आणि राजकन्या जिंकली
आणि राजकन्या जिंकली
अमरेंद्र गायकवाडांचा राजेशाही कारभार होता, शंभरावर एकर शेती, घोड्यांचे तबेले, शर्यतीच्या घोड्यांसाठी प्रशिक्षक असायचे. उत्तम प्रतीचे घोडे असल्यामुळे, दूरवरून लोक घोड्यांच्या बिजासाठी, गायकवाड यांच्याकडे यायचे. आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये गायकवाडांकडील घोड्यांना अतिशय मागणी होती. काळा चकचकीत तजेलदार रंग असलेला शानदार उंच देखणा मोती अमरेंद्र गायकवाडांचा सगळ्यात आवडता घोडा. मोती एक प्रसिद्ध आणि उत्तम गुणांचा घोडा होता.
मोती अंगावरती माशीपण बसू देत नसे, खरारा केल्यामुळे त्याची कातडी चकचकीत दिसत असे. कपाळावरच्या चंद्रकोरीने त्याच्या उभट चेहऱ्याला अवर्णनीय शोभा आली होती. चमकदार पायांवर खुरापाशी असलेली पांढरी पट्टी, चमकदार लांब शेपटी, त्याच्या रुबाबामध्ये भरच घालत होती. तबेल्यामध्ये अजून बरेच घोडे होते, शर्यतीसाठी त्यांना तयार करण्यात येत होते, पण मोतीचा थाट काही औरच होता. त्याच्यासाठी स्पेशल खरारा, आणि वेगळा खुराक दिल्यामुळे त्याची शोभा पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होती. मोतीचे बीज घेण्यासाठी दुरून दुरून लोक येत.
अमरेंद्रची दहा वर्षांची मुलगी शलाका आणि सात वर्षांचा सौरभ यांनादेखील मोती आपल्या जवळपास फिरकू देत नसे. शलाका आणि सौरभसाठी दोन वेगळे घोडे होते पण त्या दोघांना मोतीचे फार आकर्षण होते. त्यांची आई सौदामिनी गायकवाड यांना शलाका आणि सौरभ त्यांच्या हट्टाची कल्पना होती. मोती घोडा फक्त अमरेंद्र गायकवाडांना आपल्यावर स्वार होऊ द्यायचा, बाकीच्या कोणाचाही तो ऐकायचा नाही. कोणीही त्याच्यावर स्वार झालं तर मोती चक्क त्यांना फेकून द्यायचा. शलाका, सौरभ, आणि बरेचसे गडी सगळ्यांनीच मोतीकडून प्रसाद खाल्ला होता. अमरेंद्र नेहमी सांगत, “आपल्या घोड्याला स्वतः खरारा करा, स्वतः खाऊ घाला, प्रेमाने बोला, तरच तो तुमचा ऐकेल आणि तुम्हाला स्वार होऊ देईल.“ अमरेंद्राशिवाय लाखा गडीच मोतीला सांभाळू शकत होता.
पावसाळ्याचे दिवस होते, काही सामान खरेदी करण्यासाठी अमरेंद्र लाखाला घेऊन शहराच्या गावाला गेले होते. सौदामिनी गायकवाड यांनापण शहरातून मुलांसाठी बरीच खरेदी करायची होती म्हणून त्या पण त्यांच्याबरोबर गेल्या होत्या. एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये गडी माणसांसोबत फक्त शलाका आणि सौरभ होते. आज तीन दिवस झाले पावसाची झडप काही थांबतच नव्हती, घोडे तबेल्यांमध्ये बेचैन होते, बाहेर फिरता येत नव्हते,
अमरेंद्रचा मुक्काम पण लांबला होता. रात्रीच्या वेळेस अचानक दिवे गेले, घोड्याच्या तबेल्याकडून विचित्र आवाज येऊ लागले तशी शलाकाची झोप उघडली, घोडे विचित्र आवाजात खिंकाळत होते, आपलं खूर आपटून, दरवाजाला धडक देत होते, बांधलेल्या दोरीला हिसके देत होते.
दिवे गेले असल्यामुळे, टॉर्च हातात घेऊन आणि सौरभला घेऊन शलाका घोड्यांच्या तबेल्यापाशी आली, तिला बघितल्यावर तिचे घोडे शांत झाले, पण मोतीचा आवाज, खूर आपटून, दरवाजाला धडक देणे चालू होते, मोतीची तडफड चालू होती. नक्की काहीतरी झाले असावे, चोर घुसला असावा? चोराची काहीच भीती नव्हती, मोतीने बऱ्याच चोरांचे हातपाय, लाथा मारून मोडले होते. कोपऱ्यात ठेवलेला लांब बांबू उचलून शलाका तयार झाली, तिने सौरभला मोतीवरून टॉर्च फिरवण्यास सांगितले, मोती तर ठीक होत
ा, टॉर्चचा प्रकाश जसा मोतीच्या खालच्या गवतावर पडला तेव्हा एक लांब काळाकभिन्न नाग वेटोळे घालून बसलेला त्यांना दिसला. जणूकाही नागराज आणि अश्वराजामध्ये काट्याची टक्कर चालू होती. दोघेही आपापल्या दुनियेत ताकदवान होते.
मोतीने कितीही तडफड केली तरी तो नागाच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता, जसे मोतीला प्राणाचे भय होते तसेच नागराजाला देखील. तीन दिवसांच्या पावसामुळे नागराजाच्या वारुळामध्ये पाणी घुसल्यामुळे त्याने तबेल्यात आसरा घेतला होता, आणि तो पण मोतीच्या राज्यात! नागराजाच्या आगमनाने मोती पिसाळून उठला होता.
हिम्मत करून शलाका पुढे झाली, नेम धरून तिने बांबूचा अकोडा नागाच्या खाली घुसवला, बांबूचा स्पर्श होताच, नागाने वेटोळे सोडून उंच उडी मारली, पण समोर मोतीचा अवतार बघून त्याला पुढे जाता येत नव्हतं. काही क्षणातच नागराज थांबला आणि तेवढ्यात शलाकाने हिम्मत करून नागावरून असा बांबू फिरवला की नाग बांबूभोवती अडकून गेला. खसकन बांबू बाहेर ओढून तिने बांबू जमिनीवर घासला, आणि पटापट आपटून नागाला अर्धमेले केले. जोपर्यंत नाग पूर्ण ठेचला जात नाही तोपर्यंत शलाका बांबू आपटत राहिली. मोती स्थिर नजरेने शलाकाचे कृत्य बघत होता आणि थोड्याच वेळात नागाचं डोकं चिरडलं गेलं, तबेल्यातला आवाज ऐकून घरातली गडी माणसं धावत आली, शलाकाचा पराक्रम बघून त्यांना आश्चर्य वाटलं. मेलेल्या नागाला त्यांनी जाळून टाकलं.
आता मोती शांत झाला होता, बाकीची जनावरंपण शांत झाली होती. सर्व घोड्यांवरून हात फिरवून सौरभने त्यांना थोपटले, शलाकाचा घोडा तिला प्रेमाने चाटू लागला. सौरभ आणि शलाकाने सगळ्या घोड्यांना पाणी पाजले. बेफिकीर होऊन शलाका पाण्याची बादली घेऊन मोतीपाशी आली, इतर वेळी मोतीने बादलीला लाथ मारली असती, पण आज मोती शांत उभा राहिला, मोतीच्या डोळ्यातील उर्मट खुनशी भाव जाऊन त्याचे डोळे आता शांत झाले होते, काहीसे प्रेमळ झाले होते आणि शलाकाने आणलेले पाणी मोती प्यायला. जशी शलाका बादली ठेवून वळली तसे तिच्या पाठीला मोतीच्या उष्ण नाकाचा स्पर्श झाला, मोतीने आपले तोंड शलाकाच्या पाठीवर घासले. सगळे शांत झाले बघून शलाका आणि सौरभ आपापल्या खोल्यांमधे झोपण्यास गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अमरेंद्र परत आले तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली, मोतीवर चक्क शलाका स्वार झाली होती, गुडघ्यापर्यंतचे उंच बूट, निळा मखमली फ्रॉक, काळे लेदरचे जॅकेट, गळ्यात दुहेरी मोत्याची माळ, आणि डोक्यावर सोनेरी कुरळ्या केसांना संभाळणारा रेशमी रुमाल... अशी शानदार शलाका चक्क मोतीवर स्वार झाली होती.
मोती अतिशय सावधानतेने शलाकास फिरवत होता. मोतीच्या चालण्यामध्ये नेहमीसारखाच एक डौल होता, पण त्याची बेफिकीर, मुजोर चाल
आता थोडी सावध आणि नरम झाली होती, शलाकाला अतिशय सांभाळून मोती रिंगण घेत होता आणि स्वार झालेली शलाका एखाद्या राजकन्येसारखी शोभून दिसत होती, वाड्यातले सगळे नोकरचाकर, बाहेर उभे राहून टाळ्या वाजवत होते. शेवटी राजकन्येने लढाई जिंकली, उर्मट मुजोर मोतीला, शलाकाने धाडसाने, प्रेमाने जिंकले होते, आणि आता ते दोघे दोस्त झाले होते.