चिक्कू मैदान
चिक्कू मैदान
गावापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर मामाचे गाव. लहानपणी झुकझुक गाडी केवळ चित्रातच पाहिलेली, त्यामुळे मामाकडे जाण्यासाठी एकतर राज्य महामंडळाची ‘लालपरी’ नाहीतर आपली ‘चाल’ बरी! शनिवारी शाळा सुटली की लगेच कपडे बदलून आमचा मोर्चा ‘कळंबुसरे’ या मामाच्या गावाकडे वळायचा. माझ्यासारखीच इतर भाचेमंडळीही या मोर्चात सामिल व्हायची.
जुन्या पद्धतीची नळीची कौले असलेल्या घरात हा गोतावळा जमा व्हायचा. रस्त्यापासून थोड्या उंचावर मोठ्या टेकाडावरील हे घर. या घरात इतक्या मोठ्या प्रमाणावरील खटपटी लोकसंख्या नियंत्रणात राहणे तसे कठीण काम. परंतु प्रत्येकाच्या वयोमानानुसार योग्य तो खेळ उपलब्ध व्हायचा. आपला देश तसा क्रिकेटवेडा, त्यामुळे देशहितासाठी मीसुद्धा याच खेळाची निवड करायचो. मामाच्या घरचे अंगण, ज्याला आम्ही खळं म्हणतो ते तसे मोठे असले तरी एकूण क्रिकेटच्या मैदानाच्या तुलनेने लहानच. त्यामुळे या कठीण परिस्थितीत मी आणि मामाने राष्ट्रीय खेळभावनेशी तडजोड करुन ‘अंडरआर्म’ या क्रिकेट प्रकाराची निवड केली. इतरांचे क्रिडांगण असते, आमच्या अंगणात क्रिडा असायची.
सुट्टीच्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणारा हा खेळ, मधले काही ब्रेक वगळता संध्याकाळपर्यंत चालायचा. यातले काही ब्रेक्स हे स्वेच्छेने तर काही ‘आपतकालीन ब्रेक’ही असायचे. भूक लागली तर जेवणासाठी स्वेच्छा ब्रेक घ्यायचो. शेजारचे एक आजोबा आम्ही खेळायला लागलो की मागच्या बाजूला आरामखुर्ची टाकून बसायचे. या आरामखुर्चीनेच आमचे जगणे हराम केले होते. फलंदाजाला चकवून एखादा चेंडू त्यांच्या आरामखुर्चीच्या दिशेने गेलाच तर पळापळ होऊन ‘आपतकालीन ब्रेक’ घेतला जायचा. या सर्व उपद्व्यापाला घरातून समर्थन मिळणे कठीण होते, नाही म्हणायला आमच्या आज्जीचा म्हणजे ‘आयं’चा आम्हाला बाहेरून पाठींबा असायचा. लहानाचे मोठे होईपर्यंत अनेक वर्षे चाललेल्या या ‘खळा-क्रिकेट’ला एकाने मात्र कायम पाठींबा दिला. आमच्या खेळावर मायेची सावली धरून तो नेहमीच उभा राहीला. त्याच्यामुळेच दिवसभरातील आमचा खेळ सुसह्य झाला. आमचा हा खंदा समर्थक म्हणजे अंगणातील ‘चिकूचे झाड’.हे माझे सर्वाधिक आवडते झाड. भारतातील बहुतेक भाषांमध्ये या फळास चिक्कू असेच संबोधले जाते. विशेष बाब म्हणजे चिकूच्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जातींपैकी एका जातीचे नाव ‘क्रिकेट बॉल’ आहे. तर चिकू या फळाचे मूळ स्थानही एकेकाळचा क्रिकेटमधील विश्वविजेता असलेल्या वेस्ट इंडिज बेटावरचे.
घराच्या लांबलचक ओसरीसमोरील अंगणात एका टोकाला हे चिकूचे झाड उभे. अंगणातील एक रूंद खोडाचा शेवगा वगळता इतर लहान मोठी झाडे ‘वय’ संबोधल्या जाणाऱ्या काठ्यांच्या कुंपणात मिसळलेली. घराबाहेरची मोरी (बाथरूम!) आणि खळा या दोघांच्या मध्ये चिकूचे झाड . मोरीचे वरचे छप्पर म्हणजे चिकूची गच्च पानांनी बहरलेली फांदी. बऱ्यापैकी जाड बुंधा असलेल्या या झाडाला निम्म्या उंचीनंतर दोन मार्ग फुटले होते. या दोन स्वतंत्र वाढलेल्या खोडांना स्वत:ची वेगळी ओळख. एका खोडावरील फांद्या घराच्या ओढीने छपरापासून निम्म्या अंगणावर विस्तारलेल्या. तर दुसऱ्या खोडाला पकोपकाराची खोड. पहिल्याने रिकाम्या सोडलेल्या अंगणासह या खोडावरील फांद्यांनी शेजाऱ्यांच्या अंगणातही सावली धरलेली. या गर्द सावलीखाली आमचा खेळ रंगायचा. चिकूच्या झाडाचा बुंधा म्हणजे आमचे स्टंप, तर बाथरूमची कुंपणवजा नैसर्गिक भिंत म्हणजे आमचा गरीबांचा विकेटकिपर. ऑफ साईडला लांबलचक ओसरीचे बैठे घर, ऑन साईडला काठ्या, फांद्यांची घनपणे विणलेली ‘वय’. या जोडीला समोरच्या दिशेला लहान सीमारेषा ठरवू शकू इतका
लांब अंगणाचा विस्तार. अंडरआर्म क्रिकेट खेळण्यासाठी याहून चांगली जागा शोधूनही सापडायची नाही. या झाडाखाली खेळताना कधीकधी एखादा पिकलेला चिकू मैदानात पडायचा. अशा वेळी फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक सर्वजण गोल चेंडूऐवजी, फळालाच गोल (Goal) मानून धावायचे. आकाराने थोडा लहान पण तितकाच गोड चिकू कोणाच्यातरी तोंडात अदृश्य व्हायचा. उरलेले खेळाडू “मा फलेषु कदाचन” म्हणत पुन्हा खेळाकडे वळायचे. ऑनसाईडच्या कुंपणाला छेदून चेंडू पलिकडे गेलाच तर, मात्र पंचाईत व्हायची. कारण त्या दिशेच्या अंगणांची काही राष्ट्रेच मित्रराष्ट्रे होती. त्यातही एका मित्रराष्ट्राच्या अंगणातील चेंडू आणण्यासाठी कुंपणामुळे खूप मोठा वळसा घालायला लागायचा. शेजारचे हे अंगण म्हणजे एका घराचा मागच्या बाजूचा वापरात नसलेला भाग होता. हा भाग आमच्या परोपकारी चिकूने झाकलेला. त्यामुळे बऱ्याचदा चेंडू आणण्यासाठी गेल्यानंतर तिथे एखाद दुसरा चिकू मिळायचा. वळसाधारी खेळाडूला त्याचे मेहनतीचे फळ मिळायचे.
नैसर्गिकरित्या पिकलेल्या चिकूची चव अवीट असली तरीही प्रत्येक वेळेस ‘पडत्या फळाची’ वाट पाहणे शक्य नव्हते. बऱ्याचदा (किंवा नेहमीच!) आमच्या आधी पोपट, वटवाघुळे यांसारख्या पक्ष्यांना पिकत्या फळाची चाहूल लागायची. मग आमच्या हाती सरकारी योजनांसारखी कुरतडलेली फळे मिळायची. यामुळे फळांची वाढ पाहून, त्यांना घरात पिकवण्यासाठी काढली जायचे. हे चिकू संपूर्ण घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जायचे. इथून पुढे खरा संयमाचा काळ सुरू व्हायचा. एका रविवारी चिकू पिकवण्यासाठी ठेवले असल्याचे कळले की पुढच्या सुट्टीला गेल्याबरोबर पिकलेल्या चिकूंचा शोध सुरू व्हायचा. त्यात जेमतेम पिकलेल्या फळांचाही आस्वाद घेतला जायचा. मामाच्या घरच्या भिंतीला खूप सारे कोनाडे, देवड्या होत्या. यापैकीच एखादी सुरक्षित जागा शोधून वैयक्तिक स्तरावरील चिकू पिकवण्याचा प्रयोग व्हायचा. अर्थात या प्रयोगाला क्वचितच यश मिळायचे. चिकूंचा वाटा खाण्यासह घरी नेण्यासाठीही फळे मिळायची. हे चिकू घेऊन घरी जाता जाता त्यातूनही थोडेफार चाखले जायचे. नैसर्गिक साखरेचे स्रोत असलेल्या चिकूच्या फळांमध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद व आर्द्रता भरपूर प्रमाणात असते. तसेच ‘अ’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणावर असते. खेळण्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा आल्यानंतर चिकू खायला दिल्याने नवा उत्साह व शक्ती संचारते. यामुळेच खेळताना मिळालेला चिकू अधिकच आनंद द्यायचा.
सावली देणे, फळे देणे यांबरोबरच हे झाड आणखी एका मोहिमेसाठी वापरले गेले आहे. घरातले कोणी रागावल्यावर चिकूच्या झाडावर जाऊन लपण्याचे प्रसंगही घडले आहेत. अर्थात आमच्यासह या झाडावर मुंग्यांचा आधीपासून मुक्काम असल्याने त्यांच्यापेक्षा घरच्यांची टोचणारी बोलणी ऐकण्याचा पर्याय निवडला जायचा.
काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा आमच्या खळा-मैदानाला भेट दिली. बाजूची वय जाऊन तिथे शेजाऱ्यांची मजबूत विटांची भिंत उभी राहीलीय. मामाच्या या जुन्या घरात कोणीही राहत नसल्याने, थोडी दुरवस्था झालीय. मागच्या बाजूचे बाथरूम नाहीसे झालेय. अंगणात बांधकामाच्या वस्तू येऊन पडल्यात. मैदान थोडेसे आखडल्यासारखे वाटले. पण माझे आवडते चिकूचे झाड अजूनही तिथेच आहे. शेजारच्या बांधकामात परोपकारी चिकूला आपला काही भाग गमवाला लागला, पण त्याची भरपाई त्याने घरावर पसरून केलीय. आता तेथे नेहमीसारखे जाणे येणे होत नाही, पण आमच्या कुटूंबातील सदस्यासारखेच असणारे ते झाड आमची उणीव भरून काढते. त्याने आणखी पसरावे, सावली द्यावी, आपली फळे मुक्तपणे उधळावीत, ही सदिच्छा!