अस्ताला चाललेला सूर्य न्याहाळण्यात गुंग होती. थोड्याच वेळात तो धरणीमायीच्या कुशीत विसावणार होता. झोपाळ्याच्या कड्या दोन्ही हातांनी घट्ट धरून, डोकं कडय़ांना टेकवलेलं, वाऱ्याच्या झुळुकी बरोबर रुप्यात न्हालेले भुरूभुरू उडणारे केस तिच्या गालाशी चाळा करत होते. केसांचा चंदेरी रंग आजवर अनुभवलेल्या उन्हाळे आणि पावसाळयांची साक्ष देत होता. दूर कुठेतरी शून्यात लावलेली नजर आणि झोपाळ्याच्या प्रत्येक हिंदोळ्याबरोबर तिच्या मनात आठवणींची आंदोलने फेर धरत होती.
तिला तो दिवस आजही लख्ख आठवत होता, घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकत होता तसा तिचा जीव तीळ तीळ तुटत होता. ती त्याला जाऊन बिलगली,
" जाऊ नकोस ना रे,"
असं तरी कसं म्हणणार कारण आर्मीची वर्दी, देशाची सेवा करणं हे तर स्वप्न होतं त्याचं आणि त्याच्या स्वप्नात अडथळा न बनता त्याची ताकद बनायचं होतं तिला. सासूबाई गेल्यानंतर बाबांना दर तीन चार वर्षांनी पोस्टिंगच्या ठिकाणी सगळीकडे त्यांच्यासोबत जायला, फिरायला जमणार नाही म्हणुन त्यांच्यासाठी इथेच राहण्याचा सर्वस्वी निर्णय तिचाच तर होता. मग ती त्याला जाऊ नको तरी कसं म्हणणार. दोन पिलांना सोबत घेऊन मोठ्या धीरानं एकटं राहण्याचं बळ ती एकटवायची. तो यायचा चार, सहा महिन्यांनी किंवा कधी वर्षभराने महिन्याभराच्या सुट्टीवर.
सुट्टी संपली की निरोपाचा क्षण जवळ येऊच नये असं तिला वाटायचं. अंधाराची चादर आभाळ पांघरण्याआधीचं त्याचा काळोख तिच्या मनावर दाटून यायचा. हुरहूर लावणारी कातरवेळ जवळ आली की तिचे डोळे भरून यायचे. सामानाची आवराआवर सुरू झाली की ती सांजसावली अधिकच गडद होऊन तिच्या मनावर अधिराज्य करू पहायची.
त्या निरोपाच्या क्षणाला मुठीत घट्ट पकडून ती तशीच उभी रहायची, थिजल्यासारखी, एकाच जागी गोठल्यासारखी, एकटेपणाच्या येणाऱ्या जाणिवेला आपल्या कणाकणात, श्वासाश्वासात पेलत. त्याच्या मागे मागे धावणाऱ्या मनाच्या परतीची वाट पहात. तो दूर जाणार आपल्यापासून काही वेळातच. आता सगळा समुद्र डोळ्यात उतरायला लागलेला तिच्या!!
निरोपाच्या क्षणाला चटकन आटोपतं घेत तो निघणार पण पिल्लं घरट्यात निजलेली असल्यामुळे दारातूनच ती अश्रूभरल्या डोळ्यांनी त्याला निरोप देणार आणि धावत जाऊन बाल्कनी गाठणार. टॅक्सी नजरेआड होईपर्यंत ती वाकून वाकून पहायची. गाडी नजरेआड होताच ती दूरवर पसरलेल्या अथांग आभाळाला काजळाची चादर ओढून
मौन झालेलं पहायची आणि नकळत तिच्या पापण्यांतून विरहाचे मोती ओघळायचे.
आठवांची आवर्तने मनी
नयनात आसवांची दाटी
मोरपिशी आठवांच्या खुणा
कृष्ण सावळ्या पाऊलवाटी
थेंब टपोरा तो ओघळता
श्वास माझा तो चिंब ओला
क्षण विरहाचा कातर हळवा
तव प्रीत मृदगंधात न्हाला
ती तिथेच बाल्कनीत बराच वेळ रेंगाळली. तिच्या मनाचा एक एक कण जोडत त्याच्या प्रेमळ आठवणींच्या मृदगंधात न्हातं. त्याच्या मागे धावणाऱ्या मनाला हलकीशी लगाम बसली. आठवणी! एका पाठोपाठ किती आवर्तने झालेली या आठवणींची.
कधी रूसलेल्या, कधी रागावलेल्या तर कधी हसलेल्या, कधी हळव्या लाजलेल्या, तर कधी लबाड खट्याळ... कधी चमचम चांदणचुरा उधळणाऱ्या. आठवणींचं त्या मनात प्राजक्ताचा सडा उधळणाऱ्या, तर मोगऱ्यासारख्या सुगंधित करणाऱ्या नेहमीच रातरणीसारख्या रात्री उमलणाऱ्या, चांदण पाखरं करणाऱ्या. रात्रीच्या अंधाऱ्या पदरावर चमचमणाऱ्या चांदण्याच्या खडीची नक्षी उमटवणाऱ्या. प्रत्येक आठवण वेगळी आणि स्वतंत्र अस्तित्व असलेली आणि प्रत्येकीचं आपलं वेगळंच गुपित. पैंजनासारख्या रुणझुणत तर येतात त्या नेहमी आणि उदास मनात एक शुक्राची चांदणी फुलवून जातात. ह्याच आठवणींच्या चांदणझुल्यात हिंदोळे घेत पुढील अठ्ठेचाळीस तास कधी हळवं होतं आणि कधी आभाळ भरूनच आलं की आसवावाटे रितं झाली होती ती.
पहाटेचा प्रहर, बाहेर मंद वाहणारा वारा आणि पाखरांची किलबिल... आणि ‘तो सुखरूप पोहोचला असेल' या तिच्या मनात आलेल्या विचाराने तिला आळस झटकवून टाकायला मदत केली. आळोखे पिळोखे देत उठून तिने खिडकीचा पडदा सरकवला आणि बाहेर सोनेरी आभा पसरवणारा सूर्य घरात डोकावला. तेव्हा रात्रीच्या काळोखात अथांग आकाशभर विखूरलेली तिची आठवणींची चांदणपाखरं त्या सोन कवडशाची बोटं धरून तिच्या कुशीत परत आली आणि सारं लख्ख उजळलं.
तिची पिलं उठून आता त्यांच्या डॅडाविषयी विचारणार, रडणार त्या आधीच तिने त्यांना व्यवस्थित समजावून शाळेसाठी पटकन आवरायचं असं सांगत सांगत, ‘‘आम्ही सगळे ठीक आहोत, काही काळजी करू नकोस, तुच तुझी काळजी घे. बाबाची चिंता करू नकोस.” असं ती त्याला त्या सागरासारख्या निळ्या आंतरदेशीय पत्रावर लिहीत होती. हो तो पत्राचा निळा सागरासारखा रंग लाटेसारख्या उचंबळून येणाऱ्या भावनांना स्वतःमध्ये सामावून घेत होता.
तो अंधार, कातरवेळ, ती एकटेपणाची गडद सावली पुन्हा येणार नाही असं नव्हतं. ती पुन्हा पुन्हा मनाच्या अंगणात फेर धरून नाचणार होती पण मनाच्या त्या अंगणात मधोमध रूजलेला पारिजातक तो केशरी देठ आणि टपटप सुगंधित स्वर्गीय चांदण्यांची पाखरणं, एक एक चांदणसय दोघांच्या प्रीतीची तिला ठाम, खंबीर आणि समर्थ बनवत होती संसाराचा डोलारा पेलण्यासाठी तो तिकडे असताना बॉर्डरवर! आर्मीच्या वर्दीत देशासाठी पहारा देताना.
त्याने सांगितलं होतं जाताना सात आठ महिन्यानंतर येईन पुन्हा महिन्याभराची सुट्टी घेऊन दिपवाळीला. मग तो येणारच कारण तो वचनाचा एकदम पक्का!
बाकी ती मजेत होती, तो गेल्यापासून थोड़ी हरवल्यासारखीच होती. पिलांच्या किलबिलाटामध्ये राहूनही एकटी एकटी. मनामध्ये सारखं त्याच्याशी गुज करत. हसता हसता डोळे अलगद भरुन यायचे तर कधी
बोलता बोलता शब्द ओठातच विरुन जायचे. थोडी कावरीबावरी, वेंधळ्यासारखी.
जेवता जेवता कधीतरी लागायचा जीवघेणा ठसका
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यायची आणि सांगायची पिलांना काळजीसारखं काही नाही आठवण काढतोय डॅडा.
कधी कधी हृदयावर आभाळ दाटून यायचं आणि आठवणींच्या पावसात ती चिंब ओली व्हायची. नकळत त्याच क्षणांमध्ये हरवून जायची.
जसं जसं त्याचं येणं जवळ येत होतं तसं घड्याळाच्या काट्यानीं आपला वेग मंदावला होता तशी ती अधीर व्हायची आणि तो दिवस उजाडला. तो आला परत पण
तिरंग्यात लपेटून कायमचा...
विजेचा कडकडाट व्हावा आणि साऱ्या नभाला चिरून टाकावं तसचं काही कळायच्या आताच तिच्या हृदयाला दुभंगून गेला तो क्षण. निसर्गाच्या ऋतूंनी जसा रंग बदलावा
तसा तिच्या हृदयाचा आसमंत बदलून गेला. वाटलं तिला कवटाळावं त्या काळ्या कुट्ट काळाला उराशी जावं सामावून त्याच्यात पण...
" मम्मा....."
हे शब्द पडले कानात आणि अडखळले पाय. आता तिला शिकायचं होतं अश्रूंनाही डोळ्यात सजवायला. विझलेल्या दिव्यांना उजाळा द्यायला. नाहीच जरी आठवले शब्द तरी गीत गायला. तुटलेली असेल आतून तरी खुष रहायला. तुटलेल्या स्वप्नांना हळुवार कुरवळायला. नसेल जरी जमत त्याच्याशीवाय जगायला तरी हसत हसत जगायला, त्याच्यासाठी... त्याने ठेवलेल्या विश्वासासाठी, त्याच्या पिलांसाठी.
मन तिचं आज एकांतात
उगीचच रडतयं
तो नाही तिच्याजवळ
याची जाणीव क्षणाक्षणाला छळतेय
कधी कधी तिचं लटकं रागावणं
आणि त्याचं झटक्यात तिला मनवणं,
मनात आज काहीतरी सलतयं
तू ये ना परत आज मन हट्ट करतंय.
सांजवेळी कधीतरी घ्यायची मनातल्या अंगणी ती सावरायला आठवणींचा फाफट पसारा. मग फुले आठवणींची वेचता वेचता त्यात तिला दिसायची त्याचीच प्रतिमा. नकळत थेंब ओथंबून यायचे रांजणात पापण्यांच्या तेंव्हा अश्रूंचे पण ओझे अनावर व्हायचे तिच्या पापणीला.
पापण्या मिटून घेतल्या की भूतकाळातील गोड क्षणांचा चांदणं सडा व्यापून टाकायचा तिच्या मनाच्या अंगणाला. स्वैर मन मग आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वार व्हायचं आणि
त्या आठवणीतही आठवायची कित्येक गुपितं.
मनातला धूसर अंधार माजवायचे जेव्हा काहूर तेंव्हा बेचैन जीवाला आणखीच लागायची तिच्या हुरहूर. व्याकुळ तिचं मन तेव्हा साद घालायचं त्याला. आठवण येताच पुन्हा त्याची पापण्याही समुद्र पार करायच्या. विखुरलेल्या आठवणी मग तिला सावरता यायच्या नाहीत. आजही आठवणींच्या साठवणीत तिच्या स्वप्ननगरीत मिळायचा तिला बहाणा त्याच्याशी भेटीचा. म्हणुनच मग जपायची ती मोरपिसागत त्याच्या आठवणींचा पसारा.
हाच पसारा जपता जपता ती जगत गेली. पिलांच्या पंखात बळ देत गेली. आज पिलं तिची घेत आहेत भरारी स्वछंद उंच आसमंतात. गोकुळ झालंय घराचं आणि त्या गोकुळाचं हिरवेपणा तिने कधी कमी नाही होऊ दिला. तेल पाण्याचा दरवळ घराचा कोपरा न कोपरा सुगंधित करतोय. अंगणात नातवंड बागडत आहेत फुलपाखरांसारखी. वाळ्या, तोडयांचा खणखणाट गुंजतोय तिच्या कानी. 'आजी... आजीचा' नाद पडतोय कानी.
पण आज तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. मनात एक चलबिचल, कालवाकालव चालू होती. राहूनराहून तिला वाटत होतं, तो बोलावतोय तिला त्या आसमंतीचा चांद खुणावतोय तिला. ह्या अंधाराची चादर तो निळा आसमंत पांघरण्याआधीच ये तू सामावून जा माझ्यात ती सांजसावली अधिकच गडद होण्याआधी. तो बाहू पसरून उभा आहे तिच्याकडे पाहत चेहऱ्यावर एक मंद मुस्कान घेऊन.
आणि ती... तीही निघाली आहे त्याला भेटायला, त्याच्यात सामावायला पुन्हा कधीही वेगळं न होण्यासाठी त्याच्यात एकरूप व्हायला कायमची.
" आजी... आजी... चल ना घरात, किती वेळ या ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसणार."
नातवंडांनी फेर धरलाय भोवती पण त्यांचा आवाज कुठे पडतोय तिच्या कानी. ती तर एकरूप झालेय तिच्या चांदात डोळे ठक्क उघडे ठेवून हातात त्याने दिलेलं पेंडंट दोघांचा ही फोटो असलेला आणि चेहऱ्यावर समाधान त्याला भेटल्याचं.