STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Inspirational

4.7  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Inspirational

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आजचा तरुण ...

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आजचा तरुण ...

5 mins
20

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आजचा तरुण ...

भारताच्या इतिहासातील तेजस्वी सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज!
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांची जीवनदृष्टी आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात. पण विशेषतः आजच्या तरुण पिढीला त्यांच्या विचारांतून दिशा घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आजचा काळ हा कठीण स्पर्धेचा असून खूप वेगवान आणि भ्रमाचा आहे. अनेक तरुण आज दिशाहीन झाले आहेत. आत्मविश्वास, ध्येय, संस्कार आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांची कमतरता अधिक प्रमाणात आजच्या तरुणांमध्ये भासत आहे. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार म्हणजे नवचैतन्याचा झरा आहे. एक नवी दिशा देणारी वाट आहे. उन्नतीकडे जाण्याचा एक मार्ग आहे जो प्रत्येकाला यशस्वी होण्यास नक्कीच मदत करू शकतो.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते, तर ते उत्तम विचारवंत, कुशल राज्यकर्ते, शिस्तप्रिय सेनानी, संवेदनशील पुत्र आणि लोकहितैषी राजा होते.
बालपणापासूनच जिजाऊमाता यांच्या संस्कारांत वाढलेल्या शिवबांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले “हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची !”
हे स्वराज्य म्हणजे केवळ राजकीय सत्तेचे नव्हे, तर जनतेच्या हिताचे, न्यायाचे, स्वाभिमानाचे आणि धर्मनिरपेक्षतेचे राज्य होते. महाराजांच्या प्रत्येक कृतीत विचारांचे तेज होते. आणि ते विचार आजच्या तरुणांसाठी आदर्श मार्गदर्शन ठरू शकतात.

शिवरायांचे जीवन म्हणजे आत्मविश्वासाचा जिवंत झरा आहे. आजच्या तरुणांनी हा आत्मविश्वास आत्मसात केला पाहिजे. आज अनेकजण अडचणी आल्या की मागे हटतात, पण शिवरायांनी परिस्थितीला शरण न जाता आलेल्या संकटाचा सामना करून परिस्थिती बदलण्याचे धाडस दाखवले. 
स्वतःवर विश्वास ठेवा, परिस्थितीवर नाही! हेच शिवरायांचे ब्रीद लक्षात ठेवले तरी आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो.

आफझलखानाच्या भेटीला जाताना मावळ्यांनी विचारले "महाराज, भीती वाटत नाही का ?"
तेव्हा शिवराय म्हणाले होते की, “भीती वाटते, पण त्यावर विजय मिळवणे हेच शौर्य !”
आजच्या तरुणांनी हे लक्षात ठेवायला हवे. भीती हा शत्रू नाही, परंतु भीतीवर मात करणे हेच यशाचे रहस्य आहे. निर्णयक्षमता ही तरुणाईची खरी शक्ती आहे. योग्य निर्णय वेळेत घेणे, हे शिकणे आवश्यक आहे.
शिवाजी महाराजांना ठाऊक होते की एकट्या माणसाने साम्राज्य उभं राहू शकत नाही. म्हणून त्यांनी मावळे तयार केले, स्वराज्याची पायाभरणी ‘सहकार्याने’ केली. आजच्या काळात, नोकरी असो वा व्यवसाय टीमवर्क आणि एकतेचे महत्त्व प्रचंड आहे. तरुणांनी स्पर्धेपेक्षा सहकार्य शिकले पाहिजे.
शिवरायांच्या जीवनात चरित्राचे स्थान सर्वोच्च होते. सुरत लुटली तरी स्त्रियांना हात लावला नाही, शत्रूच्या बायका-मुलांचा सन्मान राखला. हे त्यांचे संस्कार. होते. आजच्या तरुणाने हे शिकायला हवे. यश मिळवताना आपल्या नैतिकतेचा, संस्कारांचा आणि मानवी मूल्यांचा विसर पडता का नये. कौशल्य, शिक्षण, पैसा यापेक्षा चरित्र हेच व्यक्तिमत्वाचे खरे सौंदर्य आहे हे कायम लक्षात असायला हवे. 
कर्तव्यप्रामाणिकता आपल्यात रुजवून आपले काम नीट आणि चोख केले पाहिजे. जे कामं हातात असेल ते प्रामाणिकपणे आणि वेळेवर करायला हवे. कुणाला एखादे वचन दिले तर त्याचं विश्वासाने ते आपल्याकडून पाळले जायला हवे याचीही काळजी आपणच घ्यायला हवी.
धैर्य व निर्भयता आपल्या अंगी यायला हवी. जिथे अन्याय होत असेल तिथे न्यायासाठी उभं रव्हाता आलं पाहिजे. छोट्या व मोठ्या निर्णयांसाठी आधी विचार करून नंतर निर्णय घ्यायला हवा. पर्याय मोजता आला पाहिजे आणि पुढील पाच पावलांचा अंदाज स्वतःला आला तरच पुढचे पाऊल योग्यरीतीने टाकायला हवे. सध्याच्या काळात नव नवीन गोष्टी शिकून त्याचा अवलंब करायला हवा. 

शिवाजी महाराजांचा प्रत्येक निर्णय विचारपूर्वक होता. मग त्यात राज्यसंस्था उभारणे, गडकोटांची उभारणी करणे, आरमार दलाची निर्मिती करणे, करप्रणाली अमलात आणणे, न्यायव्यवस्थेची मांडणी करणे, हे सर्व अत्यंत दूरदृष्टीने केले. आजचा तरुण जर आपल्या करिअरबद्दल, शिक्षणाबद्दल, भविष्याबद्दल योजना करून पावलं टाकेल तर त्याचे यश निश्चित आहे.

शिवरायांनी बालपणापासून संघर्ष पाहिला. त्यांनी नुसते स्वप्न पाहिले नाही, तर त्यासाठी अविरत परिश्रम केले. आजचा तरुण थोड्याशा अपयशाने खचतो, नको त्या विचारांना बळी पडतो, थोडं जरी मनाच्या उलट झालं तर टोकाचे पाऊल घेतो, पण शिवराय सांगतात, प्रत्येक क्षणाला धीराने सामोरे जा, स्वतःवरचा विश्वास कदापिही ढळू द्यायचा नाही. “ज्यांनी परिश्रमाची कास धरली, त्यांना यश नक्की लाभते.”

शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान सर्वश्रेष्ठ मानला. आजच्या समाजात तरुणांनी हीच शिकवण घ्यावी. प्रत्येक महिलेकडे सन्मानाने पाहणे, सुरक्षित समाज निर्माण करणे हीच खरी ‘शिवभक्ती’ आहे. आपण आपल्या घरातल्या आया बहिणींना जसं जपत असतो, त्यांच्याशी जसे वागतो तसंच समाजातल्या महिलांशीही वागले पाहिजे. यातूनच आपल्यावर आपल्या आई वडिलांनी केलेले संस्कार इतरांना दिसत असतात. 

शिवरायांसारखी शिस्त आणि नियोजन आपल्या शिक्षणात आणणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रमाणे ध्येय निश्चित करणे आणि सतत त्या ध्येयाच्या दिशेने प्रयत्न करणे हे यशाचे सूत्र आहे. 
उदा. परीक्षेत यश मिळवायचे असेल, तर ‘साहित्य, अभ्यासक्रम, वेळापत्रक, नियमितता’ यांचा योग्य मेळ ठेवावा जसा शिवरायांनी युद्धात आखला होता तसा.
शिवाजी महाराजांनी प्रशासनात पारदर्शकता आणि जनहिताला प्राधान्य दिले.
तरुण व्यावसायिकांनी हे अंगिकारले पाहिजे. “ग्राहक, कर्मचारी, समाज” यांच्याशी प्रामाणिक राहणे हेच खरे नेतृत्व आहे.
“सत्य, विश्वास आणि गुणवत्ता” या तीन मूल्यांवर प्रत्येक उद्योग उभा राहू शकतो.
शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व जातीधर्मांना एकत्र आणले.
आज तरुणांनीही भेदभाव न करता, एकतेचा मंत्र जपावा.
सोशल मीडियावर द्वेष नव्हे तर प्रेरणा, सकारात्मकता, आणि ज्ञान प्रसारित केले पाहिजे.
शिवाजी महाराजांना त्यांच्या आई जिजाबाईंचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे वाटत होते. तरुणांनीही कुटुंबाच्या मोलाची जाणीव ठेवावी, पालकांचा सन्मान, त्यांचे मार्गदर्शन स्वीकारावे. हेच आपल्याला स्थैर्य आणि दिशादर्शन देते.

शिवाजी महाराज म्हणाले होते; “देह वाया जाऊ नये, तो देशसेवेसाठी झिजावा !” आज तरुणांनी ही भावना अंगीकारली पाहिजे. आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करून देशाच्या प्रगतीत हातभार लावणे म्हणजेच खरी देशभक्ती.
आजचा तरुण माहितीच्या महासागरात आहे, पण प्रेरणेच्या ओढ्यात कमी आहे. आपले काम आपणच करावे, कारण इतर कोणी आपले राज्य उभे करणार नाही.
आज हेच तत्व प्रत्येक क्षेत्रात लागू पडते.
 स्टार्टअप सुरू करणारा उद्योजक, डॉक्टर, अभियंता, शिक्षक किंवा कलाकार 
प्रत्येकाने आपल्या कार्यातून समाजासाठी काहीतरी सकारात्मक निर्माण केले, तर तेच “स्वराज्याची आधुनिक व्याख्या” ठरेल.

शिवरायांच्या काळात युद्ध तलवारीने होत असे, आजचे युद्ध बेरोजगारी, भ्रष्टाचार, नकारात्मकता, आणि अज्ञानाविरुद्ध आहे. या युद्धात तरुण पिढीच खरा मावळा आहे. या मावळ्यांनी ज्ञान, तंत्रज्ञान, सद्विचार आणि देशप्रेम या शस्त्रांनी समाज उजळवला पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज हे एका युगाचे नव्हे, तर सर्व युगांचे मार्गदर्शक आहेत.
त्यांचे विचार म्हणजे ध्येय, कर्तव्य, निष्ठा आणि स्वाभिमान यांचे प्रतीक आहेत.
आजचा तरुण जर त्यांच्या विचारांची सांगड आपल्या जीवनाशी घालेल, तर तो केवळ स्वतः यशस्वी होणार नाही, तर समाजालाही उन्नतीच्या दिशेने नेईल.

“धर्म, नीति, पराक्रम आणि प्रेम यांचा संगम असलेले स्वराज्य, आणि आजच्या काळातही त्यांची शिकवण तितकीच सत्य आहे. 
आजच्या युगात स्वतःसाठी ध्येय ठरवता आले पाहिजे. मेहनत करण्याची ताकद आजच्या प्रेत्येक तरुणांच्या मानगटात असायला हवी. प्रामाणिक राहून आपण जे ध्येय ठरवले आहे त्याला अथक परिश्रमाची जोड देऊन स्वतःला यशाच्या शिखरावर पाहू शकतो. 
आपण जेवढेही कमावतो त्यापैकी काही वाटा नेहमी समाजासाठी द्यायला हवाच कारण आपण कामावलेले धन हे समाजातूनच आपल्याला उपलब्ध झालेले असते.
जीवनात कोणतीही कृती करताना त्या प्रत्येक कृतीत ‘शिवचरित्राची’ झलक ठेवा म्हणजे आपण केलेल्या कार्याचे आपल्याला समाधान आणि स्वतःलाच स्वतःचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

शिवरायांचा विचार जर मनात जागा झाला, तर प्रत्येक तरुण राजा होईल आणि भारत पुन्हा एकदा स्वराज्य होईल!

🙏🚩जय शिवराय 🚩🙏

✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर - आण्णा 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational