Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Raghunath Bile

Romance


3  

Raghunath Bile

Romance


हिशेब

हिशेब

14 mins 84 14 mins 84

अंधाराची घट्ट वीण झिरझिरीत होऊन हळूहळू फिटत होती आणि कालची रात्र सरून पहाटेचा निळसर उजेड ' दौलत नगर ' वस्तीवर पडला होता. पूर्वेला तांबूस छटा आभाळावर उमटल्या असल्या तरी सूर्याची किरणं मात्र झोपड्यांवर पडायला खूप अवकाश होता, ती प्रथम प्राधान्याने आजूबाजूच्या टॉवरवर पडणार होती आणि मग सरकत सरकत खाली घसरणार होती. साई अजून झोपलेलाच होता, कामावर जाण्यासाठी खरं तर त्याने इतक्यात उठायला हवे होते पण रात्री स्मशानातून यायलाच त्याला दोन वाजले होते. वस्तीत त्यांच्याच गल्लीत काल दुपारी करोना बाधित दोघेजण मयत झाले होते, एकतर अवघ्या चाळीस वर्षांचा दांडगा पुरुष होता. साई काल संध्याकाळी कामावरून परस्पर ' कूपरला ' गेला होता, गल्लीतली इतर मुलं जमली होती पण नातेवाइकांशिवाय कुणालाच आत सोडले नव्हते. जे दोन दोन नातेवाईक आत होते त्यांनी कसेबसे रडून भाकून पैसे दाबून रात्री आठ वाजता प्लास्टिकमध्ये लपेटलेले मृतदेह ताब्यात मिळवले होते. मृतदेह घरी आणायचं तर दूरच पण त्यांचे चेहरेही न पाहाता परस्पर स्मशानात नेले होते व चार तास रांगेत राहून तिथेही पैसे दाबून रात्री एक वाजता जाळले होते. काल दुपारपासून अन्न पाण्याविना हेलपाटे घालत असणारी इतर मुलं थकून भागून शांतूच्या अड्ड्यावर दारू प्यायला बसली आणि न पिणारा साई तडक घरी येऊन आंघोळ करून झोपला होता.....


मुंबईत गेले चार महिने मृत्यूचं तांडव करून 'करोना' आता थोडा थकला होता, आता रुग्णसंख्या घटत होती, निर्बंध शिथिल होत होते. हातावर पोट असणारे लोक रोजगार शोधायला बाहेर पडत होते, बाहेर पडलं तर करोना संसर्ग घरात राहिलं तर उपासमार, मरण काही चुकणार नव्हतंच. मुंबईसारखं गजबजलेलं शहराचंच एक मोठं स्मशान झालं होतं, दिवसा रात्री रस्ते, गल्ल्या सुनसान, रुग्णालये, औषध दुकाने सोडून सर्व काही बंद. ना छोट्या मुलांचा किलबिलाट, ना रहदारीचा आवाज, पक्षी देखील दिवसा चिडीचूप झाडावर बसून असायचे. फक्त वाढत होता तो प्रेतागृहांत आणि स्मशानात मुडद्यांचा खच आणि रात्री बेरात्री तोंड वर करून विव्हळणाऱ्या बेवारस कुत्र्यांचा भेसूर आवाज. पण आता नेहमीप्रमाणेच मुंबई सावरली होती, तिच्यात जीव येऊन ती हात पाय हलवू लागली होती .......


" साई उठ आता, कितीवेळ लोळत पडणार आहेस? खाडा करू नको बाबा आता तर काम सुरु झालंय " संगीता हातातली कामं न थांबवता माळ्यावर झोपलेल्या एकुलत्या एक मुलाशी बोलत होती.

" आई उठतो ग, आज मार्केटला जायचंय शेठ बरोबर "

" अरे पण तू जाणार कसा? ट्रेन सुरु नाही झाल्यात अजून "

" रिक्षाने जाईन जुहू सर्कलपर्यंत, तिथे शेठ गाडी घेऊन येणार आहे अकरा वाजता "

" ठीक आहे पण काळजी घे गर्दीत, मास्क लाव आणि डबा भरून ठेवलाय तो न्यायला विसरू नको, मी जाते कामावर "

" अग डबा कुठे बसून खाऊ आता? " 

" खा कुठेही, का शेठ घालणार आहे जेवायला " असं बडबडतच ती आपली पिशवी घेऊन चप्पल पायात सरकवून घराबाहेर पडली. 

ती घराबाहेर पडताच साई उठला, ट्रंक उघडून त्याने पावसाळ्यातल्या डिस्काउंट सेल मध्ये घेतलेला 'ली ' टीशर्ट आणि जीन्स बाहेर काढली, ट्रंक मध्ये ठेवून कपडे चुरगळले होते ते घेऊन तो बाहेर इस्त्रीवाल्याकडे गेला, परत येतानाच नसीमच्या सलूनमधून गुळगुळीत दाढी करून आला. डबा आणि नेहमीच्या वापरातला येताना बदलण्यासाठी एक शर्ट बॅगेत भरून तो आंघोळीला गेला पण तयार झाल्यावर त्याच्या लक्षात आलं कि आपल्याकडे जीन्सवर चांगले कॅज्युअल शूज नाहीत, तो पळत पळत 'आदीकडे' जाऊन त्याचे ' नायके ' घेऊन आला. त्याने सर्व तयारी व्यवस्थित झाल्याची एकदा खात्री करून घेतली, शेवटचं आरश्यात बघून भिंतीवरच्या देवाला हात जोडून तो एक्स्प्रेस ट्रेन सारख्या धडधडणाऱ्या काळजाने तिला पहिल्यांदाच भेटण्यासाठी घराबाहेर पडला .......


आत्ताशी कुठे सकाळचे साडे दहा वाजले होते, बसने जरी गेला तरी जुहू बीचवर पोहचायला त्याला फार तर अर्धा तास लागला असता पण तो आत्तापासूनच निघाला होता. कोपऱ्यावरच्या बस स्टॉपवर त्याला एसिक नगर पर्यंत जाणारी २५७ मिळाली, पाच मिनिटात एसिक नगर, तिथून चालत चालत जुहू सर्कलवरून चालत इस्कॉनच्या हरे कृष्ण मंदिरापाशी पोहोचला. लवकर निघायच्या घाईत त्याने निघताना चहा चपातीही खाल्ली नव्हती त्यामुळे भूक लागली होती आणि घाईगडबडीत निघाल्यामुळे पाण्याची बाटलीही तो विसरला होता , त्याचा विचार होता थोडावेळ मंदिरात बसून प्रसाद खाऊन मग बीचवर जायचे त्यामुळे काळजातली धडधडही थांबेल आणि वेळही जाईल पण करोना निर्बंध शिथिल झाले असले तरी अजून धार्मिक स्थळांना उघडण्याची परवानगी नव्हती. बाहेरूनच नमस्कार करून तो समोरच्याच मुक्तेश्वर देवळाच्या बाजूच्या लेनमधून चालत बीचवर आला, फक्त सवा अकरा वाजले होते अजून पाऊणतास तरी तिची वाट बघण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता कारण ती तिच्या सकाळच्या अकरावीच्या लेक्चरला दांडी मारून जुहू तारा रोडवरच्या बंगल्यातील स्वयंपाकाचं काम आटोपून बारा वाजता येणार होती, थकल्या पायांनी, भुकेल्या पोटी, कोरड्या घश्याने त्याने वाळूत फतकल मारली .....

******************

समोर उधाणलेल्या समुद्राच्या अंगावर येणाऱ्या लाटा जणू त्याला आव्हान देत होत्या आणि तो मागे मागे सरकत भूतकाळात ढकलला जात होता. दारू पिऊन पिऊन त्याचे वडील लिव्हर फुटून गेले तेंव्हा तो अकरावी कॉमर्सला होता आणि अभ्यासात हुशारही होता, त्याच्या आईने त्याचं ते वर्ष फुकट जाऊ न देता त्याला बारावी पर्यंत शिकवलं प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये मिळणाऱ्या बदली आयाच्या पगारात दोघांचे कसेबसे भागात असले तरी पुरेसे नव्हते हे ओळखून त्याने साकीनाक्याला एका पॅकेजिंग फॅक्टरीमध्ये नोकरी मिळवली व मुंबई युनिव्हर्सिटीचा बीकॉम कोरोस्पॉन्डन्स कोर्स जॉईन केला. 'दौलत नगर ' सारख्या झोपडपट्टीत जन्माला येणारं प्रत्येक मुल काही ना काही स्वप्न घेऊन जरी जन्म घेत असलं तरी साई सारखी फारच थोडी मुलं त्या स्वप्नांच्या मागे धावत असतात आणि बाकीची हलाखी, व्यसनं, वाम मार्गाने जगणं स्वीकारतात. साईने 'दौलत नगर ' ची दौलत जन्मापासून पाहिलीच नाही तर अनुभवली होती आणि म्हणूनच तो आपल्या छोट्या छोट्या स्वप्नांच्या माळेत आईला आणि आता सोनलला गुंफून आयुष्य शोभिवंत करू पाहात होता......


एका वस्तीत राहात असून, एकाच शाळेत जात असूनहि सोनलशी त्याची कधी मैत्री झाली नव्हती, झाली होती ती केवळ भांडणेच. कधी वस्तीच्या गणपती, नवरात्री कार्यक्रमात जागा अडवण्यावरून तर कधी वर्गणी मागणीवरून, त्याला ती फारच आगाऊ आणि तोंडाळ वाटायची तर तिला तो घमेंडी आणि आखडू. बालपणापासून एकाच गल्लीत वाढूनही ते दोघेही एकमेकांशी बोलायचे नाहीत आणि वेळ पडलीच तर ते एकमेकांचा उद्धार करण्यासाठी. त्या रात्री खूप उशिरा वडील घरी आले नाहीत म्हणून दोघेही वस्तीभर धावाधाव करीत शेवटी एकाच वेळी शांतूच्या खोपटात घुसले आणि एका सुरात ओरडले " बाबा "........


दोघांचेही बाबा पिऊन तर्रर्र झाल्यामुळे स्वतःच्या पायांनी घरी चालत जाणे शक्य नव्हते, त्या दोघांनी एकेकाच्या बापाला दोन्ही बाजूनी आधार देऊन आपापल्या घरी आणून सोडले. बापांना दोन्ही बाजूनी धरून तोल सावरताना त्यांना एकमेकांचा स्पर्श झाला आणि प्रथमच तो हवाहवासा वाटला. इतरवेळी काही कारणाने किंवा मारामारी करताना झालेल्या स्पर्शाची त्यांना कधी जाणीवही नव्हती पण हा ओझरता स्पर्श एक नवीन अनुभूती देत होता, बापाला दोन्हीबाजूनी खांद्यावर हात ठेऊन असेच चालत राहावे, घर येऊच नये असे वाटत होते. बापांना घरी सोडल्यावर थकून भागून हाशहुश करीत ते दोघे शेड्यावरच्या मोरीच्या कठड्यावर विसावले आणि कितीतरी वेळ अबोलपणे एकमेकांच्या उमलत्या तारुण्याचं अंधुक उजेडात चोर निरीक्षण करीत राहिले, दरवळणाऱ्या यौवनगंधात सर्व जगाला विसरून बेभान झाले .......


ते साईचं अकरावीचं वर्ष होतं, त्याचं जुनिअर कॉलेज दुपारच्या सत्रात असल्यामुळे अर्धा दिवस तो घरीच असायचा, सकाळी सावकाश आई कामावर गेल्यावर उठायचा. सोनल नववीत होती आणि शाळेचा रस्ता साईच्या घरावरूनच पुढे जात होता. एक दिवस साईच्या वर्गशिक्षकांनी साईला देण्यासाठी एक पत्र तिच्याकडे दिलं पण शाळेतून ती परत येताना तो कॉलेजला गेलेला असायचा आणि संध्याकाळी ती विसरून गेली म्हणून दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना तिने द्यायचे ठरवले. तीची सकाळी सातची शाळा असल्यामुळे ती सकाळी साडेसहा वाजताच निघायची. आठवणीने ती पत्र देण्यासाठी साईच्या घरी गेली, दार उघडचं होतं, घरात कुणीच नव्हतं, पाणी भरण्याची वेळ असल्यामुळे साईंची आई बहुतेक सार्वजनिक नळावर गेली होती. आतल्याच शिडीने ती माळ्यावर चढली, माळ्यावरच्या खाटेवर साई झोपलेला होता, खूप छान दिसत होता, केस विस्कटून चेहऱ्यावर आले होते. तो बहुदा स्वप्नात असावा, चेहऱ्यावर स्मितहास्य आणि आनंद होता, तिने त्याला उठवलाच नाही नुसतं एकटक त्याच्या त्या रांगड्या रुपाकडे बघत राहिली. कुणीतरी आपल्याकडे अगदी जवळ उभं राहून एकटक बघतंय ह्या अंतर्मनाच्या जाणिवेने किंवा स्वप्न तुटल्यामुळे तो जागा झाला आणि शेजारीच शाळेच्या युनिफॉर्ममधली दोन पोनीटेल बांधलेली गोड सोनल उभी असलेली बघून पुन्हा पुन्हा डोळे चोळीत उठून बसला. झोपेतलं पाहत स्वप्न इतक्या लवकर खरं ठरतं ह्यावर त्याचा विश्वासच बसेना, सोनलला तशीच चादरीत ओढून घ्यावी अशी अनावर इछा त्याला झाली आणि नकळत त्याचा हात पुढे झाला. तो जागा झालाय, आपण त्याला न्याहाळताना पकडले गेलोय आणि त्याची बदललेली नजर तिने ओळखली आणि लाजेने चूर होत त्याच्या पुढे झालेल्या हातावर शाळेतून दिलेलं पत्र ठेवून ती त्याची नजर टाळून एक शब्द न बोलता धडधडत शिडी उतरून निघून गेली .......


सोनलची आई नसल्यामुळे तिचा सांभाळ तिच्या वडिलांनी करायच्या ऐवजी त्यांनाच सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर आली होती, साईचे वडील वर्षभरापूर्वी गेले असले तरी तोपर्यंत त्यांना शोधून, सांभाळून आणायची जबाबदारी आईने त्याच्यावरच टाकली होती. दोघेही त्यामुळे अधूनमधून कधी बापांना शोधताना तर कधी उगाच काही नसलेलं काम काढून एकमेकांना भेटण्याच्या संधी शोधू लागले. तो कधी कधी तिच्या शाळा सुटण्याच्या वेळेला शाळेजवळ घिरट्या घालू लागला पण ती कायम मैत्रिणींच्या गराड्यात असल्यामुळे दुरून बघूनच परतण्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं. दहावीच्या प्रिलिम परिक्षेनंतर बोर्डाच्या परीक्षेसाठी शाळाही बंद झाली त्यामुळे त्याला नयनसुखही घेता येईना. जे प्रेम करतात त्यांना भेटण्याचा एक मार्ग बंद झाला तर दुसरे दहा मार्ग सुचतात त्याप्रमाणे एकदा असेच ते बाजारात भेटल्यावर त्याने तिला विचारलं " काय गं कसा चाललाय अभ्यास तुझा ? "

" नाही रे, काही काही समजतच नाही अजून, शाळेत लक्ष दिल नाही ना "

" शाळेत जा ना मग, दहावीच्या अडचणी सोडवायला शिक्षक येतात अजून "

" नको रे, खूप वेळ जातो, तू शिकवशील मला "

" मी ? " 

" मग ? तू आता बारावीत आहेस आणि एसेस्सीला पासष्ट टक्क्यांनी पास झालयास "

" तुला बरी माहिती "

" तुझी आई अख्ख्या वस्तीत पेढे वाटत फिरत होती सांगत "

" ठीक आहे, पण माझी आई असते ना घरी "

" मग ? ती काय शिकवायला नको सांगणार आहे, मी विचारते हवं तर "

" नको नको, तू येत जा सकाळी आई गेल्यावर, माळ्यावर "

" माळ्यावर का ? " ती चमकली 

" अगं मला उठवायला, नाहीतर मी झोपून राहातो दहापर्यंत " तो ओशाळला 

" चालेल, उद्या येऊ ? "

तो म्हणणार होता आताच ये पण त्याची हिम्मत झाली नाही, फक्त हो म्हणून आणि चिकन घेऊन तो घराकडे वळला .....


वस्त्या, चाळी कितीही अगोचर आणि वाचाळ असल्यातरी सकाळच्या वेळी कुणाला इथे तिथे बघायला वेळ नसतो, पाण्याची घाई, कामावर जाणाऱ्यांची घाई, शाळेतल्या मुलांची घाई त्यामुळे डोळे जरी टकामका बघत असले तरी एका जागेवर नजर टिकत नसते. सगळीकडे चाहूल घेत, साईंची आई कामावर गेल्याची खात्री करत सोनल त्याच्या माळ्यावर चोर पावलांनी जाऊ लागली. त्याला झोपेतून उठवल्यावर तो आधी तिला उठल्या उठल्या डोळे भरून बघून घ्यायचा. साई स्वतः गणितामध्ये 'ढ' होता आणि ती नेमकी गणिताच्या शंका त्याला विचारायची, तो कशीबशी वेळ मारून तिला छानपैकी त्याच्या आवडीचे इतिहास, मराठी, हिंदी विषय शिकवू लागला. तिला सगळं कळत होतं कि तो जीव ओतून शिकवतच नाहीय तर आपल्याला बघतोय, ऐकतोय, आपल्या शरीराच्या रोमरोमात झिरपतोय पण काही केल्या व्यक्त करायची हिम्मत करीत नाहीय. मग तिनेच शक्कल लढवली, बोलता बोलता त्याला विचारलं " साई एक विचारू का ? "

" हो विचार ना बिनधास्त "

" तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस ? " 

" म्हणजे, कशाबद्धल ? "

" तुझ्या डोंबलाबद्धल, अरे बारावीनंतर ? "

" मला बीकॉम कम्प्लिट तर करायचंय पण पहिला मी जॉब शोधणार आणि सकाळचं कॉलेज घेणार किंवा मग करस्पॉन्डन्स कोर्स करणार, माझ्या आईला जमत नाहीत गं आता हॉस्पिटलची आणि पेशंट्सची कामं " 

" आणि मग ? "

" मग काय ? " 

" घरातली, नळावरून पाणी भरायची जमतात होय रे कामं तिला ?"

" झेपताहेत तोपर्यंत करेल ती " 

" आणि नाही झेपली कि ? " आतापर्यंत ती सहज विचारात होती पण हे विचारताना तिच्या डोळ्यात एक चमक आली होती, चेहऱ्यावर खट्याळ हसू होतं आणि एक हात गालावर होता.

 तिचा प्रश्न त्याच्या लक्षात आला नव्हता कि त्याला उत्तर सुचत नव्हतं, तो चाचरत म्हणाला 

" मी... मी.... मला वस्तीत नाही राहायचं, घरात पाणी, टॉयलेट असेल अश्या छोट्याशा का होईना ब्लॉकमध्ये राहायचं, मी तिला म्हणजे आईला आणि तुला नाही ठेवणार इथे " तो झटकन बोलून गेल। चूक लक्षात आल्यावर एकदम वरमला, घाबरला पण त्याआधीच तिने पटकन शब्द पकडला आणि चमकून विचारलं 

" मला ? " 

" म्हणजे माझ्या फॅमिलीला " भीत भीत तो म्हणाला

" असं होय, तुझ्या फॅमिलीला " त्याला खट्याळपणे अजून सतवावं म्हणून तिने पटकन पुस्तक गोळा केली आणि ती फणकाऱ्याने निघून गेली ......


त्याला सोनल खूप आवडू लागली होती, दिसायला ती सुंदर नसली तरी चेहऱ्यात गोडवा आणि अंगाने रसरशीत होती. आई नसल्यामुळे आणि वडील तिच्यासाठी कधीच नसल्यामुळे वस्तीतल्या लोकांना, मवाली पोरांना तोंड देत फटकळ बनली होती. आईच्या पश्चात घर संभाळल्यामुळे ती व्यवहारी बनली होती. तो तिच्यावर जीव ओतून प्रेम करू लागला होता. तिला सोबत घेऊन पुढच्या आयुष्याची स्वप्न रंगवू लागला होता. त्याला माहीत होतं कि ती वस्तीतल्या कुठल्याच मुलाला तिच्या आसपासही फिरकू देत नव्हती आणि खात्री होती कि त्याच्यावर प्रेम करते आहे. प्रेम व्यक्त करायची त्याला हिम्मत होतं नव्हती आणि तिला त्याच्याकडूनच ते व्यक्त करून हवं होतं. तसं ते तिला त्याच्याकडून वदवून घेता आलंच नाही पण व्यक्त करण्याची संधी मात्र मिळाली. 


तिची एसेस्सीची परीक्षा दुसऱ्या दिवशी सुरु होणार होती, तिची संपल्यावर त्याची बारावीची सुरु होणार होती त्यामुळे ती आता त्याच्या घरी येणार नव्हती. त्या दिवशी रात्री साई माळ्यावर अभ्यासाला बसला होता आणि ती घरी आली त्याच्या आईला भेटून म्हणाली " काकी माझी दहावीची परीक्षा आहे उध्यापासून, पाया पडते , ऑल द बेस्ट करा " म्हणून पायाही पडली. साईच्या आईने त्या आईवेगळ्या मुलीला प्रेमाने जवळ घेतले व तोंड भरून आशीर्वाद दिला. जाता जाता तिने विचारलं " साईचं पण बारावी आहे ना यावर्षी , कुठे आहे तो ? "

" होय गं अभ्यास करतोय माळ्यावर तो , जा भेटून ये हवं तर " तिला आयतीच संधी मिळाली आणि ती पाय न वाजवता माळ्यावर आली. ती सकाळी येऊन गेली होती त्यामुळे परत आणि तेही आई असताना ती येईल ह्याची त्याला अजिबात अपेक्षा नव्हती, तो वाचत पडला होता, तिला पाहून तो आश्चर्यचकित आनंदित आणि भयभीत झाला. " तू आणि आता ?" त्याने डाव्या कुशीवर वळत विचारलं 

" होय मीच आणि तुझ्या आईनेच पाठवलाय मला " 

" अरे वा, हुशार आहेस, आईला पटवलंस वाटतं "

" अरे उद्यापासून परीक्षा आहे तर आजच गुरूचा आशीर्वाद घ्यावा म्हटलं, उद्या काही भेटणार नाहीस "

" ओह हो, आशीर्वाद वै. ठीक आहे, यशस्वी भव " त्याने आशीर्वाद देतात तसा हात केला, तिला हसू फुटलं

त्याने जवळच पडलेली कॉलेजची बॅग घेतली, झिप उघडली आणि मोठ्ठ 'कॅडबरी सिल्क ' काढून तिच्या हाती दिलं

" हे काय, कशाबद्दल ? "

" परीक्षेला निघण्याआधी तोंड गोड करावं म्हणून आणि उद्याच्या हॅपी बर्थडे साठी "

" थँक यु, थँक यु, मग रिटर्न गिफ्टही द्यायला हवं "

" दे, देना मग " ती काहीच बोलली नाही त्याच्या डोळ्यात न पाहाता खाली वाकली, त्याच्या अगदी जवळ आली, आधारासाठी त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला काही कळण्याअगोदर त्याच्या उजव्या गालावर आपले रसभरले ओठ टेकवले आणि त्याच्याकडे पुन्हा वळूनही न बघता धडधडत शिडी उतरून निघून गेली आणि तो कितीतरी वेळ थरथरत राहिला ......

***************************

त्या आठवणींतून तो भानावर आला तेंव्हा त्याचं संपूर्ण अंग शहारलं होतं, छातीतून राजधानी एक्सप्रेस धावत होती आणि जीभ कोरड्या टाळ्याला चिकटली होती. बारा वाजले होते पण ती अजून आली नव्हती, वळून वळून सारखं बीचवर येणाऱ्या लेनकडे बघून त्याची मान दुखायला लागली आणि तो समोर समुद्राकडे पाहू लागला. किती उशीर केलाय हिनं, येतेय कि नाही ह्या शंकेनं त्याला घेरलं, तिला निघायला मिळालं नसेल इथपासून वाटेत काही अपघात तर झाला नसेल इथपर्यंत मन चिंतू लागलं. जसजसा वेळ पुढे जाऊ लागला तशी त्याच्या समुद्राला ओहोटी लागू लागली, छातीत धडधडत धावणारी राजधानी स्लो झाली, डोळे विझू विझू झाले आणि मागे वळून न बघताही त्याला तिची चाहूल लागली. तो अगदी खंबीरपणे आपल्याला काही पडलेलीच नाही असा चेहरा करून समुद्राकडे बघत राहिला. सोनल येऊन शेजारी बसली आणि मधाळपणे म्हणाली 

" रागावलाहेस ? "

" .............." तो ढिम्म बसून समुद्र बघत राहिला 

" सॉरी बाबा, निघायलाच उशीर झाला, खूप काम होतं, बंगल्यावर पाहुणे यायचे आहेत संध्याकाळी, मला परत जावं लागणार "

".............." तो ढिम्मच 

" भूक लागलीय का तुला ?, मी खायला आणलंय तुझ्यासाठी "

" ............." त्याने फक्त बेफिकिरीने तोंड फिरवलं 

" असं नको ना करू, पहिल्यांदा भेटतोय ना आपण मग अबोलच राहायचं का साई राजा ?"

तिने साई शब्दाला जोडलेल्या ' राजा ' शब्दाने अचूक कामं केलं, तिच्याकडे वळून हसत तो म्हणाला " पाणी दे आधी, तासभत बसलोय इथे भुका प्यासा "

तिने खांद्यावरच्या बॅगेतून पाण्याची बाटली, एक डबा काढला, बाटलीचं बूच काढून त्याच्या तोंडाला लावली. तहानेने व्याकुळ तो घटाघटा पाणी पिऊ लागला, पिता पिता त्याला ठसका लागला, ते बघून तिचा जीव कासावीस झाला, तिने त्याच्या पाठीवर थोपटलं. तिने डब्यात मालकिणीने दिलेले गरमागरम पॅटिस आणले होते, त्यानेही त्याचा डबा उघडला. हसत खिदळत दोघेही जेवले. जेवून झाल्यावर मागे सावलीत इमारतीच्या भिंतीकडे सरकले, सोनलने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं त्याने तिच्याभोवती आपले बाहुपाश टाकले आणि खूप वेळ दोघेही अबोलपणे एकमेकांच्या मिठीत हरवून गेले.......


उन्ह अंगावर पडली तेंव्हा ते भानावर आले, दुपारचे अडीज वाजले होते आणि ठरवल्याप्रमाणे त्यांना गोरेगांवच्या ओबेरॉय मॉलमध्ये पीव्हीआर थिएटरमध्ये तीनच्या हिंदी पिक्चरच्या शोला जायचे होते. थिएटर्सना करोना निर्बंध पाळून सुरु करण्यास नुकतीच परवानगी मिळाली होती आणि सोनलला पीव्हीआर थिएटरमध्ये नव्याने चालू झालेल्या पीएक्सएल मध्ये सिनेमा बघायचा होता. साईने ऑनलाईन तिकिटं बुक केली होती पण सोनलला तिकीटाची किंमत कळली असती तर ती तिकिटामागे साडेसातशे रुपये घालवायला तयारच झाली नसती. त्याचा तर अजून कंपनी चालू झाल्या नंतरचा पहिला पगारही झाला नव्हता पण मित्राकडून उधार घेऊन त्याने आजचा प्लॅन आखला होता. रिक्षा करून दोघेही ओबेरॉय मॉलमध्ये पीव्हीआर थिएटरमध्ये पोहोचले तेंव्हा राष्ट्रगीत चालू झाले होते त्यामुळे त्यांना अंधारातच उभे राहावे लागले. पिक्चर सुरु झाला पीएक्सएल पडद्याची भव्यता आणि साउंड क्वालीटी ऐकून ते दंग होऊन पिक्चर बघू लागले, त्याने आपला उजवा हात पाठीमागून तिच्या खांद्यावर टाकला त्यावर तिने डोकं विसावलं. पिक्चर प्रणयरम्य होता, बालपणात बिछडलेला तारुण्याने सळसळणारा राजबिंडा हिरो आणि सुंदर हिरोईन प्रेमगीत गात स्वित्झरलँडमधल्या डोंगर दऱ्यातून पळू लागले.........


बघता बघता साई घोड्यावरून दौडत आला, खाली वाकून एका हाताने त्याने सोनलला अलगद वर उचलून घेतले आणि पुढ्यात बसवले. दोघेही मग घोड्यावरून नद्या, नाले, पर्वत, बागा, दऱ्या खोऱ्यातून घोडा उधळावीत हवं तसं प्रेम करीत, मिठ्या मारीत, किस करीत गाणी गाऊ लागले.......इंटरव्हल कधी झाला कळलंच नाही. साईने तिच्या खांद्यवरचा हात काढला, बाहेर जाऊन पॉपकॉर्न आणि कोक घेऊन आला. इंटरव्हल नंतर गरीब श्रीमंतीमधली फळी आईवडिलांचा विरोध, तिचा राजवाडा सोडून त्याच्या नदीकाठच्या झोपडीवजा घरी येणं, पाठोपाठ तिचा बाप आणि खुपसारे बलदंड खतरनाक खलनायक........ साईने एकट्याने त्या सगळ्यांशी दिलेली जीवघेणी झुंज आणि शेवटी गुंडांचा नायनाट करून प्रेमाचा विजय, ते दोघेही हातात हात घेऊन पुन्हा बागडू लागले..........लाईट्स लागले आणि एक्झिट डोरने लोकं बाहेर पडू लागले........


त्यांनी जुहूसाठी रिक्षा थांबवली, रिक्षात सोनलने साईचा हात घट्ट पकडून ठेवला होता जणू काही आता तो तिला सोडून पळून जाणार होता. दोघेही भारल्यासारखे काही न बोलता आजच्या दिवसाची अनुभूती घेत होते. त्यांना आता त्यांचं प्रेम यशस्वी होणार याबद्दल शंका राहिली नव्हती. त्यांना सगळं कसं सोपं वाटत होतं, त्यांची सगळी स्वप्न साकार होणार होती..... साई कर्तबगार होताच ती त्याला तिच्या परीने साथ देणार होती, एकमेकांच्या प्रेमाने, सुखदुःखात ते आपल्या आयुष्याचा स्वप्नमहाल उभारणार होते..........


जुहू जेव्हीपीडी स्कीमपाशी त्यांनी रिक्षा थांबवली, सोनल पटकन उतरून त्याला बाय करून बंगल्याच्या दिशेने निघून गेली, सहा वाजेपर्यंत येते म्हणून तिने कबुल केलं होतं पण आता सात वाजायला आले होते. मालकिणीला आता काय सांगावे ह्या विवंचनेत ती झपाझप चालत होती........साईला खरं तर दौलतनगर चालत जायला लांब पडणार होतं पण दुसरी रिक्षा करायची त्याची हिम्मत होतं नव्हती. कामाचा खाडा, सिनेमाच्या तिकिटांचे दीड हजार, जाण्यायेण्याचं रिक्षा भाडं, इंटर्वलचा खाण्याचा खर्च मिळून आजच्या दिवसाचा, प्रेमाचा स्वप्नमहाल आपल्याला कितीला पडला आणि मित्राची उधारी कितीने वाढली ह्याचा हिशेब करत तो घराच्या दिशेने चालू लागला....... 

(टीप : ह्या कथेमधील सर्व घटना, कथेमधील पात्रांची नावे व इतर संदर्भ पूर्णपणे काल्पनिक आहेत, कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी व इतर कुठलेही साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)


Rate this content
Log in

More marathi story from Raghunath Bile

Similar marathi story from Romance