रॉकी
रॉकी


बाहेर जोरदार पाऊस पडत होता. मैदान पाण्याने भरलेले. पावसामुळे आज प्रार्थना वर्गातच घ्यावी लागली होती. शाळा भरून अर्धा तास झाला होता. आपल्या सहावीच्या वर्गातील हजेरी संपवून पाटील बाई शिकविण्याच्या कामाकडे वळल्या. आज उपस्थितीही कमीच होती, शनिवारी सकाळी शाळा असल्यावर असते तशी. कमी उपस्थितीमुळे बाई आज आधीच्याच पाठाची उजळणी घेणार होत्या. वाचन चालू असतानाच दरवाजातून आत येण्याच्या परवानगीसाठी एक हात पुढे आला. नेहमीच्या गणवेशातील फक्त पांढरा शर्ट आणि खाकी पँटऐवजी निळ्या रंगाची हाफ पँट परिधान केलेला एक सडपातळ मुलगा हात पुढे करून आत येण्याची परवानगी मागत होता. "ये बाबा!", बाईंनी स्वागत केलं. सकाळची शाळा असल्यावर, तसेच इतर वेगवेगळ्या कारणांनी खाडे करणारा मुलगा पावसातही उपस्थित राहिला हे पाहून बाईंना आनंद झाला. डोळ्यांवर आलेले ओले लांब केस बाजूला सारत तो रिकाम्या बाकावर जाऊन बसला. आधीच्याच दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे घरात पाणी शिरून त्याचा शाळेचा गणवेश वाहून गेला होता, त्यामुळे घरातला एक शिल्लक पांढरा शर्ट आणि मिळेल ती पँट घालून तो शाळेत आला होता. टीव्हीवरील कपडे मळविणाऱ्या जाहीरातीत शोभेल अशा चेहऱ्याचा हा मुलगा. आईवडीलांनी नावही भन्नाट ठेवलेलं- 'रॉकी'! या नावाला जागणारे भाव नेहमी चेहऱ्यावर असायचे, दगडासारखेच. वर्गात बोलणे जवळपास नाहीच. प्रश्न विचारल्यानंतर केवळ स्थितप्रज्ञपणे उभे राहून शिक्षकांच्या सहनशिलतेचा अंत पाहण्याचे काम तो नित्यनेमाने करायचा. कितीही चौकशी केली, प्रेमाने विचारले तरीही फारसे बोलण्याचे कष्ट तो घ्यायचा नाही. शिक्षकांशी असलेला अबोला त्याच्या वहीतही कायम असायचा. दिवसभरात दोन चार ओळी लिहिल्या तरी खूप. परीक्षेच्या वेळेस त्याने पेपरवर ओबडधोबड आकारात लिहिलेले रॉकी हे नाव वाचायचीही गरज नसायची, इतका त्याचा फॉन्ट वेगळा होता. गणवेश, दप्तर, वह्या-पुस्तके याबाबतील अजागळ असणारा हा रॉकी एका बाबतीत मात्र इतर विद्यार्थ्यांपेक्षा समृद्ध होता. त्याच्या हातात नेहमी आकर्षक आणि लक्ष वेधणारे पेन असायचे. त्याच्या वर्गशिक्षिकेला नेहमी त्याच्या पेनांचे अप्रूप वाटायचे. एखाद्या दिवशी छानशा स्मायलीचे टोपण असणारे पेन, तर कधी वाऱ्यावर फिरणारी भिंगरी असलेला पेन; दोन-चार दिवसांनी त्याचे पेन बदलायचे. शाळेजवळच्या कुठल्याही दुकानात न मिळणाऱ्या या वस्तूंचे सर्वांनाच कुतूहल वाटायचंं. पण पुढे रॉकीच्या माध्यमातून हळूहळू वर्गातल्या इतर मुलांकडेही तसे पेन दिसू लागले.
आज शनिवार! सकाळची शाळा. दुपारी शाळा सुटल्यानंतर विरारला जाऊन खरेदी करायचे नियोजन पाटील बाईंनी केले होते. पाटील बाईंची शाळा वसई स्टेशनला जवळ. रोज बोरीवली ते वसई असा लोकल ट्रेनचा प्रवास त्या करायच्या. गर्दीच्या उलट प्रवास असल्याने त्याचा फारसा त्रास होत नव्हता. पावसामुळे बऱ्याचशा लोकल आज धिम्या गतीने धावत होत्या. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले नसले तरी, सुस्थितीतही नव्हते. पाटील बाई शाळेत दहा मिनीटे उशीरा पोहोचल्या. तशाच आपल्या वर्गात दाखल झाल्या. पाऊस आणि शनिवार असा दुहेरी योग जुळून आल्याने आजही उपस्थिती कमी होती. रॉकीही आला नव्हता. तासिका संपल्या. सर्व कामे आटोपून बाई जायला निघाल्या. बायोमेट्रिक मशीनवर अंगठा उठवण्यापूर्वी, सहकारी शिक्षिकेने मिटींग असल्याची खूण केली. सोमवारी शाळेत होणाऱ्या कुठल्याशा 'जंतनाशक' मोहिमेचे नियोजन करण्यासाठी मुख्याध्यापकांनी तातडीची सभा बोलावली होती. सभेला आरोग्य विभागाचे दोन कर्मचारीही उपस्थित होते. शासनाची ही मोहिम कशी क्रांतीकारी ठरणार आहे, याची अत्यंत रटाळ माहिती कर्मचारी देत होते. पाटील बाई अधून मधून घड्याळाकडे पहात होत्या. मोबाईल फोनचे घड्याळ आणि भिंतीवरचे घड्याळ या दोन्हींमधील वेळा त्यांनी तपासून पाहील्या. आज खरेदी करण्याचे नियोजन रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणेच विस्कळीत होण्याची चिन्हे दिसू लागली. अखेर प्रदीर्घ सभा संपली. विद्यार्थ्यांना गोळ्या कशा वाटायच्या, कोणती काळजी घ्यायची हे पुन्हा पुन्हा सांगण्यात आले. या राष्ट्रीय कार्यात गोळ्यांचे खोके फोडून त्यातील गोळ्या सर्व वर्गशिक्षकांना पटाप्रमाणे वाटण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पाटील बाईंना मिळाली. सोमवारी आल्यानंतर घाई व्हायला नको म्हणून बाईंनी लगेचच खोके मोजून त्यांची वर्गवारी करायला घेतली. या अचानक आलेल्या राष्ट्रीय आपत्तीमुळे खरेदीची वेळ टळून चालली होती. पण रविवारी मेगाब्लॉक असल्याने उद्या जाणे शक्य होणार नव्हते.
बाईंना शाळेतून बाहेर पडेपर्यंत साडे चार वाजले. पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. बाईंनी स्टेशनला येऊन विरार लोकल पकडली. पर्सचे चार कप्पे उघडल्यानंतर एका कप्प्यात त्यांचा फोन सापडला. घरून चार मिसकॉल होते. घरी फोन करून उशीरा येत असल्याचा निरोप दिला. आज सकाळच्या घाईत चार्जरही विसरला होता. मोबाईलची बॅटरी सतरा टक्के दाखवत होती. दिवसभरातले व्हॉटस्अॅप मेसेज वाचत विरार गाठले. विरारच्या एका मोठ्या दुकानात 'मान्सून सेल' लागला होता. खूप चांगले कपडे स्वस्तात मिळाले होते. पाटील बाई थकल्या होत्या, पण दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने निश्चिंत वाटत होते. खरेदी संपवताना सायंकाळचे साडेसात झाले. अंधारून आले होते, त्यातच पावसाने पुन्हा जोर धरला. हातातल्या पिशव्या सांभाळत बाईंनी स्टेशन गाठले. पुढच्या प्लॅटफॉर्मवर डहाणू-चर्चगेट लागलेली. पाटील बाई आपल्या नेहमीच्या लेडीज डब्यात चढल्या. पावसामुळे गर्दी नव्हती. डब्यात फक्त दोन महिला होत्या. कोपऱ्यातल्या सीटवर पेन, खेळणी, चाप, टिकल्या विकणाऱ्या फेरीवाल्याचे साहित्य दिसत होते. पण सीटच्या आडून कोणी दिसत नव्हते. विरारनंतर लगेचच वसई आले. त्या दोन्ही महिला वसईला उतरल्या. पाऊस बरसतच होता. बाई घरी पोहोचण्याच्या विवंचनेत असतानाच ट्रेनने पुन्हा वेग पकडला. या वेगातच कोणीतरी डब्यात चढलं. विस्कटलेले केस, गळकी जिन्स पँट अशा अवतारातील एक गर्दुल्ल्यांसारखा दिसणारा पुरूष महिलांच्या डब्यात आला होता. येऊन थेट बाईंच्या समोरच्या सीटवर येऊन बसला. पुढचे नायगांव स्टेशन पाच मिनीटांवर होते. नायगांवला उतरून डबा बदलण्याचा विचार पाटील बाईंनी केला.
पावसामुळे बाहेरचे काही दिसत नव्हते. पाऊस येतोय म्हणून त्या व्यक्तीने डब्याचा एक दरवाजा लावून घेतला. डब्यातल्या स्क्रीनवर रेल्वे पोलिसांचा हेल्पलाईन नंबर झळकत होता. बाईंनी नेहमीप्रमाणे आपल्या पर्सचे चार कप्पे चाचपून एका कप्प्यातून फोन बाहेर काढला. फोन डिस्चार्ज झालेला. तोपर्यंत नायगांव आले, ट्रेन थांबली नाही. बाईंनी विरारवरून डहाणू-चर्चगेट डबलफास्ट पकडल्याने आता थेट भाईंदर; म्हणजे आणखी पाच मिनिटे. समोरचा माणूस आता बाईंकडे रोखून पाहत होता. बाईंनी एकवार डब्यातल्या साखळीकडे नजर टाकली. साखळी ओढून ट्रेन थांबते, इतकं माहिती होतं पण प्रत्यक्षात काय करायचं हे कळत नव्हते. हातात वेळही नव्हता. अचानक ट्रेनचा वेग मंदावला. भाईंदरच्या खाडीपुलावर जाऊन ट्रेन थांबली. सिग्नल नसल्याने ट्रेन उभीच होती. बाहेरचा पाऊस एका उघड्या दरवाज्याने आत येत होता. जोरदास पावसात बाईंना डब्यातून उतरणेही कठीण होते. आता त्या व्यक्तीने दुसरा दरवाजाही बंद केला. बाईंनी उठून आपली सीट बदलली. तसा तो देखील त्यांच्या समोर येऊन बसला. अशा परिस्थितीत धैर्य दाखवणे सगळ्यांनाच शक्य होत नाही, बाईंचे अवसान खचले. इतक्यात शेवटच्या सीटवर थोडी हालचाल दिसली. सीटवर आडवा झोपलेला एक शाळकरी मुलगा आपल्या पिशव्या सांभाळत उठला. ट्रेनमध्ये विकण्यासाठी आणलेले स्मायलीच्या टोपणाचे, भिंगरीवाले पेन, खेळणी, चाप, टिकल्यांची पिशवी एका हाताने पकडून त्याने खिशातून एक मोबाईल फोन काढला. डब्यातल्या स्क्रीनकडे पाहून त्याने नंबर डायल केला.
"हॅलो सायेब, मै बीचवाले लेडीज डब्येसे बोल रहा हूँ. इधर जल्दी आव. हमारे मॅडमको हेल्प चाहीये"
रॉकीच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून तो भितीदायक माणूस चपापला. सीटवरून उठून त्याने रॉकीकडे पाहीले. हळूवारपणे दरवाजा उघडून उडी टाकून निघून गेला. पाटील बाईंनी रॉकीकडे अश्रूभरल्या डोळ्यांनी पाहीले. वर्गात काहीही न बोलणाऱ्या रॉकीच्या शब्दांनी आज बाईंना वाचवले होते. शनिवार, रविवार आपल्या कुटूंबाला हातभार लावण्यासाठी रॉकी ट्रेनमध्ये पेन, खेळणी यांसारख्या वस्तू विकायचा. आज कमी गर्दीमुळे फारशी विक्री झाली नव्हती, त्यामुळे भाईंदरपर्यंत जाऊन तो परत येणार होता. तो या कारणामुळेच शनिवारी शाळेत येत नव्हता. आज बऱ्याच नव्या गोष्टींचा उलगडा बाईंना झाला. रॉकीकडे नेहमी नवनवे पेन का असायचे याचाही शोध लागला. ट्रेनला सिग्नल मिळाला. भाईंदर आले, रॉकी उतरला, पाठोपाठ बाईंनी उतरून डबा बदलला. जनरल डब्यात त्यांना माणसांत आल्यासारखे वाटले.
बाईंनी सोमवारी रॉकीचा प्रसंग शाळेत सांगितला. सर्वांनी त्याचे कौतुक केले. तो तसाच निर्विकार. रॉकीने कसा फोन करून पोलीसांना वेळेत कळविले, याची माहिती बाईंनी कथन केली. शिक्षकांनी रॉकीला त्याचा अनुभव विचारला. रॉकीने हलकेसे हसून ट्रेनमध्ये वापरलेला फोन आपल्या दप्तरातून बाहेर काढला. पाटील बाईंनी रॉकीच्या हातातला लहान फ्लिप वाला फोन हातात घेतला. तो उघडून एक बटण दाबले, फोनमधून गाणी सुरू झाली...
"चल छैंया छैंया छैंया...."
"निंबुडा निंबुडा निंबुडा..."