विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Others

4.5  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Others

पाऊस

पाऊस

3 mins
282


चार महिन्यांच्या प्रखर उन्हाच्या झळा सोसून आणि गर्मिने येणाऱ्या घामाच्या धारांनी लोकं अस्वस्थ झालेली असतात. या उन्हाचा कंटाळा आलेला असतो. सकाळ असो, दुपार असो किंवा रात्र असो माणसाला शांत झोप लागतच नाही. बाहेर फिरतीवर काम करणाऱ्यांचे तर खूप हाल होतात. उन्हातून फिरून घाम येऊन सर्व कपडे घामाने भिजून जातात. अक्षरशः या उन्हाचा त्रास कुणालाच सहन होत नाही. अशा वेळी मे महिन्याच्या अखेरीस सर्वांच्या नजरा वर आकाशाकडे आपोआप थोड्या वेळासाठी स्थिरावल्या जातात आणि कधी पाऊस पडतो आणि कधी सर्वत्र गारवा होतोय याची वाट पाहिली जाते.


अचानक एका सायंकाळी पावसाची हलकीशी सर वाऱ्याबरोबर येते आणि तापलेल्या जमिनीला शहारून निघून जाते. परंतु पावसाच्या सरी मातीवर पडल्यामुळे सगळीकडे तो मातीचा सुगंध क्षणात पसरला जातो आणि माणसांना थोडंसं हायसं वाटते. आता पावसाला सुरवात झाली म्हणत माणसांबरोबर इतके महिने झाडे वेलीही ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो आता येऊ लागला आहे. त्याची चाहूल लागली आहे. चातक पक्षाचीही आता प्रतीक्षा संपली आहे. त्या मातीच्या सुगंधाने संपूर्ण सृष्टी सुखावली जाते.


पहिल्या पावसात प्रत्येकाला भिजावेसे वाटते. गार गार रिमझिम जलधारा अंगावर झेलताना शहारे येतात. असंच या पावसात भिजत राहावं असं वाटतं. झाडांना आणि वेलींनाही बहरून जायला होते. झाडे, वेलीही शहारून जातात. त्यांनाही नवी पालवी फुटते. झाडांची वाढ होते. फुलांचा आणि मातीचा सुगंध दरवळला जातो.

मुलांना या सुगंधाने कौतुक वाटते सारखे बाहेर जाऊन तो सुगंधाचा अनुभव घेत असतात.


शाळेतील मुलं आणि सर्व माणसं पावसाळी रेनकोट, छत्र्या घ्यायला दुकानात गर्दी करू लागतात. पावसाळा सुरू झाला. कधी उन्ह पडलेलं असतानाही पाऊस यायचा तर कधी इथे पाऊस आहे तर दुसऱ्या बाजूला नाही अशी अवस्थाही होते. कधी कधी तर धो धो पडायचा आणि सर्व नदी, नाले, तुडूंब भरुन, रस्त्यावर पाणी भरून, शाळेच्या आवारात पाणी साचून सगळीकडे पाणीच पाणी हा पाऊस करून टाकतो. अशा वेळी गाड्या बंद पडतात. लोकं जागच्या जागी अडकले जातात. काही ठिकाणी सततच्या पावसाने खूप हानिही होते. पुर येतो. या पुरात सर्व काही वाहूनही जाते. एका झटक्यात होत्याचे नव्हते होऊन बसते. एक महिन्यांपूर्वी पाऊस येऊदे म्हणणारे असा अक्राळ विक्राळ रूप धारण केलेला हा पाऊस नको असं म्हणतात. कारण अशा पावसाने खूप नुकसान झालेले असते. काहींची घरं उध्वस्त होतात. वारा आणि पावसामुळे झाडे उन्मळून पडतात. याच कारणाने माणसांना पाऊस नकोसा वाटतो. 


ग्रामीण भागात शेतकरी मात्र पावसाची अगदी त्या चातका सारखीच वाट पाहत असतो. एकदा का पाऊस पडला की, शेतकऱ्यांची धावपळ चालू होते. शेतीच्या कामांना जलदगती येते. शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळते त्यामुळे शेती हिरवीगार होऊन लवकर बहरते. शेतकरी मनापासून पावसाचे आभार मानतात. 

परंतु काही ठिकाणी पावसाची क्षमता जास्त असल्याने शेतीचे खूपच नुकसान होते. पीक येत नाही. शेतकऱ्यांना डोक्याला हात लावून बसावे लागते. पुढचा विचार त्यांना सतावत असतो. पीक आले नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा ह प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलेला असतो. यातूनच काही शेतकरी आलेल्या संकटांना सामोरे जातात आणि काहीतरी पर्याय शोधून काढतात. पण काहींना पिकाशीवाय पर्याय नसल्याने, दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी आत्महत्या करतात. हे चुकीचे असेल तरी त्यावेळी तो शेतकरी फक्त आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली किंवा येईल हे सहन न झाल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलतो आणि आपले जीवन संपवतो. अशा दोन बाजू शेतकऱ्यांच्या आहेत.


असा हा पाऊस कोणाला हवाहवासा वाटतो तर कुणाला नकोसा होतो. परंतु पाऊस हा सर्वांनाच हवा असतो. वेड लावतो हा पाऊस. लेखक, कवींना या मोसमात लेखन आणि काव्य करण्यास विषय सुचतात. छान छान कविता तयार केल्या जातात. लेखन कौशल्य वाढते. लेखणी लिहिण्यासाठी लेखकांना सारखी खुणावत असते, मग असाच एखादा लेख किंवा कविता तयार होऊन वाचकांना वाचण्यास मिळतो. त्यावर अभिप्राय, प्रतिक्रिया यांचा पाऊस पडतो. 

असा हा पाऊस सर्वांसाठी पाऊसच असतो.


Rate this content
Log in