Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Suresh Kulkarni

Drama Classics


4.3  

Suresh Kulkarni

Drama Classics


मोरूचा बाप !

मोरूचा बाप !

7 mins 322 7 mins 322

"मोरू उठ! आज शनिवार! बरीच कामे पडली आहेत!" मोरूचा बाप मोरूला म्हणाला. 

"बाबा झोपू द्या ना. विकेंड आहे. रोज सकाळीच उठाव लागता ना? आणि रात्री तसही प्रोजेक्टमुळे जागरण पण झालाय!" मोरू पांघरुणात घुसमटत म्हणाला. 

"मोऱ्या, बापाला शानपन शिकवायचं नाही! उत्तिष्ठ! म्हणजे उठ!"

मोरू नाईलाजाने अंथरुणातच उठून बसला, पण डोळे बंदच ठेवून. मोरेश्वर सॉफ्टवेयर इंजिनियर. ऑफिसात बॉस असला तरी, घरी तो बाबाचा 'मोरू'च होता. या बापलेकाची केमेस्ट्री जगावेगळी. दोघांनीही आपापल्या कडून वयाचं आंतर कमी करून पक्की फ्रेंडशिप केली होती. मोरूची आई गेल्यापासून म्हणजे, मोरू पाचवीत असल्या पासून मोरूची आई, बाप, भाऊ, मित्र हा बाबाच होता!

"मोऱ्या, रात्रीच जगता कशाला रे? हल्ली हे नवीनच फॅड काढलंय तुम्ही लोकांनी"

मयुरी, मोरेश्वराची बायको, किचनमध्ये चहा करण्यात गुंतली होती, तरी तिचे कान बेडरूम मधल्या बापलेकाच्या संवादावर होते. हा म्हातारा आपल्या नवऱ्याचे कान भरतोय, अन कागाळ्या करतोय हा तिचा, स्त्री सुलभ संशय होता. तो शेजाऱ्यापाजाऱ्यांनी खत-पाणी (किंवा चहा-पाणी) घालून पक्का केला होता. 

"बाबा, आम्हाला कामासाठी दिवस पुरा पडत नाही, म्हणून तो आम्ही रात्री जागून वाढवतो!"

"बेकूफ! दिवस कसला वाढवता? उलट रात्री जागून रात्र कमी करता, वर दुसरे दिवशी उशिरा उठून दिवस हि कमीच करता!"

"अरे, प्लिज आज तरी सुटीची ती फिलॉसफी नकोना!"

"बर राहील. मी काल ऐकलं ते खरे आहे का?"

"काय ऐकलंत?"

"तू आणि तुझ्या बायकोने म्हणे ठरवलंय!"

"बाबा, काय ठरवलंय?"

"आधी बोलावं तिला! तिच्यासमोरच सोक्ष-मोक्ष लावू!"

"मयुरीSS --"

या म्हाताऱ्याने काय ऐकलंय देव जाणे. ती चरफडत बेडरूम मध्ये गेली. 

"हू, सांग आता, मयुरी पण आलीयय."

"तुम्ही म्हणे, मला वृद्धाश्रमात सोडून येणार आहात!"

मोरूच्या डोळ्यावरची झोप खाड्कन उतरली. तो तोड वासून बापाकडे पहातच राहिला.

मयुरीने कपाळावर हात मारून घेतला. काल सहज गप्पा मारताना,शेजारच्या माधवीस, मोरूच्या बाबाच्या चक्रमपणाचे किस्से सांगत होती. तेव्हा 'अश्या म्हाताऱ्याने वृध्दाश्रमातच पाठवायला पाहिजे.' अशी माधवी म्हणाली होती.आणि 'हो,ना!' म्हणून मयुरीने सपोर्ट केला होता. आणि नेमकी हि गोष्ट या म्हाताऱ्याला कळली होती. 

"कोण म्हणत? असे काही नाही! तुमचा काही तरी गैरसमज झालाय!" मयुरी घाईघाईत म्हणाली. मोरूच्या लक्षात हि गोष्ट चटकन आली. मयुरीच्या डोक्यात असले विचार? तो गंभीर झाला. 

                                                                           ०००  

"हू, काय मोरूचे बाबा, तुम्ही म्हणे, मोठ्या घरात शिफ्ट होणार!" गणपतरावांनी मोरूच्या बापाला मुद्दाम गाठून विचारले. 

"हो! मला वृद्धांश्रमात घालणार आहेत! येतोस रूमपार्टनर म्हणून?"

"छे! माझा ल्योक सून मला चांगलं सांभाळतात! मला ते नाही पाठवणार!" पण त्याच्या बोलण्यात जोर नव्हता. 'ती' वेळ त्यांच्या पासून फारशी दूर नव्हती, हे ते दोन्ही मित्र जाणून होते. 

"गण्या, अरे तू जे ऐकलंस ते खरं नाही. माझी सून असेल फटकळ पण असे करणार नाही. अरे या पोरी, आधी आपल्या पोटच्या लहानग्या लेकरांना 'डेकेयर' नावाच्या कोंडवाड्यात ठेवतात, मग कोठे वृद्धाश्रमाचा विषय काढतात. दोन्ही ठिकाणी त्यांची काहीतरी अडचण असते रे. आपणच त्यांचा व्हिव समजून घेत नाही! पूर्वी वानप्रस्थाश्रम होताच कि! असो! ये संध्याकाळी वट्यावर गप्पा मारायला."

मोरूचे बाबा निघून गेले. गणपतराव मात्र अंतर्मुख झाले होते. 

                                                                        ००० 

खरे-खोटे काहीही असो, मोरूच्या बापाच्या डोक्यात तो 'वृद्धाश्रमाचा' कीडा मात्र घर करून बसला. एकदा पाहूनच येऊ, कसा असतो तो 'वृद्धाश्रम!' त्यांनी पक्के केले. 'मोरू, जरा फिरून येतो, आज रविवारचा दिवस आहे.' मोरूला सांगून त्यांनी 'जिवलग'वृध्दाश्रमासाठी ऑटो केली.

'जिवलग' वृद्धाश्रमाची वास्तू अतिशय सुरेख आणि ऐसपैस होती. त्यांनी मॅनेजरला गाठले. सविस्तर माहिती घेतली. सोयीसुविधा स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घेतल्या. डिपॉझिट, मासिक भाडे,सगळं विचारून घेतलं. आता तर ठीक वाटतंय सगळं. 

"मला जरा येथे रहाणाऱ्या जेष्ठ नागरिकांची नाव पहायला मिळतील का?" 

मॅनेजरने त्यांना नावांचे रजिस्टर दिले. 

"हे पाच नंबरचे जे नाव आहे, त्यांना भेटता येईल?"

"हो. का नाही. त्यांच्या रूम मधेच असतील!"

तासाभराने मोरूचे बाबा 'जिवलग' मधून बाहेर पडले!

                                                                         ००० 

पुन्हा शनिवार आला. 

"मोरू, उठ आज शनिवार! बरीच कामे आहेत पडलेली!"

"बाबा, तुम्ही न विकेंडला का सकाळी सकाळी उठवता माहित नाही!"

"तू बैठकीत ये, महत्वाचं बोलायचंय! अन हो तुझ्या बायकोला पण बोलावं! तिच्या समोरच सोक्ष-मोक्ष लावू!"

बाबाच काही तरी तर्कट असणार. म्हातारा चक्रमच आहे. लोक म्हणतात ते आता खरं वाटायला लागलय. मयुरी नॅपकिनला हात पुसत किचन मधून आणि मोरू डोळेचोळत त्याच्या बेडरूम मधून बाहेर आला. 

"तुम्ही दोघे माझे म्हणणे लक्ष देऊन ऐका. मी त्या वृद्धाश्रमात------"

"आजिबात जाणार नाही! हेच ना? अहो तुम्हाला कोण पाठवतोय वृद्धाश्रमात? उगाच काहीतरी डोक्यात घेताय!" मोरू वैतागून म्हणाला. 

"मोऱ्या, पूर्ण न ऐकून घेता बोलत जाऊ नकोस! बावळटपणा आता कमी कर. लग्न झालंय तुझं."

"सांगा! तुमचे ते 'संपूर्ण' काय आहे ते तर कळू देत!"

"मला वृद्धाश्रमात जायचंय! मी बॅग भरून ठेवली आहे! उद्या रविवार तुला सुट्टी आहे. मला ये सोडन, सुटी सत्कारणी लागेल!"

मोरू आणि मयुरी तोंड वासून म्हाताऱ्याकडे पहातच राहिले!

"मी हि आनंदाची बातमी, आमच्या गणोबाशी शेयर करून आलोच!" आनंदाने मोरूचे बाबा घराबाहेर पडले. 

कालपर्यंत 'वृद्धाश्रम' म्हटले कि जाब विचारायला येणारा म्हातारा, आज राजीखुशीने जायचंय म्हणून हट्ट करतोय! का? या प्रश्नाने मोरू आणि मयुरी विचारात पडले. 

                                                                        ००० 

शनिवारच्या रात्री मोरूच्या बेडरूम मधला दिवा बराच वेळ चालू होता. तो आणि मयुरी खालच्या आवाजात काहीतरी बोलत होती. मोरूचा बाप त्याच्या अंथरुणावर जागाच होता. त्याला झोप येत नव्हती. 

सकाळी मोरू लवकरच उठला. त्याला कपडे घालून तयार झालेले पाहून, मोरूच्या बापाने आपली भरून ठेवलेली सुटकेस बाहेर घेतली. 

"चल, निघायचं ना?" त्यांनी मोरूला विचारले. 

"बाबा, आज माझी महत्वाची मिटिंग आहे. आपण पुढच्या रविवारी जावू! चालेल ना?" मोरू निघून गेला. मोरूचे बाबा थोडेसे उदास झाले असावेत, असे मयुरीला वाटले. 

                                                                         ००० 

पुन्हा शनिवार उगवला. पण या शनिवारी मोरू आणि मयुरी सकाळीच गायब झाले होते. काहीतरी गडबड जरूर होती. मोऱ्या या पोरीच्यानादी लागून डांबिस झालाय. कालपर्यंत सु-करायला जाताना सुद्धा विचारून जायचा. हल्ली गुपचूप काम करतोय. ताकास तूर लागू देत नाही. संध्याकाळी ते जोडपं परतलं. हातात ढिगभर शॉपिंगच्या पिशव्या! बोंबला, मोऱ्या सगळी पगार या पोरीवर उधळून आला असणार. पण हिला काटकसर कोण शिकवणार? मरू देत, आपल्याला काय करायचंय म्हणा? ते कमावतात तेच गमावतात. आमच्यावेळेस जमा करण्याचे दिवस होते, हल्ली खर्च करण्याचे दिवस आलेत!

शेवटी तो रविवार उगवला. भल्या सकाळीच मोरूचे बाबा ठेवणीतले कपडे घालून तयार होते. 

"मोरू, उठ! आज रविवार! बरीच काम पडलीत!" त्यांनी आज बैठकीतूनच आवाज दिला.

"बाबा, मोरू तयार होऊन बाहेर गेलाय. गाडीत पेट्रोल घालून आणतो म्हणाला. तो आला कि, येईल तुम्हाला, 'जिवलग' मध्ये सोडून! तुम्हाला तयार रहायला सांगितलंय!" मयूरीनी सांगितल्यावर मोरूचे बाबा तीन ताड उडाले. काय कार्टी आहेत? बाबा, का जातंय आम्हाला सोडून? वगैरे विचारून थोडा सुद्धा गहिवरले नाहीत! ट्रॅव्हल टूर साठी निघाल्या प्रमाणे आनंदाने सोडायला निघाले? आणि वर आरतीचं ताट तयार करून ठेवलं होत. जाताना ओवाळायला असेल बहुदा!

तेव्हड्यात दाराची बेल वाजली. मयुरीने दार उघडले. 

"थोडं थांबा!" म्हणत ती ते आरतीचं ताट घेऊन सरसावली.

हे काय नाटक चाललंय. असं कोण आलाय कि पंचारतीने ओवाळून स्वागत होतंय?

आधी एक बॅग दारातून घेऊन मोरू घरात आला. त्याच्या पाठोपाठ नऊवारीतील ----

"अंजली अन तू?---" मोरूच्या बाबाना काय बोलावे सुचेना. जिच्या साठी ते वृद्धाश्रमात जाणार होते, तीलाच मोरू घेऊन आला! का? आणि कसे? या मोऱ्याला कसे समजले? पण त्याचे 'उत्तर' हि त्या पाठोपाठ घरात आलं. ते गणपतराव होते. 

"म्हणजे गण्या, तू सगळं सांगितलंस या मोऱ्याला!"

"हो! तुझ्या पेक्षा या अंजलीसाठी मी केलं!"

हे मात्र खरं होत. अंजलीचे आणि मोरूच्या बापाचे प्रेम होते. पण त्यांचं लग्न होऊ शकले नव्हते. कारण मोरूचा बाप गरीब होता. अंजलीच्या घराण्याच्या तोडीचा नव्हता. अंजलीने पहिल्याच रात्री आपल्या प्रेमाची गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली. कारण पुढे या गोष्टीमुळे संसारात वितुष्ट येऊ नये म्हणून. पण झालं भलतंच, त्या व्यसनी माणसाने, याच गोष्टीच भांडवल करून तिला आयुष्यभर छळल, आणि पदरी पोर टाकून मरून गेला. व्यसना पायी दारिद्रय घरापर्यंत आलेच होते. पोरग बापाच्याच वळणांवर गेलं. 'तू माझ्या साठी काय केलंस? मला जल्माला घालून काही उपकार केले नाहीस! तुमच्या वासनेच्या खेळाचा मी परिपाक!' असे म्हणणारा दिवटा पोटी आला होता! वाईट सांगत, दारू, ड्रग्स आणि शेवटी एड्सने त्याचे आयुष्य संपवलं! अंजलीच्या नशीब फक्त आणि फक्त फरफट आणि दैना आली. कोणी तरी तिला 'जिवलग' मध्ये आणून सोडले होते. तिचे पैसे एक सेवाभावी संस्था भरायची.

मोरूचा बाबा जेव्हा तिला 'जिवलग' मध्ये भेटला तेव्हा, ती किती तरी वर्षांनी रडली होती! हसायचे काय, ती रडायचीपण विसरून गेली होती.

"बाबा, आता चला! उचला तुमची बॅग! सोडतो तुम्हाला तुमच्या 'जिवलगा'त! "

मोरूचा बाबा, अंजली, गणपतराव आणि मयुरीला गाडीत घालून, मोरूने समोरच्याच कॉम्लेक्स जवळ गाडी उभी केली. पहिल्या मजल्यावर आल्याबरोबर, लिफ्टच्या उजव्या बाजूला सात नंबरचा फ्लॅट होता. त्यावर नवी कोरी नेमप्लेट होती. 'जिवलग!'

"बाबा! हेच तुमचे 'वृद्धाश्रम! मी सकाळी आणि मयुरी संध्याकाळी भेटत जाऊ. उद्यापासून एक अटेंडेंट काकू येतील, त्या धुणं - भांडी- स्वयंपाक सगळं करतील. तुम्हालाही सांभाळतील."

अंजलीचे आणि मोरूच्या बापाचे डोळे भरून आले. 

"हे बघ मित्रा, उद्या सकाळी आम्ही सगळे पुन्हा येतोय! रजिस्ट्रार ऑफिसात जाऊन सिव्हिल मॅरेज करून घ्या! लोकांना नाव ठेवायला संधी देऊ नकोस!" गणपतराव मोरूच्या बापाच्या कानाशी कुजबुजला. सगळे निघून गेले. 

"किती भाग्यवान आहेस! बापासारखा, तुझा पोरगा आज तुझ्या पाठीशी खंबीर पणे उभा राहिलाय!"

अंजली म्हणाली. 

"अंजली, थकली असशील. बेडरूम मध्ये पलंगावर जरा विश्रांती घे."

"अरे, मला पलंगाची गरज नाही. चालायला आधार आणि विश्वासानं डोकं टेकायला खांदा हवाय रे! मला कधी वाटलंही नव्हतं या जन्मी तू पुन्हा मला भेटशील! नियतीची बघ आहे आहे, अशा दिवसात, पुन्हा पाहिलं प्रेम पदरी टाकती आहे, जेव्हा दिवसच थोडे राहिलेत!."

"अंजली, जे काय दिवस वाट्याला आलेत, सोबत घालवू! तू फार विचार करू नकोस!"

संध्याकाळचा संधीप्रकाश ते बसले होते त्या लिव्हिंगरूममध्ये पसरला होता. त्याने सुद्धा, ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून विसावल्याचे पाहून घेतले. आणि चाहूल न लागू देता निघून गेला, कारण काळोखाची चाहूल त्याला पण लागली होती! 


Rate this content
Log in

More marathi story from Suresh Kulkarni

Similar marathi story from Drama