विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Inspirational Thriller Others

3  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Inspirational Thriller Others

एक प्रवास असाही

एक प्रवास असाही

7 mins
169


१६ मे २०१९ चा दिवस.....


वाटेतला वाटाड्या आणि माणसातली माणुसकी


इमरान कुरेशी..... भाई आप जाओ बैठो, मैं मीरा रोड आयेगा तो आपको आवाज देता हूं.....


     माझ्या आईचे ब्रेन ट्युमर चे ऑपरेशन होऊन 15 दिवस झाले होते, या १५ दिवसात मला खूप चांगली माणसं भेटली सर्वांनी सर्वोतोपरी मदत केली आणि ऑपरेशन पार पडले.


आईचे चेक-अप करण्यासाठी मला १५ दिवसांनी के ई एम हॉस्पिटल ला पुन्हा जावे लागले होते पण काही रिपोर्ट दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता मिळणार होते; पण राहायला विरार आणि हॉस्पिटल परेल ला असल्यामुळे आई आणि भाऊ संजू ( संजय ) या दोघांना चेक-अप झाल्यावर संध्याकाळी टॅक्सी करून देऊन घरी पाठवून दिले.


संध्याकाळचे ५ वाजले होते. आता उद्या सकाळी ९ पर्यंत करायचे काय हा प्रश्न मला भेडसावत होता. त्यातच मला आठवले की आईचा MRI केलेला रिपोर्ट आणायचा आहे. फिल्म लगेच सकाळीच मिळाली होती पण रिपोर्ट संध्याकाळी मिळणार होता.


मी संजूला फोन करून लॅब ला विचारायला सांगितले रिपोर्ट तयार आहे का ?

लॅब वरून कळले की रिपोर्ट व्हाट्सअप्प करण्यात येईल. त्यामुळे मी तिकडे जायची घाई केली नाही.


थोडा चहा घेऊ असा विचार करून मी कॅन्टीन मध्ये जाऊन चहा घेतला आणि तिथेच हॉस्पिटल मध्ये कशीतरी रात्र काढली. पत्नी आणि भाऊ सारखे फोन करू विचारत होतेच, काही खाल्लं का वैगेरे शेवटी आपल्या माणसाची काळजी.


सकाळी जाग आली तेव्हा ६ वाजले होते. हॉस्पिटल मधेच आंघोळ वैगेरे करून ९:३० ला मी डॉक्टरांना भेटायला गेलो. डॉक्टर नुकतेच आले होते त्यामुळे थोड्या वेळाने या असे त्यांनी सांगितले. पुन्हा १० वाजता डॉक्टरांना भेटल्यावर एक फॉर्म भरून दिला आणि न्यूरोपॅथालॉजि कडे जाण्यास सांगितले. तिकडे गेल्यावर मला पुन्हा १ वाजता बोलावले.


मी परत कॅन्टीन मध्ये येऊन ५ रुपयात हॉस्पिटल मध्ये जेवण मिळतं तिथं गेलो. अगदी एक माणसाचे पोट व्यवस्थित भरेल आणि सात्विक असे जेवण असते. मी जेवून झाल्यावर १:०० वाजता पोहचलो तो ठीक न्यूरोपॅथालॉजि मधेच. तिथून रिपोर्ट आणि ब्लॉक घेऊन टाटा हॉस्पिटल मध्ये गेलो आणि ब्लॉक सबमिट केला. याचा रिपोर्ट १० दिवसांनी ऑनलाईन मिळेल असे सांगण्यात आले.

 आज सर्व काम झाले म्हणून एक समाधानाचा सुस्कारा सोडला आणि २० मिनिटे डोळे बंद करून शांत खुर्चीवर बसून होतो. बसून राहिलो तर धावपळ झाल्यामुळे झोप लागेल म्हणून घरी जाण्याच्या घाईने बाहेर आलो. आता संध्याकाळचे 4 वाजले होते. बाहेर येताच मला विरार ला जाणारी टाटा हॉस्पिटल च्या स्टाफ साठी गाडी होती ती दिसली पण खूप विनवण्या करून देखील तिथे माझी निराशाच झाली.

घरी जायचं कसं याच विचारात असताना मी तिथे असणाऱ्या टॅक्सी वाल्यांना विचारलं तर सगळे २००० ते ३००० भाडे सांगत होते, म्हणून एक गृहस्थाला विचारले तर ते म्हणाले प्लाझा च्या इथे चालत गेलात तर तिथून गाड्या मिळतील. लगेच पटापट पाय उचलत प्लाझा च्या इथे येऊन बस ची वाट बघत उभा राहिलो. बस आली की प्रत्येक बस मध्ये चढून परत खाली उतरायचो कारण माझ्याकडे सरकारी कामाचे ओळखपत्र न्हवते. आईची हॉस्पिटलची फाईल असूनदेखील कोणीही बसने प्रवास करू देत नव्हते.


तोपर्यंत सात वाजले होते. आपल्याला आता वाहन मिळणार नाही हे समजून चुकले होते. भाऊ संजू आणि पत्नी विद्याचाही सारखा फोन येत होता. घरी यायला गाडी भेटली की नाही सारखं विचारत होते. गाडी अजून मिळाली नाही असं पत्नीला बोलून मी सकाळी येईन असं तिला सांगितलं. तशी पत्नी बोलली चालत येताय की काय ! 

मी हो म्हटलं आणि काळजी करू नकोस येईन सकाळ पर्यंत असं बोलून फोन ठेवला.


मग काय एकतर स्वाभिमानी स्वभाव असल्यामुळे निघाला पठ्ठा चालत. माहीम पर्यंत चालत आल्यावर एक मुलगा दिसला. त्याच्या पेहरावा वरून तो मुस्लिम आहे हे माझ्या लक्षात आले. पठाणी सूट घातलेला आणि डोक्यावर मुस्लिम टोपी असा काहीसा त्याचा पेहराव होता. त्याला सहज विचारावे म्हणून मी त्याला विचारले. भाई इथून सांताक्रूझ ला जायला कसं जायचं त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होते. तू चालत जाणार आहेस !! त्याचे ते मराठी उद्गार ऐकल्यावर मला थोडे हायसे वाटले. हो दादा काय करू कोणीच सोडायला तयार नाही.


तो - सांताक्रूझ ला कुठे जायचे आहे ?


मी - दादा मी राहतो विरारला पण सांताक्रूझ पर्यंत गेल्यावर बघतो कोणी लिफ्ट दिली तर.


तो - बापरे म्हणजे विरारला चालत जाणार का तू ? 


 तू एक काम करशील १ तासाने माझा टेम्पो जाणार आहे पण मी तुला फक्त मीरा रोड फाउंटन पर्यंत सोडू शकतो, तो पर्यंत तू त्या सिग्नल ला बसत असशील तर बस मी एक तासाने तुला फोन करेन, एकमेकांचे नंबर घेऊन तिथून निघालो. 


निघताना त्याला नाव विचारले एक स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवत त्याने आपले नाव उच्चारले "इमरान कुरेशी" .


या वाक्याने मी थोडा मनातून सुखावून गेलो. निदान तिथपर्यंत जरी सोडलं तरी आपण कसेही पुढे जाऊ शकतो. असा विचार लगेच माझ्या मनाला शिवून गेला.

त्यावेळी संध्याकाळचे ७:४० झाले होते. मी सिग्नल ला बसून होतो मनात विचार येत होते की हा माणूस नक्की येईल ना ! देवा त्याने मदतीचा हात पुढे केलाय त्याला सद्बुद्धी दे आणि इथपर्यंत पाठव जेणे करून मी लवकर घरी जाईन, अशी प्रार्थना मनापासून देवाकडे करत होतो.

आणि तशीच प्रार्थना मी अल्लाह कडे पण केली.


बरोबर एक तासाने म्हणजे ८:४० ला त्याला फोन केला पण लागत न्हवता. मधेच फोन बंद येत होता. आता काय करायचे ? विश्वास ठेवून १ तास बसलो तर खरे आपण, पण आता काय करायचं. शेवटचे १० मिनिटे बसूया असं ठरवून तिथेच बसून राहिलो. पण जास्त वेळ बसून पण उपयोग नव्हता. पुढे जायला खूप उशीर होणार होता म्हणून उठलो आणि झालं ते झालं असं म्हणून पुन्हा चालायला लागलो. पत्नी आणि भावाचे फोन चालूच होते. कुठे पोहचलात ? कशीतरी कोणाकडे लिफ्ट मागा आणि या कसेतरी असे आर्जव पत्नी करत होती.


संजू म्हणाला आपल्याला नेहमी जे टॅक्सी वाले काका सोडतात त्यांना फोन करून विचार. मी हो बोलून लगेच त्या काकांना फोन केला पण काकांनींही २००० च सांगितले. त्यांना नाही म्हणून पुढे चालत राहिलो. आता काही झालं तरी आपल्याला चालतच जायचे आहे असे मनाशी धरून पाय ओढत ओढत चालत होतो. मधेच लिफ्ट साठी हाथ दाखवत होतो पण कुणीच थांबायला तयार नव्हते. बराच अंतर चालून आल्यावर वांद्रे खेरवाडी पर्यंत कधी येऊन पोहचलो ते मलाच कळले नाही.


चालून चालून तहान लागल्यामुळे इकडे तिकडे नजर फिरवत होतो पण कुठेच दुकाने वैगेरे उघडे दिसत नव्हती. एक खोली रस्त्याच्या कडेलाच होती. त्यांच्याकडे पाणी मागितले पण तुमच्याकडे बाटली असेल तर त्यात घ्या आम्ही आमच्या भांड्यातून देणार नाही असे सरळ त्या माणसाने सांगितले. यावरून कळलं की लोकांनी कोरोनाचा धसका किती घेतला आहे. शेवटी पाणी मिळालं नाहीच. त्यांना नमस्कार करून पुढे चालत असताना माझा फोन वाजला.


 म्हणतात ना "भगवान के दरबार मे देर है मगर अंधेर नहीं" असंच काहीसं घडलं. तो फोन होता "इमरान कुरेशी" याचा.


निघताना मी त्याला मेसेज पाठवला होता, मी पुढे जात आहे आलात तर मला पिकअप करा.


इमरान - तू पुढे गेलास काय ? कुठे आहेस ?


मी - मी आता खेरवाडी जवळ आहे पोलिसांचा टेंट आहे त्याच्या पुढे.


इमरान - थांब तिथेच मला थोडा उशीर झाला. तू पुढे जाऊ नकोस मी आलो १० मिनिटात.


हे शब्द ऐकले आणि माझ्या जिवात जीव आला. देवाचे आणि अल्लाहचे सुद्धा आभार मानले आणि १० मिनिटे तिथेच बसलो.


इमरान टेम्पो घेऊन पोहचला आणि मी त्याला नमस्कार केला. इमरान ने ते सगळं नंतर कर आधी पाठीमागे जाऊन बस चालत आला आहेस झोपलास तरी चालेल अस बोलून इमरानने मला सूचना केल्या. पाठीमागे बसल्यावर जसा टेम्पो रस्त्यावरून हालत होता तसा मीही गाणे गुणगुणत डोलत होतो.

 दिवस भरचा थकवा आल्यामुळे आणि चालल्यामुळे पाय थोडे दुखत होते म्हणून तिथेच अंग टाकले आणि थोडी झोप लागलीही. जेव्हा जाग आली तेव्हा ट्रक कुठेतरी थांबलेला होता. मीही खाली उतरलो तसा इमरान पुढे आला नि खांद्यावर हात ठेवून म्हणाला; झोपायचं ना तू !! झोपला होतास म्हणून उठवलं नाही. आम्हाला ठाण्याला जायचं आहे. तू झोप जा. फाउंटन आलं की तुला उठवतो. मी परत ट्रक मध्ये येऊन बसलो. पत्नीचा फोन आला तिला सांगितले मी ट्रक मधून येतोय अर्ध्यापर्यंत नंतर पुढे बघतो कसं यायचं आणि फोन ठेवला.


काही अंतर पुढे गेल्यावर ट्रक पुन्हा थांबला. मी उठून काय झालं असेल म्हणून बघायला गेलो तर एक गृहस्थ ट्रकमध्ये चढले. बहुधा इमरान बरोबर ठाण्याला जाणारे असावेत. ट्रक चालू झाला आणि ते गृहस्थ माझ्या पाठीमागे बाजूलाच येऊन पहुडले. इमरान ने त्यांना माझ्या बाबतची आधीच कल्पना दिली असावी असे त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते. पहिलाच प्रश्न त्यांचा होता. विरारला कुठे राहता आपण ? यावरूनच स्पष्ट झालं होतं.

मी आता बसून होतो त्यामुळे चढ उतारावर थोडे ट्रक बरोबर हबके बसत होते. थोड्याच वेळात फाउंटन आलं आणि इमरान ने आवाज दिला. खाली उतरून त्याचे मनापासून आभार मानले.


 पुढे जात असतो तर नक्कीच मी तुला विरार पर्यंत सोडलं असतं रे. असं तो अगदी भावनिक होऊन म्हणाला. असं बोलून त्याने काळजी व्यक्त केली होती. इमरान ला व्हाट्सअप्प वर त्याचा एक फोटो पाठवायला सांगितले आणि त्याला शेवटचा नमस्कार केला.

इमरान काही वेळ माझ्याबरोबर तिथेच उभा राहून रिक्षा थांबवत होता. माझ्यासाठी.

काही वेळाने एक रिक्षा विरार फाट्यापर्यंत जाणारी आली. त्याने रिक्षावाल्या काकांना ' या दादाला व्यवस्थित घेऊन जा ' असे आवर्जून सांगितले. मी नाही म्हणत असतानाही त्यानेच रिक्षाचे पैसे माझ्या हातात ठेवले. माझे डोळे आपोआप डबडबले. माझ्या दोयांत बघून तो म्हणाला, दादा मला तुझा मोठा भाऊ समज पण डोळ्यांतून अश्रू काढू नकोस.

सांभाळून जा. काळजी घे.


"इमरान कुरेशी" - हाच तो माणुसकीतला माणूस आणि वाटेतला वाटाड्या.


त्या दिवशी मी रात्री खूप उशिरा घरी पोहचलो. पोहचलो तो फक्त " इमरान कुरेशी " या देवदूतामुळे.

 इमरान ला सांगून सुध्दा त्याने फोटो पाठवला नाही.

कदाचित त्याला मदत केल्याचे समाधान वाटले असावे. त्याने केलेली ही मदत मला माझ्या घरापर्यंत सुखरूप पोहचण्यास कारणीभूत ठरली.


ही गोष्ट आहे माझी स्वतःची. एवढंच म्हणेन की आजही प्रत्येक माणसात माणुसकी आहे मग तो कोणत्याही जातीचा का असेना, त्याने माणुसकी जपलेली आहे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational