Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Suresh Kulkarni

Comedy Drama Others


3  

Suresh Kulkarni

Comedy Drama Others


सहल!

सहल!

15 mins 268 15 mins 268

उन्हाळा संपता, संपता आभाळात ढगांची उपस्थिती जाणवू लागली कि, आमच्या वश्याचे मन बेचैन व्हायला सुरु होत. त्यानं पावसाची एखादी सर येऊन गेली तर, विचारायलाच नको! हा महिना, महिना मुडक्याच्या टपरीकडे न फिरकणार, दिवसातून तीन, तीन चकरा मारतो. 'अल्ते कारे ते दोघे?', म्हणजे मी अन शाम्या, म्हणून मुडक्याला भंडावून सोडतो. तर या वश्याचे आणि पावसाळ्याचे काही तरी कनेक्शन आहे? पण नेमकं काय? तेच तर आज तुम्हाला सांगणार आहे!

तशी तुमची आणि वश्याची ओळख -वश्याचे क्युट लफडं!- या कथेत झालीच आहे. तरी थोडा रिकॅप! अत्यंत कळकट रहाणारा, गुढग्यावर फाटक्या जीन्स आणि बनियनिवर जाकीट घालणारा, स्वतःस 'कुल'अन मॉड समजणार आमचा एक मित्र!

तर अश्याच एका ढगाळ आभाळाच्या साक्षीने, श्याम्याने दुसरा चहा आणि खारीची ऑर्डर मुडक्याला दिली होती. मुडक्या जर्मनच्या भांड्यात, चहाच्या उकळत्या पाण्यात, कडचीने चेचून आद्रकाचा तुकडा टाकत होता. मुडक्या अष्टवधानी आहे. एकीकडे चहा, त्यात आद्रक, बाजूच्या भांड्यातल्या दुधावर आणि रस्त्यावर नजर, शिवाय तोंडाने बडबड चालूच असते. एकाच वेळेस! श्याम्या त्या बड्बडीला कॉमेंट्री म्हणतो! श्याम्या डॅम्बीस आहे. त्याच्या कडे तुम्ही फार लक्ष देत जाऊ नका. 

"सुरेश आण्णा, तुमचं दोस्त, वश्याराव, सकाळ धरन दोन डाव, खेटा मारून गेलं बगा! 'ते दोगं आल्ते का?' इचारून उंड वर आनलाय! पीडाच कि!"

"वश्या? कशाला तडमडलं होत?" श्याम्याने विचारले. 

"काय कि! पन तुमच्या तिगांची जोडी लयी भारी! शामू आण्णा, चाई मदी शाई घालू का?"

(आता तुम्ही पुण्याचे असाल तर आवश्यक म्हणून, आणि नसाल तर, तुमच्या ज्ञानात भर पडेल म्हणून, येथ एक छोटासा खुलासा करणे गरजेचे आहे. एक मुडक्या चहाच्या टपरीचा मालक असून सुद्धा, आमच्या मित्रात मोडतो! दुसरे, या सोलापुरी वाणाला कमी लेखू नका, तल्लख टकूर हाय! आत्ताचेच ताजे उदाहरण देतो. 'तिघांची जोडी!' या त्याच्या शब्दप्रयोगाला तुम्ही कुच्छीत हसलात ते, तुमचं चुकलंच! आम्ही तिघेही, स्वतःला 'पूर्ण' आणि बाकी राहिलेल्याना 'अर्ध'वटच समजतो! त्यामुळे मुडक्या 'तिघांची जोडी' म्हणतो, ते एकदम योग्यच! अस्तु. चहात 'शाई', हा काय प्रकार आहे? तर मुडक्या, दुधाच्या सायीला 'शाई' म्हणतो इतकेच! )

"नको! तुझी 'शाई' तुझ्यात दौतीत राहू दे! मला फक्त चाई दे! सुरश्या, वश्या येतोय!" श्याम्या किंचाळला.

काहीतरी विशेष दिसल्या शिवाय हा किंचाळणार नाही. 

"वर्णन कर! कसा येतोय?" मी मुडक्याने श्याम्या साठी आणलेला अद्रकवला 'चाई'चा कप तोंडाला लावत, शांतपणे विचारले. 

"अथ ध्यानाम! वाहन म्हणून फाटक्या शीटाची, उडालेल्या रंगाची बाईक आहे. ताठ उभा आहे, रस्त्याच्या मध्यभागी! वयाने पोक्त आहे. वसने, रंग वर्णनाच्या पलीकडील परिधान केलीआहेत! वासासाठी डियो मारला आहे. हाती करमणुकीसाठी भ्रमणध्वनी आहे. कुठून तरी मुडकेच्या 'शाप' कडे येत आहे. पश्चिमेकडे पहात आहे. कारण तेथे स्त्री जातीची व्यक्ती मार्गस्थ होत आहे. सर्वानी संयम बाळगावा हि विनंती! शुंभावातु!!"

माझ्या तोंडातला चहाचा घोट मधेच अडकला होता. इतर गिऱ्हाईकांचे हाल झाले असतील?--- तुम्ही कल्पना करू शकता! शाम्या असाच आहे!

वश्या हाश - हुश करत माझ्या शेजारी येऊन बसला. तोवर टपरी सावरली होती. 

"वश्या, कोण होती रे, ती?" शाम्या खुसपट काढायलाच बसलेला असतो. 

"ती? हा,आत्ता रस्त्यात होती तीच ना?"

"हा! तीच. पिंक ड्रेस मधली! तुझ्या मुलीची मैत्रीण होती का?"

"मलाही तसेच वाटलं होत! म्हणून तर थांबून पहात होतो! पण ती मुलीच्या मैत्रिणीच्या आईची शेजारीण असावी! पण ती वेगळीच निघाली.

"वेगळी?"

"म्हणजे, मी ओळखीचं स्माईल दिल, तर तिने चक्क क्रोध कटाक्ष टाकला! मग मी नाही थांबलो!"

"ते मात्र बर केलंस! बर ते जाऊ दे! तू म्हणे आम्हाला शोधत होतास. कशाला?" मी मधेच तोड खुपसलं.

"काय यार? विसरलात? आता पावसाळा येतोय! 'पावसाच्या माऱ्यात, गारगार वाऱ्यात!' एक ट्रिप काढायाची आपलं ठरलंय ना, म्हणून आठवण करून देण्यासाठी आलो होतो!"

"एस वश्या, पक्का. जरूर जावूत! मस्त गाडी ठरवू, सुरश्या त्याच्या पोराला सांगून रिसॉर्ट बुक करील. रात्री कॅम्प फायर! चिकन -old monk- जुनी गाणी-आठवणी!" शाम्या त्या कल्पनेत रमून गेला. 

आमचं हे रडगाणं दर वर्षीचचं! काँट्रीब्युशनला फक्त मी आणि शाम्या तयार असतो! वश्याला फुकटात किंवा कमी पैशात ऐष करायची असते! मग सगळंच बारगळत. पण या वर्षी जाण्याचं, मी मनात पक्क करून टाकलं.

"पण, मी काय म्हणतो? ते रिसॉर्टच ठीक. पण गाडी कशाला? श्याम्याची आहेच कि! तीच घेऊन जाऊ! पेट्रोल आणि रिसॉर्ट काँट्रीब्युट करू! कसे?" वश्याने सजेशन दिले. शाम्या सावध झाला. 

"वश्या, गाडी माझी असेल तर बाकी सगळं तुम्ही बियर करायचं! साली गाडी माझी, ड्राइव्हर मीच अन वर माझ्या कडूनच कसलं काँट्रीब्युशन घेतेस? नाही तर, जा तुमचे तुम्ही!" शाम्या कधीकधी टोकाचं रिऍक्ट होतो.

" शाम्या! असं एकदम झटकून टाकू नकोस! यार, तुला सोडून आम्हाला कस जावं वाटणार? 'म्हाताऱ्याच्या तुंब्यातलं' घोट तरी, घश्या खाली उतरेल का? अन त्या हि पेक्षा, तुला एकट्याला घरी करमेल का? अरे, असे क्षण मागूनही मिळत नाहीत! तू फक्त 'हो' म्हण. काँट्रीब्युशनच आपण नन्तर बघू!" मी मध्यस्ती केली. वश्या खुलला आणि शाम्याला हि माझा पॉईंट पटला!

बेत पक्का झाला.

मी सोमण्याला फोन करून विचारले. तो कोकणात जाणार होता. मी, शाम्या, वश्या अन सर्पराईझ म्हणजे मुडक्या पण दोन दिवस टपरी बंद ठेवून येणार होता! 

माळशेज घाटात एक रिसॉर्ट निघाल्याचे कळले होते. मी मुलाला सांगून दोन रूम बुक करून घेतल्या.

"मुख्य आणि महत्वाचे. शाम्या 'तुझी' सध्या 'मैकेवाली' का 'घरवाली'?" मी श्याम्याला विचारले.

"अरे, कालच 'घरवाली' झालियय!"

                                                                          ००० 

आमच्या मित्र मंडळात (मंडळ कसलं? आहो, आम्ही 'मित्र' एकत्र कसे? याचे मलाच कधी, कधी नवल वाटत! सगळ्याचे स्वभाव टोकाचे भिन्न, आवडी निवडीत जमीन अस्मानचे अंतर! आम्ही न, त्या बाभळीच्या फांदीवरल्या काट्या सारखे आहोत. सगळ्याची तोंड वेगवेगळ्या दिशेला तरी, एकाच फांदीला घट्ट चिकटलेली!). 

चार चाकी वाहन फक्त श्याम्या कडे आहे. 'चंपाकळी!' बोनेटभर नाव लिहलेली कार !( मी 'चंपाकली' लिही म्हणत होतो. पण श्याम्याचा मराठी बाणा आड आला!). त्याची गाडी म्हणजे एक स्वतंत्र 'व्यक्तिमत्व' आहे. तिला तिचा स्वभाव आहे! पक्की नखरेल आणि खोडील! हि बया, आमचा शाम्याचं सांभाळू जाणे! हिला ग्यारेजमध्ये रहायला खूप आवडते! काहीतरी कारण काढून 'ग्यारेज' मध्ये जाते! ती ग्यारेज मध्ये गेली कि, श्याम्या 'सध्या माहेरी' गेली आहे म्हणतो! आणि ठाक ठीक हुन घरी आणली कि, 'घरवाली' होते!

हिचा जाती कुळीवर अजिबात विश्वास नाही! आणि का असावा? हिच्यात फक्त एकच गोष्ट ओरिजनल आहे. एक नंबर प्लेट! मालक -श्री शामराव, सुद्धा सेकंडहॅन्डच! सगळे पार्टस बदलून लावलेले! काही तर बैल गाडीचे असावेत! स्पीड वरून मी आपला एक अंदाज केलाय!

आणि हो, हे फक्त तुमच्या माझ्यात ठेवा. शाम्याला कळता कामा नये! त्याचा या गाडीवर खूप जीव आहे. कारण -कारण हि त्याने त्याच्या लाडक्या लेकीसाठी -आलकी साठी घेतली होती!(सन्दर्भ-शाम्या, द बेकूफ! कथा). मीच तिला मांडीवर घेऊन शाम्याच्या शेजारी बसलोय, कितीदा तरी!

                                                                            ०००

ठरल्या दिवशी सकाळी सातला निघायचं म्हणून ठरलं. सगळ्यांनी मुडक्याच्या टपरी जवळ जमायचं हे हि ठरलं. आणि हे असच ठरवायचं असत!

मी सकाळी आठच्या अंदाज्याला शाम्याकडे आलो. अर्थात त्याला झोपेतून उठाव लागलं. मग आम्ही एक एक विल्स नेव्ही कट ओढली. हे श्याम्याच्या सकाळच्या आन्हिकातलंच असत. अंघोळ वगैरे आटोपून आम्ही 'चंपाकळी' घेऊन मुडक्याच्या टपरीवर धडकलो. 

आमच्या मुडक्याचा प्रश्न नव्हताच. तो तयारच असणार होता. हा रात्री पावणे पाच पर्यंत जागा राहिला तरी, साडेपाचला उठतो. गंगाळभर गार पाणी डोक्यावर ओतून घतो, कपाळाला विभूतींचे (त्याच्या भाषेत इबूत!) पट्टे ओढले कि गडी तयार! सोलापूरला असताना, रात्री मेकॅनिक चौकात काय झालं? पत्रातलिमीच्या पोरांनी कसा राडा केला? सांगायला मोकळा असायचा. आता नगरमध्ये, प्रोफेसर चौकात गाडी कशी पल्टी झाली? नाही तर नेप्ती नाक्यावर पोलिसांनी कश्या गाड्या रोकल्या? हे सांगत असतो. 


"मुडक्या, थकलो बाबा. जरा चहा दे! अन भूक लागलीय! खारी पण दे!" आता घरापासून, या टपरीपर्यंत ड्रायव्हिंगने हा बाबा थकलोय! आजच्या ट्रिपचा काय होणार? परमेश्वरालाच माहित!

मुडक्याने मुळीच वेळ न घालवता, तयार 'चाई' अन चार खाऱ्या बशीत घालून दिल्या! श्याम्या खाऱ्यात आणि चहात बुडून गेला!

मिनव्हाईल वश्या डेरेदाखल झाला होता. 

"शाम्या, डिकीची चावी दे! लगेज ठेवून देऊ!" वश्या गाडीच्या मागे उभा राहून ओरडला. शाम्याच्या 'चंपाकळीला' जितके दार होती, तितके कुलपे होती! तितक्याच किल्ल्या! शाम्याने किल्याचा जुडगा वश्याकडे फेकला. मोजून बावीस मिनिटे वश्या झटत होता. शेवटी एकदाची किल्ली सापडली, डिकी उघडून वश्याने मेणचट रंगाची, बॅकसॅक डिकीत भरकवली!(हे त्याच लगेज! म्हणजे चटईला होलडॉल, म्हणण्यासारखे होते!) किल्ली हुडकून वैतागलेल्या वश्याने, दाणकन डिकीचे झाकण लावले. परिणाम सुंदरच झाला! 'चंपाकळीने' आपला निषेध नोंदवला! डिकी लागली आणि बॉनेट फाडकन उघडले! मग श्याम्या तरातरा पुढे आला, ढेरी पुढे काढून वश्यासमोर कमरेवर हात ठेवून उभा राहिला. वश्या त्याला वळसा घालून बॉनेटकडे गेला बॉनेट कचकावून दाबून बसवलं! तर मागे डीकीने तोंड वासल! असे तीनचार वेळेस झाले. शेवटी मी डिकीच झाकण दाबून धरलं आणि वश्याने बॉनेट बंद केले, तेव्हा कोठे टोटल शटडाऊन झाले!

वश्याने, त्याची बाईक मुडक्याच्या टपरी जवळच ठेवली होती. मुडक्या, एक भली मोठी पिशवी आणि पाण्याची वीस लिटरची बरणी घेऊन, मागच्या सीटवर बसला. त्याने डोक्यावर वश्याचे हेल्मेट घातले होते!

"मायला, मुडक्या केव्हडी मोठी पिशवी घेतलीस? काय घेतलंस त्यात?" शाम्याने विचारले. 

"आण्णा, काय नाय, सोलापूर चादरी हैत! रातच्या गारवा वाट्ला तर?"

"अन हे हेल्मेट कशाला?" वश्याने विचारले. 

"शामू आण्णा गाडी चालत्यात! म्हणून!"

वश्याला श्याम्याची ड्रायव्हिंग माहित नव्हते! शाम्याच्या ड्रायव्हिंग अफलतू आहे. शाम्या चाळीसच्या वर स्पीड जाऊ देत नाही. एकदा सुरु केली गाडी कि, ती सरळच चालवतो. रस्त्यातल्या खाचा, खळगे, दगड गोटे अजिबात पहात नाही आणि म्हणून टाळत ही नाही! गेल्या खेपेस 'चंपाकळीला' ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे शॉकप्स बसलेत. बेसावध, त्यातही मागच्या सीटवरलेल्याचे हाल--- किमान चार टेंगळ! एखाद बोनस मध्ये! शाम्या सहसा मला गाडी चालवू देत नाही. कारण मला चाळीस स्पीडवर झोप येत. साठ- सत्तरला 'चंपाकळी' फुत्कारे सोडते! बया संतापी आहे! एकदा या तापण्याने येडशीच्या ढाब्यावर मुक्काम केला होता!

अश्या प्रकारे एकंदर पूर्व तयारी झाली, आणि माध्यानी आमची ऐतिहासिक ट्रिप निघाली. (ऐतिहासिकच म्हणायची, कारण त्यानंतर पुन्हा कधी असा योग्य भविष्यात आलाच नाही!)

                                                                             ००० 

साधारण दोनच्या सुमारास, मुडक्याची चुळबुळ सुरु झाली. मी श्याम्या शेजारी समोर बसलो होतो, म्हणजे श्यामचाच तसा आग्रह होता, त्यामुळे वश्या तोंड फुगवून बसला होता. त्यात शाम्याचे दिव्य ड्रायव्हिंग! एका गचक्यात, त्याच्या बाजूचे दार उघडलं! शिताफीने ते वश्याने ओढून घेतले. पण ते लागेना! तो ते दार तसेच ओढून धरत बसला! आता, त्याला काय माहित, दाराला बाहेरून कडीकोंडा आहे, तसे आतून बोल्ट सुद्धा आहेत, दार लावायला!

"सुरेश आण्णा, जरा झाडाखाली थांबायला सांगा की!"

"कशाला?" शाम्या डाफरला.

"दाटून आलीय!" करंगळी दाखवत मुडक्या कळवळला. 

मग शाम्याने दोन किलोमीटरवर गाडी, एका चहाच्या टपरी जवळ उभा केली. 

पिंजऱ्याचे दार उघडल्यावर उंदीर जशी बाहेर पाळतात, तशी मुडक्याने अन वाश्याने धूम ठोकली, आणि आडोशाला गेले. मी टपरी मालकाला चहाची ऑर्डर दिली. शाम्याने फारशी तसदी घेतली नाही. गाडीच्या पलीकडे तोंड फिरवून, गडी 'मोकळा' झाला!

मुडक्या, वश्या हाश हूश करत परतले. गरमागरम चहा त्यांनीच वाट पहात होता. मुडक्याने लगबगीने गाडीतून त्याच्या पिशवीतील एक गठुडं अन खारीन भरलेली बरणी आणली. 

"मुडक्या! तुला मी माझ्या सोबत स्वर्गात घेऊन जाणार!" बरणीकडे आधाशीपणाने पहात शाम्या म्हणाला. पुढच्या क्षणी तो या जगात नव्हताच! खरीसोबत त्याने, त्या मचूळ चहात सूर मारला होता. 

वश्या टपरी मालका कडून ब्रिस्टॉल सिगारेट घेऊन धूर काढण्यात गुंतला होता. म्हणजे आसपास काही 'प्रेक्षणीय' आहे का? याचा अदमास घेत होता. मी चहाचा कप तोंडाला लावणार, तेव्हड्यात मला तो वास नाकाला जाणवला. या गोष्टीसाठी, या क्षणी तरी, मी स्वर्गावर सुद्धा लात मारली असती! तो होता शेंगदाण्याच्या खमंग चटणीचा वास! खास सोलापुरी! मी चहाचा कप उचलला, पायाचा आवाज होऊ न देता, मुडक्याच्या शेजारी जाऊन बसलो. त्याने खारीची बरणी वाश्याच्या हवाली केली होती, आणि आपलं चटणी भाकरीच गठुडं घेऊन, जवळच्या झाडा खाली, मांडी घालून बसला होता! हट्ट्या कट्ट्या भाकरीवर बचकभर तेल सुटेपर्यंत कुटलेली, सोलापुरी शेंगदाण्याची चटणी! आसमंत, भुकेने पेटून उठवला होता त्या दरवाळाने! मी मुडक्याच्या भाकरीचा तुकडा मोडला, ती चटणी अन भाकरी! अहो स्वर्ग सुख या पलीकडे काही नसत! बोलण्याचा प्रश्नच नव्हता! वाळलेल्या खुंटासारख्या म्हाताऱ्या भट्टीवाल्यास, काय वाटले कोणास ठाऊक? त्याने दोन, मुटक्या एव्हडे कांदे अन हिरव्या मिरच्या आम्हाला बहाल केल्या. वश्या सिगारेट फुंकून आम्हालाच जॉईन झाला. न बोलता ते गावरान जेवण, वश्या तल्लीन होऊन खात होता. ती वेळच भुकेची होती म्हणा. त्या क्षणी, मुडक्याच्या डोळ्यात अपरंपार माया होती, भुकेलं लेकरू जेवताना पहाणाऱ्या, उपाशी आईच्या डोळ्यात असते, तशीच! कारण आम्ही दोघे ज्या त्वेषाने खात होतो, त्यावरून मुडक्यासाठी फारस उरणारच नव्हतं! 

शाम्याने खारीची आर्धी बरणी रिकामी झाल्यावर, आसपास नजर फिरवली. आम्ही कोठेच दिसेनात! तो गांगरला. 

"आमची माकड कुठं गेली?" त्याने मालकाला विचारले. त्या म्हाताऱ्याने आम्ही बसलो होतो त्या झाडाकडे बोट दाखवले! 

"मायला! किती स्वार्थी आहेत? मला सोडून जवायला लाज वाटत नाही?"

हातातला चतकोर भाकरीचा तुकडा अन चटणी मुडक्याने श्याम्याला दिली. आणि त्याने गाडीत ठेवलेल्या पाण्याच्या जारकडे आपला मोहरा वळवला! माझे लक्ष्य तो पाणीपिताना त्याच्या कडे गेले. मी जागेवरून उठलो. मला गलबलून आलं. सकाळी चार वाजता उठून त्याने भाकरी केल्या असतील! तो बाहेरच खात नाही, हे मला माहित असून हि--- मी जेवताना त्याचा विचार केलाच नव्हता! मी जवळ जाऊन त्याला मिठी मारली.

"सॉरी!" मी पुट्पुलो. माझ्या डोळ्यातला ओलावा त्याने पहिला असावा. 

"आण्णा, पोटाचं काय नसत. पर,आज मन मातर भरलं बगा!"

"तुमची भरतभेट संपली असेल तर निघू! सुरश्या, मी आता थकलो. तू चालावं! पण पन्नासच्या पुढे जाऊ नकोस!"

मी फक्त गालातल्या गालात हसलो. 

पोटात गेलेल्या मुडक्याच्या भाकरीने वश्या आणि शाम्या झोपले होते. त्यात शाम्या म्हणजे घोरपड. थोडा पडला की, लगेच घोरायला लागतो! मी ड्राइव्हिंग करायची म्हणून अन मुडक्या उपाशी म्हणून, जागे होतो. माळशेज घाट सुरु झाला होता. एका वळणावर मुडक्या साठी केळी आणि चिक्कू घेतले. दोन केळी खाऊन मुडक्याने पण मान टाकली!

आम्ही रिसॉर्टवर पोहंचलो तेव्हा, आठ वाजून गेले होते! वश्या आणि मुडक्या एका रूम मध्ये, आणि शाम्या, माझ्या सोबत होता. 

सगळेच थकले होते. गरम पाण्याच्या आंघोळीने भुकेची जाणीव जागी झाली. आम्ही डिनर साठी हॉल मध्ये गेलो. मला व्हेज, शाम्याला चिकन आणि वश्याला अंडाकरी आली. वश्या असाच कुंपणावरला आहे. धड शुद्ध शाखाहारी नाही कि मांसाहारी नाही. असे लोक बिलिंदर असतात. स्वतःला अर्ध आस्तिक म्हणवतात. आरतीला टाळ्या वाजवायच्या ऐवजी हात बांधून उभे रहातील, पण प्रसादाला मात्र दोन्ही हाताची ओंजळ पुढे करतील! हे लोक पायात सुद्धा चप्पल किंवा बूट घालत नाहीत, तर सॅन्डल घालतात! देवावर विश्वास नाही, पण 'एक आदी शक्ती हा विश्वाचा गाडा हकते.' हे यांचे लाडके तत्व! जाऊ द्या. खरी गोची झाली ती मुडक्याची. त्याच्या समोर काहीच आले नव्हते. तो जागेवरून उठणार, तेव्हड्यात एक छोटी फळांची परडी, मोठ्ठा दुधाचा ग्लास आणि साखरेचा पॉट घेऊन वेटर आला, तेव्हा त्याने माझ्या कडे हळूच पाहिले. मी ती सोय केल्याचे त्याच्या लक्षात आले होते.

जेवण संपल्यावर वश्या सिगारेट फुंकायला बाजूला गेला. शाम्या मुडक्याला घेऊन गाडीकडे गेला. अर्ध्या तासाने श्यामच्या हातात एक, अन मुडक्याच्या डोक्यावर एक असे, गाडीचे चाक होते!

"मायला, शाम्या पंचर झालं का काय? अन तेही दोन-दोन चाक? तरी म्हणत होतो, या सुरश्याला नको देऊ गाडी चालवायला!" वश्याने आश्चर्याने विचारले.

शाम्या काहीच न बोलता ती चाक कोपऱ्यात ठेवली.

"वश्या, या शाम्याच्या गाडीला सगळीकडे लॉक आहेत. फक्त इग्निशन लोक नाही! म्हणून हा मुक्कामी गाडी असली कि, एक पुढंच अन एक मागचं चाक काढून ठेवतो! चोरीची भीती नाही! मग याला शांत झोप लागते!"

"आयला, भलतंच! पण या रिसॉर्टमध्ये, नाईट वॉचमन आहे ना? मग कशाला हा भुक्कडपणा?" वश्या म्हणाला. 

"खरच श्याम्या, कशाला हा उद्योग केलास?" मी शाम्याकडे पहात विचारले. खरे तर हा 'नाईट वॉचमन' वाला पॉईंट शाम्याच्या लक्षात आलाच नव्हता, पण श्याम्या तो मान्य करणार नव्हता! 

आम्ही रूमवर आलो. मुडक्या वश्याच्या रूमवर जाऊन झोपी गेला. शाम्याने old monkचा चौकोनी तुंबा काढला. तिसऱ्या पेंगला शाम्या आउट झाला. वश्यापण उठला. 

"बस ना वश्या! तुझा स्टॅमिना मला माहित आहे." मी आग्रह केला. 

"नको! आज मुडच नाही रे!" वश्यापण निघून गेला! 

मी श्याम्याच्या पाकिटातली विल्स काढली, आणि पेटवली. 

हे असं काही अपेक्षितच नव्हते! त्या गप्पा, आठवणी, गाणी! गेली कुठं? हा, जेवताना शाम्याच आणि वश्याच थोडं तू-तू, मी-मी झालं होत, पण ते नेहमीचंच होत! हि 'सहल' राहिली नव्हती, 'सोबत' नसतील तर 'सहल' कसली? लॉन्ग ड्राइव्ह सारखं झालं होत. सगळंच फसल्या सारखं झालं. मला आतून पोकळ वाटू लागलं. श्याम्या लयीत घोरू लागला होता. मी बेचैन होऊन रूम बाहेर पडलो. 

बाहेर छान टिपूर म्हणतात तस, चांदणं पडलं होत. एक तरुण जोडपे दूर लॉनवर, त्यांच्यातच गुंतले होते. बहुदा हनिमूनला आले असावे. सहज वश्याच्या रुमकडे नजर टाकली. लाईट चालूच होते. मनगटावरल्या घड्याळात नजर टाकली. साडेबारा वाजून गेले होते. मी हलकेच दार ढकलले, तर उघडेच होते. मुडक्या जमिनीवर गादी घेऊन, त्यावर हातपाय पोटाशी घेऊन, सोलापुरी चादरीत गुरफटून झोपला होता. निरागस लेकरा सारखा! वश्या मात्र छताकडे सिगारेटीचे झुरके सोडत होता. माझी चाहूल लागताच त्याने माझ्या कडे पहिले. मी खुणेनेच त्याला बाहेर बोलावले. तो बाहेर आला. 

"आयला, कसलं झकास वातावरण आहे, सुरश्या! थँक्स! मला बाहेर काढल्या बद्दल!" वश्याने हातातली सिगारेट फेकून दिली. हवेत गारवा होता, पण सुखद.

"वश्या, नेमकं काय बिनसलंय?"

"तेच ते! शाम्या न कधी कधी डोक्यात जातो. तू जेवायला यायच्या आधी, त्याच्या त्या डबडा 'चंपाकळी'चा विषय निघाला होता. मी त्याला ती, भंगार मध्ये विकून, एखादी नवीन सायकल घे, असा प्रामाणिक सल्ला दिला. यात माझं काय चुकलं? कसला बिथरला माझ्यावर. डायनिंग हॉलमध्ये तमाशा नको म्हणून, मी शांत बसलो! इतका नालायक माणूस माझ्या पहाण्यात नाही!"

"वश्या, अरे या गाडीत त्याच्या सेंटीमेंट्स आहेत. त्याच्या लाडक्या लेकीच्या आठवणी आहेत! तुला ते माहित नव्हते. ते जाऊ दे. पण शाम्या आपला मित्र ना, मग सोडून दे! माझ्या साठी तरी!"

"हे, तुझं नेहमीचंच आहे!"

"वश्या, आजची तारीख तुझ्या लक्षात आहे?"

"कशी विसरेन सुरश्या? अशीच चांदणी रात्र होती! मी तुझी चातकासारखी वाट पहात होतो! तू कालिंदीचा निरोप घेऊन येणार होतास! पावसाची पहिली सर आजही मला बेचैन करून जाते!"

"म्हणजे तुला सगळं आठवतंय? त्या दिवशी ती मला भेटली होती, पण ------"

"ती 'दुसरीकडे' गुंतली होती! मी साधासुधा, तिच्या मानाने 'बावळटच'! अरे असच होत तर, तो नजरेचा खेळ का केला? स्पष्ट नाही म्हणाली असती तर काय बिघडलं असत? "

"वश्या, आता तो इतिहास झालाय! असतील तिच्याही काही अडचणी! ते सोड! पण तू तो, ऑर्केस्ट्रा सोडायला नको होता!"

"काय करू तेथे? काली तेथे नव्हती. दुसऱ्या कॉसिंगरबरोबर सूर लागेना! गाणं अन ऑर्केस्ट्रा सोडणं भाग होत! स्टेजवर सारखी ती दिसायला लागली होती!" वश्या खरच त्या कालीवर जीव टाकायचा! नव्हे अजूनही आहेच!

मी त्या दिवशी कालिंदीला भेटलो होता. ती वश्याला खेळवत होती! तो तिच्यासाठी 'टाईमपास' होता! तिने ऑर्केस्ट्राच्या मालकाशी सूत जमवलं होत. तो म्हणे, तिला मोठ्या बॅनरमध्ये 'गायिका' करणार होता! कीर्ती अमाप पैसे कुठं? अन वश्याची दीड हजाराचा पगार कुठं? मी याची वश्याला कल्पना देणार होतो. पण त्या पूर्वीच तो डिप्रेशन मध्ये जाऊ लागला. ट्रीटमेंट सुरु झाली. माझी माहिती न सांगणेच गरजेचे झाले. 

"वश्या! रात बिती बात बिती! चल एक घुटका मार! आपण या चांदण्यात, त्या समोरच्या झाडापर्यंत फेरी मारून येवुत!" मी पॅंटीच्या हिप पॉकेट मधून, निब काढून वश्याला दिली. त्याने ते कडवट पेय घटभर घश्याखाली घातले. 

"हलकट, डांबिस, कमीनो! मला सोडून पिताय? लाज लज्जा शरम! काय शिल्लक आहे का?" बगलेत एक चौकोनी लांबुळकी पेटी घेऊन शाम्या आमच्या मागे उभा होता! अर्थात शेवटचा प्रश्न बाटलीतल्या दारूच्या संदर्भात होता!

"नाही! शेवटचा घोट होता, वश्याला दिला!"

वश्याने रिकामी बाटली दूर भिकावून दिली! 

आणि स्वतःच्या हिप पॉकेट मधून 'चपटी' काढून शाम्याच्या हातात दिली!

" मी काय म्हणतो? कॅम्प फायर कुठाय?"

त्या कॅम्प फायर मध्ये आता नुसतीच राख होती. मी नाईटवॉचमन गाठला. त्याने लाकडांची सोय केली. भक्क जाळ पेटवून दिला आणि तो तेथेच उबेला बसला. कारण गारवा, 'सुखद'ची सीमा ओलांडून 'थंडी'च्या वाटेने दौडत होता.

शाम्याने बगलेतली, बुलबुल तरंगाची पेटी उघडली. शाम्याची बोट कि बोर्डावर नाचू लागली. एकापेक्षा एक जुनी रसाळ गाणी त्यातून झिरपू लागली.

"चांदी सी चमकती राहे, झूम झूम के पुकारे---"

"खोया खोया चाँद -------"

"अभि ना जावो,-----"

"वश्या, मी एरव्ही नसतो म्हणालो, पण आज एक गाणं म्हण ना! खूप दिवस झाले तुझा आवाज ऐकून!" मी वश्याला विनवल. 

"वेश्या अन गाणं? अबे, हे रिसॉर्ट उठून बसेल!" शाम्याला वश्याच कसब माहित नव्हतं. 

थोडे आढे वेढे घेतले, पण गडी राजी झाला. 

"मै पल दो पल का ----" मी, शाम्या आणि तो नाईट वॉचमन गाणं सम्पेपर्यंत 'आ' वासून ऐकत होतो. शाम्या आपल्या वाद्यावर भन्नाट साथ देत होता. गाणं संपलं तेव्हा दहा हात टाळ्या वाजवत होते! ते मघाशी पाहिलेले जोडपे आमच्यात कधी सामील झाले, ते आम्हाला समजलेच नाही. 

"यार, कि गल है? बेहतरीं मैफिल बना दि यारो! मै प्रेमजीत, ये मेरी स्वीट हार्ट कामिनी! ये भी गाती है!"

त्या पोरीला, पण शाम्याने गाण्याचा आग्रह केला. 

"मैने देखी है, इन आंखोमे मेहकती ----" पोरीचा गळा खरेच गोड होता. 

शेवटी कहर केला तो वॉचमनने --- चप्पा चप्पा चरखा चाले!. या गाण्यावर आम्ही सगळेच फेर धरून नाचलो! रात्रीचे तीन वाजले तेव्हा ती गाणे मैफिल संपली.

                                                                              ००० 

सकाळी नऊ वाजता नाश्ता करून आम्ही परत फिरलो. परतीच्या वाटेत फोटो काढत माळशेज घाटाला बाय केला. नगर गाठायला सहा वाजून गेले होते. 

मी घरी आलो तेव्हा साडे सहा झाले होते. फोन वाजला. 

"का रे, काय काम आहे?"

"सुरश्या, गाडी शेड मध्ये पार्क करायची आहे!"

"कर आजच्या दिवस तूच! मी जाम थकलोय यार!"

"डांबिस! मला माहित आहे, तू काय माझ्या कामाला यायचा नाहीस! गेलास उडत!" शाम्याने रागाने फोन कट केला. 

सकाळी अकराच्या अंदाजाला, शाम्या मुडक्याच्या टपरीवर टपकला. गडी घुश्यातच होता. 

कपभर चहा आणि चार खाऱ्या पोटात गेल्यावर त्याने तोंड उघडले. 

"बेकूफ! तुझ्या मुळे हे झालं!"

"काय झालं, माझ्या मुळे?" माझ्या लक्षात येईना नेमकं काय झालंय?

"तुला काल गाडी शेड मध्ये ठेवायला बोलावलं, तर साल, भाव खाऊ लागला होतास! आला अस्तास तर काय बिघडलं असत? माझं नुकसान तर झाले नसते!"

"अरे बाबा, नक्की काय झालं? कशाचं नुकसान?"

"तू येत नाहीस म्हणून, मीच रागारागा गाडी शेड मध्ये घालण्याचा प्रयत्न केला! डिकीच्या सेंटरला शेडचा खम्बा लागला! खाडकन हेड लाईट लागले! बंद होईनात! रात्रभर चालू होते! सकाळी बॅटरी डाऊन झाल्यावर 'चंपाकळी'ने डोळे मिटले! अन बंद पडली!"

"मग?"

"मग काही नाही! 'माहेरी' सोडून आलोय! काय दोस्त पदरी घातलेस रे देवा! मुडक्या, अजून एक चहा घाल माझ्या मड्यावर! अन बिल या सुरश्या कडून घे!"

हे बाकी खरे आहे, शाम्याला गाडी रिव्हर्स घेता येत नाही! आरशातल्या इमेज मध्ये गोंधळतो!

(मद्यपान आणि धूम्रपान आरोग्यास घातक असते. लेखक त्यास अनुमोदन/पाठिंबा देत नाही.)


Rate this content
Log in

More marathi story from Suresh Kulkarni

Similar marathi story from Comedy