नाग आणि पंचमी
नाग आणि पंचमी
त्याने डोळे उघडले तेव्हा कसली तरी थरथर चालू होती. त्याच्या लहानशा शरीराला ती जाणीव स्पष्टपणे झाली. डोळ्यांवरच्या चिकट स्रावामुळे फारसे काही दिसत नव्हते. त्याने जिभेनेच डोळ्यांवरचा चिकट द्रव काढून टाकला. तो ज्या अंड्यातून बाहेर पडला, तसलीच आणखी काही लहान लहान अंडी आजूबाजूला दिसत होती. त्या अंड्यातून वळवळत बाहेर पडलेले त्याचे भाईबंद होते. त्यांच्याकडे पाहून त्याने आपली जीभ बाहेर काढली. यावेळेस समोर काहीतरी धोकादायक असल्याची चाहूल त्याला लागली. समोर एक भलामोठा प्राणी वेगाने हालचाली करत होता. त्या प्राण्याच्या हातातील वस्तूच्या तडाख्याने वळवळणाऱ्या भाईबंदांचा चेंदामेंदा होत होता. काही कळायच्या आतच अंत:प्रेरणेने तो बाजूच्या बिळात घुसला, तिथेच अगदी तळाला दडून राहीला.
......................................................................
आज पायाच्या कामासाठी दोन मजूर आले होते. त्यांनी फकीने आखून दिलेल्या जागेत खोदायला सुरूवात केली. त्याच्या घराच्या कामाला आज खऱ्या अर्थाने सुरूवात होणार होती. पावसाळ्यापूर्वी घर बांधून तयार व्हायला हवे होते. थोडे खोदकाम झाल्यानंतर दोन्ही मजुरांनी त्याला आवाज दिला. तो धावतच तिथे आला. तिथल्या एका बिळाला पहार लागून त्यात जेमतेम फुटलेली अंडी दिसली. अंड्यांच्या शेजारीच सात-आठ लहान साप वळवळताना दिसले. निरखून पाहीले असता, ती नागाची पिल्ले असल्याचे लक्षात आले. फारसा विचार करण्यास वेळ नव्हता. त्यांनी पहार, काठी घेऊन सापांना ठेचण्यास सुरूवात केली. पिल्ले इकडे तिकडे पळत होती. त्यातला एक साप नव्या बिळात शिरला. संपूर्ण बिळ खणून काढले तरी सापडला नाही. शेवटी मजुरांनी त्याचा नाद सोडला आणि पुन्हा आपल्या कामाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
........................................................................
जमिनीवरचे आघात थांबत नव्हते. अंधाऱ्या बिळात स्वत:ला मुडपून त्याने स्वत:चा बचाव केला. बाहेरच्या हालचाली पूर्ण थांबल्यानंतरच तो बाहेर आला. बांधाच्या कडेकडेने सरपटत निघाला. जन्माला आल्यापासूनच स्वत:चे अन्न शोधणे आणि बचाव करणे या दोन्ही त्याला स्वत:लाच कराव्या लागणार होत्या. पाय नसूनही त्या लहान सापाला स्वत:च्या पायावर उभे राहावे लागणार होते. जिभेच्या साह्याने तापमानाचा अंदाज घेत लहानशा तलावाचा शोध त्याला लागला. अंड्यातून बाहेर पडला तेव्हा समोर असलेला भयानक प्राणी आजूबाजूला नसल्याची खात्री करून तो ओलसर जागेत विसावला.
सकाळी लहान बेडकीचा भरपेट नाश्ता करून तो एका आयत्या बिळावर जाऊन बसला. बिळाच्या बाहेर डोकावताना त्याला आधीच्या दिवशी दिसलेले ते भयानक प्राणी दिसले. पण आज त्या प्राण्यांच्या अंगावरच्या त्वचेत बदल दिसत होता. रंग ओळखत नसले तरी झालेला बदल त्याने ओळखला. बहुतेक त्या प्राण्यांनी कात टाकल
ी असावी, लहान नागाच्या मनात आले. काहीही असले तरी हा प्राणी म्हणजे मृत्यू हे नागाच्या मनात ठसले.
........................................................................
मजुरांनी कालच्याप्रमाणे खोदकाम सुरू केले. आधीचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी सावध पवित्रा घेतला होता. बिळ असलेल्या भागात आधी लांबूनच पहार लावून पाहात होते. मातीची ढेकळे काळजीपूर्वक उचलली जात होती. संध्याकाळी काम उरकून हात-पाय धुण्यासाठी ते तलावाकडे वळले. तळ्याच्या काठावरील दगडावर बसून त्या दोघांनी तळ्यात पाय सोडले. त्यांच्या हालचालींना घाबरून काठावरील बेडकाने पाण्यात उडी मारली. बेडकाच्या आवाजाने मजुरही दचकले. या परिसरात सापांची संख्या जास्त असल्याचे त्यांना ठाऊक होते. पाण्यातून बाहेर निघताना अंधुकशा प्रकाशात काहीतरी सळसळताना दिसले. काहीही असले तरी साप म्हणजे मृत्यू हे दोघांनीही जाणले होते.
..........................................................................
बाळ नाग आता चांगलाच मोठा झाला होता. सरडे, उंदिर, बेडूक यांबरोबरच तो आता आहारात बदल म्हणून पक्ष्यांची अंडीदेखील खात होता. आता दररोज कात बदलणाऱ्या मनुष्य नावाच्या भयानक प्राण्याला टाळण्यासाठी तो शक्यतो रात्रीच बाहेर पडायचा. दिवसा तळ्याकाठच्या बिळात सुस्तपणे पडून आपली उर्जा वाचवायचा. तिथले थंड वातावरण त्याला आवडायचे. पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने बिळ पूर्ण भरून गेले होते. त्यामुळे त्याचा निवारा बदलता होता. आज नव्या जागेच्या शोधात निघाला असताना अचानक समोर तेच कात बदलणारे भयानक प्राणी समोर दिसले. त्यांच्या हातात काठी व काही भांडी होती. हा प्राणी म्हणजे मृत्यू हे नागाला ठाऊक होते. बचावासाठी नागाने पूर्ण ताकदीने फणा उगारला. यावेळेस त्या मनुष्य प्राण्यांनी काठी उगारली नाही किंवा नागाला मारण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट त्यांनी हातातील काहीतरी वस्तू समोर ठेवली. समोरचा प्राणी कसलीही धोकादायक हालचाल करत नाही, ही संधी साधून नाग चपळाईने दगडांच्या फटींआड नाहीसा झाला.
........................................................................
बऱ्याच दिवसांनी मजुरांच्या घरात गोडधोड बनले होते. एकाच्या पत्नीने लाह्या आणि दुधाचा नैवद्य हाती देऊन तळ्याकडे पाठवले होते. ते दोघेजण तळ्याकडे निघाले. तिथे फक्त नैवेद्य ठेऊन त्यांना परत यायचे होते. तळ्याच्या काठी पोहोचताच त्यांना भला मोठा नाग दिसला. नागाला पाहून त्यांनी हातातला नैवद्य खाली ठेवला, हात जोडले. हात जोडताच नागाने फणा उगारला. नागपंचमीच्या दिवशी नागाने दिलेला आशीर्वाद पाहून दोघेही मनोमन सुखावले.
नाग दिसेनासा झाल्यावर दोघेही आनंदाने घरी आले.
........................................................................