"स्वरांगी शेवंती किशोर देशमुख" - एक लेक
"स्वरांगी शेवंती किशोर देशमुख" - एक लेक


...........काय गार गार पाऊस पडतोय यार, मस्त वाटतंय, भिजून काय भारी मजा येतेय यार, असाच कोसळत राहू दे, रात्रभर भिजत राहू दे मला, वारा पण बघ कसा गार गार वाहतोय, अंग पूर्ण चिंब भिजलंय, मस्स्त वाटतंय यार......
टीप टीप बरसा पानी
पानी मे आग लगाई....
अगं ये नकटे, आग लागली तुझ्या तोंडाला, काय बडबडतेयस हे असं वेड्यासारखं....
झोपलेल्या स्वरांगीच्या अंगावर पाणी शिंपडत तिची आई शेवंती रागवूनच तिला उठवत म्हणाली......
तशी स्वरांगी, झोपेतून अचानक जागी झाली आणि अंगावर पांघरायच्या चादरीनेच तोंड पुसत, आईकडे बघत वर डोके केले...
तशी आई पुन्हा कडाडली, अगं ये, झोपलीयस काय आणि काय गाणी म्हणतेयस, तिकडे घड्याळाकडे बघ वाजले किती, जायचंय ना तुला शाळेत...... उठ, उठ आधी.....
आईने तिच्या अंगावरची चादर खेचत तिला रागवतच म्हणाली...
अगं आई तुला काय सांगू, मस्त स्वप्न होतं गं, मस्त रात्र, मस्त चांदण्यांच्या लहरिने पडणारा तो पाऊस.....
आईचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन नाचणारी स्वरांगी...
एवढी मोठी घोडी झालीयस तरी काय अजून सुधरायचं नाव घेऊ नकोस....
आपले हात तिच्या हातातून निसटते करत आई बोंबलत होती....
पण....स्वरांगी तिथे थांबलीच नाही हे ऐकायला, कधीच निघून गेली होती ती तिच्या दुनियेत.......
शेवंती - अहो ऐकलंत का, मला बहुतेक कळा यायला लागल्यायत, कुंदा मावशीला बोलवता का तुम्ही......
तिच्याच बाजूला काम करत असलेल्या किशोरला थोड्या जड आवाजाने शेवंती म्हणाली....
किशोर - अगं शेवंती काय होतंय, थांब मी आवाज देतो त्यांना........
मावशी ओ मावशी...जरा लवकर येता का इकडे....प्लिज...या ना पटकन......किशोरने काळजीतच मावशीला आवाज दिला...
बहुतेक शेवंतीची वेळ आली वाटतं....हातातली कामं बाजूला ठेवून, मावशी भराभर जिना उतरत, स्वतःशीच बोलत आल्या..
अहो मावशी बघा ना शेवंतीला बहुतेक हॉस्पिटल ला न्यावे लागेल....
किशोर तू एक काम कर, आपल्या पहिल्या माळ्यावर "ज्योती जगदाळे" डॉक्टर आहेत त्यांना आवाज दे आणि जातानाच उल्का ताईंनाही आवाज दे, ........
शेवंती तू घाबरू नकोस, आम्ही आहोत सगळे, आता या घडीला तुला हॉस्पिटलला नेले तर, मला वाटत नाही तू आणि तुझं बाळ सुखरूप घरी येतील, म्हणून आपण इथे घरातच तुझी डिलिव्हरी करूया असं माझं मत आहे.......
मावशी, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण माझं काहीही झालं तरी चालेल पण माझ्या बाळाचं काही झालं नाही पाहिजे, मग तुम्ही काहीही करा........
आपल्या बाळासाठी एक आई, मावशीला रडकुंडीला येऊन सांगत होती....हेच असतं बाळ आणि आई मधलं एक अदृश्य नातं.....असो...
किशोर धावतच बाहेर गेला....
उल्का ताई, आहात का घरात ?
हो-हो .....बोला भाऊ काय झालं....
अहो ताई शेवंती बघा ना....
किशोरचा रडवेला चेहरा बघून उल्का ताई तशाच, शेवंतीकडे धावल्या....
किशोर जिने चढत, धापा टाकत, आपल्या बायकोच्या काळजीने धडपडत जिने चढत जगदाळे डॉक्टरांच्या दरवाज्याजवळ पोहचला......
मॅडम.....मॅडम....
डॉक्टर आवाज ऐकल्यावर दरवाज्याजवळ आल्या....
मॅडम .....मॅडम..
तुम्हाला कुंदा मावशी आमच्याकडे बोलावतायत, लवकर चला....शेवंती...चला ना लवकर ....मॅडम...
आधीच किशोरला धाप लागलेली आणि त्यातच शब्द तोंडातून फुटत न्हवते.....
डॉक्टरांना माहीत होते, शेवंतीचा नववा महिना संपायला आला होता, कदाचीत कळा लागल्या असतील म्हणून हा धावत इथे आला असणार.....
तू जा किशोर मी येते लगेच......
सर्व साहित्य घेऊन पाचच मिनिटात डॉक्टर शेवंतीच्या समोर हजर झाल्या.....
बघतात तर काय, शेवंती कळवळतेय, कुंदा मावशींनी तर सर्व तयारी करूनच ठेवली होती, उल्का ताई शेवंतीच्या डोक्याजवळ बसून तिला धीर देत होत्या......
कुंदा मावशी - डॉक्टर आपण इथेच जर.....
डॉक्टर - हो मावशी तुमच्या तयारीवरून माझ्या लक्षात आलंय सगळं.......
ज्योती डॉक्टरांनी सर्व चेकअप केल्यावर ......
किशोर तू बाहेर जाऊन बस, काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल.....बाहेर बस थोडा वेळ....
आता, कुंदा मावशी, उल्का ताई, आणि डॉक्टर ज्योती जगदाळे, शेवंती ची काळजी घेण्यास घरात थांबल्या होत्या....
मावशींनी थोडीफार तयारी करून ठेवल्यामुळे डॉक्टरांना खूपच मदत होणार होती.........
किशोर......दरवाज्याच्या बाहेर आला..., कधी बसत होता तर कधी उभा राहून नखं चावत होता, त्याला धास्ती लागली होती....
लग्न झाल्यापासूनचे दिवस त्याला आठवत होते.....
हातात हात घेऊन फिरलो, कुठे कुठे गेलो....फिरायला...
अगदी सगळं त्याला आठवत होतं.....
किती वेदना सहन करून या माऊली आपल्याला जन्म देतात,...
असा विचार येताच त्याच्या अंगावर काटा आला....
आपण आपल्या आईला, रागात बोललेले शब्द, आणि आईने ते शब्द मनात न ठेवता आपल्यावर केलेली माया, सारं काही त्याला एका क्षणात आठवायला लागलं होतं....
भाकरी जर करपली म्हणून आईला ओरडणारे बाबा...
पण तितकेच आईवर प्रेम करणारे बाबा त्याला लगेच आठवले...
आज अकरा वर्ष झाली होती, आई बाबांना जाऊन आणि एकुलता एक मी पोरका झालो होतो, पण शेवंती भेटली आणि आपण सुधरलो, शेवंतीने तर पार बदलून टाकलं आपल्याला....
तसंच शेवंतीचेही आई बाबा ती लहान असतानाच गेले, आणि तिचा सांभाळ तिच्या मामाने अगदी पोटच्या पोरी-प्रमाणे केला.......
आमचं प्रेम आहे एकमेकांवर असं मामाला सांगायला अजिबात घाबरली नव्हती शेवंती.....
पण मामाने दाखवलेला शेवंती आणि माझ्यावरचा विश्वास आम्ही तंतोतंत सार्थ ठरवला होता....
शक्य होईल तेवढं मी शेवंतीला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करीन...नव्हे आनंदातच ठेवेन.....
दिवस गेलेत म्हणून मला शेवंतीने सांगितले तेव्हा मी ऑफिस मध्ये होतो...फोन ठेवला आणि तसाच घरी आलो होतो...
बेल वाजवून वाजवून थकलो, तरी तीने दरवाजा नाही उघडला , मी घबरून गेलो....खिडकीतून पाहिलं तर ही वेडी, आई होण्याच्या नादात एकटीच आपल्याच तंद्रीत नाचत होती.....
मला बघून धावत येऊन दरवाजा उघडत, एखाद्या लहान पोरीसारखी तिने मला मिठी मारली होती, आणि म्हणाली - मला उचलून घ्या ना.....
अशीच आपली नकटी तुम्हाला एकदा म्हणेल तेव्हा आताची माझी आठवण तुम्हाला येईल की नाही बघा....
मग काय घेतली उचलून आणि दोघेही नाचलो होतो - अगदी मन-मुराद - आनंदाने.........
अरे किशोर.....! किशोर......! ये किशोर.......
अं..अं...काय...
अरे कुठे हरवला होतास, विचार कसला करतोयस ये आत ये...
शेवंती आपल्या बाळाला घेऊन हसत होती...
ते तीचं हसणं बघून किशोर गहिवरला.....
तू ठीक आहेस ना....!
शेवंती मानेनेच हो म्हणाली......
आज तू मला एक बाप म्हणून समाजात नव्याने जन्म दिलास म्हणून तुझे खूप खूप धन्यवाद.....!!
शेवंतीच्या कपाळावर आपले ओठ टेकवत, किशोर तिलाच ऐकायला जाईल असं हळूच म्हणाला....
कुंदा मावशी - किशोर लेक झालीय तुला, लक्ष्मी आलेय घरात...
डॉक्टर - हो किशोर पहिलीच लक्ष्मी झाली आहे, सुंदर असे नाव ठेवून सगळे मिळून बारसे करू आपण....
उल्का ताई- किशोर भाऊ, लक्ष्मीची पाऊले लाभली आहेत, बाप झालात......अभिनंदन तुमचं..!!
आपल्या सर्वांचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही....अगदी जन्मभर........!!
किशोर गहिवरून म्हणाला......
सगळे संध्याकाळ पर्यंत तिथेच थांबले होते...
डॉक्टरांनी दोघांनाही काही सूचना केल्या आणि त्या थोड्या वेळाने निघून गेल्या....
उल्का ताई शेवंतीला सर्व गोष्टी समजावून सांगून, तिचा तात्काळ निरोप घेतला....
मावशी तुम्ही राहा इथेच.....किशोर म्हणाला
अरे तू सांगून मी राहणार आहे होय, माझी लेक आहे ही, मी इथेच राहणार आहे, तू सांग नाहीतर नको सांगू....
किशोर गहिवरला आणि मावशीच्या कुशीत जाऊन पोरासारखा रडायला लागला...
शेवंती हे सगळं पाहत होती, तिच्याही डोळ्यांतून अश्रू आले.....
किशोर शेवंतीजवळ जाऊन बसला बाळाला न्याहाळत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला ........
-मी म्हणाले होते ना , एक दिवस तुम्हाला, आपली लेक अशीच उचलून घायला सांगेल म्हणून, बघा आता तसंच होणार आहे......
जगदाळे डॉक्टरांच्या सल्ल्याने, बाळाचे बारसं बारा दिवसांनी न करता एक महिन्याने खूप आनंदात पार पडले.....
खूप माणसे आली होती, किशोरच्या ऑफिसची लोकं, शेवंतीच्या मामाकडचे सर्व, मामा-मामींनी तर भर-भरून आशीर्व
ाद दिला....
पोरी अशीच खुश राहा-सुखी राहा.....आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत....
आणि माझ्या पाठीशी कोण ठेवणार आशीर्वाद....असे म्हणत किशोर खाली वाकत मामा-मामीच्या पाया पडला...
अहो तुमच्यासारखे जावई आम्हाला मिळाले यातच आमचे भाग्य.......मामा जावयाला मिठीत घेत म्हणाले.......
यावेळीही डॉक्टर कुंदा मावशी, उल्का ताई यांची खूपच मदत झाली.....
सर्वांच्या एकमताने नाव ठेवले होते "स्वरांगी"
"स्वरांगी शेवंती किशोर देशमुख"
दोन वर्षांची इटूकली-पिटुकली पाऊले घरभर धावत होती, किशोर आणि शेवंतीला तिच्या मागून धावायला दिवस पुरत नव्हता......
दिवसांमागून दिवस हसत खेळत जात होते, मुलीच्या संगोपनात शेवंती आणि किशोरने कसलीही कसर सोडली नव्हती....
खेळणी , खाऊ, अगदी रोज मिळायला चालू झाले लेकीला...
मग काय पाठीवर बसवून घोडा-गाडी करत खबडक खबडक घोडोबा चालायचे, तर कधी उचलून घेऊन खांद्यावर बसवून हिंडायचे सगळीकडे....
शेवंती जेवण करत असताना तर कधी पुस्तक वाचताना मधेच स्वरांगी यायची, बोबड्या बोलीत बडबडायची, खूप मस्त वाटायचं लेकीचं ते बोबडे बोल ऐकायला दोघांनाही...
बघता बघता स्वरांगी सहा वर्षांची झाली.....
शाळेत नाव टाकले, लेक शाळेत जाऊ लागली......
पाठीवर छोटीशी कार्टून ची बॅग घेऊन लेक तयार झाली की, पप्पा चल ना मला सोडायला, असे लाडानेच बापाला आवाज द्यायची, शेवंतीला तिच्याशिवाय राहवतच नसे, कधी एकदा शाळेतून घरी येतेय असं व्हायचं.....
घरी आली की मग शाळेतल्या घडलेल्या गोष्टी सांगत बसायची, किती किती बोलायची, अगं जरा दम घे ना, शेवंती नी किशोर एकमेकांकडे बघून हसायचे.....
स्वरांगी आता अकरा वर्षाची झाली होती.....
सगळं काही तिला समजत होते, आपल्यासाठी आपले पप्पा आणि आई किती कष्ट करतात हे ती आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होती.
आपण खूप शिकायचे आणि मोठ्ठं व्हायचं , आई पप्पांना काम करू द्यायचं नाही, असे अनेक विचार एवढ्याशा वयात तिच्या डोक्यात येत असत.....
सगळे खूप आनंदाने चालले होते....मस्तीत ......मजेत.......
एक दिवस किशोर स्वरांगीला शाळेत सोडून आला....
शेवंती आणि तो .....लेकीसाठी संध्याकाळी काहीतरी गोड बनवून खायला द्यायचं म्हणून गोडाचं करत बसले होते.....
शेवंती अगं ये शेवंती......शेवंती....
कुंदा मावशी हाकेवर हाक मारत होत्या.....
त्यांचे ओरडणे ऐकून उल्का ताईही बाहेर आल्या......
काय हो मावशी काय झालं......किशोर
हे साहेब बघ तुला भेटायचं म्हणतायत.....
किशोर भांभावून गेला.....
आता काय झालं ......
का आले असतील पोलीस.....किशोर विचारात गुंतून गेला..
बाहेर आलेली शेवंती पोलिसांकडे बघत ....किशोर ये किशोर का आलेत रे हे पोलीस....
किशोर शेवंतीच्या आवाजाने भानावर आला नि पोलिसांशी बोलू लागला....
साहेब काय झालं हो तुम्ही इथे आमच्याकडे....!!
साहेब - नमस्कार मी "इन्स्पेक्टर - मनोज वढणे" आपल्याला माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला यावे लागेल....
किशोर - पण काय झालंय काय, मी येतो नाही म्हणत नाही, पण झालंय काय ते तरी सांगा....
शेवंती - साहेब सांगा ना काय झालंय, का यायचंय आम्ही पोलीस स्टेशनला.....शेवंती रडतच बोलत होती...
साहेब - चला मी सगळं सांगतो, गाडीत बसा आधी...
साहेब- आण्णा यांना सावकाश बसवा गाडीत आणि चला गाडी काढा.....
साहेबांनी आण्णा हवालदारांना सूचना केली....
आण्णा - अंह..हो साहेब...
किशोर गाडीत बसला......
सगळे बघत बसले होते, कोणाच्या अध्यात मध्यात नसणाऱ्या माणसाच्या घरी पोलीस.....सगळे विचार करत होते...
शेवंती पार कोलमडून गेली होती.....
पोलिसांची गाडी शाळेच्या दिशेने चाललेली दिसल्यावर किशोरने प्रश्न केला....
साहेब गाडी शाळेत का नेताय....किशोर
आपण आधी तिथे जाऊ नंतर बघू....इंस्पेक्टर "मनोज वढणे"
अहो दादा चला, तीथे गेल्यावर आपल्याला समजेलच....आण्णा
गाडी गेटच्या आत आली किशोर गाडीतून उतरला तसा समोर पाहिलं आणि तसाच खाली बसला, डोळ्यावर अंधारी आली, चक्कर येऊन तो खाली पडला होता....
आण्णा गाडीतून पाणी घेऊन या.....साहेब ओरडलेच...
आण्णांनी धावत जाऊन साहेबांच्या समोर पाण्याची बॉटल तिरकी केली....
पाणी हातावर घेऊन साहेबांनी किशोरच्या तोंडावर मारत त्याला सावरून बसवले .....
किशोर जागा झाला, शुद्धीवर आला तसा मोठ-मोठयाने रडू लागला....
समोर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली त्याची अकरा वर्षाची लेक होती........
, काय झालं असेल त्या बापाचं, किती स्वप्न रंगवली होती आपण तिच्या आयुष्याची आणि हे काय होऊन बसलंय.....
किशोर पार कोलमडून गेला होता, तसाच ढोपरं घासत स्वरांगी जवळ गेला नि तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून धाय मोकलून रडू लागला....स्वरांगी...माझी स्वरांगी....ये...स्वरांगी...
ती आर्त आरोळी ऐकून सर्वांचे डोळे पाणावले....
इन्स्पेक्टर "मनोज वढणे" - आम्ही तुमचे दुःख समजू शकतो पण आता आपल्याला इथून घरी जायचे आहे....आपले डोळे पुसत साहेबांनी किशोरला सावरले...
स्वरांगी शाळेत मैत्रीणींबरोबर खेळताना कुठेतरी तिचा पाय अडखळला आणि ती पडली....
पडली ती बरोबर तिचं डोकं मागच्या बाजूला एक दगडावर खूप जोरात आपटले तिने एक किंचाळी फोडली आणि ती जागीच.........
इन्स्पेक्टर साहेब - आण्णा अँबुलन्स कुठे आली बघा....
आण्णा आपले भीजलेले डोळे लपवत म्हणाले.....
ही ही काय आली साहेब अँबुलन्स....
स्वरांगीला अँबुलन्स मध्ये ठेवले गेले आणि बाजूला किशोर, त्याच्या एका बाजूला साहेब, दुसऱ्या बाजूला आण्णा...
आपल्याच मुलीच्या पार्थिवाजवळ बसून कोण बाप शांत बसेल....
आकांड तांडव केला होता त्याने....
आपल्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहवत किशोर खूप काही बडबड करत होता...
दादा सांभाळा स्वतःला....आण्णा आपला रडवेला आवाज दाबत बोलले....
किशोरला सावरत इन्स्पेक्टर म्हणाले....एक बाप आपल्या मुलीवर किती प्रेम करतो हे आम्हाला माहितेय, पण तुम्ही शांत व्हा....
एरव्ही इतक्या कठोरपणे वागणारा माणूस हा आज एवढा हळव्या मनाचा आहे हे आण्णांना आज नव्याने कळले होते....
अँबुलन्स दरवाज्यात आली ....किशोर उतरला आणि सरळ शेवंतीकडे धावला, काय झालं असं विचारायला तोंड उघडणार तेवढ्यात शेवंतीला खाली उतरवताना आपल्या लेकीचा चेहरा दिसला नि ती कोळलीच, खाली पडली, पण उल्का ताई बाजूला होत्या त्यांनी तिला सावरलं....
एक साथ सगळ्यांनी हंबरडा फोडला आणि सर्व परिसर रडवेला झाला, जो येत होता त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते...
त्याचवेळी जगदाळे डॉक्टरही तिथे आल्या...त्यांना बघून तर शेवंती अजूनच रडायला लागली, मावशींनी तिला धरून ठेवली होती....सारखी स्वरांगी....स्वरांगी....करून जीव कासावीस करत होती....
आणि किशोर......
शेवंतीचे होणारे हाल पाहून तो एका बाजूला आता शांत बसला होता, कसलीच रेषा त्याच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हती, अगदी शांत........
स्वरांगी ........स्वरांगी......ये स्वरांगी......,
शेवंती झोपेतून जागी झाली आणि स्वरांगीला मोठं- मोठयाने आवाज देऊ लागली.....
शेवंती पुन्हा आक्रोश करून रडायला लागली....
आई ....ये आई....
शेवंतीला आवाज आला...
तू आहेस का इथे ...स्वरांगी....
कुठे आहेस.....
आई मी इथे आहे....
शेवंती थोडी पुढे सरकली तर तिला स्वरांगी तशीच शाळेच्या कपड्यावर असलेली बाजूलाच बसलेली दिसली....
अगं तू कुठे होतीस, किती शोधले तुला मी...
का जातेस तू मला सोडून सारखी सारखी.....
आई तू का रडतेयस ..नको रडू....मी नेहमी तुझ्याजवळच असेन...मी तुला सोडून कधी - कधी कुठे जाणार नाही....
शेवंतीच्या डोळ्यांतून येणारे अश्रू आपल्या दोन्ही हाताने पुसत होती......स्वरांगी -
किशोर ...किशोर...कुठे आहात तुम्ही, आपली स्वरांगी आलेय बघा....
किशोर धावतच शेवंती जवळ आला ....
अहो ही बघा आपली स्वरांगी, इथेच आहे, ही बघा, दिसली का तुम्हाला.....
किशोर शेवंतीला मिठी मारून जोर-जोरात रडू लागला....
पुन्हा शेवंतीच्या डोळ्यातुन येणारे पाणी पुसत "स्वरांगी शेवंती किशोर देशमुख" आपल्या दुनियेत निघून गेली......
शेवंती लेकीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली....
लेकीचा पुन्हा आवाज आला......
"आई - पप्पा मी येईन परत, नक्की येईन"
या वेळेला तो आवाज किशोरने ही ऐकला आणि पुन्हा दोघं एकमेकांच्या मिठीत एकमेकांना एकमेकांत सामावून घेऊन रडू लागले.....
क्रमशः
(भाग २...लवकरच... )