विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Tragedy Action Inspirational

4.3  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Tragedy Action Inspirational

सह्याद्रीची भुतं...

सह्याद्रीची भुतं...

4 mins
99


      आपण कोणी कधी सह्याद्रीची सफर करायला गेला आहात का ? कधीतरी जा. अगदी आपल्या कुटुंबासोबत जा. आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन जा, त्यांना कळुद्या हे महाराष्ट्राचे वैभव. आपण ज्या महाराष्ट्रात वास्तव्यास आहोत त्या महाराष्ट्राला ज्या महापुरुषामुळे एक आगळी ओळख निर्माण आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलाढ्य ताकदीची, बुद्धिमत्तेची आणि विचारांच्या प्रगल्भतेची जाणीव आपल्या मुलांना करून द्या. 

सांगा आपल्या बालगोपाळांना, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यात महाजांच्या मावळ्यांबरोबरच या गड-किल्ल्यांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. या किल्ल्यांमुळेच महाराज पातशहांशी नेटाने झुंजू शकले.

तिथल्या गड कोटांच्या पायऱ्या निरखून पहा आणि प्रत्येक मावळ्यांनी या सह्याद्रीसाठी प्राणांची आहुती देऊन सांडलेल्या रक्तातून उभे राहिलेले डोंगरमाथ्यांच्या कुशितेले हे किल्ले स्वतःच्या हाताने मुलांना दाखवून दूरवर पसरलेल्या याच सह्याद्रीच्या रांगा दाखवा.


जेव्हा कधी या गड-कोटांवर जाल तेव्हा आपणांस एक प्रत्यय नक्कीच येईल. त्यात आपण या सह्याद्रीच्या रांगेत वसलेल्या गडांवर राहायला गेलात तर मात्र आपली काही खैर नाही. अहो, म्हणे तिथे सह्याद्रीची भुतं रात्रंदिवस वावरत असतात. बरं, ही भुतं त्रास कुणालाच देत नाहीत. फक्त गडांवर चाळे करण्यास आलेल्या आणि दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या माणसांवर अक्षरशः आपला "चाळा" फिरवून मोकळे होतात. आपण कोकणातले असाल तर हा, "चाळा" म्हणजे काय ? हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. तशी ही भुतं तिथं असलेल्या मंदिरात रात्र झाल्यावर दिवसभर संवर्धन करून थकलेले शरीर घेऊन थोडीशी विश्रांती घेण्यास येतात. मंदिर नसेल किंवा मंदिर छोटं असेल तर हीच भुतं अथांग पसरलेल्या त्या निळ्याशार आभाळाखाली त्याचेच पांघरून आणि जमिनीला अंथरून बनवून पहुडलेली आढळतील.


कधीतरी रात्रीची हीच भुतं उठून भूतांसारखी सह्याद्रीत फिरत असतात. फक्त नी फक्त शिवकार्यासाठी.


सह्याद्रीच्या भुतांबद्दल सांगायचं तर, पहिल्यांदा त्यांच्यात लपलेला मावळा आपल्याला त्यांच्या अंतरंगात जाऊन आणि शिव-विचार घेऊन शिवकार्य करणारा माणूस शोधावा लागेल. तेव्हाच आपल्याला सह्याद्रीची ही भुतं समजून येतील. त्यांचे कार्य किती मोठे आहे हे समजून येईल.

आज गेल्या कित्येक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांनी वसवलेल्या आणि घडवलेल्या गडकोटांच्या रक्षणार्थ आणि संवर्धनासाठी ही सह्याद्रीची भुतं दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून गडकोट जसे आहेत तसे राखण्यासाठी अपार मेहनत घेत आहेत.

म्हणूनच आपल्याला या किल्ल्यांवर जाऊन ते किल्ले पाहता येतात. 


हीच ती भुतं आहेत जी आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येक भुताच्या सानिध्यात नेहमीच असतात. कुठल्याही भुताला काहीही मदत लागली तर हीच सह्याद्रीच्या कड्या कपारितली भुतं एकत्र येऊन त्याला मदत करीत असतात. इतकंच नाही तर, आजपर्यंत अनेक संस्थांना यांनी जशी होईल त्या परीने मदत केलेली आहे. करत आहेत. ज्या विभागातील हे दुर्गसेवक असतील त्या त्या विभागातील शाळांना शैक्षणिक साहित्य किंवा गरजूंना वेग-वेगळ्या पद्धतीने मदत करून त्यांच्यापर्यंत पोहचत असतात.


मला वाटतं आज आपण जे गडकोट पाहायला जातो. तिथे गेल्यावर गडाचे सौंदर्य पाहत असताना तिथली प्रत्येक वास्तू किंवा वस्तू न्याहाळताना जी काही साफ सफाई दिसते ना ती सफाई याच सह्याद्रीतल्या भुतांनी केलेली असते. 

परंतु आपण तिथे गेल्यावर काय करतो ? 

पाण्याच्या बाटल्या, खाऊचे पाकीट, लाज नसलेल्यांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या किंवा आपल्याकडून चुकून किंवा जाणूनबुजून जो काही कचरा होतो तो कचरा हीच भुतं साफ करीत असतात. 

हा कचरा करताना आपण कुठे आलो आहोत आणि आपण काय करतोय याचे भानही काही लोकांना नसते. गड किल्ले आणि मंदिर यात काहीच फरक नाही असे मी मानतो. मंदिरात गेल्यावर आपण घाण, कचरा करतो का ? नाही ना. 

मग, किल्लेसुद्धा मंदिर प्रमाणेच साफ सुथरे आणि सुंदर दिसावे यासाठी आपणच स्वतःला आधी बदलले पाहिजे. हे किल्ले म्हणजे शिवरायांचे जीव की प्राण होते मग यांना नीट नेटके ठेवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. फक्त मुखाने शिवरायांचा जयजयकार आणि अंगात त्यांचे फोटो असलेले कपडे घालून मिरवले म्हणजे शिवभक्त होता येत नाही. त्यासाठी महाराजांना अंगावर आणि डोक्यावर न ठेवता महाराजांच्या विचारांना डोक्यात घेणे आज गरजेचे आहे.


कोणत्याही गडावर जाताना आपल्याकडून काही चूक होणार नाही याची खबरदारी आपल्यालाच घ्यायची आहे. जर काही असभ्य वर्तन, किंवा वेडेवाकडे चाळे कोणी केले तर... तर ...मग काय !! 

हीच भुतं मग असल्या लोकांच्या मागे लागतात अगदी "चाळा" बनून. मग हा "चाळा" तो माणूस गडाखाली पायउतार होत नाही तोपर्यंत एखाद्या "बायंगी" प्रमाणे ही सह्याद्रीची भुतं त्याचा पाठलाग सोडत नाहीत.


अशी ही सह्याद्रीची भुतं सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून अखंडपणे, अविरतपणे आनंदाने शिवकार्य हाती घेऊन गडकोटांच्या रक्षणासाठी हर एक दुर्ग कसा सौंदर्यमय, नयनरम्य करता येईल याचा विचार करून,

महिनोनमहिने संवर्धनासाठी मोहीम आखत असतात. यातूनच आज हे गडकोट जगाला उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळत आहेत. हेच आमचे परमभाग्य !!


🚩सह्याद्रीची भुतं...


भुतं कोणी कधी पाहिलीत का ?

पाहिलीच असतील कोणी तर,

पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले विकल्प फक्त

मी पाहिलीत खरी भुतं, सह्याद्रीच्या कड्या-कपारीत


फावडा, कुदळ, खांद्यावर घेऊन गडावर चढणारी

संवर्धन करता करता थकल्यावर

त्या काळया कातळावर विसावलेली

घामाच्या धारांनी भिजलेल्या शरीराची भुतं

मी पाहिली आहेत, अशी सह्याद्रीची भुतं...


टिकावाच्या घावाने, बुजलेल्या गडाच्या पायऱ्या 

दृष्टीस पडल्यावर मेहनतीचे चीज झालेले

आपल्या भरल्या डोळ्यांनी पाहत

हृदयातल्या कप्प्यात हे क्षण आठवत असताना

आनंदलेली मी पाहिली आहेत ही सह्याद्रीची भुतं...


कुदळ, फावड्याने तलावातील काढलेला गाळ, 

सर्वजण साखळी बनवून बाहेर दूरवर फेकत 

दगडांचे त्याच तलावाभोवती बांध बांधणारी

पशु पक्षांची तहान भागवण्यासाठी धडपड करणारी

मी पाहिली आहेत ही हाडामांसाची सह्याद्रीची भुतं...


दुर्गसेवक हे नाव अभिमानाने मिरवणारी

दुर्गसेविका होऊन हर मोहिमेत सामील होणारी

थकव्याची जाणीव न करता हसऱ्या चेहऱ्याने 

शिवरायांचा जयघोष करत गड उतरणारी

मी पाहिली आहेत, ही सह्याद्रीची भुतं...


मी पाहिलेत स्वतः सह्याद्रीचे भूत होऊन

कड्या कपारीत वावरताना 

चपळाईने एक एक गड कोटांची काळजी घेताना

शिवरायांच्या चरणी माथा टेकवून नतमस्तक होताना

आयुष्यभराचे पुण्य कमावताना

मी पाहिली आहेत, ही सह्याद्री भुतं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy