Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Raghunath Bile

Others


3  

Raghunath Bile

Others


कोसळ - आरंभ

कोसळ - आरंभ

10 mins 164 10 mins 164

तो १९६१ सालचा पावसाळा होता, माझी आई माझ्या भावंडांना व आजारी वृद्ध आजोबाना घेऊन जंगलातल्या घरातून डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या नवीन घरात पावसाळ्या पूर्वीच राहावयास आली होती, आजोबानी मात्र नवीन घरात फार दिवस काढले नाहीत. कोकणातला जोरदार पाऊस सुरु झाला आणि आमची शेतीची कामं खोळंबली, माझी भावंडेही फारशी मोठी नव्हती आणि आई चौथ्या खेपेला गर्भवती होती, तिचे दिवस भरत आले होते त्यामुळे तिला कामं झेपणं शक्य नव्हतं. माझे बाबा म्हणूनच मुंबईहून गावी आले होते आणि येताच त्यांनी खोळंबलेली शेतीची कामं मार्गाला लावली होती.


ऑगस्ट महिना आला तरी पावसाने जराही उसंत घेतली नव्हती त्यामुळे नदी व्हाळांना उतार नव्हता. लावणीची कामं झाली कि खरं तर जवळजवळ शेतीची कामं संपल्यातच जमा असायची, नंतर फक्त पिकात वाढलेलं उपटसुंभ गवत काढायचं काम असायचं. हिरवीगार भातशेती पोपटी आणि हळूहळू सोनेरी होऊन वाऱ्यावर झुलताना बघण्यात विलक्षण सुख असायचं पण ह्यावर्षी पाऊस अजून दम घेत नव्हता. वडिलांची सुट्टी संपली होती पण आईला अवघडलेल्या अवस्थेत सोडून जाता येत नव्हते, घरात वडीलधाऱ्या आजोबांचा आधारही आता नव्हता, त्यात पावसापाण्याचे दिवस आणि घर गाव आवाटापासून ( वस्ती, वाडी ) लांब जंगलाच्या पायथ्याशी. तश्या म्हाताऱ्या शिताऱ्या वडिलांच्या चुलत चुलत आत्या होत्या पण इतक्या लांब त्या येण्याच्या परिस्थितीत नव्हत्या. शेतकामाचे दिवस असल्यामुळे इतर कुणाला मदतीला यायला फुरसद नव्हती. शेवटी बाबाना कनेडीला जाऊन रजावाढीची तार करावी लागली.


१४ ऑगस्ट, श्रावण महिन्यातला शुक्ल पक्षातला सोमवार मावळत आला, आईने दिवसभराची जेवणं खाणं, भांडी कुंडी, वैगेरे सर्व कामं आटोपली, भावंडं मोठी असल्यामुळे थोडी बहुत मदत व्हायची त्यात बाबा असल्यामुळे दूरवरच्या विहिरीवरून पाणी भरण्यासारखी, लाकडं फोडणं वगैरे जड कामं ते करायचे. सगळ्यात लहान शेवटचं भावंड म्हणजे माझी बहीण, ती सात वर्षांची, तिच्या अगोदरचे दोन भाऊ नऊ आणि अकरा वर्षांचे. त्या रात्री पावसाला फारच जोर आला होता, मुसळाच्या धारेने धो धो कोसळत होता. पावसाच्या आणि डोंगरातून, बांधावरून वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजामुळे इतर कसलेच आवाज ऐकू येत नव्हते, घरात आपापसात बोललेलंही जोरात ओरडल्याशिवाय ऐकू येत नव्हतं. नदी व्हाळ, छोटे मोठे नाले देखील दुथडी भरून आपापल्या हद्दी सोडून बेभान वाहत होते. आईची आवरा आवर झाल्यावर तिने एकवेळ झोपलेल्या मुलांवर नजर फिरवली आणि ती अंथरुणावर पडली, दिवटीची वात बारीक करून कोनाड्यात ठेवायला मात्र ती विसरली नाही.


मध्यरात्री कसल्याशा आवाजाने बाबांची झोप चाळवली, त्यांनी उठून दिवटीची वात मोठी केली आणि मुंबईहून येताना आणलेल्या घड्याळात पाहिले, रात्रीचे दोन वाजले होते आणि आई तिच्या अंथरुणावर विव्हळत होती, ते तिच्याजवळ बसले, तिला काय हवे नको विचारले, आईने कळा वाढत जात असल्याचे व सुईणीला घेऊन यायला सांगितले. आवाटात सुईणआजी एकच होती आणि तीही खूप वयस्कर आणि एकटीच राहात होती,तिचं घरही बरच दूर व्हाळापलीकडे होतं. खरं तर तिला आधीच आमच्या घरी आणून ठेवायचे ठरले होते पण ती यायला तयार नव्हती कारण तिची गाय, कोंबडी कुत्री होती त्यांची राखण करणे जरुरी होते. वडिलांनी भावंडांना बळजबरीने उठवलं आईजवळ बसायला सांगून ते घोंगडीची खोळ आणि नवीन आणलेला टॉर्च घेऊन भर पावसात बाहेर पडले......


रात्री अडीच वाजण्याचा सुमार, धो धो कोसळणारा पाऊस, टॉर्चच्या उजेडात दिसणाऱ्या काट्या कुट्यानी, दगडा धोंड्यानी भरलेल्या पांदी, घळनि अडखळत ठेचकाळत पार करीत वडील दोन व्हाळांवर ( दोन नाले एकत्र मिळून एक नदीसारखा मोठा व्हाळ होतो ) पोहोचले खरे पण बांध आणि साकवाच्याहि वरून वाहणाऱ्या पाण्यात पाय टाकायची त्यांची हिम्मत होईना. काय करावं ह्याचा विचारही करायला वेळ नव्हता, आई घरात प्रसूती वेदनांनी तढफडताना त्यांना दिसत होती, तिची सुटका हेच आव्हान स्वीकारून त्यांच्यातला सैनिक मोठ्या धाडसाने त्या राक्षसी प्रहावात झेपावला........


व्हाळ ओलांडल्यावर एका टेम्भावर सुईणआजीचे एकच घर होते आणि त्यात ती एकटीच राहायची, घळन चढून वडिलांनी बेळा ( बांबूच्या पट्ट्यांचा तकलादू दरवाजा ) ढकलून घरात प्रवेश केला, सुईणआजी वळयत ( घराचा मधला खण ) जमिनीवरच गोधडी टाकून झोपली होती, अंगावर घोंगडी होती तरी ती थंडीने कुडकुडत होती, वडिलांनी तिला उठवण्यासाठी हात लावला तर तिचे अंग तापाने फणफणत होते, अशा परिस्थितीत ती इतक्या लांब व्होऊर (पूर) आलेला व्हाळ ओलांडून आपल्या पायाने चालत येणं अशक्य होतं. क्षणभरच विचार करून वडिलांनी खिशातून सोबत आणलेली ब्रॅंडीची बाटली काढली, औषध आहे सांगून तिच्या दोन तीन वेळा तोंडाला लावली आणि उरलेली स्वतःच्या घशात रिकामी करून सुईणआजीला उचलून खांद्यावर घेतली आणि कसलाही विचार न करता परतीची वाट धरली ........


हडकुळी असली तरी म्हातारीला खांद्यावर घेऊन व्हाळ पार करणं सोपं नव्हतं त्यात दुसऱ्या हातात टॉर्च, वाहत येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यांचा अंदाज नाही आणि त्या सोबत वाहात येणारे ओंडके, झाडांच्या फांद्या. वडिलांच्या गळ्यापर्यंत पाणी पोहचलं तसं त्यांनी खांद्यावरच्या म्हातारीला अजून उंच उचलून धरली व गटांगळ्या खात कसाबसा पैलतीर गाठला पण ह्या सर्व प्रयत्नात पायातली पावसाळी चप्पल आणि टॉर्च मात्र गमावला. ( चप्पल आणि टॉर्च गमावल्याची गोष्ट वडील मला त्यांच्या आयुष्यभर सांगत होते )


व्हाळापासून घरापर्यंत मिट्ट काळोखात काट्या कुट्यात ठेचकाळत म्हातारीला खांद्यावर घेऊन वडील घरी पोहोचले तेंव्हा आई मोठ्याने किंचाळत होती आणि सर्व भावंडे जागी होऊन तिच्या उश्या पायाशी बसून होती, पुढे काय करायचं हे नेहमी सांगणारी आईच तडफडत पडल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हतं, केविलवाणे चेहरे करून सर्व बसून होते. वडिलांनी सुईणआजीला खाली ठेवलं, पोटात अर्धी अधिक क्वार्टर गेल्यामुळे ती तरतरीत झाली होती. तिला सुके कपडे, गरम पाणी वैगेरे सामग्री देण्याच्या कामाला वडील लागले थोरले दोन्ही भाऊ त्यांना मदत करू लागले, थोड्याच वेळात आमच्या नवीन घराने एका नवजात बाळाचा टाहो ऐकला तेंव्हा पहाटेचे चार वाजले होते, १५ ऑगस्ट १९६१ श्रावण महिन्यातला शुक्ल पक्षातला भारताचा स्वतंत्रता दिवस उगवत होता...


भारताच्या स्वतंत्रता दिवसाची पहाट आणि माझा टाहो एकत्रच फुटला असला तरी माझ्या ह्या टाहोमुळे माझ्या आईला आणि भावंडांना पुढे अनेक हंबरडे फोडायची वेळ आली. माझ्या बारश्यापर्यंत वडील कसेबसे रजा वाढवत राहिले, मुलांच्या मदतीने, म्हाताऱ्या आत्याच्या सल्ल्याने आईचं बाळंतपण काढत राहिले आणि बारसं झाल्यावर लगेच मुंबईला गेले. आता सर्वच कामं एकट्या आईवर येऊन पडली पण माझ्या भावंडांनी मोठया जबाबदारीने तिला मदत करू लागले, स्वानुभवाने आणि आवाटातल्या म्हाताऱ्या आजांच्या सल्ल्याने आई माझे काढे, लेप, चाटण बनवू लागली कारण त्यावेळी डॉक्टरही नव्हते कि औषेधेही. ऑगस्ट महिना संपला तरी पावसाचा जोर कमी झाला नव्हता, हवेत थंडी आणि आर्द्रता होती, त्याचा परिणाम कदाचित माझ्या नाजूक प्रकृतीवर झाला असावा, माझी छाती भरून आली, सर्दी खोकला, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, तापही येऊ लागला. आईने सगळे उपाय करून झाले, गाऱ्हाणे, अंगारे धुपारे झाले पण गुण पडला नाही, इवल्याश्या जीवाची घुसमट आणि सदोदित रडणं माझ्या आईला नि भावंडांना बघवेना, त्यांच्या डोळ्यातील अश्रूंना खळ पडेना...


आमच्या गावात तेव्हा डॉक्टर काय तर रस्तेही नव्हते (डॉक्टर तर आजही नाही), तीन साडेतीन मैलावर कनेडी नावाचं एक ठिकाण होतं ज्याला आजूबाजूचे सगळे गाव जोडलेले होते म्हणून तिथे बाजार आणि इतर काही अत्यावश्यक गरजेच्या गोष्टी होत्या. कनेडीवर डॉक्टर नागवेकर नावाचे डॉक्टर होते, खरं तर ते शहरातले कंपौंडरच पण त्यांना RMP (रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर) म्हणून छोट्या गावात वैद्यकीय सेवा नसल्यामुळे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायला सरकारी परवानगी होती. त्यांचा दवाखाना जरी कनेडीवर असला तरी पावसाच्या दिवसात, शेतीच्या कामांमुळे व येण्याजाण्याचे साधन नसल्यामुळे कुणी रुग्ण येत नसत म्हणून डॉक्टरच आठवड्यातले वार ठरवून एकेका गावी भेट द्यायचे व रुग्णावर उपचार करायचे. दुसऱ्या गावामध्ये ये जा करण्यासाठी डॉक्टरांकडे एक खेचर होते पण मानाने लोक त्याला डॉक्टरांचा घोडा म्हणायचे. आमच्याही गावी डॉक्टर आठवड्यातून एकदा यायचे आणि शाळेत किंवा एखाद्या रुग्णाच्या घरी थांबून तात्पुरता दवाखाना थाटायचे. रुग्ण असे फारसे नसायचेच कारण लोक घरगुती, गावठी उपचार व पाळमूळ खाऊन, देवळातला अंगारा लावूनच बरे व्हायचे. अगदीच केस हाताबाहेर जात असेल किंवा काहीच गुण पडत नसेल तर ते डॉक्टरकडे यायचे.


त्या दिवशी माझी तब्येत खूपच बिघडली होती, रडून रडून श्वास कोंडत होता, दूधही पिणं सोडलं होतं आणि दुपारपासून निपचित पडून होतो. आई सतत मांडीवर घेऊन बसली होती, आळीपाळीने भावंडेही मला मांडीवर घेऊन बसत होती कारण खाली ठेवलं कि मी किरकिरायला सुरुवात करायचो. त्या दिवशी डॉक्टर येणार असल्यामुळे तोच एक शेवटचा उपाय शिल्लक होता. त्या दिवशी पाऊसही खुळ लागल्यागत कोसळत होता, दुपारपासून वाट बघता बघता आता तिन्हीसांजा झाल्या होत्या, दिवसाला एक दोन गाव करणाऱ्या डॉक्टरचा काही भरोसा नसायचा त्यात पाऊस जास्त असला कि त्याचं खेचर पुराच्या पाण्याला बुजायचं. गावातले लोक शाळेत जमा झाले होते आणि डॉक्टरची वाट पहात थांबले होते......


आता रात्र झाली होती, बरेच रुग्ण कंटाळून शाळेतून माघारी गेले होते, डॉक्टरच्या येण्याची अजिबात आशा नव्हती पण माझ्या आईला आशा आणि जिद्द सोडून चालणार नव्हते, सकाळपासून घरात चूल पेटली नव्हती, पदरातली तहान भुकेने व्याकुळ, हू कि चुही न करणारी मुलं, अंगातली जिद्द मनातली आशा आणि श्रद्धा हेच तिचा आधार होते. डॉक्टर येणार कि नाही येणार, आले तर कुठे येणार हे काहीच माहीत नसल्यामुळे व कळायचे साधन नसल्यामुळे तिने शेवटी जाडजूड दुपट्यांमध्ये मला गुंडाळले, छातीशी धरले, छोट्या बहिणीला दुसऱ्या हाताने कडेवर घेतले, कांबळी खोळी इरली जे मिळेल ते डोक्यावर घेऊन भर पावसात सर्व मुलांसहित घर दार उघडंच टाकून एकुलता एक कंदील घेऊन ती शाळेकडे निघाली .......


भर पावसात छातीजवळ दुपट्यात गुंडाळलेलं एक २० दिवसाचं बाळ, कडेवर एक मूल आणि पाठीमागून चालणारी दोन मुलं कशीबशी दोन व्हाळापर्यंत पोहोचली आणि व्हाळाच उग्र रूप बघून तिथेच थबकली, पाण्याला उतार मिळाल्याशिवाय मुलंच काय आई एकटीसुद्धा तो व्हाळ ओलांडू शकली नसती. अतीव निराशेने आई वैऱ्यासारख्या वाहणाऱ्या व्हाळाकडे आणि छातीजवळ निपचित धरलेल्या माझ्याकडे बघत राहिली, चोहोबाजूंनी कोसळणाऱ्या पाण्यात तिच्या डोळ्यातून निसटलेले पाण्याचे दोन थेंब कुणालाही दिसले नाही. व्हाळ ओलांडल्याशिवाय शाळेत जाता येणार नव्हते पण व्हाळाला समांतर शेत होते आणि त्या शेताच्या मेरेवरून ( बांधावरून ) शाळेच्या रस्त्याला जाता येणार होते, जरी आपण त्या रस्त्यावर पोहोचलो तरी डॉक्टरला थांबवता येणार होते, हा विचार करून आई मुलांना घेऊन त्या निमुळत्या मेरेवरून कसरत करत चालू लागली .........


" गे अनुसये! "

" ..........."

 " गे अनुसये! "

" ..........."

कुणीतरी आईला हाका मारीत होत पण पावसाचा आणि व्हाळाच्या पाण्याच्या आवाजात ऐकू येत नव्हतं.


"गे सुभाचे आवशी !" आता मात्र खूप जवळून हाक आली तसे आईने उजव्या बाजूंच्या घरांच्या दिशेने पाहिले तर पहिल्याच बांधावरच्या घरातली सदडेकारिंन बांधावर उभी राहून हाक मारीत होती, तिच्या हातात दिवटी होती. आई थांबली तशी ती विचारू लागली " अगो काय खुळावलंस काय ? ह्या पावसात नखाएवढ्या पोराक घेवन खय चललस?" आईने तिला शाळेच्या रस्त्यावर डॉक्टरला गाठायला जात असल्याचं सांगितलं.

"अगो खुळा कि काय तू? तो डॉक्टर तरी कसो जातलो शाळेत, तेचो घोडो पाणी बघल्यान काय पाठी पळता, तू हयसरच आमच्याथय थांब, तो मेलो डॉक्टर इलो तर हयसून दिसतलो, मगे तेका बोलवूया, मी देवळाकडे निरोप धाडतय " असं समजावत बळेबळेच तिने आम्हाला घरात घेतलं, सर्वाना पुढच्या पडवीत बसवलं कारण तिथे परसा ( शेकोटी ) पेटलेला होता त्याची उबदार धग सगळ्यांना मिळत होती.


खूप वेळ निघून गेला पण डॉक्टरचा पत्ता नव्हता, सदडेकारिंन थोड्या थोड्या वेळाने बांधावर चढून बघत होती, एव्हाना आईने माझ्या जन्मापासूनची ह्याक्षणापर्यंतची तब्येतीची सर्व कहाणी सांगून झाली होती, सकाळ्पासूनची उपाशी, थकलेली भावंडे बसल्याजागी पेंगत होती. मुलांसाठी काही खायला मागण्याचा विचार आईच्या डोक्यात आला होता पण तिचा स्वाभिमान तिला अडवत होता. ती सारखी दुपटी खोलून निपचित पडलेल्या माझ्याकडे बघत असायची, छातीला हात लावून ठोके बघायची, मी उठून दूध पितो का ह्यासाठी प्रयत्न करायची. खरं तर तिचं मन सारखं चुकचुकत होतं आणि मी आहे कि गेलो ह्याची तिला खात्री करायची असायची, ठोके हाताला लागले कि तिच्यात ताकद आणि हिम्मत यायची आणि त्याच्या बळावरच ती अनिश्चित काळापर्यंत दुसऱ्याच्या दारात बसून, भुकेलेल्या मुलांना घेऊन पावसापाण्याची पर्वा न करता डॉक्टरची वाट बघत थांबायला तयार होती...


"टॅह्या....टॅह्या......" दुपारपासून निपचित पडलेल्या मी अचानक रडायला सुरुवात करताच सगळे भानावर आले. आईने लगेच दुपटे सोडून ओले केले आहे का हे तपासले, दूध पाजायचा प्रयत्न केला, थोपटले मी रडायचा थांबावा म्हणून शक्य ते सर्व केले पण माझे ईपळकणे ( तीव्र स्वरात रडणे ) काही थांबेना, रडता रडता अचानक जोरदार खोकला आला आणि श्वास कोंडल्यासारखे झाले, आईने छाती, पाठीवर हळुवारपणे चोळून, मला उलटा सुलटा करून पाहिले पण अडकलेला श्वास सुटून मी काही रडेना. आई जोरजोराने थोपटत काही बाही बोलू लागली, देवाचा धावा करू लागली, पेंगणारी भावंडं जागी होऊन केविलवाणी बघू लागली. आईचा स्वर कातर होऊ लागला आणि एक जोराचा ठसका देत मी डोळे फिरवले, आईच्या हाताला ठोके लागेनात तसा तिचा धीर संपून तिने हंबरडा फोडला आणि भावंडांनीही तिच्या मागोमाग रडायला सुरुवात केली, सदडेकरांच्या घरात झालेली हि बोंब ऐकून सदडेकारिंन आणि आजूबाजूच्या घरातले लोक गोळा झाले आणि कुणीतरी ओरडलं " डाक्टर ईले " सगळे लोक बांधाकडे धावले. खरोखरच डॉक्टर आले होते, खेचाराला बांधून ते पडवीत येऊन बसले, औषधांची पेटी उघडली आणि मला बघायला मागू लागले पण छातीशी कवटाळलेलं माझं बोचकं काही ती सोडेना. मी गेल्याची तिची ठाम समजूत झाली होती आणि कुणीही तिची समजूत ह्या क्षणी बदलू शकणार नव्हतं...


जमलेल्या बायकांनी बळजबरीने मला आईच्या छातीपासून वेगळं केलं आणि डॉक्टरच्या हवाली केलं, डॉक्टरनी सावकाश तपासलं, स्टेथोस्कोप लावून छाती पाठ तपासली, डोळे बघितले, मला परत देऊन मग गरम पाणी करायला सांगितलं. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही आशा वाटेल असेच काय कसलेच भाव नव्हते, त्यांना स्वतःला कदाचित खात्री वाटत नसावी. पाणी गरम होईपर्यंत त्यांनी २ - ३ छोट्या औषधाच्या बाटल्या काढल्या, एका डब्यातून इंजेक्शनची सिरिंज, सुई काढली आणि गरम पाणी येताच त्यात टाकली. डॉक्टरांनी तपासलं, इंजेक्शन बनवलं काही सांगितलं जरी नाही तरी आईची आणि माझ्या भावंडांची आशा पुन्हा जागृत झाली, रडायचं थांबून सगळे कुतूहलाने बघू लागले. डॉक्टरांनी गरम पाण्यातून सुई आणि सिरिंज काढून जोडली मग प्रत्येक बाटलीतून थोडं थोडं औषध सुईने इंजेक्शनमध्ये ओढलं, मला पुन्हा आईकडून घेतलं पण तिने अजिबात प्रतिकार केला नाही. माझी सगळी दुपटी डॉक्टरांनी सोडायला लावली, बायकांनी ती सोडून डॉक्टरच्या सांगण्यावरून मला उपडा केला मग डॉक्टरांनी माझ्या पार्श्वभागात सुई घुसवली आणि दुसऱ्या क्षणाला मी " टॅह्या....टॅह्या......" असा टाहो फोडला. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर प्रथमच स्मितहास्य चमकले, जमलेल्या सगळ्या लोकांना आनंद झाला. आईने क्षणार्धात मला जवळ घेऊन हजारो मुके घेतले, माझी सर्व भावंडं सभोवती जमली आणि हुंदक्यांच्या साथीने माझ्या दुपटे विरहित अंगावर अश्रूंचा सामूहीक कोसळ सुरु झाला...


(टीप : कोसळमध्ये उल्लेख केलेली प्रत्येक घटना, पात्रांची नावे, स्थळ व इतर संदर्भ पूर्णपणे वास्तविक आहेत आणि माझ्या स्वतःच्या बालपणातल्या आठवणी आहेत. शब्दांकन करताना माझ्या आई बहिणीने सांगितलेल्या आठवणींच्या आणि कल्पनेच्या बळावर घटनाक्रम, तो काळ काही स्वातंत्र्य घेऊन मी रचला आहे, काही चुका आढळल्यास किंवा कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास त्या हेतूपुरस्सर नाहीत हे लक्षात घेऊन मला क्षमा असावी.)


Rate this content
Log in