SANJAY SALVI

Thriller

3.4  

SANJAY SALVI

Thriller

पारध

पारध

27 mins
26.4K


ही कथा आहे कोकणातली, पंचवीस तीस वर्षांपूर्वीची. आता कायद्याने शिकार करणे गुन्हा आहे. पण त्या वेळी तसे नव्हते. कोकणात प्रथा होती, अजूनही आहे. पण आता काय करतात ते देव जाणे ?. प्रथा म्हणजे देवाला कौल लावून शिकार केली जायची आणि कधी कधी जंगलातील काही विशिष्ट प्राणी खूप चविष्ट लागतात म्हणून शिकार व्हायची. तर या अस्या एक स्वानुभवातील शिकार कथा तुम्हाला आज सांगतो, यात कोकणातील बोली भाषा आहे, ती तशीच वाचूया म्हणजे त्याची गम्मत वेगळीच येईल.

इतर कथा , लेख यामध्ये काही जुन्या किंवा ग्रामीण शब्दांचे अर्थ शेवटी किंवा त्या पानाचे शेवटी असतात. पण या ठिकाणी या कथेत येणाऱया काही शब्दांचे अर्थ मी अगोदरच या खाली देणार आहे. त्यामुळे नवीन पिढीला आणि बिगर कोकणातील माणसाला हि कथा समजण्यास सोपे जाईल आणि त्याची वाचनातील खुमारी वाढेल.

पारध - शिकार, बलंकनदार - बंदूकधारी, दांडक्या - हातात मोठा भरीव सोटा किंवा मजबूत काठी घेऊन असणारा, टेलक्या - टेहळणी करणारा ( झाडावरून ), हाकारे - गडबड गोंगाट करून जंगल उठवणारे,

        ----- ००००००० -----


माझी बारावीची परीक्षा झाली आणि रिवाजाप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी एस.टी. पकडून तिसऱ्या दिवशी भल्या पहाटे माझ्या कोकणातील गावी पोहोचलो. माझा पहिलाच एकटयाने केलेला प्रवास होता तो, आणि माझे खेडेगाव महामार्गा पासून बरेच म्हणजे जवळ जवळ दहा - बारा किलोमीटर दूर होते. त्यामुळे चुलत भाऊ स्टॅन्ड वर न्यायला आला होता. त्यावेळी माझ्या गावी जायला फक्त दिवसातून दोन वेळा एस. टी. होती, आणि ती देखील मुलांच्या शाळा - कॉलेज च्या वेळेला. मी सकाळी पाच वाजताच उतरलो होतो. मार्च महिना होता. पहाटेची वेळ होती, वातावरण मस्त प्रसन्न होते. किंचित गारवा होता. माझ्या हातातील जड बॅग चुलत भावाने घेतली आणि मी एक लहान पिशवी चक्क पाठीवर घेऊन चालत चालत निघालो, ख्याली खुशाली झाली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता गाव आता फक्त दोन - तीन किलोमीटर राहील होत. गप्पा चालूच होत्या.

"मग काय दादा, काही विशेष" - मी

"काय विशेष, चाललाय आपला रोजच्या सारका, आला दिवस ढकलायचा" - भाऊ.

"तस नाही रे होळी आहे ना म्हणून विचारलं, कोण कोण आलाय मुंबईवरून" - मी,

"उम्बवरना ना, आलयत कि, मोप जन हयत, दरवर्सी परुस औंदा मोप लोका हयत" - भाऊ.

"अरे मग तर मजा येईल या वर्षी" - मी सुद्धा बरेच वर्षाने लहानपणीच्या सवंगड्यांना भेटता येईल म्हून हरखून गेलो.

"मग आजच सर्वाना जाऊन भेटतो दिवसभरात" मी उत्साहाच्या भरात लगेच बोलून गेलो.

"तुज कश्या जाऊस हवाय, सगली भेटतील एके ठिकानी" - भाऊ.

"एके ठीकाणी, आणि ते कसे काय रे" - मी

"आर आज पारध हाय ना, सगले जमतील आठ वाजता देवलात, आणि मग कौल घेऊन जातील पारधीस" - भाऊ.  

"अरे वा आज पारध आहे का ? मस्त मजा येईल मग" - मी

"मजा बिजा कसली तुज नाय पाठवनार मोठी आय" - भाऊ,

माझ्या आजीला सर्व जण "मोठी आई" आणि आजोबाना "मोठे बाबा" म्हणत असत मी फक्त त्यांना "आई' आणि "बाबा" म्हणत असे, माझा धाकटा भाऊ "आजी आणि आजोबा" म्हणत असे.

तसे पहिले तर भाऊ म्हणत होता ते खरेच होते. माझे आजी - आजोबा मला काही जाऊ देणार नाहीत याची मला खात्री होती. तोच विचार करत असता घरी कधी पोहचलो ते कळलंच नाही.

पोहोचल्याबरोबर आजी - आजोबाना नमस्कार केला, ती आमच्या घराची प्रथाच होती. दोघांच्या डोळयात आलेले आनंदश्रू लपले नाहीत.

"बब्या केव्हडा मोठा झालस रे" - आजी म्हणाली. कोकणात मोठ्या नातवाला बब्या म्हणायची प्रथा आहे. घरोघरी एक तरी बब्या सापडणारच.

"मग आता बारावीची परीक्षा देऊन आलो". - मी.

दोघांनी माझ्याकडे कौतुकाने पहिले आणि आजीने दही भाताची ऊंडी माझ्या वरून ओवाळून बाहेर जाऊन कोंड्याच्या बेटात टाकली. कोंड्याचे बेट म्हणजे बांबूचे बेट किंवा बन. कोकणात प्रत्येक घराच्या परसवनात ( घराच्या बाजूचे आवर ) कोंड्याचे बेट असतेच.

घरात येऊन आज्जी म्हणाली -

"पांचूली वर पानी तापत ठेवलाय, कडत कडत पानयांन आंगोली कर, धय ( दही ) किमाट खा आनी आराम कर, रात दारना दगदग झाली असल" – आजी. किमाट म्हणजे भातापेक्षा पातळ आणि पेजे पेक्षा घट्ट.

आज्जीने लगेच एका ताटलीत ( छोटे ताट ) पटकन ऊन ऊन किमट आणि त्यावर घट्ट असे दही आणि एका वाटीत वेगळे दही लगेच वाढले देखील. आमच्या घरी दूध दुभते खूप उत्तम होते, त्याबाद्दल एका वेगळ्या कथेत सांगेन.

मी दही बघताच चटकन पाटावर बसलो, आणि दोन घास घेताच तोंडातून शब्द निघाले " आई व काय मस्त ! हे खावं तर तुझ्या हातचच" - मी.

मी बोललो त्यात सत्याचा भाग होताच पण थोडी साखर पेरणी सुद्धा होती. त्याचाच भाग म्हणून मी पुढे बोललो.

"आणि हे खाऊन झाल्यावर देवळात जातो" - मी

देवळात म्हटल्यावर आज्जी खुश होणार हे मला माहित होत.

" हा बाबा जा आनि देंवाचे आशीर्वाद घेवन य तसाच " - आज्जी.

"अग आई तस नाही, आज पारध आहे ना !, मग तसाच पारधीला पण जाईन" - मी

"नको रे बाबा, रातदारना झोप नसल झालेली, आनि दिवसभर खय वनवन फिरसील" - आज्जी.

"मी मस्त झोपूनच आलो गाडीतून, काही जागरण नाही झालेलं मला" - मी.

" अर्र तुज नाय झेपायचा, तू उम्बयचा मानुस, पारधेस वनवन फिरावा लागता, काट्या कुट्यातन रान काढावा लागता, तुज नाय जमायचा, तू न्हान हैस अजून" - आज्जी.

"असं काय ग आई, मघाशी तर म्हणालीस, किती मोठा झालास म्हणून आणि मला सुद्धा समजायला पाहिजेत ना गावाकडच्या गोष्टी" - मी सुद्धा थोड़ा गूळ लावणाऱ्या आवाजात बोललो.

माझी मात्रा थोडी लागू झाली पण आज्जीच ती, तिने हुकुमाचा एक्का काढला.

"बघ बाबा, कालजी वाटता म्हणून बोललो, पन कारभारी ( आजोबा ) पाठवतील सा वाटत नाय" - आज्जी.

चला एक टप्पा पार केला, आता दुसरा टप्पा आजोबा म्हणजे "सुप्रीम कोर्ट".

पटपट खाऊन घेतलं, आजोबा पुढच्या ओसरीत आराम खुर्चीत बसले होते. मी तिथे गेलो.

"का र दोन घास खाल्लस कि चाल्लंस लगेच भेटूस मैत्रास ?" - आजोबा.

"बाबा, सर्व जण आज पारधीला जाणार ना, मग इथे कुठे भेटणार ? मी सुद्धा जाऊ का पारधीला ?" - मी.

इथे मी वेगळा बाण वापरला, म्हणजे अनुमती, विनंती. माझे आजोबा कोपिष्ट म्हणून ओळखले जायचे. त्यांना मी सांगितले असते कि मी शिकारीला जातोय तर म्हणाले असते "जातोस तर जा, तूम्ही आता स्वतःचे निर्णय घेताय, मग आम्हाला का विचारता ?"

म्हणून मी अनुमती मागितली.

"तू आता बापया होशील, तुज दुल ( सुद्धा ) गावच्या गोष्टी समजूस हव्यात, जा तू, पन चांगला झाड बघून टेलक्या रहा ! मी सांगतो रामास. - आज्जोबा.

मला तर एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. त्याच वेळी माझं लक्ष ओसरीवरील खुंट्यांवर गेलं.

"बाबा आपली बंदूक कुठे आहे " - मी.

"का र बाबा, तू काय बलकंदार होणार हैस ?" - आजोबानी हसून विचारले. आणि तसेच पुढे म्हणाले, " ती न्हेल्याय यशाने, भेटेल तुला तो देवलात." - आज्जोबा.

आमची एक ठासणीची एका नळीची बंदूक होती, गावात ती नामी हत्यार म्हणून नावाजलेली होती. ती फक्त यशवंत नानाच वापरीत असे. खूप शिकारी त्यांनी केल्या त्या बंदुकीने.

असो, मी आजोबांची अनुमती म्हणजे पडत्या फळाची आज्ञा समजून घरात पळालो आणि आज्जीला सांगितलं.

"आईगं, बाबानी जा म्हणून सांगितलं, मी जातो आता" - मी.

"अर हो, पारधेस काय असाच जातात, पैक ( थांब ) मी पटकन दोन भाकऱ्या टाकतो, आनि काय डांगर देव?" - आज्जी.

"अग डांगर बिंगर काही नको, तू आपली चटणी दे भकरीत गुंडाळून" - मी.

"हा ता बेस हाय, तू मागल्या दारास जाऊन वाड्यातन ( कोकणात गुरांच्या गोठ्याला "वाडा" म्हणतात ) चंगली ताठ काठी शोधून घे, नाय मिलाली त साद घाल आनि एक केलीचा पान काडून धुवून आन " - आज्जी.


मी वाड्यात जाऊन चांगली भरीव कोंड्याची काठी शोधली आणि एक केळीचं पान तोडून आणलं. तेव्हड्यात आज्जीने तांदळाच्या दोन भाकऱ्या भाजल्या आणि मला आवडतात म्हणून पुन्हा चुलीतील निखाऱ्यावर उभ्या करून शेकवल्या. मग तिने केळीच्या पानाचं टोकाकडील थोडा भाग कापला, त्यात लाल चटणी गुंडाळली, ते पुडकं भाकरीत घातलं आणि भाकऱ्या चतकोर होतील अस्या प्रकारे घड्या केल्या. मग भाकऱ्या केळीच्या पानात गुंडाळल्या. त्या एक सफेद धडक्यात बांधल्या आणि शेवटी ती शिदोरी दुसऱ्या एक फडक्याने माझ्या कंबरेला गुंडाळली. आता मी तयार झालो होतो.

"येक, तू रानात शिरू नकस, हकाऱ्यांबरोबर जावं नकोस, टेलक्या रहा. मस्त दिसता सगला रान वरना , बगुस मजा वाटता" - इति आज्जी.  


आज्जीच्या सर्व सूचनांना होकार भरला आणि मी निघालो. बाहेर पडलो आणि पांधळीने (दोन घरांच्या मधली पायवाट) चालत निघालो. जाता जाता आजूबाजूवाल्यांचा हाक मारत त्यांची खुशाली विचारत माझी सांगत पुढे पुढे जात होतो. देवळात जायचे म्हणजे मला अंदाजे तीन एक किलोमीटर चालत जावे लागणार होते.

आमची पांधळ ओलांडून गावातील हमरस्ता ओलांडून पुढे निघालो आणि पुढची वाट सुरु झाली, या वाटेवर अजून दोन चार घर होती जी आमच्या घरापासून हाकेच्या अंतराच्या बाहेर होती. मी तिथून जात असता त्या घरातील माणसांना कोणीतरी वाटेने जातेय याची चाहूल लागली पण झाडांच्या गर्दीमुळे मी त्यांना दिसत नव्हतो, त्यामुळे कोणीतरी कुकारा (एक विशिष्ट आवाज काढणे "उ हू हू" असा) मारला, त्याला बरेच स्थानिक लोक तसाच कूकारा देऊन प्रतिसाद देतात आणि ते एकमेकांना कळतेही कोण आहे ते. पण मला सवय नव्हती आणि माझा आवाज त्यांनी ओळखलासुद्धा नसता, म्हणून मी जरा आवाज वाढवून सांगत गेलो "कारभाऱ्यांचा नातू आहे, देवळात जातोय". मग त्या बाजूने आवाज येई "बरा बरा, कदवा (केव्हा) आलस? सांभालून जा काटाकुट्यातून". कोकणात सर्व ठिकाणी अशी आपुलकीची भाषा ऐकायला मिळते.


ती चार घरे सोडली की पुढे आमची गावाची प्रसिद्ध बावडी (विहीर) लागते. या बावडीचं पाणी अतिशय थंडगार आणि चवदार लागते. आम्ही कित्येक वेळा या विहिरीतून पाणी भरलेलं आठवतंय. त्या विहिरीवर काही काकू, मावश्या पाणी भरत होत्या, मी तिथे गेलो आणि विहिरीत डोकावून पाहिलं. माझा प्रतिबिंब पाण्यात पाहून थोडा सुखावून गेलो. तिथे दोन मिनिट बोलून पुढे वाट धरली. हीच वाट पुढे मग छोट्या टेकडीवजा डोंगरातून जात होती. आजूबाजूला काजू, रातांबे (कोकम), आंबा अशी गर्द झाडे आहेत. त्यातील पायवाटेने स्वतःशीच गुणगुणत जात होतो. पुढे एक मोठा वहाळ (ओढा) लागतो जो डिसेंबर नंतर पूर्ण कोरडा होतो त्यावेळी त्या ओढ्यातील गोल गोट्यांवरून चालताना तोल सम्भाळून जावे लागते. एक डुगडुगणारा साकव (पूल) आहे जो बांबू आणि काथ्या (रस्सी) च्या सहाय्याने बनवला आहे पण त्याचा उपयोग फक्त पावसाळ्यात वहाळ ओलांडण्यासाठी केला जातो. 


त्यापुढे शेतजमीन आणि पुढे एक आडवी पायवाट ओलांडली कि देवाचे शेत लागते. देवाचे शेत ओलांडून मी समोर देवळाच्या दिशेने पाहिलं. बरीच पुरुष मंडळी देवळात दिसत होती. मी झपझप पावलं टाकून देवळात पोहोचलो. आमच्या ग्रामदेवतेचे हे देऊळ मला का कोण जाणे खूप आकर्षित करत. चारी बाजूनी उघड असं हे देऊळ पूर्णपणे लाकडी खांबांवर उभं आहे. हे भले मोठे लाकडी खांब आणि वरच्या आडव्या तुळया देखील तेव्हड्याच मोठ्या. देवाचा गाभारा हा प्रकार नाहीच. लाकडी कोरीव काम केलेला ऊंच पाठीची बैठक किंवा मखर. देवाच्या बैठकीला लाकडी पाट. आणि देवांच्या सुरेख काळ्या दगडी मुर्त्या. पुढे दोन फुटांवर नारळ अँर्पण करण्यासाठी दगडी चौथरा. मी आत जाताच देवाला नमस्कार केला. तिथे जवळच गावाचे गावकर आणि गुरव ( देवळाचे पारंपरिक पुजारी ) बसले होते. त्यांना देखील नमस्कार केला.


गुरवानं मला ओळखलं नसावं पण गावकर आबांनी एक ओळखीचा हुंकार भरला. हे आमचे गावकर आबा समोरच्याला प्रतिक्रिया द्यायची असेल तर एक विशिष्ट हुंकार करीत त्याची मला गम्मत वाटे. ते घस्यातून वेगळाच आवाज काडत आणि त्यात सतत पान तोंडात असल्यामुळेS त्याला वेगळाच नाद येई.

मी लगेचच माझ्या मित्रांच्या घोळक्यात रमून गेलो गप्पा टप्पा चालू झाल्या तेव्हड्यात आबांचा आवाज घुमला.

"एका र, काय नुसता बाजार लावलाय? गुरव कौल लावताय, बोलू नका."

"गुरुवानुं करा सुरुवात". - आबा

गुरवाने देवीला पाण्याने आंघोळ घातली. गंध लावले, अगरबत्ती ओवाळली आणि पूजा आटोपली.

त्यांनी मूठभर भाताचे गोटे ( बी ) एका ताम्हणात घेतले. त्यातील दोन गोटे पाण्यात बुडवले आणि एक एक गोटा देवीच्या दोन्ही खांद्यांवर चिकटून राहील असा लावला. दोन्ही गोटे चिकटले. गुरव बोलले,

"गावकारानु कौल लावायचा ? अनुमती हाय ?"

"सगल्याची अनुमती हाय नव्ह ? " गावकर आबांनी सगळ्यांना उद्धेशून विचारले. कुणाची नाही बोलायची श्यामत नव्हती त्यामुळे, "होय - व्हय - होय" असे आवाज आले.

"हा गुरुवानुं करा सुरुवात" - आबा.

"देवा म्हाराजा हि सगली मंडली तुज्या देवलात जमलीत देवा, आज वर्ष्याच्या होलीयचा सन हाय आणि गावाची पारध हाय, देवा म्हाराजा तुजा कौल मागतत, देवा हो म्हनत असशील तर उजवा सोड, नाय त डावा सोड" - गुरव.

सगळे जण देवीकडे एकटक बघत होते. माझ्यासाठी तर ही पर्वणी होती. आत्तापर्यंत मी फक्त "कौल लावणे" ऐकत होतो आज प्रत्येक्ष पाहत होतो.

"देवा होय म्हनत असशील त उजवा सोड, नाय त डावा" - गुरव.

पाच दहा मिनिटा अशीच गेली गोटे काही जागचे हालेनात, गुरुव बुवा परत परत विचारत होते.

"देव काय बोलत नाय वाटता आज, काय रूसलाय की काय ?" गुरव स्वगत बोलले.

"काय रे कोन आंगोली करून आला नाय की काय" आबांनी आवाज चढवून विचारले.

"बाबा देवा बोल कायतरी, काय चुकला माकला असल पोटात घे, पन कौल दे म्हाराजा" - आबा.

तेव्हड्यात दोन्ही गोटे खाली पडले.

"देव रागावलाय वाटता" आबा थोडे नाराज होंऊन म्हणाले.

गुरुवाने पुन्हा गोटे चिकटवण्याची तीच क्रिया केली.

"देवा बावा काय चुकला असल तर माफी दे, पारधीचा कौल मागतोय, तुझ्या म्होरं आम्ही नाय. होय म्हनत असशील त उजवा सोड, नाय त डावा" - गुरव.

तरी देखल गोटे काही हालेनात.

"माज्या बावा सोड काय ता, कौल दे माज्या राजा" - आबा.

पुढे पाच मिनिट गेली मग आबा थोडे करवादले.

"काय ता बोल, असा घुम्यासारखा राव्ह नको, लोक कामा टाकून आलीत, होय नाय काय ता बोल आनी मोकला कर" - आबा.

तरी देखील कौल मिळेना.

"आता बोलतस का जावं आम्ही कामा धंद्यास, तू पन मोकला आमी पन" - आबा

"म्हाराजा बोल काय ता, लोका थाम्बलीत, सोड बाबा. होय म्हणायचा असलं त उजवा दे नाय त डावा" - गुरव.

तेव्हड्यात देवीच्या उजव्या खांद्यावरचा गोटा खाली पडला.

आबांनी सुस्कारा सोडला आनी लोकांकडे बघत बोलले " देव बोलला र, पारधीस जायचा कौल पडला".

"हा गुरवा आता रान खयचा काढायचा ता विचार आनी देवास मोकला कर" - आबा.

"देवा बावा म्हाराजा, पारधेचा कौल त दिलस, आता खय जायचा ता एकदा सांग आनि मोकळा कर" - गुरव.

"हा" - आबा घश्यातल्या घश्यात हुंकार भरत बोलले.

"त देवा उगवीतकडं जायचा असलं त उजवा सोड, मावलीतकड जायचा असल त डावा सोड" - गुरव.  

सर्व लोक देवीकडे पाहत होते. गुरव आता पेंगळायला लागला होता. आबांनी त्याला कोपराने ढोसलं.

"हा म्हाराज्या दे बाबा कौल दे, किरना चडू लागलीत, लोका रानात जातील कदवा आणि येतील कदवा ?,

आता सोडवं सगल्यास्नी". - गुरव.

त्यासरशी देवीच्या डाव्या खांद्यावरचा गोटा खाली पडला.


आबांनी बसल्या बसल्या मांडीवर थाप मारली आणि ते मोठ्याने बोलले - "चला र, मावलतच्या रानात जावस सांगताय देव".

त्यानंतर बाकीचे पूजा, गार्याणे असे सोपस्कार पार पडेपर्यंत सर्व गावकऱ्यांची खलबत चालू झाली. त्यात मुख्य करून कुठून रानात शिरायचं, कोण कुठल्या बाजूने जाणार, टेहलके कोण कुठल्या ठिकाणी बसणार, किती वाजेपर्यंत कुठपर्यंत जायचं, कुठे भाकरी / शिदोरी खायला थांबायचं. किती वाजेपर्यंत रान काढायचं. या सर्व गोष्टींचा खल झाला. मी या सर्व गोष्टी लक्ष देऊन बारकाईनं ऐकत होतो. तेव्हड्यात रामनाना मला शोधत आला.

"बभ्या तू भिक्या दादा च्या सांगाती र्हा, ता झाड चडूस चांगला हाय आणि ऊंच सुदा हाय" - रामनाना.

"हा नाना" - मी.

पण मी मनाशीच ठरवलं होत कि आज मी जंगलात माझ्या मित्रांबरोबर घुसायचं, रान काढायचं हाकारे मारून, त्यातलं थ्रिल अनुभवायचं.

आबांनी आवाज दिला " चला निघा र".

टेहळके अगोदरच निघाले होते, त्याना सर्वात आधी जाऊन त्यांच्या ठरलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसायचं होत. बाकी बलकंदार, हाकारे, दांडके, वाट काढणारे सर्व गप्पा मारत आपल्या टोळी सोबत निघायच्या तयारीत होते. मीही माझ्या मित्रांच्या टोळीत सामील झालो.

मी अंगात शर्ट आणि हाफ प्यांट घातली होती. माझ्या एका मित्राने सांगितल - " अरे तू जर आमच्या सोबत रान काढणार असशील तर शर्ट काडून कंबरेला गुंडाळ किंवा इथे देवळात काडून ठेव, नाहीतर त्याच्या चिंध्या चिंध्या होतील परत येईपर्यंत". नशीब माझं, मी शर्टाच्या आत बनियान घातली होती. मी लगेच शर्ट काडून देवळात असलेल्या खांबाच्या खिळ्याला अडकवलं. इतर लोकांनीदेखील काही ना काही जास्तीचे तिचेच अडकवलं होत.

आता आम्ही गप्पा मारत सर्व जंगलाच्या दिशेने चालू लागलो. तेवड्यात मागून आवाज आला "काय गप्पा मारत चालतावं, अश्यांन रान काढनार कदवा आणि शिकार करनार कदवा? उचला पाय चटचट".


तसे आम्ही भरभर चालू लागलो. आमचा मुलांचा दहा - बारा जणांचा ग्रुप होता. जंगलाच्या पायथ्याशी आल्यावर आम्ही दोन भागात विभागणारं होतो. त्यामुळे मला समजेना मी कुणाबरोबर जावं? जेव्हा दोन ग्रुप तयार झाले तेव्हा दोन्ही ग्रुप वाल्याना मी त्यांच्या बरोबर पाहिजे होतो, मुंबईच्या गमती-जमती ऐकवायला.

शेवटी मीच मनाशी नक्की केलं आणि माझ्या खास मित्रांच्या ग्रुप मध्ये घुसलो. आता आम्ही गावाबाहेर जिथून दाट जंगल सुरु होत तिथे पोहोचलो होतो. जवळ जवळ दहा - साडे दहा वाजत आले होते. ऊन चांगलेच जाणवत होते. चार पाच, चार पाच जण अश्या आठ टोळया वेलवेगळ्या ठिकाणांहुन जंगलात शिरणार होते. कुठून तरी हाकाऱ्यांच्या म्होरक्याचा मोठा कुकारा ऐकू आला त्याच बरोबर प्रतेक टोळीच्या म्होरक्याने कुकारा दिला. हि खुण होती जंगलात शिरण्याची. एकदम चैत्यन आल्यासारखे माझे गावातले मित्र जोरजोरात आवाज करत काठ्या आपटत जंगल भेदीत निघाले. मी सुद्धा त्यांच्या बरोबर जोशात निघालो. सुरुवातीला जंगल विरळ होते, त्यामुळे मी त्यांच्या बरोबर हाकारा देत मोठ्या जोशात चाललो होतो.


अंदाजे अर्धा-पाऊण तास मी चाललो असेंन रणरणत्या उन्हाने, घामाने कातावून गेलो. त्यात भर म्हणून कि काय वाटेत येणाऱ्या वेलींच्या, झाडांच्या फांदीने अंगावर, पायावर , हातावर ओरखडे उठले होते, त्याला घामाचा स्पर्श झाला के चुरचुरत होते. तरी देखील मी नेट लावून इतर मुलांबरोबर, मित्रांबरोबर चालत, पळत राहण्याचा प्रयन्त करत होतो. त्याला दोन मुख्य कारण होती. एक म्हणजे मला कोणी कमजोर म्हणू नये आणि दुसरं म्हणजे शिकार बघायची, करायची दांडगी हौस अजून फिटली नव्हती. रानातून चोहो बाजूनी ढोल बडवल्याचा आवाज, माणसांचे हाकारे दिल्याचा आवाज एकच गदारोळ उडवून देत होते. झाडावरून टेहळके कोणती टोळी मागे रहात असेल किंवा कोणी मध्ये मोकळी जागा सोडून रान उठवत असेल तर तसे मोठयाने ओरडून सांगत होते. कोणी दोन - तीन वेळा सांगूनही दाद देत नसेल तर त्याला अस्खलित शिव्या देत होते.

सर्व जण जोरजोरात हाकारे देत, सोटे-दंडुके आपटत चालले होते. चालता चालता गावातील काही मनोरंजक गोष्टी काढणं, येकमेकांची चेष्टा मस्करी करण चाललं होत. मी कसा-बसा त्यांच्या बरोबरीने रहायचा पर्यंत करत होतो. सूर्य अगदी डोक्यावर आला होता. ऊन उभं करपून काढत होतं. त्यात झाडी झुडपातून वाट काढणं, काट्यातून स्वतःला वाचवणं खूप कठीण जात होत. पायांवर हातावर सर्व ओरखडल्याच्या खुणा उठल्या होत्या. त्या ठिकाणी घाम लागून अंग चुरचुरत होत. खरं सांगायचं तर अंगाची अगदी लाही लाही झाली होती. त्यामुळे मी मागे पडत होतो. माझा खास मित्र त्यामुळे माझ्या सोबत राहण्यासाठी मागे पडत होता. मग त्याच्या नावाने कोणीतरी शंख करत असे. "मेला झो तानाजी खय हाय ? दमला ? हि मेली आताची पोरा, सगली पिचकी. खायचा आणि गावभर फिरयचा, म्हेनत नको करुस, सगला आयता पायजे".


तसे मग आम्ही परत जोरात पळत जात होतो. त्यांच्या धारेत मिसळत होतो. तसं पाहिलं तर मी आता खूप दमलो होतो, धावून पळून घशाला कोरड पडली होती. तरी नेटाने त्यांच्या बरोबर राहायचा प्रयन्त करत होतो. तेव्हड्यात एका टेहळक्याचा जोरात कुकारा घुमला पाठोपाठ त्याची मोठी हाळी ऐकायला आली " आर तिकडं शेवटच्या जालयत कोन तरी हायसा वाटताय, सादेवा तुझ्या वरल्या अंगास जा आणि हिकडच्यांनी आवलीत नेव्हा" म्हणजे आमची जी हाकाऱ्यांची साखळी होती तिच्या दुसऱ्या टोकाच्या जवळपास काही तरी असल्याची तो बातमी देत होता. आणि आमच्या बाजूच्या लोकांना तो त्या बाजूला सरकायची इशारत करत होता. आवाज, कल्ला सर्व बंद झाले होते. लोक दबक्या चालीने आता सरकू लागले होते. टेहळणी करणारा माणूस लोकांना वरून मार्गदर्शन करत होता. त्याने त्या जाळीच्या जवळपास असणाऱ्या बंदूक धाऱ्या माणसाला सावध केलं आणि तयार राहायला सांगितलं.


बलकंदार बंदुकीच्या टप्प्यात शिकार हेरून तयार राहिला सर्व शिकारी लोक अर्ध वर्तुळ करून तयार राहिले. मी त्या जाळीकडे टक लावून बघत होतो पण मला काहीच दिसले नाही. मी तानाजीला हळू आवाजात विचारले "तुला काही दिसतंय कारे". एव्हड्या हळू आवाजाला सुद्धा एका वयस्कर माणसाने मला खुणेने दटावले. तानाजीने सुद्धा मला चूप राहायची खुण केली.


"सादेवा बार घाल" टेहळक्याने इशारा केला. त्या इश्यारासरशी सहदेव नानाने चाप ओढला पण काहीतरी घोटाळा झाला असावा. बार काही झाला नाही. म्हणून दुसऱ्या बंदूकधाऱ्याने बार केला पण तो चुकला. त्या बरोबर जाळीत लपून बसलेल्या भेकऱ्याने एक मोठ्या उडीत जाळी बाहेर पडून धूम ठोकली. हे जनावर अतिशय चपळ आणि काटक असते. क्षणार्धात ते नाहीसे झाले आणि मग एकाच कल्लोळ झाला.

"आर सादेवा तुझं काय 'डोल फुटलं होत का ?

"बंदूक बगुन घेवस काय झाला होता तुज, तुझा वाटोला व्होऊन जाऊदे"

"ह्यास पुन्हा बंदूक हातात देवस नको"

"मेला झो बलकंदार व्हतंय, कोंबडी मार घरास बसून"

एक ना दोन, सर्व जाणती, वयस्कर माणसं सहदेव नानांवर तोंड सुख घेऊ लागली. तस पाहिलं तर आबांना सुद्धा राग आला होता पण त्यांनी थोडं सावरून घ्यायचं ठरवलं, ते बोलले, " सादेवानं दुल ( सुद्धा ) हत्यार वडून बगुस हवा व्हता, पण झाला ता झाला, आता आनि अर्धा दिस हाय, चला आडव्या झऱ्याजवळ भाकरी खावंसं जाऊया" - आबा.

लगेच आबा जवळ उभ्या असणाऱ्या माणसाने एक कुकारा दिला आणी " आडव्या झऱ्यावर" असं मोठयाने बोलला. तसं आजूबाजूच्या झाडावर, टेकडीवर बसलेल्या टेहळक्यानी जोरजोरात आवाज देऊन सर्वानी आडव्या झऱ्यावर जमावे असं सुचवलं.


पुढील पंधरा मिनिटांत सर्व लोक तिथे जवळच असलेल्या झऱ्या जवळ एक मोठ्या झाडाखाली जमा झाले. सर्वानी हात पाय धुतले आणी पुन्हा हुकलेल्या शिकारी वर तावातावाने चर्चा सुरु झाली. त्यात सहदेव नानाची खूप भंबेरी उडवली गेली. सर्व जण आप आपला ग्रुप करून जेवण करायला बसले. मी देखील आमचा मुलांचा ग्रुप करून बसलो. खरं सांगायचं तर मी खूप दमून गेलो होतो. अंगावर असलेल्या सॅंडो बनियान ठीक ठिकाणी फाटली होती. अंगभर खरचटलं होत. तहानेने व्याकुळ झालो होतो. पहिल्या प्रथम मी झऱ्यांचंच थंड पाणी पिऊन घेतलं. मग सर्वानी आपापली शिदोरी मोकळी केली. सर्वानी भाकऱ्याच आणल्या होत्या. तांदळाची किंवा नाचणीची भाकरी. कुणाकडे डांगर होत, कुणाकडे लोणचं, कुणाकडे चटणी, कुणाकडे सुकी मासळी, कुणाकडे भाजी तर कुणाकडे कांदा-मिरची. हे सर्व पाहुन मझ्या जिभेला नुसतं पाणी सुटलं, अक्षरशः कोकणाची शाही मेजवानी समोर दिसत होती. सर्वानी गप्पा मारता मारता जेवणं उरकलं. गप्पांमधें माझाच विषय जास्त होता. मुंबईची गम्मत जम्मत, मी किती दिवस राहणार, वगैरे वगैरे. काही वयस्कर माणसे पटापट जेवून तिथेच झाडाच्या सावलीखाली पाला-पाचोळ्यावर आडवी झाली आणि पडल्या पडल्या हात डोक्याखाली काटकोनात घेऊन तळव्यावर डोक्याचा भार सांभाळत गप्पा मारत होती. वीस पंचवीस मिनिट झाली, सर्व लोक पोटोबा करून, थोडा आराम करून जरा सुधारल्या सारखे झाले. मग कुणीतरी खाकरल्या सारख केलं "आर आता उठताव कि तसंच घरास निघताव ?" दादू-आजा बोलला. आणी बाकी कोणी उत्तर द्यायच्या आत आबां कडे बघून बोलता झाला " हां आबा आता काय, सरळ जायचा कि उजवीकडनं रान काडून खाली उतरायचा ? नाय त डावीकडून जावंन वरच्या रानातन खाली रान काढायचा ?" - दादू आजा.

आबांनी घस्यातून हुंकार भरला आणि दोन तीन मिनिटानंतर बोलले " आदी सरल जावया सेमीपर्यंत आनी मगे डावीकडना वर जावया, पण आज जनावर मिलाल्याशिवाय माघारी जायचा नाय"


असं बोलून आबा उठून पंचा झटकू लागले. त्या बरोबर सर्व जण उठून बसले. टेहळके लगेच पळापळ करत पुढे जाऊ लागले, आता त्यांना पुढे जाऊन नवीन ठिकाणी टेहळणी करायची होती. त्यांचे टेहळणी बुरुज, झाडे, जागा ठरलेल्या होत्या. अमुक एक जागेवर कुणी जायचं हे देखील ठरलेले होते.

सर्व जण उठून उभे राहिले पण मी काही उठलो नाही. माझ्यात उठायची हिम्मतच नव्हती. माझी ही परिस्थिती पाहुन माझा मित्र समजुतीच्या सुरात म्हणाला "तू आता जंगलात येऊ नकोस, ऊन खूप चढलय, आनी आता सर्व लोक एकदम जोमात रान काढतील. तुझी फरफट होईल. त्या पेक्षा रामनाना बरोबर टेलक्या रहा. ता झाड लय ऊच हाय आनी चडूस एकदम सोपा हाय".

"अरे पण राम नाना तर गेला निघून" - मी.

"अर्र ता गेला त गेला, मी हाय ना, मी सोडन तुला तिथं आनी मी परत ह्यास्नी येऊन भेटींन" - माझा मित्र.


हे ऐकताच मी जोमाने उठलो आणि माझ्या मित्राच्या मागे चालू लागलो. मी आता थोडासा सुखावलो होतो, जंगलातली पायपीट आणि ओढाताण टळणार होती. मित्र झपझप चालत होता मी मात्र त्याच्या मागे पळत जात होतो. आता आम्ही जंगलातील पायवाटेने जात होतो त्यामुळे चालताना अढखळत नव्हतो पण डोक्यावर सूर्य तळपत होता. माझा मित्र चालता चालता काहीतरी बोलत होता. मला पूर्ण पणे ऐकायला येत नव्हते तरी मी त्याला अरे वा, बर, ठीक आहे, असं का अशी दाद देत होतो. अंदाजे वीस-पंचवीस मिनिटे चालून झाल्यावर आम्ही एका शेवरीच्या झाडाजवळ आलो. ते झाड खूप ऊंच होतेच आणि त्याला खूप फ़ांद्या आणि पाने देखील होती. माझ्या मित्राने बुंध्याजवळून कुकारा दिला, प्रतिसाद म्हणून वरून कुकारा आला.

"रामना, ह्या विज्यास घेऊन आलोय, तुज्या सोबतीनं टेलक्या राव्हदे, तू रानातली मजा दाखव त्यास" - माझा मित्र.

"व्हय, कारभाऱ्यांन निरोप पाठवलांन व्हता, पन त्यास झाडावर चडूस जमलं ? लय ऊच हाय" - राम नाना. मित्राच्या ऐवजी मीच उत्तर दिल "रामनाना चढेन मी झाडावर तू नको काळजी करू".

न्हाय तसा न्हव्ह झाड मोप ऊच हाय, मी अगदी वर शेंड्यास बसलोय, तू खाली बसलस तरी चालता, गाडग्यात (मातीच लहान मटकी) पाणी हाय, झाडाची सावली हाय, मस्त आडवा हो, वारा हाय चंगली झोप लागलं" - रामनाना वरून ओरडून म्हणाला.


"तू ठरव काय ता, पन वर गेलंस त सगल्या रानाची आनि पारधीची मजा बघूस मिलल, मी जातो", "रामना मी जातो र" असं बोलून माझा मित्र घाईघाईने निगुन गेला.

आता मी निरीक्षण करायला लागलो. झाडाच्या बुंद्याला टेकून रामनाना ने त्याची अतिशय निमुळत तोंड असलेली पाण्याची मडकी ठेवली होती. तिच्या तोंडावर झाडाचे मोठे पन वेलीने बांधले होते. तिथेच बाजूला त्याचा सोटा पडला होता. आधी मी त्या मटकीतील गार पाणी पिऊन घेतलं. न जाणो आता वर गेल्यावर किती वाजता खाली येता येईल ?

मग मी रामनाना कुठे बसला आहे त्याचा अंदाज घेतला. तो झाडाच्या शेवटच्या फांदीवर अगदी शेवटी जिथे त्याचे वजन पेलले जाईल अश्या ठिकाणी बसला होता. मला तर त्याच्या या कसबाचं अगदी नवल वाटलं. माझ्या लक्षात आलं, मी तर त्या तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मग नजर फांद्यांवरून खाली खाली सरकत आली ती अगदी बुंध्या पर्यंत. बुंधा हा भाला थोरला रुंद होता अगदी दोन माणसांच्या पसरलेल्या हातात देखील मावणार नाही असा. आणि तो देखील जमिनीपासून सरळ नऊ दहा फूट सरळ वर कुठेही फांदी किंवा काही गुंज अथवा चडन्यासाठी काही सोयीचा नव्हता. मी झाडाच्या भोवती गोल फिरलो आणि मला रामनानाने वापरलेली चांगली जाडजूड बांबूची काठी झाडाला टेकून असलेली दिसली. मी लगेच तिचाच वापर करून पहिला टप्पा पार केला आणि जिथून भरपूर फांद्या फुटल्या होत्या त्या ठिकाणी पोचलो. तिथून मी रामनाना जिथे बसला होता तिथे पाहिलं. अजून पल्ला खूप लांब होता. मला रामनाना जिथे बसला होता तिथपर्यंत जाता आलाच नसत आणि अगदी जीवाचा आटापिटा करून पोहोचलो असतो तरी तिथे किती वेळ राहता आलं असत देव जाणो, कारण रामनाना अगदी शेवटच्या टोकाच्या फांदीवर बसला होता आणि ती फांदी नाजूक देखील होती. वाऱ्याच्या मोठ्या झोताबरोबर ती पुढे मागे झोके घेत होती. रामनाना अतिशय कसबीने आपला तोल संभाळून खाली जंगलात लक्ष ठेवून होता.


मी रामनाना बसला होता त्या फांदीच्या जवळ पास जागा हेरून बसलो. मला खालचं जंगल बऱ्यापैकी दिसत होत. रामनाना मला वरून काही सूचना करत होता, जंगलातील माहिती देत होता. झाडांच्या पानांमुळे आणि वाहत्या वाऱ्यामुळे दुपार असून ऊन जाणवत नव्हतं. मी देखील रामनाना सांगेल तसं जंगलात इकडून तिकडे बघत होतो. ऊंचावरून आणी ते देखील झाडावरून जंगल पाहणे म्हणजे विलक्षण अनुभव होता. अंदाजे एक दीड किलोमीटर चा जंगल भाग मी वरून पाहू शकत होतो. वेगवेगळे वृक्ष, वेली, ऊंच सखल भूभाग, आकाशात उडणारे पक्षी, कीटक सगळं कस एकदम जवळ आल्यासारखं वाटत होत. मी सर्व गोष्टी अचंबित होऊन बघत होतो. तेव्हड्यात अचानक दुसऱ्या झाडावरील टेहळक्याने जोरात हाळी दिली " आर वरना दोन डुकरा येतहत, पारध्यांकडच येतहत. गोंधल थांबवा." त्या सरशी हाकार्यानी, पारध्यांनी हाकारे ध्यायाचे थांबवले. सर्व लोक एक जागी स्थब्ध झाले. डुक्कर हा प्राणी अकलेने कमी म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळे कि काय ते दोन्ही डुक्कर आवाज, गोंधल चालू असतानाही पारध्यांच्या बाजूलाच येत होते, आणि त्या बाजूच्या टेहळक्याने त्यांना बरोबर हेरले होते.

सर्व चारी बाजूचे टेहळके आता सतर्क झाले आणि डुक्कर कोणत्या बाजूला वळतोय कुठे आलाय याची माहिती बलकंदाराला देऊ लागले.

"आर व्हयतीकडं येताय तुक्या, तूज्याकडं येताय बघ, तयार र्हा."

"न्हाय न्हाय उलटी फिरली, उलटी फिरली वाकड्या आंबाच्या बाजूस गेली"

"गोविंदा तयार र्हा, आली आली आली बघ, मेल्या झो तुझ्या ढेंगा खालना गेली असती, तरी तू आपला वड काडीत र्हा, कस्या बंदूक घेतस ?". एक टेहळक्या. ज्या ठिकाणी शिकार दिसली त्या ठिकाणी जास्त करून मोठी झाडे होती आणि बराचसा भाग मोकळा होता त्यामुळे डुक्कर फिरताना वरून स्पष्ट दिसत होते. मी देखील त्यांना पाहू शकत होतो. समोरून होणाऱ्या आवाजामुळे आता दोन्ही डुक्कर थोडे सतर्क झाले आणि त्यांनी आपला धावायचा वेग कमी केला आणि ते एकदम थांबले. त्यांनी थोडा कानोसा घेतला आणि माघारी वळण्यासाठी त्यांनी पवित्रा घेतला आणि हीच संधी साधून एक बालकंदराने बार घातला ( गोळी झाडली ). हि बार घालायची वेळ कसलेला शिकारी किंवा बंदूकधारी हेरू शकतो, कारण डुक्कर हा प्राणी जागच्या जागी वळू शकत नाही त्याला वळायला वेळ लागतोच आणि वळताना रिंगणंही मोठे घेतो त्यामुळे त्यावर अचूक नेम धरता येतो. एका डुकराच्या बहुतेक मागील जांघेत गोळी लागली असावी. दुसरा डुक्कर पळून जाण्यात यशस्वी झाला कारण सर्वांचे लक्ष त्या गोळी लागलेल्या डुकरावर होते.

"लाग्ल्याय लागल्याय फर्यावर गोली लागल्याय" एक टेहळक्या.

"अर पण मेलाव दुसरा दुल गवसला असता ना !" दुसरा टेहळक्या.

"बारका व्हता म्हणून उडया मारत धावत व्हता" टेहळक्या.


तो गोळी लागलेल्या डुक्कर पाय ओडीत थोडं अंतर जाऊन एका झाडाखाली थांबला, त्याचा मागून सर्व शिकारी कल्ला करत पळत गेले, त्यात एक दोन बालकंदार होते. एकाने थोड्या अंतरावरून बरोबर वर्मावर गोळि मारली. डुक्कर मेला. पाच एक मिनिट थांबून खात्री पटल्यावर बलकंदार डुकराजवळ गेला आणि मेलाय याची खरी झाल्यावर आनंदाने ओरडला. "यवा र यवा, पारध पडली". त्या बरोबर सर्व शिकाऱ्यानी एकाच कल्ला केला आणि टेहळके मोठं मोठयाने एकमेकांना निरोप देऊ लागले.

"पारध गावली र पारध गावली, डुक्कर पडला, डुक्कर पडला".

त्या सरशी सर्व बालकंदारी एका मागोमाग एक करून हवेत बंदुकीच्या फैरी झाडल्या. जेणे करून गोवत बातमी पोहचेल कि शिकार मिळाली आणि तिकडील लोक पुढील तयारी करतील.

सर्व टेहळके आपापल्या जागेवरून शिकारीच्या ठिकाणी आले. आता पुन्हा चर्चा, थट्टा, मस्करी चालू झाली. कुणी पानसुपारीची देवाण - घेवाण केली. कुणी पाणी तोंडाला लावले. कुणी हॅश-हुश करत जमिनीवर बसले. काही जण डुकराचं अंदाज घेत होते. त्याचे सुळे, अंग बघून त्याच वय ठरवत होते तर बरेचसे लोक तो किती वजनाचा असेल आणि अंदाजे किती मटण मिळेल याचा अंदाज लावत होते.

"अटकीचा असलं नाय" !? - एक जण.

कोकणात शिकारीचं वजन मोजायचं प्रमाण वेगळं आहे. वज्याचं म्हणजे एका माणसाने उचलण्यासारखा. दोन वज्याचं म्हणजे दोन माणसांनी उचलण्यासारखा. चवकीचा - चार जणांनी, अटकीचा - आठ जणांनी असं.

"अटकीचा नाय वाटत, मेला काय 'डोल फूटलयत तुझं ?, चार ताठ गड्यास्नी अल्लद उचललं." दुसरा कोणीतरी.

"तसा नाय जानूदा, सा गडी तरी लागतील, जनावर भरलेला हाय" - तिसरा कुणीतरी.


तेव्हड्यात आबा आले, त्यांनी शिकारीकडे एकदा बघितलं आणि म्हणाले "जनावर नामी हाय, आता तोंडा काय बघताव ? म्होरल्या तयारीस लागा."

लगेच चार तरणी ताठी मूल पुढे आली. त्यांनी जाड रस्सीने डुकराचे पुढील आणि मागील पाय क्रॉस म्हणजे इंग्रजी X प्रमाणे बांधले, नंतर चांगला जाड-जुड बांबू दोन्ही पायांमधून सरकवला आणि पुढे दोन आणि मागे दोन गडी असा करून ते धूड उचललं. आता ते शिकारीचं धूड बांबूला उलट लोम्बत होत. पण एकंदरीत चारी गड्यांच्या चेहऱ्यावर कुचंबल्याच्या खुणा दिसत होत्या. त्यातला एक जण बोलला. "लय जड हाय, आनीक एक एक येवा". नंतर अजून एक एक जण पुढे मागे खांदा देऊ लागले. अश्या प्रकारे सहा जण शिकार घेऊन चालू लागले. सर्वात पुढे ढोल ताश्या वाजवणारे होते, त्यांच्या मागून शिकार आणि शिकारी असे चालले होते. सर्व जण वेग-वेगळ्या गोष्टींवर चर्चा करत मजेत गप्पा मारत अंतर कापत होते. ते एव्हडं मोठं धूड सहा जनांनीहि जड जात होत. दहा पंधरा मिनिटांनी ओझे वाहू गडी बदलले जात होते. तासाभराने आम्ही गावाचे वेशीजवळ आलो. तिथे पोराटोरांची हि गर्दी जमली होती त्यात काही म्हातारे देखील होते. तिथे दोन मिनिटे थांबून पान सुपारी झाली. इथेच वाट दोन पायांनी फुटते. डावीकडचा मुख्य रस्ता गावात जातो त्या वाटेने आलेली सर्व पोरे टोरे, म्हातारे आणि काही शिकारी साठी सहभागी झालेले देखील गेले. बाकी आम्ही सर्व उगवीकडे वळलेल्या पायवाटेने देवळाकडे निघालो. पुढील पंधरा मिनिटात आम्ही सर्व देवळात पोचलो. तिथे देखील काही मूल, वयस्कर मानस जी देवळापासून थोड्या अंतरावर राहत होती ती आली होती. शिकार देवळाच्या बाहेरील आवारात झाडाच्या पानावर ठेवली गेली. आता मी देखील शिकार अगदी जवळ जाऊन न्ह्याहळू लागलो. चांगला सत्तर ऐंशी किलोचा नर डुक्कर होता. त्याचे दोन्ही सुळे चांगले जाडजूड आणि मोठे होते. त्याच्या मांडीला आणि कानाच्या खाली अश्या दोन गोळ्या लागल्या होत्या. त्याच्या अंगावरचे केस मोठे आणि जाड होते. शरीराच्या मानाने त्याचे पाय नाजूक किंवा बारीक वाटत होते. माझ्या मित्राने सांगितले, डुक्कराचे पाय अतिशय काटक असतात, त्यामुळे त्याच वजनदार शरीर अगदी लीलया पेलत वेगाने पळू शकत होते.


येव्हड्यात गुरवाने आवाज दिला आणि सर्व लोक देवळाच्या गाभाऱ्यात जमले. गुरवाने देवाला पुन्हा गार्हाणे घातले आणि त्याने दिलेल्या कौलाप्रमाणे शिकार दिली म्हणून आभार मानले. आता आबा वळले आणि त्यांनी मोठ्याने आवाज दिला, "ऐका र, लगेच घरास पलू नका, जनावर मोठा हाय, घरास दुल बोटी घेवन जावा थोडा वेल थांबून", आनी मगे घरटी एक येवा सांजवता सांजवता". 


खरं सांगायचं तर मी देखील दमलो होतो आणि रात्री पुन्हा यायचं होत, घरी जाऊन आंघोळ वगैरे करून घरच्या सर्वाना भेटायचं होत. म्हणून मी देखील निघायच्या तयारीत होतो. मी माझ्या मित्राकडे प्रश्नार्थक नजरेने बघीतल सुद्धा. तो समजला आणि त्याने मला सांगितल "आजची शिकार मोठी आहे त्यामुळे फक्त इथेच सागुती शिजणार नसून घरी न्हेण्यासाठी देखील मटण मिळणार आहे, त्यामुळे ते घेऊनच आता इथून निघायचं म्हणजे घरच्यांना देखील सागुती मिळेल." मग त्याने हे देखील सांगितलं "आता वाटे कसे करतात ते सुद्धा बघून घे" .


नंतर सर्व डुक्कर कापून होईपर्यंत आम्ही देवळात बसून गप्पा मारल्या. थोड्याच वेळात माझ्या मित्रालाच वाटे करण्यासाठी तिकडून बोलावंन आलं. मी सुद्धा त्याच्या मागोमाग गेलो. वाटे करण्याचा प्रकार असा होता जो पारंपरिक प्रमाणे चालत आला होता. पुढील फरा ( तंगडी ) इथे होणाऱ्या सागुती साठी होती. त्यानंतर प्रत्येक घरी एक वाटा, ज्यांच्या ज्यांच्या बंदुका असतील त्यासाठी एक वाटा. ज्याने शिकार केली त्याला एक वाटा. गुरवाचा एक वाटा. असे सर्व वाटे करण्यात आले. काही गावकर्यांनी मोठी मोठी पाने आणली आणि त्याचे मोठे द्रोण तयार केले. प्रत्येकाचा वाटा देण्यात आला ज्याच्या घराचे कोणी आले न्हवते आणि जे घरी गेले होते त्यांचा वाटा शेजारच्यांकडे देण्यात आला. मग भानुदा ने जोरात ओरडून सांगितलं "आचारी आणि कामकरी तेव्हड रव्हा, बाकीच्यांनी भाकऱ्या घेव्न आठ वाजता येव्हा"


तसे आम्ही सर्व निघालो. आता तिथे काही ठराविक माणसे राहिली होती. माझ्या मित्राने वाटेत जाता जाता माहिती पुरवली. तिथे राहिलेले ठराविक लोक हे गाव जेवणात तरबेज आहेत. त्यातील काही आता मटण बारीक करतील, त्यातील हड्डी वेगळी काढली जाईल ती कालवणासाठी वापरली जाईल. काही लोक वाटण वाटतील. काही पाणी आणतील. मग मटण, कालवण आणि भात शिजवला जाईल.

आपण सर्व आठ वाजेपर्यंत तिथे भाकरी घेऊन पोहोचायचं, प्रत्येक घरातील फक्त येक माणूस. अश्या गप्पा होता होता आम्ही घरा जवळ आलो. त्याच घर माझ्या घराच्या बाजूलाच होत, मध्ये फक्त एक पांधळ (पायवाट किंवा गल्ली ) होती. घर जवळ आल्याबरोबर तो म्हणाला "साढे सात वाजता आपण निघू मी तुला हाक मारेन".

मी त्याला म्हटलं हाक नको मारू, कुकारा मार. त्यावर आम्ही दोघे हसलो.  

घरी आलो अन आंघोळीला गेलो तेव्हा कळलं कि अंगावर ठीक ठिकाणी बरेच ओरखडे उठले होते, काही ठिकाणाहून किंचित रक्त देखील ओघळलं होत. अंगातली सॅंडो बनियान खूप ठिकाणी फाटली होती अगदी टाकून देण्याच्या लायकीची झाली होती. 

सॅंडो बनियान ची अवस्था बघून आजी देखील करवादली ( रागावली / चिडली ). आणि थोडी नाराजीने म्हणाली "देवलाकडं जाणार हेस जेवस कि हिथच जेवनार हेस ?" दिवसभर दमल असशील आणि रातीचा परवास, इथंच जेव आनी झोप लवकर".

मी तिला म्हणालो "अगं आई अशी संधी मला पुन्हा केव्हा मिळणार सांग, घरात काय आता दररोज जेवणार आहेच, मी जातो देवळाकडे. सर्व मित्रांना सांगितलंय मी येतो म्हणून."

"माज म्हायती व्हता, तू काय घरात थांबूचा नाय, मी पटकन भाकरी टाकतो तीन त्या घेऊन जा" - आजी.

"तीन ? मी जवळ जवळ ओरडलोच. "अगं आई तीन काय ? मला एकंच भाकरी दे, तिकडे भात आहे ओरपायला" मी.       


मी आंघोळ आटोपून दिवाबत्ती केली, मोठी माणसं घरी आली होती त्यांची विचापूस केली आणि पुन्हा जेवणखोलीत आलो. मग आजी आणि माझ्या प्रेमळ गोष्टी चालू झाल्या. थोडा वेळ झाला असेल तोच मित्राचा कुकारा ऐकू आला, मी आजीला भाकरी बांधायला सांगितली आणि गम्मत म्हणून बाहेर जाऊन कुकारा मारायचा प्रयत्न केला पण गम्मतच झाली आणि काहीतरी विचित्र आवाज तोंडातून आला. आजीने भाकरी आणि टॉर्च हातात दिली, म्हणाली " कालोक हाय हातात काटी घे आनी संबालून जा".

कोकणात रात्री बाहेर पडायचे म्हणजे हातात काठी आणि टॉर्च हवीच. मी बाहेर गेलो, मित्र वाट पहात होतेच. सर्व जण गप्पा मारत अर्ध्या तासात देवळात पोहोचलो.

बहुतेक प्रत्येक घरातील एक व्यक्ती तिथे जमली होती. काही लोक देवळाच्या बाहेरील परिसरात जेवण तयार करत होते, काही बाजूच्या तळीतून पाणी आणून मोठे मोठे हांडे भरत होते, काही पत्रावळ्या लावत होते. काही साफसफाई करत होते तर काही मानकरी, वयस्कर लोक देवळात गप्पा मारत होते. मी गेल्या गेल्या त्या लोकांना भेटून विचारपूस करून पुन्हा माझ्या मित्रांच्या टोळक्यात सामील झालो. त्यांनी सुद्धा काही पान आणि हिरक्या ( बांबूच्या अतिशय बारीक काटक्या ) आणल्या होत्या आणि सर्व गप्पा मारत पत्रावळ्या लावत होते. बहुतेक सर्व ग्रुप मध्ये आजच्या शिकारीच्या गप्पा चालल्या होत्या. काही वेळात भानू नानाचा आवाज आला "आबानू रस्सा कसा झालाय ता कुनास तरी बेगुस सांगा".

"ता ऊंबसयना चाकरमानी आलाय त्यास दे" - आबा.


माझ्या मित्राने पडत्या फळाची आज्ञा समजून लगेच एक द्रोण भरून लालभडक रस्सा चव बघण्यासाठी माझ्याकडे दिला. मी सुद्धा माझा तो मोठा मान समजून तोंडाला लावला. एक घोट घेताच जळलळीत जाळ घशातून खाली उतरला, एक जोरदार ठसका लागला आणि नाका - डोळ्यातून पाणी आलं. पण त्याची चव काही औरच होती. मी तशीच कबुली दिली. "आबा, भानू नाना एकदम फक्कड आहे खावटी, झकास".  

“"मटान शिजला का ता सांग" भानूनाना.

"अरे पण तू मला बोटी कुठे दिलीस, फक्त रस्सा दिलास" - मी.

"असा झाला व्हय ?" - भानूनाना.

सर्वजण शिकारीच्या आणि इतर शिळोप्याच्या गप्पात दंग झाले होते. तास - दोन तास कसे गेले कळलेच नाही. आता जवळजवळ दहा वाजत आले होते. मटणाच्या सागोतीचा खमंग वास सुटला तसं एकेकाला भुकेची जाणीव व्हायला लागली. मधेच कुणी कुणी भानूनाना ला डिवचू लागले.

"काय र भान्या, आज मिळनार हाय कि नाय जेवस"? - एकजण.

"घराकडं असतो यार अवदू जेवन-खावंन झोपलो असतो" - दुसरा.

थोड्या वेळात भानूंनानाचे आवाज दिला "चला पत्रावल्या लावूस घेवा".


तसे बहुतेक सर्व तरुण मंडळी उठली. काहींनी पत्रावल्या रांगेत लावून घेतल्या. काही पाणी वाढायला लागले. काहींनी भात वाढायला सुरुवात केली. काहीनि मटण वाढायला घेतले. पुढील दहा मिनिटांत आबांनी आवाज दिला "चला र, पाना वाडलीयत". तसे सर्व जण हात पाय धुवून पंगतीला बसले. प्रत्येकाने आपल्या सोबत आणलेला भाकर तुकडा एकमेकांना दिला. कुणी तांदळाची भाकरी, कुणी नाचणीची भाकरी तर कुणी घावण आणले होते. मित्र प्रेमामुळे माज्या पानात भाकरीचा ढीग जमा झाला. मी अर्धी अर्धी भाकरी ठेवून घेतली बाकी पुन्हा मित्रांना दिल्या. आणि मग जी काही पंगत सुरु झाली यंव रे यंव. अशी सागुती मी बरीच वर्ष खाल्ली न्हवती. मस्त तिखट जाळ रस्सा आणि मटण, भन्नाटच झाले होते. वाढणारे वाढपी पंगतीच्या मध्ये फिरून दमून गेले तरी काही उमदे लोक पानावरुन उठेना, भाताचे ढीग च्या ढीग संपत होते. फार मजा आली. सर्व लोकांची जेवणे होईपर्यंत आणि त्यानंतरची आवराआवर होईपर्यंत रात्रीचे दीड वाजले. आणि मग सर्व लोक जडावलेल्या पोटाने, पेंगुळलेल्या डोळ्यांनी आप-आपल्या घरी परतले.    


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller