दैवी अनुभूती
दैवी अनुभूती


संध्याकाळच्या चार त्रेपन्नच्या वसई-पनवेल पॅसेंजरने प्रवास करत होतो. बसायला सीट न मिळाल्याने एका कोपऱ्यात आधाराला टेकून उभा राहिलो. संध्याकाळचे पाच वाजले तरी वातावरण तापलेलेच होते. मोबाईल आणि मी दोघांचीही बॅटरी उतरू लागली होती. डिस्चार्ज होण्याच्या भितीने मोबाईल वापरता येत नसल्याने ऑक्सिजनचा साठा संपत आल्याचा फील येत होता. हातातील घड्याळाकडे वैतागाने पहात घरी वेळेत पोचण्याचे गणित आजमावत होतो.
इतक्यात ‘चढता सुरज...’ या सुरेख कव्वालीचे सुंदर संगीत कानी पडले. एका दुसऱ्या डब्ब्यातून व्हायोलीनचा मधुर आवाज येऊ लागला. मी उत्सुकतेने आवाजाच्या दिशेने पाहिले. एक वीस ते बावीस वर्षाचा मुलगा हातात व्हायोलीन पकडून या अप्रतिम कव्वालीचे अत्यंत कठीण पण सुरेख स्वर लीलया काढत होता. मी त्याला या ट्रेनमध्ये पहिल्यांदाच पहात होतो. सुमारे सात मिनीटांची ही कव्वाली त्याने जशीच्या-तशी वाजवली. या दरम्यान मला सीट न मिळाल्याचे दु:ख मी विसरून गेलो. एक गाणं संपल्यानंतर त्याने प्रवाशांकडे पैशांसाठी हात पसरला, एक-दोन रूपये, पाच रूपये असे पैसे लोक देऊ लागले. माझ्या हातून पैसे फार कमी वेळा सुटतात, तरीही मी स्व:खुशीने दहा रूपयांचे नाणे दिले. त्याने सलाम ठोकला आणि ट्रेनमध्ये गाणाऱ्यांचे फेव्हरेट गाणे ‘परदेसी परदेसी जाना नही...’ वाजवत पुढे निघाला. छान वाजवले, मला या गाण्याचे मात्र अप्रूप वाटले नाही. आता मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा भरलेल्या सीट्सकडे आशेने पाहिले. एकाही व्यक्तीची उतरण्यासाठीची हालचाल दिसत नव्हती. मनातल्या मनात त्यांना चार-दोन संस्कारीत शिव्या घातल्या आणि माझ्या बॅटरी संपत आलेल्या मोबाईलकडे पुन्हा एकवार निराशेने पाहिले. तेरा टक्के! म्हणजे घरी पोहोचेपर्यंत नक्कीच फोनची विकेट पडणार ही चिंता आणि त्यात पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे अलिबागला परीक्षेला जायचे होते त्याचे टेन्शन!
आता माझे डोके गरगरू लागले. तेवढ्यात पुन्हा एकदा तोच व्हायोलीनचा मधुर स्वर कानी पडला. तो मुलगा पुढच्या डब्यातून पुन्हा आमच्याच डब्यात परत आला. पैसे गोळा करत त्याने नवीन धून छेडली. “और इस दिलमें क्या रखा है...” या गाण्याची सुरूवात केली आणि सगळ्यांचे डोळे-कान टवकारले गेले. त्याच्या वाद्यातून दैवी संगीत बाहेर पडत होते. या सुरांनी माझ्या अंगावर काटे उभे राहिले (हो, हे लिहत असतानासुद्धा!) हे कोणाच्या आठवणीबद्दल नव्हते की, त्या मुलाविषयीची दया दाखवणारे नव्हते किंवा रिअॅलिटी शोजमधल्या जज लोकांसारखे फिल्मी नव्हते. मी त्याच्या स्वरांनी इतका भारावून गेलो की आपोपाप माझे डोळे पाण्यांनी भरले. मनापासून जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा आनंद घेतो तेव्हा ही भारावलेपणाची स्थिती निर्माण होते.
मी एका ठिकाणी वाचले होते की
“भुखा पेट से गाता है,
कलाकार गले से गाता है
और सच्चा कलाकार दिल से गाता है..”
पण हा भुखा कलाकार दिल से गात होता हे नक्की!
या क्षणी तो पैसे गोळा करतोय, तो गरीब आहे ही गोष्ट बाजूला राहिली पण त्याने निर्माण केलेले ‘दैवी संगीत’ एक निखळ आनंद देत होते. आपले सर्व दु:ख, विचार विसरून आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत तल्लीन होतो त्यालाच दैवी अनुभूती म्हणत असावेत. या पंधरा वीस मिनिटांच्या कालावधीत मी ही अविस्मरणीय दैवी अनुभूती घेतली.