कोसळ
कोसळ


असेच दोन पावसाळे अजून गेले, माझ्या बहिणीचा अभ्यास आणि शाळा माझ्यामुळे त्या पावसाळ्यांत खरंच बुडत राहिले . मी जसजसा मोठा होत गेलो तसा बहिणीच्या ताब्यातून निसटत राहिलो, तिला जुमानेसा झालो, गेल्या पावसाळ्यात तर घराबाहेर पडून मी बांधावर खोटे खोटे 'कीव' बांधले ( पाणी अडवून मासे पकडण्यासाठी केलेली रचना ) , मासे तर हाताला लागले नाहित पण 'कोके' 'कुर्ल्या ' ( छोटे खेकडे ), बेडक्या, काडू ( गांडूळ ) वैगेरे सहज शक्य होते त्या पाणीजीवांना पकडले व आईने करवादल्यावर जिवंत राहिले त्यांना सोडून दिले. ह्याचा परिणाम लगेच झाला,मी आजारी पडलो आणि आईने ठरवून टाकले कि येत्या पावसाळ्यापूर्वी माझी काही व्यवस्था करायला हवी ती म्हणजे मला शाळेत घालणे पण माझं वय पहिलीसाठी सहा भरायला अजून एक वर्ष बाकी होतं. मला घरी बहिणीकडे ठेऊन आता जमणार नव्हतं, एकतर तिच्या अभ्यासाचे नुकसान आणि मी तिला आवरणारहि नव्हतो, पावसाळ्याला अजून वर्ष होतं पण आईला आत्तापासूनच चिंता लागून राहिली.......
पावसाचा जोर गणपती येऊन गेल्यानंतर कमी व्हायचा आणि दसऱ्यानंतर तर जवळ जवळ थांबायचाच, शेतीची काम उगवलेलं तृण उपटण्यापुरतच बाकी असायचं, शेतकरी भात पिकण्याची वाट बघायचे, साधारण दिवाळीच्या दरम्यान सोनेरी भात शेतं वाऱ्यावर डोलू लागायची, महिन्याभरात भात घरात आलं, गवताच्या गंजी रचल्या कि कोकणातल्या शेतकऱ्याला कवळतोड ( भाजणी ) सोडली तर पुन्हा पावसाची वाट बघण्याशिवाय काही मोठं काम तीन महिने तरी नसतंच. म्हणूनच मग जत्रा सुरु होतात, लोकं पाहुण्यांच्या घरी जातात, घर दुरुस्ती किंवा इतर कामं काढतात, मुंबईला मुलांकडे जातात किंवा मग गुरं ढोरं चरायला सोडून नुसतेच एकमेकांकडे जाऊन, देवळात जमून गजाली हाकतात ( गप्पा मारतात ).
आई आधीच मला शाळेत घालण्याच्या विचारात होती त्यातच एके दिवशी संध्याकाळी आमच्या गावाच्या वरच्या आवाटातले ( वाडीतले ) शिरी ( श्रीधर ) मास्तर आमच्या घरी आले, लोकं त्यांना आदराने भाऊ मास्तर म्हणायचे आणि मुलं गुरुजी, गावातल्या शाळेतच त्यांची नेमणूक होती व माझ्या बहिणीलाही तेच शिकवायला होते. ते उत्तम गायक आणि पेटीवादक असल्यामुळे आमच्या वाडीतल्या भजनांचे ते बुआ होते. त्यांना आमच्या घरी येताना बघून बहीण घरात पळून गेली, मी शाळेतच जात नसल्यामुळे मला भिण्याचं कारणच नव्हतं म्हणून मी मातीत तसाच खेळात राहिलो, त्यांना बघून आई त्यांच्या बसण्यासाठी कांबळं ( घोंगडी ) आणायला आत गेली. मला मातीत खेळताना बघून त्यांनी विचारलं
" काय बिले बाबा ? ( माझं नाव आजोबांचं ठेवल्यामुळे माझे वडील आणि इतरही वयस्क लोकं मला बाबा म्हणून संबोधीत कारण माझे वडील आजोबाना बाबा म्हणायचे )? , शाळेत बिळेत जावचा हा कि नाय कि मातीतच खेळूचा हा ? " नेमकं बाहेर कांबळं घेऊन येणाऱ्या माझ्या आईने हे ऐकलं मात्र ती लगेच म्हणाली
" वायंच बसा हा, चाय ठेवतय आणि बोलतय " ती कांबळं पेळेवर टाकून लगबगीने आत गेली आणि मास्तरांसाठी चहा घेऊन आली ( गावच्या लोकांना चहा म्हणजे जीव कि प्राण ), मग तिने माझी पूर्ण रामकथा त्यांना ऐकवली. मास्तरांनी बशीत ओतून शांतपणे तिची कथा आणि व्यथा ऐकत चहा संपवला, तिने पुढे केलेला पानांचा डबा उघडला आणि विचारलं
" किती वरसाचो हा ह्यो ? "
" पाच " आई म्हणाली आणि मी कान टवकारले
" मग शाळेत सहा पुरी झाल्याशिवाय पटावर नाय घेऊक गावचा पण मी आसय, हेड मास्तरही गावचेच आसत ते माझा ऐकतले, हेका बेबग्या ( माझ्या बहिणीला बेबी म्हणायचे ) वांगडा ( सोबत ) शाळेत धाड, बसात बहिणी सोबत एक वरीस, काय शिकलो तर शिकलो नाय तर पुढच्या वर्साक घेऊ त्याका पाहिलीत " आईचा चेहरा कळीचं फुल व्हावं तसा आनंदाने फुलत गेला आणि आधीच मातीने लाल झालेला माझा चेहरा मात्र काळा पडला.
" लय उपकार होतले तुमचे "
" कधीपासून ? " तिने विचारले
" आता पुढच्या महिन्यात पोरांच्या परीक्षा झाल्यावर "
मास्तर गेल्यापासून आईने सुटकेचा निश्वास सोडला आणि तिने त्याक्षणापासून माझ्या प्रोत्साहनानाला आणि माझे मन वळवायला सुरुवात केली पण तिला माहीत नव्हते कि हे तिचे सर्व प्रयत्न फोल ठरणार आहेत ...........
शाळेत जाण्याचा दिवस उजाडला, सकाळची शाळा असल्यामुळे बहीण लवकर तयार झाली, आईने मला उठवले आणि माझी तयारी सुरु केली, कपडे घातले एक पाटी पेन्सिल पिशवीत घातली आणि माझ्या खांद्यावर दिली, देवघरात जाऊन देवाला नमस्कार करून यायला सांगितले. मी खळ्यापर्यंत गेलो खरा पण बहिणीचा हात धरून बाहेर पडायला राजी होईना, शाळेतली इतर मोठी मुलं आणि ऐकीव मारकुटे मास्तर डोळ्यासमोर आले आणि माझे मन बदलले, मी ब्रेक लावल्यासारखा एका जागेवरून ढिम्म हलेना. हताशपणे उभ्या बहिणीच्या मदतीला आई आली, तिने मला समजावले, बाबा पूता केले, आमिष दाखवली पण नाही, मग आईचा संयम संपला तिने मागच्या दारी जाऊन लिंगडीची बारीक काठी काढली, ती परत येईपर्यंत बहिणीने मला समजावले कि मला तिच्या सोबतच बसायचे आहे, आईच्या रागाची भीतीही दाखवली पण शून्य परिणाम. आईला लिंगडीची काठी घेऊन येताना मी बघितले आणि भोकाड पसरले, आई जवळ आली मला काठी दाखवत तिने माझा एक हात बहिणीच्या हातात दिला आणि जायला सांगितले, मी हात झटकून टाकला, भोकांडाला तीव्र स्वर लावला आणि तिथेच मातीत लोळण घेतली. आता मात्र आईचा स्वतःवरचा ताबा गेला, तिने जमदग्नी रूप धारण केले आणि माझ्या पायांवर सपासप मारायला सुरुवात केली आणि तोंडाने " जातलस कि नाय शाळेत ? " , मी नाही म्हणाल्यावर पुन्हा ' सपासप '. लिंगडीची ताजी बारीकशी फांदी पण वळ उठवायला पुरेशी होती, सण सण करून लागायची पण मी बधलो नाही. बहीण मध्ये पडून मला मारू देईना मग तिने दोन चार फटके तिलाही दिले, शेवटी स्वतःच दमून पेळेवर बसली. बहीण पुढे झाली रडत रडत मला मातीतून उठवले, कपडे झटकले, मातीमिश्रित अश्रू पुसले आणि पोटाशी धरून उभी राहिली, आपल्या अश्रुनी माझे केस भिजवत राहिली .......
दिवसभर आई बोलली नाही , स्वतः जेवली नाही संध्याकाळी आईचा राग शांत झाला, तिने दोघांनाही प्रेमाने जवळ घेतले, माझ्या पायावरचे वळ बघितले आणि हळद लावण्यासाठी घरात घेऊन गेली, दिवसभर मग ती माझ्याशी फार लाडाने वागत राहिली आणि संध्याकाळी विचारले " उद्या जाशी ना शाळेत ? " मी होय म्हणालो आणि तो खुश झाली. दुसऱ्या दिवशीही आदल्या दिवसाची अगदी हुबेहूब पुनरावृत्ती झाली आणि शेवटी आईने तिचे राखीव ब्रह्मास्त्र बाहेर काढले, ती मुद्दाम मला ऐकू जाईल अशी मला मुंबईला बाबांकडे पाठवण्याची गजाल कोणासोबत तरी करू लागली, मी सावध झालो आणि आई बहिणीला सोडून मुंबईला जाण्याच्या भीतीने तिसरी दिवशी बहिणीचा हात धरून निमूटपणे शाळेत जाऊन तिच्या सोबत तिच्या वर्गात बसू लागलो.....
मला बहिणीचा हात धरून चालायला आवडायचं नाही पण सारखा धडपडायचो त्यामुळे ती माझा हात धरायची आणि अजिबात सोडायची नाही, मी तिच्या वर्गात निमूट बसायचो कारण एकतर मास्तर वाडीतलेच होते आणि इतर मुली माझे लाड करायच्या, मी थोडा वेळ शिकवतात ते ऐकायचो आणि मग कंटाळून लकन्या ( डुलक्या ) काढायचो किंवा तिच्या वह्या पुस्तकांशी खेळात बसायचो. शाळेत जाण्याची वाट सरळ नव्हती, गडगे सखल, व्हाळ, पांदीतुन जायची, माझ्या पायाला दगड टोचायचे, चप्पल कुणाकडेच नसायची पण मुलांना सवयीने सहज चालता यायचे. थोडं चालून माझी कुरबुर सुरु झाली कि बहीण मला उचलून घ्यायची एका खांद्यावर तिची दप्तराची पिशवी तर दुसऱ्या कडेवर मी, लोकं आणि इतर मुलं बहिणीच्या कडेवर बसून शाळेत जाताना बघून मला हसायची पण मी माझी सोय बघायचो आणि दुर्लक्ष करायचो.
पावसाळा येईपर्यंत हे सर्व सुरळीत चालू होतं, पण पावसाळा सुरुवात झाली आणि माझ्या बहिणीला मला कडेवर घेऊन जाणं जिकिरीचं झालं, एका खांद्यावर दप्तर, दुसऱ्या कडेवर मी आणि छत्री त्यात व्हाळाला खूप पाणी असायचं ते दोन दोन व्हाळ कंबरे एवढ्या पाण्यातून मला घेऊन पार करायला लागायचे. आईने मग आम्हाला दुसरी वाट दाखवली, ती लांबची होती पण कमी जोखमीची होती. त्या वाटेनं जायचं म्हटलं तर पहिल्यांदा एका घळीत उतरावं लागे, मग एक व्हाळ पार करून पांदी पांदीतून एक टेकडी चढून जावं लागे आणि नंतर मात्र भराड होतं ( माळ किंवा टेकडीवरचा सपाट भाग ). ह्या वाटेवर फक्त एकच घर होतं, गरज लागली तर मदतीला येईल असं कुणीच नसायचं पण माझी बहीण खूपच धैर्यवान होती तिला त्या निर्मनुष्य माळरानातून जाताना भीती वाटत नव्हती किंवा ती मला तसं दाखवत नव्हती.
त्या माळरानातून जाताना मला खूप आवडायचं संपूर्ण माळ हिरवा गालिचा अंथरल्या सारखा दिसायचा, हिरवंगार, त्यात उमलली पावसाळी विविध रंगांची रानफुलं कोराटे, नागरकडवा, तेरडा, कांगला इत्यादीनि माळ बहरलेला असायचा.
भर पावसाळ्यात शाळेला पहिला महिनाभर सुट्टी असायची आणि नंतर जुलै मध्ये पाऊस जोराचा असला तरी शाळा चालूच असायची पण एकाच सत्रांत भरायची, सकाळी दहा ते संध्याकाळी पाच, पावसामुळे आधीच अंधारलेलं , घरी येईपर्यंत पूर्ण अंधार व्हायचा, पाऊस जोराचा पडला तर ह्या वाटेवरचा व्हाळालाही पूर यायचा आणि आम्ही अडकून जायचो .
असाच एक दिवसभर पाऊस पडत होता, शाळा सुटल्यावर आम्ही निघून व्हाळापर्यंत आलो आणि बघतो तर काय, व्हाळ आक्राळ विक्राळ रूप धारण करून वेगाने वाहत होता, पाणी वरच्या बांधापर्यंत म्हणजेच पुरुषभर उंचीवर पोहचलं होतं, त्या भरधाव पाण्यातून मोठे मोठे ओंडके, झाडांच्या फांद्या वाहून जात होत्या पाण्याच्या प्रवाहाचा प्रचंड आवाज येत होता, माझ्या बहिणीचीच काय मोठ्या पुरुषांचीही त्या पाण्यात उतरण्याची हिम्मत झाली नसती. घरी कुणीच नसायचं, आई रानात, जवळ एकुलतं एक घर होतं पण घरात कुणी नव्हतं सगळे शेतावर गेलेले असणार. बहीण मला घेऊन त्या घरी गेली त्यांच्या ओसरीवर आम्ही पाऊस कमी होऊन व्हाळाचं पाणी ओसरण्याची वाट बघू लागलो, आता अंधार गडद होऊ लागला होता .....
असाच खूप वेळ गेला, त्या घरीही कुणी आलं नाही पण पावसाचा जोर थोडा ओसरला, आणखी थोड्या वेळाने पाऊस एकदम टीप टिपू लागला तशी बहीण मला तिथेच थांबायला सांगून व्हाळाकडे गेली आणि पाणी बघून आली तिला पूर्ण खात्री नव्हती पण असं कितीवेळ इथे दुसऱ्यांच्या ओसरीवर बसून राहाणार म्हणून थोडं थांबून कसलासा विचार करून मग मला घेऊन ती निघाली, एव्हाना पूर्ण काळोख पडला होता, पायाखालीही नीट दिसत नव्हतं, व्हाळ पार केल्यावर घळण चढून जावं लागणार होतं, तिने डोळे मिटून देवाचा धावा केला, मला कडेवर घेण्याऐवजी खांद्यावर बसवला आणि पहिलं पाऊल पाण्यात टाकलं, थोडा अंदाज घेऊन दुसरं पाऊल उचललं, पाणी तिच्या कंबरेपर्यंत होतं त्यामुळे तिला सवय होती, अतिशय सावधपणे एकेक पाऊल घट्ट रोवून ती अर्धा व्हाळ पार करून गेली, मी तिच्या खांद्यावर असलो तरी घाबरलेला होतो. आता तिची हिम्मत वाढली होती फक्त अर्धा व्हाळ पार करायचा बाकी होता, तिने हिमतीने पाऊल उचललं आणि अचानक वरून धडधडत पाण्याचा प्रचंड लोंढा आला, पावलांची पकड सैल झाली ,तिचे पाय डगमगू लागले, तिच्या हातातली छत्री खाली पडली आणि प्रवाहाबरोबर वाहून गेली, आता मला हि टाकणार ह्या भीतीने मी रडायला लागलो पण ती रडत नव्हती पाय आणखी घट्ट रोवून स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होती, पाणी तिच्या गळ्यापर्यंत आलं होतं पण पुढे जाणं धोक्याचं होतं, " माका घट धरून ऱ्हव, सोडा नुको " ती फक्त एकदाच मला म्हणाली. मी तिचं डोकं, वेण्या घट्ट धरून स्थिर बसलो. तिने एक पाऊल मागे घेतलं आणि माणसांचा एकच गलका ऐकू आला " पोरा बुडतली, अरे धावा " सगळे धावत व्हाळाच्या ऐलतीरावर आले आणि मोठ्याने ओरडून आम्हाला म्हणाले
" भिया नुको, थयसरच ऱ्हव, आमी येताव " आणि एकमेकांची साखळी करून ते आमच्या पर्यंत पोहचले, मला एकाने आपल्या खांद्यावर घेतलं आणि बहिणीला धरून पैलतीरावर आणलं.
पैलतीरावर पोहोचताच बहिणीने आम्ही दोघेही सुखरूप असल्याची खात्री करून घेतली मला त्या माणसाच्या हातून घेतला आणि पोटाशी धरला, ती पूर्ण चिंब भिजली होती, ती एवढी धीराची पण आता संकट टळल्यावर तिचं अवसान गळालं ती रडू लागली. ते सर्व शेतावर काम करणारे गडी लोकं होते, आपापल्या घरी माघारी जात होते, आम्हाला घरी सोडायला तयार होते पण बहीण म्हणाली आम्ही जाऊ. म्हणून ते परत फिरले, मला कडेवर घेऊनच रडत रडत बहीण घळण चढली आणि बांधावर दोन्ही हात पसरून उभी असलेली आई आम्हाला दिसली, मग मात्र बहिणीने हंबरडा फोडला, आईने दोन्ही हात आधीच पसरलेले होते त्यांच्या कावेत आम्हाला घेऊन तिथेच बांधावरच्या काळोखात अश्रूंचा कोसळ पुन्हा एकदा सुरु झाला .....
पावसाळा संपला, हिवाळा गेला, उन्हाळा सुरु होऊन शाळेच्या परीक्षा संपल्या आणि शाळा पूर्ववत सुरु झाली पण आमचे भाऊ गुरुजी आणि हेड मास्तर दिसले नाहीत तेंव्हा कळलं कि दोघांचीही बदली झाली, दोन्ही नवीन मास्तर आले. शाळेच्या पहिल्या दिवशीच नेहमीप्रमाणे मी बहिणीसोबत तिच्या वर्गात बसलो होतो आणि एक धोतर नेसलेले जाडजूड मास्तर वर्गात आले, त्यांचं रूप आणि रापलेला रंग पोटात धडकी भरवणारा होता. आल्या आल्या त्यांनी मुलांना दमात घ्यायला सुरुवात केली, त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं, ते जवळ आलेले बघून मी बहिणीच्या मांडीत डोकं खुपसलं, त्यांनी तिच्याकडे माझी सगळी चौकशी केली तिनेही भीत भीत उत्तर दिली आणि दुसऱ्या क्षणी माझा एक हात धरून खसकन ओढून मला बहिणीपासून दूर केलं, एका हातात माझी पिशवी आणि दुसरी हातात माझं बखोट धरून फराफरा ओढत मला ते पहिलीच्या वर्गात घेऊन गेले आणि एका जागेवर नेऊन आदळलं, मी इतका घाबरलो होतो कि भीतीने मला रडूही येत नव्हतं फक्त हुंदकेच फुटत होते आणि मी ते गिळत होतो, दुसरे गुरुजी वर्गावर आले आणि त्यांनी फळ्यावर लिहिलं ' ग म भ न .....' आणि माझी शाळा सुरु झाली ......
समाप्त
टीप :
कोसळ मध्ये उल्लेख केलेली प्रत्येक घटना, पात्रांची नावे, स्थळ व इतर संदर्भ पूर्णपणे वास्तविक आहेत आणि माझ्या स्वतःच्या बालपणातल्या आठवणी आहेत. शब्दांकन करताना माझ्या स्मरणशक्तीच्या आणि कल्पनेच्या बळावर घटनाक्रम, तो काळ काही स्वातंत्र्य घेऊन मी रचला आहे, काही चुका आढळल्यास किंवा कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास त्या हेतुपुरस्सर नाहीत हे लक्षात घेऊन मला क्षमा असावी.