Tushar Mhatre

Inspirational Children

4.5  

Tushar Mhatre

Inspirational Children

शाळा, गुरूजी आणि मी

शाळा, गुरूजी आणि मी

5 mins
428


आयुष्यातला शाळेत जाण्याचा पहिलाच प्रसंग. हातात दगडी पाटी, पेन्सिलला मोडून शर्टाच्या खिशात ठेवलेले दोन तुकडे अशा तुटपुंज्या साहित्यासह पहिलीच्या वर्गात दाखल झालो. ज्या हॉलमध्ये दोन वर्ग बसवले होते त्याच वर्गात तोंडं एका दिशेला फिरवून प्रार्थना सुरू झाली. राष्ट्रगीतानंतर प्रतिज्ञेसाठी हात पुढे करण्याची सूचना मिळाली. इतरांकडे पाहून हात पुढे केला. 'भारत माझा देश आहे' अशी सुरूवात झाली आणि का कुणास ठाऊक मला नाव नोंदणीसाठी शाळेत आल्याचा दिवस आठवला. नाव नोंदणीच्या दिवशी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा नाही हे ओळखण्यासाठी तिथल्या गुरूजींनी मला उजवा हात डोक्यावरून घेऊन डाव्या कानावर पोहोचवण्यास सांगीतले होते. या कृतीची मला आठवण झाली आणि मी प्रतिज्ञेला पुढे केलेला हात डोक्यावरून डाव्या कानाला लावला. माझा हात कानावर पोचतो न पोचतो तोच पाठीमागून लाकडी रूळाचा हलकासा फटका माझ्या पाठीवर बसला. मागे वळून पाहीले तर राष्ट्रगीताच्या वेळेस पेटी वाजवणारे लाल डोळ्यांचे शीडशिडीत गुरूजी डोळे वासून माझ्याकडे पहात होते. पहिल्याच दिवसाचे असे जोरदार स्वागत पाहून माझ्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. तेवढ्यात आकाशी रंगाचा शर्ट आणि राखाडी पँट परिधान केलेली एक विरळ केसांची व्यक्ती मला बाजूला घेऊन गेली.प्रेमाने विचारपूस केली. रडू नको म्हणून सांगीतले. थोड्या वेळाने मी सर्व काही विसरून त्याच वर्गात तोंड फिरवून बसलो.

    

आता पुढे काय? अशा प्रश्नार्थक चेहऱ्याने सर्वजण बसले होते. दारातून पुन्हा एकदा आकाशी शर्टवाल्या व्यक्तीने वर्गात प्रवेश केला. काही वेळापूर्वी प्रेमाने विचारपूस करणाऱ्या व्यक्तीने मी तुमचा 'गुरूजी' अशी ओळख करून दिली आणि हायसे वाटले. हे म्हात्रे गुरूजी पुढील चार वर्षे आमच्या अतरंगी वर्गाचे वर्गशिक्षक राहीले. वर्गशिक्षक हाच सर्व विषयांचा विषयशिक्षक असणाऱ्या प्राथमिक शाळेत आम्हाला असे गुरूजी लाभले हे आमचे भाग्यच होते.

    

फारसं काही न कळण्याच्या वयातसुद्धा म्हात्रे गुरूजींचे वेगळेपण लक्षात येत होते. शाळा भरण्यास तासभर वेळ असतानाच आम्ही शाळेत जाऊन शाळा उघडण्याची वाट पहायचो. त्यावेळी गुरूजी आणि त्यांच्या सौभाग्यवती मॅडम लांबून येताना दिसल्या की खूप आनंद व्हायचा. शाळेत सर्वात आधी येऊन वर्ग उघडण्याचे काम नेहमी तेच करायचे. पहिली ते चौथीच्या वर्गातील काही ठळक आठवणी आहेत आणि या सर्वच आठवणी गुरूजींच्या संदर्भातील आहेत. माझ्या दृष्टीने शाळा म्हणजेच म्हात्रे गुरूजी असा काहीसा प्रकार होता. ते नेहमी सर्व विद्यार्थ्यांचा चेष्टामस्करी करत असत. फावल्या वेळात ते आमच्यासोबत जमिनीवर येऊन बसायचे त्यामुळे त्यांची भिती कधी वाटलीच नाही. वर्गात भांडणं झाली तर मारामारी होईपर्यंत ते कधिही मध्यस्ती करायचे नाही, स्वत: बाजूला बसून लहान मुलांच्या भांडणाचा आनंद(!) घ्यायचे. भांडण जास्तच वाढले तर मात्र दोन्ही पार्टीला जबरदस्त दम देऊन मिटवून टाकायचे. पण कधीकधी भांडणाचा आवाज ऐकून त्यांच्या बाई वर्गात यायच्या आणि गुरूजींचा त्यातला सहभाग बघून ओरडायच्या. अशा वेळी मात्र गुरूजी साळसूदपणे आपल्या खुर्चीत जाऊन बसायचे आणि डोळे मिचकावत खोटा दम देऊन भांडण सोडवायचे. बालमानसशास्त्राचा फारसा बाऊ नसतानाच्या काळातही ते या शास्त्राचा प्रत्यक्ष वापर करत होते. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावामुळे त्यांच्या टेबलभोवती नेहमी विद्यार्थ्यांचा गराडा पडलेला असायचा. कोणालाही प्रश्न विचारण्याचे धाडसही त्यांनीच निर्माण केले. त्यामुळेच भीड चेपलेला आमचा चौथीचा अतरंगी वर्ग पाठ घेणाऱ्या डी.एड.च्या विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरायचा. व्यक्तिमत्व विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात राबवल्या जात होत्या.

      

काही वाक्प्रचार गुरूजींनी वारंवार वापरून प्रसिद्ध केलेत. एखाद्या विद्यार्थ्याने जर एका विषयाच्या वहीत दुसऱ्या विषयाचे लिहले तर गुरूजी म्हणायचे, "कासवान सुकटीची भेल" केलीस. एखाद्याने जर दिलेला अभ्यास पूर्ण करताना थोडक्यात चुका केल्या तर म्हणायचे, "सव्वा खंडीच्या वरणान मुतलास!". ही दोन वाक्ये गुरूजींनी त्यांच्या विशिष्ट शैलीत उच्चारली की आम्ही हसून लोळायचो. 'गणित' म्हणजे गुरुजींचा आत्माच. माझ्यात गणिताची आवड त्यांनीच निर्माण केली. पुन्हा पुन्हा सराव आणि स्व:अभ्यास या दोन पद्धतींनी गुरूजींनी गणित अध्यापनात स्वत:चे नाव सर्वमुखी केले. गावच्या शाळेत गुरूजींच्या येण्यापूर्वी स्कॉलरशिप परीक्षेबाबत उदासिनता होती. ही उदासिनता दूर करण्यासाठी त्यांनी आमच्याच वर्गाची निवड केली. झेरॉक्स, प्रिंटर उपलब्ध नसताना त्यांनी स्व:लिखित-स्व:निर्मित प्रश्नपत्रिंकाद्वारे गणिताचा सराव घेतला. संपूर्ण वर्षभर मेहनत घेतल्यानंतर अखेर परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आमच्या वर्गातील सर्व विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाले, मी गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्तीस पात्र झालो. हे शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं. निकाल लागला तेव्हा मी शेजारच्याच हायस्कूलमध्ये पाचवीत शिकत होतो. गुरूजींनी शाळेत येऊन मला उचलून घेतलं. या यशामुळे केंद्रशाळेत माझा सत्कार आयोजित करण्यात आला होता. तिथे जाऊन मी काय बोलावं यासाठी प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकांनी मला एक भाषण लिहून दिलं होतं. या भाषणात मला त्या मुख्याध्यापकांनीच मार्गदर्शन केल्याचा उल्लेख होता. हा कागद मी माझ्या वडीलांना दाखवला. त्यांनी तुला वाटतं ते जाऊन बोल असा सल्ला दिला. मी नवी कोरी स्लीपर घालून केंद्रातील गटसंमेलनाच्या दिवशी गेलो. तिथे आमच्याच पाचवी मराठीच्या पुस्तकाचे विश्लेषण चालू होते. बरेचसे शिक्षक नाश्त्याला मिळालेल्या वड्याचे रसग्रहण करण्यात दंग होते. चर्चा संपल्यानंतर मला एक ग्लास आणि गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी, तसेच केंद्रप्रमुखांनी माझ्याबद्दल गौरवोद्गार काढले. मला दोन शब्द बोलण्यास सांगीतले. मी लिहून दिल्याप्रमाणे औपचारीक सुरूवात केली आणि थांबून गुरूजींकडे बोट दाखवून "म्हात्रे गुरूजींमुलेच मला कॉलरशीप मिलाली!" असे उत्साहाने सांगीतले. गुरूजींचा चेहरा अभिमानाने फुलला. भाषण संपल्यावर त्यांनी मला मिठी मारली. भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडलो. नाश्त्याचे वडे ग्लासात टाकून घरी आलो. मात्र नवी कोरी पॅरागॉन कंपनीची स्लीपर आणि माझं मन केंद्रशाळेतच राहीलं होतं. 

    

शिष्यवृत्ती मिळवणारा मी त्यांचा पहिला विद्यार्थी. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेचा परीस अशी ओळख गुरूजींनी मिळवली. 

    

गणिताबरोबरच जीवन जगण्याची कलाही त्यांनीच शिकवली. त्यांच्या शिकवणुकीमुळे अजूनही वहीचे पान फाडण्याची माझी हिंमत होत नाही. वस्तूंचा काटकसरीने वापरही त्यांनीच शिकवला. मराठी शाळेची सहल प्रतिवर्षी गावाबाहेरील वनातील विहीरीजवळ जायची. चौथीला असताना काही मित्रांनी मिळून या वनभोजनासाठी खाऊला पैसे जमा करण्याचे ठरले. गुळ व शेंगदाणे असा मेनू ठरला. या जादाच्या खाऊला पैसे कुठून आणायचे, म्हणून माझ्या एका मित्राने वह्या रद्दीत विकण्याची आयडीया काढली. मी चालू वर्षाच्या वह्या पन्नास पैसे प्रतिवही दराने विकून सहल साजरी केली. गुरूजींनी विचारल्यावर सरळ रद्दीत विकल्याचे सांगीतले. त्यावेळी पहिल्यांदाच मी गुरूजींना रागावलेले पाहिले. छडीचे वळ पायावर उठले. घरी गेल्यावर मी मार खाल्ल्याचा वृत्तांत आधीच कळला होता. वडीलांनी गुरूजींच्या प्रकाराचे रिपीट टेलीकास्ट केले. लिहून भरलेल्या वह्या विकल्याने काय चुकले हे मला शेवटपर्यंत कळले नाही. पण गुरूजींचा रूद्रावतार पाहून पुन्हा त्या मित्राच्या नादाला न लागण्याचा निश्चय केला. 

   

पुढे हायस्कूलला गेल्यापासून मात्र गुरूजींशी असलेला संपर्क तुटला. त्यांची बदलीही दुसऱ्या ठिकाणी झाली. अधे-मध्ये वडीलांना भेटून ते माझी विचारपूस करायचे. त्यानंतर एका लग्नात वरचेवर भेटले. थोडे अधिक थकल्यासारखे वाटत होते. डोक्यावरच्या विरळ केसांनी साथ सोडली होती. पण चेहऱ्यावरचे विलक्षण हास्य तसेच होते. मधल्या काळात त्यांची बायपास सर्जरी झाल्याच कळलं. प्रत्यक्ष भेट होत नव्हती.

   

गुरूजी त्यानंतर भेटले ते थेट गावातल्या प्राथमिक शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात. या निमित्ताने शाळेत काम केलेल्या सर्व शिक्षकांचा सत्कार आयोजित केला होता. या सोहळ्यास गुरूजी मॅडमसह हजर होते. मी सत्कारासाठी आवश्यक शाली, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ यांची व्यवस्था करण्यात गुंतलो असताना मंडपातील एका खुर्चीत गुरूजींना बसलेले पाहिले. तडक जाऊन नमस्कार केला. माझी ओळख सांगीतली. गुरूजींनी ओळखले. गुरूजींचा सत्कार झाला. गुरूजी भाषणासाठी उभे राहीले. पुन्हा तोच तडाखेबंद आवाज, पुन्हा तोच उत्साह. शाळेतले काही प्रसंग सांगीतले, माझा उल्लेख असलेले .(काही प्रसंग मलाही आठवत नसलेले). गुरूजी बोलत होते, मी आठवत होतो. पुन्हा जुने दिवस उभे राहीले, नव्याने!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational