STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Others

3.5  

Tushar Chandrakant Mhatre

Others

बाजार

बाजार

5 mins
89


   आपल्या भारतीय संस्कृतीला ‘सण-कृती’ म्हणावे लागेल इतक्या मोठ्या संख्येने विविध प्रकारचे सण, उत्सव सातत्याने साजरे होत असतात. कधी आवड आहे म्हणून, तर कधी सवड आहे म्हणून आपला समाज रोजची चाकोरी सोडून या सणांमध्ये सहभागी होत असतो. आपल्या देशात मोठ्या शहरांपासून ते लहान खेड्यांपर्यंत विविध उत्सवांची ‘जत्रा’ कायमच भरलेली असते. या बहुरंगी देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या बहुढंगी मुंबईपासून जवळचे ‘पिरकोन’ हे गाव देखिल उत्सवप्रेमीच. या गावातही आवडीचे, सवडीचे सण-उत्सव तितक्याच साजरे होत असतात. या सर्व सणांच्या जोडीला पिरकोनमध्ये एक अनोखा उत्सव साजरा होतो. हा उत्सव म्हणजे ‘उर्स’ किंवा ऊरूस. या उर्साला अनोखे म्हणण्याचे कारण म्हणजे आगरी समाजाची वस्ती असणाऱ्या या गावात सध्या एकही मुस्लिम वस्ती नाही, तरीही गावकरी मोठ्या आनंदाने हा उर्स साजरा करतात. केवळ पिरकोनच नव्हे तर त्याच्या पश्चिमेला असणारा आवरे आणि उत्तर पूर्वेकडील मोठीजुई या गावांमध्येही असाच उरूस साजरा केला जातो.

हे उर्स म्हणजे तरी काय?


  दक्षिण आशियातल्या सुफी संतांना चिश्ती म्हणून ओळखले जाते. हे संत परमेश्वराचे प्रेमी मानले जातात. त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच ‘विसाल’ झाल्यानंतर त्यांचे परमेश्वराशी मिलन होते अशी धारणा आहे. या दोन प्रेमींचे मिलन म्हणजेच ‘उर्स’. त्यामुळे या मुस्लिम संतांची पुण्यतिथी ही एखाद्या विवाह वर्धापन दिनासारखी समजली जाते. सुफी संताच्या पुण्यतिथीला त्यांच्या दर्ग्याजवळ प्रतिवर्षी उरूस साजरा होतो. दर्ग्याच्या संरक्षकांद्वारे हा सोहळा आयोजित केला जातो.काही ठिकाणी उर्साच्या निमित्ताने कव्वाली सारख्या धार्मिक संगित कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. यादिवशी किंवा आधीच्या दिवशी ‘गिलाफ’ असतो. गिलाफ म्हणजे भाविकांद्वारे मझारवर मखमली चादर चढवणे. या वेळी भाविक दर्ग्यावर चद्दर (चादर) चढवण्यासाठी व दुवा करण्यासाठी येत असतात. अजमेर येथील मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्साच्या निमित्ताने प्रतिवर्षी चार लाखांहून अधिक भाविक दर्ग्याला भेट देतात. उर्सासाठी मोठेया संख्येने लोक येत असल्यामुळे दर्गा परिसरात बाजारही भरण्याची परंपरा आहे.


   या उर्सांमध्ये आणि पिरकोन परिसरात साजऱ्या होणाऱ्या उर्सामध्ये काही साम्य-भेद आहे. उरण तालुक्याच्या पूर्व विभागातील आवरे, मोठीजुई, चिरनेर, विंधणे या गावांमध्ये दर्गा असल्याने तेथे उर्साच्या काळात चादर चढविण्यासारखे विधी संपन्न होतात. परंतु काही बाबी मात्र उर्साच्या पट्टीत बसणाऱ्या नाहीत. या उरूसांचे वेगळेपण ‘पुण्यतिथी’ पासूनच सुरू होते. मुस्लिम धर्मात कालगणनेसाठी ‘हिजरी’ सन वापरले जाते. सुफी संतांची पुण्यतिथी म्हणजेच उर्सदेखिल याच कालगणनेनुसार साजरे होतात. (भारतातील सुप्रसिद्ध अजमेर शरीफ येथील उर्स प्रतिवर्षी जमादिउल आखिर या महिन्यात येतो.) आश्चर्याची बाब म्हणजे आवरे, पिरकोन, मोठीजुई गावांतील उरूस मात्र मराठी कालगणणेनुसार येतात. पिरकोनचा उरूस प्रतिवर्षी पौष कृष्ण त्रयोदशी या तिथीला येतो. हिजरी कालगणणेनुसार गेली दोन वर्षे तो रबी अल अव्वल महिन्यात आला होता, तर त्यापूर्वी तो याहूनही वेगवेगळ्या महिन्यांत होता. पौष कृष्ण द्वादशी ते चतुर्दशी असे सलग तीन दिवस तीन वेगवेगळ्या गावांत उर्स संपन्न होतो. त्यापैकी आवरे आणि मोठीजुई या दोन गावांत मुस्लिम संताचा दर्गा आहे. तेथील ‘करम करम पीर परदेसी बाबांच्या’ दर्ग्यात भाविक चद्दर चढवण्यासाठी येत असतात. मात्र पिरकोन येथे दर्ग्याची नोंद नाही. असे असले तरी पिरकोन येथे एक मशिद असून काळाच्या ओघात तीची पडझड होऊन ती जमिनदोस्त झाली. या मशिदीत पूर्वी शाळेचे वर्गही भरायचे. उर्साच्या दिवशी येणारे भाविक या मशिदीच्या जागेत अभिवादन कर

तात. सध्या पिरकोन येथे एकही मुस्लिम वस्ती नाही. तरीही या अनाम मुस्लिम संताच्या स्मृतीखातर रंगणारा उर्साचा उत्सव सर्व गावकरी उत्साहाने साजरा करतात.


   साधारणपणे एक-दोन महिने आधीपासूनच उरूसाच्या दिवसाची विचारणा होते. अलिकडच्या काळात दिवस निश्चितीबरोबरच संभाव्य वार कोणता आहे हे देखिल पाहीलं जातं. खरंतर उर्स किंवा उरूस हे नाव इतरांसाठी, गावकऱ्यांसाठी तो बाजारच. मॉल्स, शॉपिंग सेंटर संस्कृतीचा मागमूसही नसण्याच्या काळात या बाजारांना अनन्यसाधारण महत्त्व होते. नेहमीच्या वस्तूंपेक्षा वेगळं काहीतरी पहायला, ल्यायला मिळणाची ही संधी. शेती, मीठउत्पादन आणि पशुपालन ही उदरनिर्वाहाची प्रमुख साधने असलेल्या पिरकोन परिसरात शेतीतून उसंत मिळण्याच्या काळात अशा स्वरूपाचे उत्सव साजरे होणे लोकांच्या पथ्यावरच पडणारे होते. त्यामुळेच इतर उत्सवांपेक्षा पिरकोनच्या बाजाराचा उत्साह लक्षणीय असतो. उरूसाच्या काही दिवस आधीपासूनच आकाशपाळण्यांसारख्या साधनांचा डेरा गावात पडतो. त्यामुळे उरूसाची वातावरणनिर्मिती काही दिवस आधीपासूनच होते. आवरे येथील बाजार संपायच्या आतच विक्रेत्यांचे प्रतिनिधी जागा अडवण्यासाठी पिरकोनमध्ये दाखल होतात. ताडपत्री किंवा पालाच्या साह्याने ते आपली जागा निश्चित करतात. आवऱ्याचा बाजार आटोपताच सर्व विक्रेते आपले फिरते मॉल घेऊन पिरकोनमध्ये दाखल होतात. रात्री उघड्यावरच मुक्काम करून सकाळी आपले दुकान सजवायला लागतात. सामानाची मांडामांड झाली की आपोआप दुकानावर ‘ओपन’ची पाटी झळकल्यासारखी वाटते. लहान मुलांची सकाळी नऊ वाजल्यापासून बाजारात जाण्यासाठीची धडपड सुरू असते. पण खऱ्या अर्थाने दुपारी बारा वाजल्यानंतरच बाजार भरण्यास सुरूवात होते. लहान मुले खेळण्यांच्या दुकानाकडे नेण्यासाठी हट्ट धरतात, तर महिलांची पावले सौंदर्य वाढवणाऱ्या साहीत्याकडे वळतात. या सर्वांच्या जोडीला गर्दीची वाट पाहत उभा असलेला तरूणांचा घोळका असतो. त्यांच्या हातात मोठ्या आवाजाचे भोंगे असतात. बहुधा भोंग्याच्या आवाजाद्वारे आपल्यातील उर्जेला मोकळी वाट करून देण्याचा प्रयत्न ते करत असावेत. बाजाराचा आनंद घेणारी मुले, महिला, तरूणवर्ग यांची गर्दी वाढत जाते. आवाज वाढत जातो. विज्ञानाच्या भाषेत म्हणायचे तर ‘आवाजाचे रुपांतर गोंगाटात होते’. पण या सगळ्या कोलाहलात एक गट मात्र आपल्याच विश्वात रममाण असतो. बाहेरच्या धावपळीशी त्यांचा काडीचाही संबंध नसतो. एखाद्या तपस्व्याला लाजवेल इतकी एकाग्रता आणि संयम त्यांच्या ठायी असतो. सकाळी दहा वाजल्यापासून ‘हल्ला गुल्ला सब है!’ असे सुभाषित लिहलेल्या ‘डिगली’ म्हणजेच आकडा लावण्याची सोय असलेल्या ‘सोडत’ वाल्याकडे हा गट उभा असतो. किलवर, बदाम, चौकट, एक्का,दुर्री, झेंडी, टोपी अशा संकेतांकडे पाहत ते मुक्तहस्ते आपले नशिब आजमावत असतात. हळूहळू सूर्य मावळतीकडे झुकतो. लोक घरच्यांसाठी गोडधोड पदार्थ, भेटवस्तू खरेदी करून आपल्या घरी निघून जातात. विक्रेते आपली दुकाने आटोपून ‘मोठीजुई’ गावाकडे रवाना होतात. मात्र सकाळपासून नशिब आजमावणारे अजूनही तिथेच असतात. अखेर रात्र वाढते आणि बाजार संपतो.


 ललगावाचा एक उत्साही, उत्सवी दिवस संपतो. यावर्षीचा बाजार खूपच कमी भरला असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत राहतात. पुढच्या वर्षीच्या बाजारात काय खरेदी करायचे याचेही मनसुबे रचले जातात. परंतु हे सगळं घडताना आपण उर्स का साजरा करतोय हे कोणालाच ठाऊक नसतं. जाणून घ्यायचंही नसतं. इथले पीर कोणत्या जातीचे, धर्माचे आहेत हा तपशिल महत्त्वाचा नसतो. या गावातील एका पिढीने मशिदीच्या वास्तूत आपल्या शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ केलाय. त्यामुळे इथल्या मशिद बावीचे पाणी लोकांच्या दृष्टीने पाण्यासारखेच रंगहीन आहे. अलिकडच्या काळात उर्साचा बाजार झालाय हे कबूल, पण हा बाजार अजूनही इथल्या कष्टकरी जनतेला ऊर्जा देतो, नवा उत्साह देतो- यापुढेही देत राहील.


Rate this content
Log in