STORYMIRROR

Tushar Mhatre

Children Stories Inspirational

4.4  

Tushar Mhatre

Children Stories Inspirational

राजा, गुरू आणि दगड

राजा, गुरू आणि दगड

3 mins
111


      एका प्राणीशाही नांदत असलेल्या जंगलात एक ‘वाघ’ राज्य करत होता. जंगलातील काही प्राणी आपल्या राजावर सतत खूष असायचे तर काही प्राणी सतत नाखूष. कालांतराने नाखूष वर्गाची संख्या वाढून जंगलात सत्तापालट झाला. एक जबरदस्त डरकाळी फोडू शकणारा ‘सिंह’ या प्राणीशाही असलेल्या जंगलाचा राजा बनला. राजा बनल्यानंतर त्याने धूर्त लांडग्याची आपला प्रधान म्हणून नेमणूक केली. एक अत्यंत हुशार वृद्ध माकड संपूर्ण जंगलाला गुरूस्थानी होता.

सिंह जंगलाचा राज्यकारभार स्विकारत असताना ‘गुरू माकड’ तीन लहान कुलूपबंद पेट्या घेऊन आला. ते वृद्ध अनुभवी माकड राजाच्या हाती या तीन पेट्या देऊन म्हणाला, “या जंगलाच्या सर्व समस्या सोडवणे तुझे कर्तव्य आहे, पण जर का तू समस्या सोडवण्यास असमर्थ ठरलास तर पहिली पेटी उघड!”

“आणि बाकी पेट्या?” राजाने विचारले.

माकडाने उत्तर दिले, “त्यानंतरही तुला सोडवता न येणाऱ्या समस्या निर्माण झाली तरच दुसरी आणि तिसरी पेटी उघडायची.”

    सिंहाने अत्यंत आनंदाने आणि विनम्रतापूर्वक या तिनही पेट्या जंगली तिजोरीत ठेवून दिल्या.

     नविन राज्य उत्साहाने चालत होत होते. एके दिवशी जंगलातील काही ‘नकारात्मक’ आणि ‘जंगलद्रोही’ प्राण्यांमुळे मोठी समस्या निर्माण झाली. ही समस्या सोडवणे अशक्य होऊन बसल्यावर राजाने तडक जाऊन पहिली पेटी उघडली.

   त्या पेटीत एक साधा दगड आणि एक कागदाची चिठ्ठी होती. “दगड हेच समस्येचे उत्तर आहे!”, चिठ्ठीत लिहिलं होतं.

   सिंहाने चिठ्ठी वाचली. आपला प्रधान असलेल्या लांडग्याला त्याने अर्थ विचारला. प्रधानाने अर्थ सांगीतला- “आपला आधीचा राजा दगड असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.”

सिंहाला पटले, त्याने तातडीने जाहीर सभा घेऊन जंगलातील तमाम प्राण्यांना आधीच्या वाघामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचे सांगीतले. प्राण्यांनाही ते पटले. समस्या थंडावली. विकासाचा वेग पुन्हा वाढू लागला. ‘प्राणीशाही’ बाळसं धरू लागली. काही दिवसांनी पुन्हा एकदा खूपच गंभिर समस्या निर्माण झाली. समस्येवर

विचार करण्या आधीच राजाला दुसऱ्या पेटीची आठवण झाली. त्याने तडक जाऊन जंगलातल्या तिजोरीतील दुसऱ्या पेटीचे कुलूप फोडले.

   पेटीमध्ये पहिल्यासारखाच दगड आणि एक चिठ्ठी होती.

चिठ्ठीत लिहले होते- “दगड हेच समस्येचे उत्तर आहे!”

   सिंहाने आश्चर्यचकीत होऊन चिठ्ठी वाचली. नेहमीप्रमाणे आपला प्रधान असलेल्या लांडग्याला त्याने अर्थ विचारला.

प्रधानाने अर्थ सांगीतला- “आपल्या जंगलातील जे नागरिक आपल्याला विरोध करित आहेत, त्यांना विरोधात जाल तर दगडाने चोपू असा दम भरायचा.”

   सिंहाला हे उत्तर आवडले, त्याने पुन्हा एकदा तातडीने जाहीर सभा घेऊन जंगलातील तमाम प्राण्यांना विरोधात न जाण्याचे आवाहन केले. तसेच विरोधात गेल्यास शिक्षा भोगावी लागेल असा दमही भरला. सर्व प्राणी घाबरले, पण शांत झाले.

  नविन राज्य आता भयाने चालत होते. त्यात उत्साह राहीला नव्हता. अखेर सर्व प्राण्यांनी एकत्र येऊन आंदोलन सुरू केले. ही समस्या सोडवणे अशक्य होऊन बसल्यावर राजाने तडक जाऊन शेवटची पेटी उघडली.

या पेटीतदेखील एक साधा दगड आणि एक कागदाची चिठ्ठी होती. “दगड हेच समस्येचे उत्तर आहे!”, चिठ्ठीत लिहिलं होतं.

    सिंहाने निराशेने चिठ्ठी वाचली. आपला प्रधान असलेल्या लांडग्याकडे आता काय अशा अविर्भावाने पाहीले. प्रधान लांडगाही हतबल झाला होता. राजा, प्रधान आपल्या माकड गुरूपाशी गेले. पेटीतला दगड आणि चिठ्ठी वृद्ध माकडाला दाखवली आणि अर्थ विचारला.

माकड म्हणाले, “खरंतर तू आधीच यायला हवं होतंस. तुला न सुटणारी समस्या निर्माण झाली तेव्हाच!”

असे म्हणून माकडाने एक दीर्घ निश्वास सोडला. सिंह, लांडग्याची जोडी गुरूकडे आशेने पहात राहीली.

   वृद्ध माकड पुढे म्हणाले, “एखाद्या समस्येचे उत्तर तुझ्याकडे नाही आणि ते सोडवण्यासाठी विचारपूर्वक पाऊले उचलण्याऐवजी तू एखाद्या आयत्या उत्तरावर आणि अविचारी सहकाऱ्यावर अवलंबून राहतोस. याचा अर्थ तूच दगड आहेस. हे राज्य चालवण्यास पात्र नाहीस. तेव्हा मला त्या तीन पेट्या परत दे, मी नव्या राज्यकर्त्यासाठी तयारी करतो.”


Rate this content
Log in