Raghunath Bile

Drama Thriller

4  

Raghunath Bile

Drama Thriller

कोसळ - २

कोसळ - २

7 mins
227


असाच एक पावसाळी दिवस उजाडला, आदल्या रात्रभर पाऊस कोसळत होता आणि अजूनही पडतच होता, बाहेर इतका अंधार होता की जणू दिवसच उजाडला नव्हता. आईची रानात जाण्याची लगबग सुरु होती, बळेबळेच आम्हाला तिने उठवलं आणि आमच्या तयारीला लागली तशी आमची तोंडं हिरमुसली, बहीण मला जवळ घेऊन आईला लाडात येऊन आईला भीती घालू लागली 

" आये, आज पावस लय हा, व्हाळाक हौर ( पूर ) इलो हा , तुका उतार गावाचो नाय, आज जाव नुको " 

खरोखरच आज आईने जाऊ नये असं आम्हाला वाटत होतं. आईलाही हे सर्व कळत होतं पण तिला काम हवं होतं, काहीतरी समजूत घालून, दोघांचेही भरपूर लाड करून, बिरमोळ्याचं ( एक गोड़ रानमुळी ) अमिश दाखवून हसत मुखाने, बहिणीच्या कोवळ्या खांद्यावर मला देऊन आई रानात गेलीच आणि आम्ही दोघेही लहानगे त्या मोठ्या घरात दिवसभरासाठी एकटे झालो, सोबत होती ती फक्त मनी मांजरीची, पण ती सुद्धा सकाळपासून कुठे गायब झाली होती.

आई गेल्यावर नेहमीप्रमाणे मी भोकाड पसरलं, बहिणीने मला बाबा पूता करून गप्प केलं आणि आईची आठवण काढू नये म्हणून माझं मन दुसरीकडे वळवलं, मातीची भांडी मांडली, झोपाळ्यावर बसून गाणी गायली पण माझं मन तेच तेच खेळून कशातच रमत नव्हतं, रडत नसलो तरी कुरबुर चालूच होती म्हणून मग शेवटी ती मला यंगेवर ( कडेवर ) बसवून पाऊस दाखवायला खळ्यात घेऊन गेली पण बाहेर पाऊस संततधार पडतच होता त्यामुळे हवेत खूप गारवा होता म्हणून लगेच आत घेऊन आली. मला आत यायचं नव्हतं, पावसाची ओसरीवरून खाली येणारी धार मुठीत पकडायची होती जमलं असतं तर तिची नजर चुकवून खाली पाण्यात उतरायचं होतं, पाण्यातले कोके ( गोगलगाय ) पकडायचे होते, आडोशाला आलेल्या बेडक्यांना पाण्यात ढकलायचं होतं पण मला थंड हवा बाधेल ह्या भीतीने घरात आली आणि परत माझी पिरपिर सुरु झाली ...

खरं तर बहिणीला पावसाळी सुट्टीतला अभ्यास असायचा पण आई घरात असताना ती तो करायची नाही कारण मी तिची पुस्तकं, वह्या आणि कंपासपेटी उघडून सगळ्या वस्तूंचा पसारा करायचो, वह्या पुस्तकं रेघोट्या मारून खराब करायचो आणि मी रडायला सुरुवात करेन ह्या भीतीने ती मला मारू किंवा ओरडूही शकणार नव्हती पण मला रमवण्यासाठी तिने ते शेवटचं अस्त्र बाहेर काढलं. मला घेऊन ती चुलीकडच्या ( स्वयंपाकघर ) खोलीत गेली कारण तिथे एक खिडकी होती जो काही थोडाफार बाहेर उजेड होता तो येत होता आणि ती खोली चुलीमुळे उबदार असायची, तिने खुंटीवरची तिची शाळेची पिशवी काढली, खाली गोधडी अंथरली ,मला खाली ठेऊन ती अभ्यासाला बसली आणि मी तिची पिशवी उघडून पसारा करायला .........

ह्यावेळी मनी मांजर मस्तपैकी चुलीच्या कुशीत उब घेत निजलेली असायची पण आज सकाळपासून ती हि कुठे तरी गेली असावी कारण तिची अजिबात जाग नव्हती, तिचं एकही म्यांव सकाळपासून ऐकलं नसल्यामुळे चुकल्या सारखं आणखीनच एकटं वाटत होतं. माझी बहीण अभ्यासात आणि मी तिच्या वह्या पुस्तकांशी खेळण्यात रमून गेलो आणि अचानक मनीचा दबलेल्या आवाजातला म्यांव ऐकू आला पण असं वाटत होतं की ती तोंडं न उघडता म्यांव ओरडली असावी, आवाज कुठून येतोय हे बघण्यासाठी आम्ही आजूबाजूला बघतच होतो इतक्यात परत त्याच आवाजातला म्यांव ऐकू आलं पण या वेळचा म्यांव थोडा तक्रारवजा होता, आमचं लक्ष वेधण्यासाठीचा होता, आणि वरून येत होता, सहाजिकच आमचं लक्ष वर गेलं.........

आमचं घर नळ्यांनी शाकारलेलं होतं ( छपरावर त्यावेळी कौले नसत तर मातीचे नळे असायचे ) व त्याखाली आतल्या बाजून लाकडी फळ्या आडव्या टाकलेल्या असत, त्या फळ्यांवर काही सामनाही ठेवता येत असे. चुलीकडच्या खोलीतहि आतल्या बाजूने ह्या फळ्या बसवलेल्या होत्या व त्यावर मनी बसली होती पण तिच्या तोंडात काहीतरी होतं, नेमकं काय होतं हे जरी कळत नसलं तरी ते हलताना दिसत होतं म्हणजेच तो कुणी जिवंत प्राणी असावा असं आम्हाला वाटलं, तो तोंडातून पडू नये म्हणूनच ती तोंडं बंद ठेऊन म्यांव करत होती.आम्ही तिच्याकडे बघतो आहोत हे पाहून तिने तोंडं उघडून पुन्हा म्यांव केलं आणि तिच्या तोंडातला तो प्राणी धपकन खाली आमच्या पुढ्यातच पडला, तो लांब आकाराचा पण छोट्या जातीचा साप होता, वळवळत तो लपण्यासाठी जागा शोधू लागला, पाठोपाठ मनीनेही खाली उडी घेतली पण त्यापूर्वीच माझ्या बहिणीने अतिशय धैर्य व चपळाईने मला उचलून आपल्या पोटाशी धरलं आणि क्षणार्धात वह्या पुस्तकं तिथेच टाकून चुलीकडच्या खोलीतून जिवाच्या आकांताने बाहेर पडली .......

चुलीकडच्या खोलीनंतर वळय म्हणजेच मोठा हॉल त्यानंतर ओटी व त्यानंतर पडवी, हे सर्व मला पोटाशी धरून त्या चिमुरड्या मुलीनं जीव खाऊन पळत पार केलं आणि ती ओसरीवर येऊन थांबली, मला जाणवत होतं की तिचा उर कितीतरी वेळ धपापत होता, घाबरून ती रडू लागली होती पण मी सुद्धा भिऊन जाऊ नये म्हणून ती फक्त उसासे टाकत होती. थोड्या वेळाने तिने मला खाली उतरवलं, स्वतः घराच्या पेळएवर ( सभोवती बांधलेली थोडीशी उंच जागा ) पायाच्या चवड्ययावर उभी राहून आजू बाजूच्या शेतात किंवा पांदीत मदतीसाठी कुणी दिसतंय का हे पाहू लागली, खूप जोरजोराने ओरडून जर कुणी असलेच तर लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करू लागली आणि थोड्या वेळाने दमून जाऊन हताशपणे खाली उतरली. काही मदत मिळण्याची आशा संपल्यावर ती मला घेऊन निराश होऊन खाली भिंतीला टेकून बसली, मला पोटाशी धरून फक्त थोपटत आणि आगतिकीने अश्रू ढाळीत तशीच बसून राहिली.......

अचानक उद्भवलेल्या प्रसंगाने मी भेदरून गेलो होतो, बहिणीला चिकटून बसलो होतो, काय होतंय ते पूर्ण काळात नसलं तरी संकटाची जाणीव माझ्या छोट्या जीवाला झाली होती, आई नसताना माझी बहीणच माझा आधार आहे मला वाचवण्यासाठी ती काहीही करेल हे पटलं होतं, मलाही खूप रडू येत होतं पण तिला रडताना बघून मी हुंदके गिळत होतो. माझी जेवणवेळ कधीच टाळून गेली होती, भूकही लागली होती, तिलाही लागली असणार पण मला बाहेर एकट्याला सोडून किंवा सोबत घेऊन परत चुलीकडच्या खोलीत जाण्याची तिची हिम्मत नव्हती. एक आठ वर्षांची मुलगी धीर म्हणून किती एकवटणार ती फक्त माझ्या पाठीवर थोपटत, केसांतून हात फिरवत माझे पापे घेत " भूक लागली हा माझ्या बाबुक, आता आये येतली खावक हाणातली, बाबुक भरवतली " म्हणत माझी आणि स्वतःची समजूत काढत होती आणि मी सुरक्षेच्या भावनेने, बहिणीच्या मायेच्या उबदार कुशीत गाढ झोपी गेलो होतो..... 

मी जागा झालो तेंव्हा पाऊस पडतच होता, बहीण मला जाग येईल म्हणून जागेवरून हलली सुद्धा नव्हती, बाहेर आणखीनच अंधार झाला होता, रात्र झाली ह्या समजुतीने की काय छोट्या बेडक्या टिक्यांव टिक्यांव असं ओरडू लागल्या होत्या, आमच्याकडे काही घड्याळ नव्हतं आणि आज सूर्य हि नव्हता त्यामुळे संध्याकाळ झाली आहे की रात्र हे कळत नव्हतं पण आपली आई आता लवकरच येईल हि आशा होती. घरातून मनीचसारखं म्यांव म्यांव ऐकू येत होतं पण ती काही घराबाहेर येत नव्हती, बहिणीने मला ओसरीला नेऊन सुसु करवून आणलं मला खालीच ठेऊन पेळयेवर चढून आई दिसते का खूप वेळ उभं राहून बघितलं पण तिचे पाय दुखले आणि नेहमीच्या वाटेवर आई दिसली नाही म्हणून मला घेऊन आईची वाट बघत बसून तिचं नेहमीचं गाणं गाऊ लागली " आराड गे बांडके सांज जावंदे, आये माझी घराक येवंदे " .........

थोड्याच वेळात अंधार आणखी गडद झाला, रातकिडेही किरकिरायला लागले, मीही चूळबुळायला लागलो तशी ती परत उठून पेळयेवर चढली आणि मोठमोठ्याने तिच्या बाळ आवाजात कुकारे घालू लागली पण तिचे कुकारे ऐकायला आणि त्यांना प्रतिसाद द्यायला वाटेवर आई नव्हती, आम्ही दोघांनीही सकाळपासून पाणीही प्यायलो नव्हतो, तिची सहनशक्ती, संयम, आता संपुष्टात येत होता, आईची चाहूलही न लागल्यामुळे धीर खचत चालला होता. रडकुंडीला येऊन दमून ती परत खाली बसली, कावऱ्या बावऱ्या नजरेने, कधी माझ्याकडे कधी वाढत जाणाऱ्या अंधारात बघत राहिली आणि अचानक " कुकु " असा कुकारा आला पण तो नेहमीच्या आईच्या वाटेवरून आला नव्हता तर मागच्या दाराने येत होता, बहिणीने आईचा कुकारा ओळखला आणि मला काखोटीला मारून ती ओसरीवरून मागे धावत गेली, आई खूप जवळ होती, आपली पिल्लं पाहिल्यावर तिच्या जीवात जीव आला, धावतच येऊन तिने दोघांनाही पोटाशी धरलं आणि बहिणीने हंबरडा फोडला......

रडत रडत बहिणीने सकाळ्पासूनची सर्व हकीकत आईला सांगितली, आम्हाला पुरेसा धीर दिल्यावर, आम्ही तिच्या डोळ्यातून कोसळणाऱ्या अश्रुनी आणि तिच्या ओलेत्या अंगाने पूर्ण भिजल्यानंतर आईने आम्हा दोघांनाही बाहेरच थांबायला सांगून, घरात प्रवेश केला, आत शिरताना कोनाड्यातली काठी घ्यायला ती विसरली नाही, आतून मनीच म्यांव म्यांव अजूनही येत होतं. अतिशय भेदरून आम्ही दोघंही अंधारात उभे होतो, आई आत गेली होती म्हणजे आम्हाला भीती नव्हती पण तिला नक्कीच धोका होता, इतक्यात आईने जोरजोरात बोललेलं आम्हाला ऐकू आलं तसे दोघेही हिम्मत करून आत गेलो, ओटीवर आणि वळयमध्ये अंधार होता पण चुलीकडच्या खोलीतून दिवटीचा मिणमिणता उजेड येत होता, आम्ही वळय आणि चुलीकडच्या खोलीच्या दारात उभे राहून आत डोकावू लागलो, साप रक्तबंबाळ होऊन गोधडीबाहेर जमिनीवर पडलेला होता, त्याची वळवळ थांबलेली होती,मनी एखाद्या विरांगनेसारखी त्याच्यावर एक पाय देऊन उभी होती आणि आई भीती, कौतुक आणि सुटकेच्या समाधानाने स्तब्ध उभी होती, तिच्या डोळ्यातून अश्रूंचा कोसळ सुरु झाला होता............

समाप्त 


टीप : 

कोसळ मध्ये उल्लेख केलेली प्रत्येक घटना, पात्रांची नावे, स्थळ व इतर संदर्भ पूर्णपणे वास्तविक आहेत आणि माझ्या स्वतःच्या बालपणातल्या आठवणी आहेत. शब्दांकन करताना माझ्या स्मरणशक्तीच्या आणि कल्पनेच्या बळावर घटनाक्रम, तो काळ काही स्वातंत्र्य घेऊन मी रचला आहे, काही चुका आढळल्यास किंवा कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास त्या हेतुपुरस्सर नाहीत हे लक्षात घेऊन मला क्षमा असावी. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama