Tushar Mhatre

Others

4.3  

Tushar Mhatre

Others

विमला

विमला

4 mins
112


करकचून उन लागत होतं. अशा कडक उन्हातच उरणला एका लग्नसमारंभात हजेरी लावून घरी येण्यासाठी निघालो. शहरातल्या अंतर्गत रस्त्यांची कामे चालू असल्याने ‘ट्राफीक जाम’ मध्ये फसलो. गुप्तधनाचा शोध चालल्यासारखे रस्ते खोदलेले, म्हणून नेहमीच्या मार्गाने जाण्याऐवजी उरणमधील विमला तलावाच्या बाजूने बाईक काढली. तळ्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर ‘गोळा-सरबत’च्या गाडीने लक्ष वेधले. थंडगार लिंबू सरबत घेतली. चव नेेहमीपेक्षा वेगळी होती; बहुधा नजरचुकीने आज ग्लास धुतले गेले असतील! एकेक घोट घेत (सरबताचा) समोर तलावाकडे नजर टाकली. थंडगार पाण्यात पाणपक्षी डुबक्या मारत होते. मलाही तीच इच्छा झाली. सध्या डुंबण्यालायक वाटणारा हा तलाव कधीकाळी पिण्यालायक होता. या शहराला पिण्याच्या पाण्याचे तीन महत्त्वपूर्ण तलाव होते. त्यापैकी एक उरण-मोरा(मौर्य?) रस्त्यावर, दुसरा उरण-करंजा रस्त्यावर आणि हा तिसरा शहराच्या मध्यवर्ती भागातील- ‘विमला तलाव’. सभोवतालच्या राखलेल्या हिरवाईने नटलेला, शांत परिसरातील हा जलाशय. आबालावृद्ध, युगुलांचे आवडीचे फिरण्याचे ठिकाण म्हणजे विमला तलाव.

या तलावाचे नाव ’विमला’ का बरे ठेवले असेल?

या नावात काय आहे?

ही ‘विमला’ कोण होती?

  या अशा वास्तूंच्या नावांचा शोध घेणे म्हणजे खोल पाण्याचा तळ गाठणे. सरबत संपवून मी विमलाच्या शोधात निघालो.

आपण सध्या जो तलाव पाहतो याचा जीर्णोद्धार इ.स. १८६० मध्ये उरणच्या मामलेदाराने केला. जीर्णोद्धार करताना तळ्याच्या बांधकामात उरणच्या पोर्तुगीज भुईकोट किल्ल्याचे दगड वापरले गेले.(या किल्ल्याचे प्रवेशद्वार काळधोंडा-कोटनाका येथे होते.) मामलेदाराने जीर्णोद्धार केला, म्हणजे हा तलाव आणखी जुन्या काळातला आहे हे नक्की. कधीही न आटणाऱ्या या तलावाचे खरे नाव आहे ‘भिमाळे’ तलाव. पोर्तुगीजांनी या तलावाचा उल्लेख ‘बेमला’ आणि ‘बिमला’ केला. पुढे त्यात नावासह लिंगबदल होऊन ‘भिमाळे’ ची ‘विमला’ झाली. अर्थात ‘उरण-मुंबई’ची नोंद ‘ओरानु-बम्मारा’ करणाऱ्यांकडून फारशी अपेक्षा नाहीच.(आपण सुद्धा त्यांच्या ‘सँडहर्स्ट’ रोडला नेहमी ‘संडास’च करतो!). हे तळं खोदताना ‘भीम राजाचा’ असे लिहलेला दगड सापडला होता. त्यामुळे तलावाचे नामकरण ‘भिमाळे’ करण्यात आले. जुन्या सर्व कागदपत्रांमध्ये हा तलाव ‘भिमाळे’ नावानेच उल्लेखलेला आहे.

सरबत संपलं! ग्लासाच्या तळाला न विरघळलेले मीठ शील्लक होते. उरणचा इतिहासाही असाच आहे, या न विरघळलेल्या मीठासारखाच. चिमूटभरच दिसतो, पण काळाच्या ओघात किती विरघळलाय देव जाणो.

  मी ‘विमलाच्या’ शोधात निघालो आणि हाती दगड लागला, तोही भीम राजाचा. आता हा ‘भीम राजा’ कोण? आणि उरणला त्याचा दगड कसा हे आणखी काही प्रश्न!

 भारताच्या ज्ञात इतिहासात सुप्रसिद्ध असे तीन ‘भीम’ राजे होऊन गेले. त्यापैकी गुजरात परिसरातील चालुक्य वंशात म्हणजेच ‘सोलंकी’ वंशात प्रथम भीमदेव आणि द्वितीय भीमदेव असे दोन राज्यकर्ते होऊन गेले. पहील्या भीम राजाचा काळ इ.स.१०२२ ते १०६३ असा होता. मोढेरा-अहमदाबाद येथील सुर्यमंदिर याच राजाने बांधले. गझनीच्या महमूदसोबत संघर्ष झालेला हा राजा. दुसऱ्या भीमदेवाचा काळ इ.स

११७८ ते १२४० होता. या दोन्ही राजांचे प्रभावक्षेत्र गुजरात आणि सभोवतालच्या परिसरात होते.

        तिसरा प्रसिद्ध ‘भीमराजा’ यादव कुळातला. याचा उल्लेख ‘बिंब राजा’ असाही केला जातो. तेराव्या शतकाच्या प्रारंभी महादेव यादवाने शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वराचा पराभव केला आणि उत्तर कोकणचा ताबा मिळवला. पुढे या यादवांच्या साम्राज्यालाही यावनी आक्रमणामुळे जोरदार धक्के बसू लागले. देवगिरीचा पाडाव झाला. तरीही ठाणे आणि पैठण यादवांच्या अधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा भीमदेव (बिंबराज) यादव कोकण आणि पैठण परिसरात राहीला. तेव्हा अपरान्तातील अलिबाग परिसरात तीन लहान राज्ये होती. एक चौल येथे, दुसरें आवास- सासवणे येथे व तिसरे सागरगड येथे. चौल व आवास येथे हिंदू राज्ये होती. तर सागरगडावर दिल्लीच्या बादशहाच्या वतीने मुसलमान सरदार राज्य करत होता. तो शेजारील राज्यांजवळून कर वसूल करून तो दिल्लीस पाठवी. (सध्याची आपली राज्यव्यवस्था पण अशीच आहे का?) पुढे हा सरदार बलाढ्य होऊन दिल्लीस कर पाठवीनासा झाला. बादशहाचे हुकूम अमान्य करू लागला. म्हणून दिल्लीच्या बादशहाने एक सरदार त्याच्या पारिपत्याकरितां पाठविला; परंतु त्यास यश न येतां तो दिल्लीस परत गेला. नंतर बादशहाने दुसरा सरदार पाठविण्याचे ठरवून मुंगीपैठणाचा राजा भीमदेव (बिंबराजा) यास पत्र पाठवून दिल्लीहून येणाऱ्या सरदारास मदत करण्याविषयीं विनंती केली. राजाने ती विनंती मान्य करून आपलें सर्व सैन्य घेऊन ठरल्याप्रमाणें दिल्लीहून येणार्‍या मुसलमान सरदारास ठाण्याजवळ येऊन मिळाला. राजा भीमाने आपल्या सर्व लोकांसह गड चढून छापा घातला; गडावरील सरदारांचा बिमोड केला व स्वत: गडावर राहून राज्यकारभार पाहू्ं लागला. काही दिवसांनी त्याने चौल व आवास- सासवणें येथील राज्ये जिंकली. आसपास कोणी शत्रू नसल्यामुळें राजाने परत जाण्याचा बेत रद्द करून तेथेच कायमचे राज्य स्थापण्याचें ठरविले. शांततेच्या वेळीं इतक्या मोठ्या सैन्याची जरूर नसल्यामुळें राजाने पुरेसे लोक पदरीं ठेवून बाकींच्यांनां मिठागरे बांधून दिलीं व जरूर त्या ठिकाणीं गांवठाणे बसवून तेथें वसाहत करण्यास सांगितलें. मिठागराचे उत्पन्न चांगलें व किफायतशीर असल्यामुळें मुंगी पैठणास जाण्यापेक्षा येथेच राहणे या लोकांस अधिक आवडले. राजा भीमानंतरही त्याचे वंशज हे राज्य पुष्कळ वर्षे सुरळीतपणें चालवीत होते. म्हणजे मी ज्या भीम राजाचा शोध घेत होतो, तो हाच आहे हे नक्की.

     पुढें हळूहळू मिठागरें व वसाहती वाढत जाऊन भीमदेवा सोबत आलेल्या कुळांच्या वस्ती रायगड (कुलाबा) जिल्ह्यांतील अलिबाग, पेण, पनवेल,उरण, कर्जत, रोहा व माणगांव तालुक्याचा थोडा भाग येथे व ठाणें जिल्ह्याचा बराचशा भागात पसरत गेल्या. जिथे खारटपणाचा भाग आहे तिथे व त्याच्या लगतच्या प्रदेशांतच अशी वस्ती पसरलेली आहे. भीमदेवाबरोबर जी कुळे आली ती इथेच स्थायिक झाली. ह्या सगळ्यांची नोंद ‘महिकावतीच्या बखरीत’ आहे. या बखरीत उल्लेखलेली चौधरी, म्हात्रे, पुरो, चुरी, सावे, ठाकूर, राऊत, पाटेल, चोघले ही कुळे येथे अजून राहतात.

  असा हा मुंबईचा निर्माता राजा भीम. या परिसरातील आगरी, कोळी, भंडारी, पाचकळशी, गवळी, कुणबी या समाजाला आश्रय देणारा. श्रमाचे महत्त्व जाणणारा . या भीमपराक्रमी राजाला सलाम.

शेक्सपिअर म्हणतो,नावात काय आहे? मला वाटतं नावात इतिहास आहे. तो लपलेला इतिहास शोधला, तर कळेल की नावातंच सर्व काही आहे.


Rate this content
Log in