टॅक्सी !
टॅक्सी !


शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखटजाळ सामोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कोणीच कामाला सुरुवात करत नाही. तसा तो खाऊन आम्ही रोजच्याप्रमाणे आजही सुरुवात केली. पण आज काहीसा वेगळाच दिवस होता.
माझ्या टेबलवरला तो कावळ्यासारखा काळाकुट्ट फोन केकाटला. हा लँडलाईन सेट सात वर्षापूर्वी घेतला होता. मालकाला तो लकी म्हणून अजून तसाच आहे.
"नमस्कार, दैनिक दिनकर, बोला "
"चीफ एडिटर ?"
"हो, बोलतोय "
"काहो? मुंबईत म्हणे एक अशी टॅक्सी आहे जी तुम्हाला हवे त्या ठिकाणी नेत नाही, तर तुम्ही ज्या जागी हवे आहेत तेथे नेते !"
"अहो ,अश्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. अशी टॅक्सी कशी असू शकते? "
"नाही म्हटलं, तुम्ही पेपरवाले तुम्हाला अश्या बातम्या माहित असत्यात. "
" अशी काही अधिकृत बातमी अजूनतरी आमच्यापर्यंत आलेली नाही. आली तर उद्या पेपरात तुम्हाला नक्की दिसेल. धन्यवाद. " मी फोन कट केला. काय एक एक महाभाग असतात? काय तर म्हणे 'तुम्हाला हवे त्या ठिकाणी नेत नाही, तर तुम्ही ज्या जागी हवे आहेत तेथे नेते! अशी टॅक्सी!"
पुन्हा फोन वाजला.
"नमस्कार"
"नक्की अशी टॅक्सी नाही ना?" मगासचा आवाज .
हा मुडदा समोर असतातर त्याचा पुन्हा मुडदा पाडला असता. एकदा सांगून कळत का नाही?
"अहो, कितीदा सांगायचं"
" नाही म्हणजे तो धुमाळ म्हणत होता, पण तो खोटे बोलत असेल."
मी काही सुनवायच्या आत त्यानेच फोन बंद केला. दुसऱ्या क्षणी पुन्हा रिंग वाजली. साला वैताग. मी रागाने रीसिवर उचलला.
"अबे, भाड्खाऊ"
"तोंड सांभाळा कुलकर्णी ! मी देवधर बोलतोय !" देवधर माझा बॉस !
"सॉरी सर, एक फोन मगासपासून"
"उद्या बेंगलोरला सकाळी नवाला एडिटर्स मिट आहे. आपले सारे फॉरेन करसपोंडडट येणार आहेत तुम्ही मुंबई रीप्रेझेंट करा. बाय." माझा 'हॅव अ गुड डे' न ऐकताच बाबाने फोन कट केला. बोंबला म्हणजे आज झोपेचे खोबरे.
लॅपटॉप जवळ ओढला. बेंगलोर फ्लाईट बुक केली. पहाटे चारचं डिपार्चर होतं. दोन तास घरापासून एअरपोर्ट, तासभर चेकइनसाठी आणि अर्धातास बफर. म्हणजे रात्री बारा ते एकच्या दरम्यान घर सोडायला पाहिजे. कॅब बुक केली. पुन्हा फोन किंकाळला. हे दिवसभर चालू असत.
"नमस्कार, दैनिक दिनकर. बोला"
"मी डॉ. अभ्यंकर , मला एक थँक्स द्यायचे आहेत एका अननोन टॅक्सी ड्रॉयव्हरला."
डॉ. अभ्यंकर म्हणजे मुंबईतील बड प्रस्थ! नामवंत न्यूरोसर्जन! अन फोनवर!
"बोला डॉक्टर साहेब. काय झाले ?"
"गोष्ट काल रात्रीची आहे. माझी गाडी बिघडली म्हणून मी टॅक्सी बुक केली. घरचा पत्ता ड्रॉयव्हरला सांगून गाडीत बसलो. गाडी थांबली,मी उतरलो पण ते माझे घर नव्हते ! माझ्या समोर नुकतीच एक प्रवासी बस अपघात ग्रस्त झाली होती! लोक विव्हळत होते, काही मदतीसाठी टाहो फोडत होते! परिस्थितीची मला जाणीव झाली. मी माझ्या हॉस्पिटल स्टाफ, पोलीस, ऍम्बुलन्सला भराभर फोन केले. काही वेळात सरकारी फौज आली. तोवर जमेल तसा लोकांना मदत आणि धीर देत होतो. फार नाही पण काही जणांचे प्राण वाचवण्यात माझी मदत झाली. माझी नेमकी जेथे गरज आहे तेथे मला पोहचवणाऱ्या टॅक्सी ड्रॉयव्हरचे आभार मानायचे आहेत. या गडबडीत त्याचे भाडे पण द्यावयाचे राहून गेले आहे. प्लिज एखाद्या कोपऱ्यात या माणुसकीच्या बातमीसाठी जागा द्या आणि हो त्या ड्रॉयव्हरला मला भेटण्याचे अपील करा!"
"जरूर ती मी सोय करतो. "
थँक म्हणत डॉक्टरांनी फोन ठेवला. मगाशी त्या बावळट माणसाचा फोन आणि ही डॉक्टर अभ्यंकरांची बातमी! सत्य की योगायोग? मी एक छोटी नोट तयार केली.
"आनंद!" माझ्या असिस्टंटला आवाज दिला.
"सर?"
"आनंद, एखादी फिलरसाठी आलेली चारोळी, कविता कमी कर, ही नोट नजरे खालून घाल आणि पेपरला घे आणि हो मी आता निघतो उद्या बेंगलोरला मिटिंगसाठी जायचे आहे. थोडी झोप काढतो."
"ओके"
मी टेबलवरला पसारा आवरून निघालो.
"कारे ,आज दुपारीच परतलास? बरे नाही की काय?" अंजलीने दार उघडताच विचारणा केली.
"अगं, सगळं ठीक आहे. प्रकृती पण मस्त आहे."
"मग ?"
"उद्या बेंगलोरला मिटिंग आहे. पहाटे चारची फ्लाईट आहे. झोपेचं खोबर होणार. म्हणून जमेल तेवढी दुपारी झोप काढावी म्हणून लवकर आलो."
"मला वाटले माझी आठवण"
"अंजली, तू माझ्या आत्मा जीव की प्राण जान जिंदगी आहेस ! तू नेहमीच माझ्यासोबत असतेस!"
"बस, बस नको इतकं प्रेम उतू घालूस! जेवलास का नसता जेवून घे. ताक केलंय.पी आणि झोप."
मी बेडरूम कडे मोर्चा वळवला. कपडे बदलले. ताक प्यायलो. अन झोपी गेलो.
अंजलीने उठवले तेव्हा रात्रीचे साडेनऊ झाले होते. फ्रेश झालो.
"चल, अंजू जेवण करून घेऊया. मग तू झोप."
"नको, मी आज जेवणार नाही. अरे दुपारपासून छातीत जळजळतंय. थोडं दूध पिऊन झोपणार आहे."
अंजलीच हे नेहमीच आहे. अरबट चरबट खाते अन मग पित्त होतं, डोकं दुखतं.
मी जेवण केलं. थोडी मीटिंगची तयारी करायची होती, त्याच्या मागे लागलो.
कॅबला रात्री बरोबर बारा वीसला येण्यासाठी बजावले होते आणि बारा वीसला कॅब दाराबाहेर थांबली.
अंजलीचा नुकताच डोळा लागला होता. तिला उठवणे जीवावर आले. जवळच्या चावीने घराचे मेन डोअर लॉक करून टॅक्सीत बसलो. आभाळ भरून आलं असावं हवेत उष्मा वाढला होता. टॅक्सिच्या ए सी मध्ये डोळे मिटून मागे टेकलो. गाडीने वेग घेतला. तोच मोबाईल वाजला.
"बोल आनंद"
" सॉरी सर दुपारची तुमची नोट चुकून खिशातच राहिली. आत्ता लक्षात आलं. तरी प्रिंटिंग सेक्शनला गेलो होतो, पण पेपर लोड झाला होता."
"ठीक आहे. उद्या मात्र आठवणीने टाक. एक अपॉलॉजीचा फोन डॉक्टरला कर. बाकी घे सांभाळून. "
मी पुन्हा डोळे मिटून मागे टेकलो.
साधारण तासाभराने कॅबचा वेग वाढल्याचे जाणवले. डोळे उघडून पाहतो तो स्ट्रीट लाईट बंद. सर्वत्र अंधार. बाहेर पाऊस सुरु झालेला. कोणत्या भागात आहोत हेही कळेना.
"काय झालाय?" मी ड्रॉयव्हरला विचारले.
"बारिश है साब. इसलिये बत्ती गुल हो गयिली होगी."
"आपण वेळेत पोहांचूना?"
" हा, आप फिकर मत करो. टाइम पर और सही मोके पर पोहचा दूंगा"
दहा पंधरा मिनिटातच कचकन ब्रेक मारून कॅब थांबली.
समोर 'अपोलो हॉस्पिटल' ची निऑन पाटी चकाकत होती. दवाखान्याच्या इमर्जन्सी डोअरवर माझी टॅक्सी पार्क झाली होती.
"अबे, तेरेको एयरपोर्ट बोला था" माझे शब्द घशातच राहिले. तेवढ्यात सफाईदार वळण घेऊन सायरन वाजवत ती छोटी ऍम्ब्युलन्स माझ्या समोर थांबली. मागचे दार उघडून आमच्या शेजारचा शेखर बाहेर उडी मारूनच उतरला. लगोलग पेशंटला स्ट्रेचरवरून बाहेर घेतले. माझ्या पायाखालची जमीनच खचली. स्ट्रेचरवर अंजली होती.
अंजलीला आय सी सी यु मध्ये ऍडमिट केले होते. इमर्जन्सी होती. इ सी जि ऍबनॉर्मल होता. पण ती आता डॉक्टरांच्या देखरेखेखाली होती. थोडे स्थिरावल्यावर मी शेखरला विचारले.
"काय झालं होत?"
"तुम्ही गेल्यावर काकूंनी मला आवाज दिला. त्या खूप घाबरल्या होत्या. दम लागला होता. छातीत जळजळ होतेय म्हणाल्या. जबडा पण दुखतोय म्हणाल्या. मी तुम्हाला फोन लावला 'नॉट रिचेबल' आला. मग ऍम्ब्युलन्स मागवली! पण तुम्ही येथे अगदी वेळेवर कसे? संध्याकाळी तुम्ही बेंगलोरला जाणार म्हणत होत्या काकू!"
"अरे मी एअरपोर्टसाठी निघालोच होतो" काही तरी आठवून मी मोबाईल काढला. त्यावर मी बुक केलेल्या टॅक्सीचा 'गाडी फेल हुआ है, दुसरा कॅब बुक करो' मेसेज होता!
मग मला घेऊन निघालेली आणि येथे आणणारी कॅब कोणती होती?
मी फोन लावला. मी बराच वेळ बोलत होतो आणि शेवटी म्हणालो.
"आनंद, त्या चारोळ्या, कविता फिलरलाच राहू दे आणि ती 'अँन्जिल टॅक्सी'हेड लाईनला घे! डॉक्टर अभ्यंकरांसोबत माझी घटना पण टाक!"