शिकार
शिकार
आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे बाजीरावाचे घरात खुपच लाड झाले होते. तो पंचवीस वर्षाचा झाला तरी त्याचे आई-वडील त्याला लहान मुला सारखचं सांभाळत होते. गावातील सगळया वाडयांमध्ये शोभून दिसणारा भव्य चिरेबंदी वाडा, पस्तीस एकर बागायती जमीन, तालुक्याला प्लॅाटींगमध्ये गेलेली जमीन, पंचवीस-तीस दुभती जनावरं, दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी, चार-ट्रक एवढया प्रॉपर्टीचा तो एकुलता एक वारसदार होता. फक्त तब्येत बनवायची,खायचं-प्यायचं अन् पोरींच्यामागे फिरायचं, एवढच काम तो करायचा. ‘आबा’, म्हणजे बाजीरावाचे वडील, त्यांचं वय साठीकडं झुकलं तरी त्यांचं शरीर बलदंड होतं. घरचा सगळा व्यवहार अजून तेच बघत होते.
बाजीरावही आता भर तारुण्यात होता. निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याला मुलींचं आकर्षण वाटु लागलं. तसं ते त्याला सहावी-सातवीत असतानाच वाटत होतं पण तेव्हा इतकं कळत नव्हतं. घरचे लग्न कर म्हणून त्याच्या मागं होते. पण त्याला आताच लग्न करायचं नव्हतं. त्याला आयुष्याची मजा घ्यायची होती. एवढया लवकर लग्नाच्या बेडीत अडकायचं नव्हतं. त्यामुळं तो आणखी दोन-तीन वर्ष तरी लग्न करणार नव्हता.
त्याचं बलदंड शरीर, सरळ टोकदार नाक, पिळदार मिशा, भरदार छाती, गौर वर्ण, गळयात सोन्याचं लॉकेट, हातात कडं, बोटामध्ये अंगठया अन् बुलेटवरील सवारी बघून कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडत होती.त्याच्या श्रीमंतीवर, त्याच्या देखणेपणावर त्याला गर्व होता. अशी गावात एकही मुलगी नव्हती की, त्यानं तिच्याकडं पाहिलं अन् तिनं त्याला प्रतिसाद दिला नाही. पण तो आज पर्यंत तरी कोणाच्या प्रेमात पडला नव्हता. माणूस सर्वात सुखी त्यावेळेस असतो, ज्यावेळेस तो कोणाच्यातरी प्रेमात पडतो. पण एकदा का ते प्रेम सफल झालं तर तो आनंद पहिल्यासारखा राहत नाही. जर का प्रेम विफल झालं तर माणूस जगातील सर्वात मोठया दु:खाच्या खाईत फेकला जातो. मग त्याला परत आपल्या जागेवर येण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छाशक्ती, त्या व्यक्तींच्या विचारांचा, आठवणींचा, सहवासाचा पूर्णपणे त्याग इत्यादी गोष्टींची गरज असते.
बाजीरावालाही प्रेमात पडायचं होतं. प्रेमात पडल्यावरचा आनंद अनुभवायाचा होता. प्रेम विफल झालं तर होणाऱ्या परिणामांना सामोरं जायचं होतं. त्याने खुप मुली पाहिल्या होत्या, मुलींच्या त्याच्याकडे पाहण्यानं त्याला आनंद होत होता. पण कोणत्याच मुलीवर प्रेम होत नव्हतं. त्यामुळे तो गेल्या रविवार पासून गावच्या बाजारात मित्राच्या चहाच्या हॉटेलमध्ये जावून बसत होता. कारण बाजारात आसपासच्या गावातील बऱ्याच मुली येत होत्या. त्यातील मनाला भावणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडण्यासाठी व त्या मुलीला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी तो आज सकाळ पासूनच हॉटेलवर येऊन बसला होता.
व्यापारी, माळव्यावाले, किराणा दुकानदार, कपडयावाले, शेव चिवडयावाले, मसाल्यावाले, वारीक, चांभार, फळवाले सर्वजण आपापले दुकान लावण्यात मग्न होते. बाजारात खुप सुंदर मुली आल्या होत्या. तो फक्त त्यांची सुंदरता पाहण्याचं नेत्रसुख घेत होता. पण जिच्या प्रेमात पडावं अशी एकही मुलगी त्याला दिसत नव्हती. एखादे वेळेस कपडयाच्या दुकानात गेल्यावर दुकानदाराने सगळेच छान कपडे दाखवावेत आणी कोणते कपडे घ्यायचे याबाबत आपल्या मनात संभ्रम निर्माण व्हावा तशी त्याची मन:स्थिती झाली होती. कारण मुलीपण त्या कपडयांप्रमाणेच एकापेक्षा एक सुंदर नजरेस पडत होत्या.
शेवटी मुली पाहण्याच्या कार्यक्रमात दुपार झाली. त्याला कडाडून भुक लागली. तो घरी जावून जेवण करुन परत आला. आता दुपारचे चार वाजत आले होते. तरी आतापर्यंत एकही मुलगी त्याला प्रेमात पाडु शकली नाही. बाजीरावचा मित्र शश्या गिऱ्हाईकाला चहा देत होता. त्यानं बाजीरावाला स्पेशल चहा बनवून दिला. तो चहा पीत-पीत बाजारात नजर फिरवु लागला. आणी त्याची इतक्या दिवसांची, इतक्या क्षणांची प्रतीक्षा संपली. त्याला हवी असेलेली, त्याने मनात रंगवलेली सुंदर परी त्याला दिसली. ती माळवं घेत होती. तशीच ती पुढं-पुढं येत बाजीराव बसला होता तिथचं बाजूला माळवं घेण्यासाठी आली. तो तिला जवळून पाहत होता. तिचं सुंदर रुप डोळयात साठवत होता. तिच्या सौंदर्याने त्याच्या मनाला वेड लावलं होतं. स्वर्गातील अप्सरा पृथ्वीवर तर अवतरली नाही ना? असा त्याच्या मनाला क्षणभर प्रश्नच पडला. तिचा गौर वर्ण, तिचे मादक, सुरेख व रेखीव शरीर, तिचं सुंदर हास्य, तिची मनमोहक अदा पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडला असता, तोही तिच्या प्रेमात पडला. तिच्या सौंदर्यापुढे त्याचं देखणेपण, त्याची श्रीमंती, त्याचा रुबाब, त्याचं एैश्वर्य त्याला गौण वाटु लागलं.
माळव्यावाल्याच्या पाठीमागेच शशीचं हॉटेल होतं. तो हॉटेलमधील पाठीमागच्या बाकडयावर बसूनच तिला देहभान विसरुन पाहत होता. तिनेच त्याला पाचशे रुपयांची चिल्लर मागीतली, तेव्हा तो भानावर आला.त्याने शर्टच्या वरच्या खिशात सहाशे- सातशे रुपयांच्या शंभरच्या नोटा असताना मुद्दाम खालच्या खिशातून नोटांचा बंडल काढून तिला नोटा दिल्या. नोटा देताना त्याने तिच्या डोळयात पाहिलं. तिच्या नजरेच्या जादूनं तो आणखीनच तिच्या प्रेमात पडला. ती तेथून तशीच पुढं गेली. तेथील शेवग्याच्या शेंगा घेत त्याच्याकडं पाहू लागली. तो क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण होता. त्याचं देखणंपण, त्याची श्रीमंती, त्याचा रुबाब पाहून तीही त्याच्या प्रेमात पडली. त्या दोघांची नजरा-नजर होऊ लागली. त्याचं मन आनंदानं नाचत होतं. पण त्याच्या मनाला एक खंत वाटत होती. कारण तिने साडी नेसली होती, तिच्या कपाळाला टिकली होती, गळयात मंगळसूत्र होतं. तसेच तिच्या पायात जोडवे होते. याचा अर्थ ती विवाहीत होती. एका विवाहीत स्त्रीच्या प्रेमात पडणं त्याला पाप वाटु लागलं. पण वेळ आता पाप – पुण्य पाहण्याची नाही,असं त्याचं वाईट मन त्याला सांगु लागलं. ती नजरेच्या बाणाने त्याला घायाळ करत होती.
शेवटी त्याच्या वाईट मनानं त्याच्या चांगल्या मनावर विजय मिळवला. आणी तो नकळतपणे तिच्या मागे निघाला. तिच्या हातातील बाजारची पिशवी भरत आली होती. तिच्या जवळील ओझं आपण घ्यावं असं त्याला मनोमन वाटत होतं. पण आजूबाजूला लोक होते. तो मोठया घरचा असल्यामुळे पंचक्रेोशीत जवळ-जवळ सर्वच पुरुष मंडळी त्याला ओळखत होते. प्रेमात माणूस आंधळा होतो याचा प्रत्यय त्याला तेव्हा आला. इज्जतीची पर्वा न करत
ा, तो तिच्या मागे-मागे फिरत होता. तरीही थोडं अंतर ठेवून तो तिच्या मागे-मागे जात होता. तिचं नजरेच्या बाणांनी त्याला घायाळ करणं चालूच होतं. तिच्या सौंदर्यानं त्याच्या बुद्धीवर त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर पूर्णपणे प्रभाव पाडला होता. त्यामुळे तो नकळतपणे तिच्या मागे-मागे फिरत होता.तो पूर्णपणे तिला वश झाला होता. तिचा बाजार करणं झालं होतं. ती बाजाराच्या बाहेर जाऊ लागली. त्याने मनाशी ठरवलं, ही कोठे राहते याचा शोध घेण्यासाठी हिच्या मागे-मागे जायचे. ती थोडं पुढं जावून वळून त्याच्याकडं पाहून हसत होती. तसेच पुढे-पुढे चालत होती. तो आपल्याकडे कोणी पाहत तर नाही ना,याचा अंदाज घेत थोडं अंतर ठेवून तिच्या मागे चालत होता.
ती बाजाराच्या बाहेर निघाली होती. आता गावातील रस्त्याने चालत होती. येणारा-जाणारा प्रत्येक पुरुष तिला पाहिल्या शिवाय पुढं जात नव्हता. गाव आल्यामुळं बाजीराव तिच्यापासून आणखी थोडं अंतर ठेवून चालु लागला. ती आता वेशीच्या बाहेर आली होती. तिनं एकदा तो तिच्या मागे येत असल्याची खात्री करण्यासाठी मागे पाहिलं आणी त्याच्याकडे पाहत सुंदर हसून ती परत हरिणीच्या चालीने चालु लागली. ती वाट पाणकुळ वाडयाकडं जात होती. म्हणजे पाणकुळ वाडयापर्यंत त्याला तिला बोलता येणार नव्हतं.कारण तिथपर्यंत तुरळक लोक वस्ती होती. तिथपर्यंतची सगळी घरं त्याच्या परिचयाची होती. ही बाई पाणकुळवाडयाच्या पुढेच राहत असणार, असा त्याने मनाशीच अंदाज बांधला. ‘पाणकुळ वाडा’ म्हणजे दोन्ही बाजूने दाट झाडी व मधोमध ओढा वाहत होता.ओढयाच्या बाजूनेच पायवाट होती. त्याठिकाणी लोकांची वर्दळ नव्हती. म्हणजे तिथं फक्त ती आणी तोच या विचारानं त्याच्या मनात आनंद भरला. त्याच्या हदयाच्या ठोक्यांची गती वाढली. तिला कसं बोलावं, याच विचारात तो तिच्या मागे चालु लागला. तिचा हात ओझ्यानं अवघडला होता. पण काय करणार त्याला तिच्या हातातील ओझं घेता येत नव्हतं कारण समोरुन कोणीतरी येतच होतं.
आता पाणकुळवाडा जवळ आला होता. दोघांना एकांत भेटणार होता. मघापासूनच्या तिच्या वागण्यानं तिलाही त्याच्यावर प्रेम झालं आहे, हे त्याला समजलं होतं. आता फक्त मनातलं बोलणं बाकी होतं. तेवढयात बाजीरावच्या शेतातील गडी सदा येताना त्याला दिसला. त्यानं बाजीरावला थांबवलं. ती पाणकुळवाडयात शिरली होती. त्याने जर आता इथं वेळ घालवला तर पुढं पाणकुळवाडयात दोन रस्ते फुटतात, ती नेमकं कोणत्या रस्त्याला गेली ते त्याला कळणार नव्हतं. त्यामुळे त्याला सदाजवळ वेळ घालवायचा नव्हता.
सदा म्हणाला, “मालक कुणीकडं निघलाव? बरं झालं भेटलात मला बाजारला पैसं पाहिजी व्हतं.”
बाजीरावानं रानातच चाललोय म्हणून त्याला सांगीतलं. त्याला माहित होतं सदाच्या बायकोनं मघाशीच बाजार केला होता. त्याला दारु प्यायला पैसे पाहिजे होते. पण तो विचार न करता, बाजीरावनं पटकन त्याला शंभरची नोट काढून दिली.
सदानं पटकन नोट घेतली अन् तो बाजारच्या दिशेनं निघाला. तेवढया वेळात ती त्याच्या नजरेआड झाली होती. त्याचं मन बेचैन झालं,तो पाणकुळवाडयात शिरला. दुतर्फा झाडी होती. ओढयाच्या बाजूच्या पाऊल वाटानं तो झपाटयाने चालु लागला. थोडं पुढं जाताच तो दोन रस्त्यांजवळ आला. त्यातील म्हातारा म्हसोबाच्या वाटेला वळून ती त्याचीच वाट पाहत असलेली त्याला दिसली. तिला पाहताच त्याला खुप आनंद झाला. तिनं एकदा त्याच्याकडं पाहिलं. ती तशीच हरीणीच्या चालीनं चालु लागली. तो तिचं पाठमोरं सौंदर्य न्याहळत चालु लागला. सुडौल शरीर ,मोहक चालणं, प्रेमळ हसणं, मधाळ बोलणं आणी नजरेच्या बाणानं घायाळ करणं अशा कितीतरी अदा तिच्यामध्ये होत्या, तिचं सौंदर्यच विलोभनीय होतं. अशी सुंदर स्त्री आपल्यावर भाळली याचा त्याला मनोमन आनंद होत होता.आता ते दोघेही ओढयाच्या अगदी मधोमध आले होते. दोन्ही बाजूंनी घनदाट झाडी, झाडांच्या बाजूलाच बहरात आलेले ज्वारींची, गव्हांची आणी ऊसांची शेतं. पाखरांची किलबील, नदीचा खळखळाट आणी झाडांच्या पानांचा सळसळाट याशिवाय कसलाच आवाज येत नव्हता.
थोडया अंतरावर ओढयाचा खोलगट भाग होता. त्याबरोबर पायवाटही खाली उतरुन वर चढत होती. आता काहीही झालं तरी येथे तिला थांबवून बोलायचेच या निर्धारानं त्यानं मन घट्ट केलं. ती खाली उतरली. त्यानं आजूबाजूला पाहिलं,कोणीच नव्हतं. त्याच्या हदयाची धडधड वाढली. ती खोलग्यात उतरताच तिनं एकदा त्याच्याकडं वळून पाहिलं.एकदा चौफेर नजर फिरवली व ती एका जागेवर थांबली. तो तिच्या अगदी चार-पाच पावलांच्या अंतरावर होता. ती त्याच्याकडे पाहत होती. पण ही नजर पहिल्यापेक्षा वेगळी होती. त्या नजरेत आसुरीपणा त्याला स्पष्ट जाणवला. ती त्याच्याकडे पाहून राक्षसी हास्य करत होती. त्याने बाजूला पाहिलं, झाडीत लपलेले बलदंड बांध्याचे चार-पाच जण हातात कुऱ्हाड, काटया घेवून त्याला घेरुन उभे राहिले. क्षणार्धात त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. पंधरा दिवसांपुर्वी याच जागेवर गव्हाणवाडीच्या ज्ञानु सावकाराच्या पोराचा त्याच्या अंगावरील सोने व त्याच्याकडील पैसे लुबाडून निर्घुणपणे खुन करण्यात आला होता. म्हणजे, या स्त्रीनेच त्याची शिकार केली होती. आता तिने बाजीरावच्या अंगावरील सोनं, त्याची श्रीमंती पाहून त्याला लुबाडण्यासाठी आपल्या सौंदर्याच्या मायाजालात अडकवून त्याला आपली शिकार बनवलं होतं.
ती राक्षसी नजरेने त्याच्याकडे पाहत होती. ती चार-पाच आडदांड माणसं त्याच्याकडे कुऱ्हाड घेवून त्याला मारण्यासाठी त्याच्याकडे सरसावली. त्याने क्षणार्धात चित्याच्या चपळाईनं माती घेवून त्यांच्या डोळयात फेकली, दगड हातात घेवून एकजणाच्या डोक्यात मारला. आणी काय होतयं कळायच्या आतचं तो गावाकडे पळत सुटला. ते थेट पाणकुळवाडयाच्या बाहेर येईपर्यंत तो थांबलाच नाही.त्याने वस्तीवरील लोक घेवून त्या स्त्रीचा व तिच्या साथीदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते त्याच्या हाती लागले नाहीत.
इतकी सुंदर स्त्री इतकी घातक असेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तिची ओळख नसताना, तिचा स्वभाव माहित नसताना बाजीराव फक्त तिच्या सौंदर्याला पाहून तिच्या प्रेमात पडला होता. त्याची श्रीमंतीच आज त्याचा कर्दनकाळ ठरणार होती. पण सुदैवानं तो आता वाचला होता. त्याला खात्रीने माहित होतं, ती आता कधीच बाजारात येणार नाही कारण तिची शिकार तिच्या हातून सुटली होती. आता ती शिकारच आपली शिकार करेल हे तिला चांगलं माहित होतं.