पाच आत्म(विश्वास) कथा
पाच आत्म(विश्वास) कथा


एका गावात टेनिस क्रिकेटची ग्रामीण स्तरावरील स्पर्धा चालू होती. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सरासरीपेक्षा अधिक लांब सीमारेखा, कमी दर्जाचे चेंडू यांमुळे गोलंदाजांचे वर्चस्व राहीले. संपूर्ण दिवसभरात फलंदाजांना एकही षट्कार ठोकता आला नाही. पहिल्या दिवसाच्या गटातून एक संघ अंतिम फेरीस पात्र झाला होता. दुसऱ्या दिवशी नवा गट. आधीच्या संघातील एकाने पहिल्या दिवसाच्या निराशाजनक खेळाची चर्चा एका फलंदाजाला ऐकवली. त्याचा संघ दुसऱ्या गटात होता.
तो फलंदाज म्हणाला, "मी तिथे षट्कार मारेन!"
स्पर्धा संपली. संपूर्ण स्पर्धा कमी धावसंख्येसाठी ओळखली गेली. दोन दिवसांत फक्त एकच षट्कार ठोकला गेला.
तो त्याच फलंदाजाने मारला होता.
....................................................................................................
तालुक्याच्या बाजारपेठेतल्या एका अरूंद गल्लीतील दुकानांच्या बाहेर पाच सहा शिलाई यंत्रे चालू होती. डोक्यावरच्या पत्र्यावर 'टेलर' असे लिहिलेले असले तरी नवे कपडे शिवून देण्यापेक्षा रफू करणे, अल्टर करणे, छोट्या-मोठ्या शिलाई करणे, कपडे-बॅगा दुरूस्ती करणे अशी कामे करणारे ही सर्व माणसे. हातातल्या पिशवीत कपडे घेऊन एक सडसडीत बांध्याचा तरूण तिथे आला. गोदामात काम करणाऱ्यांकडून त्याने निर्यात दर्जाचे नवे कपडे स्वस्तात मिळवले होते. पिशवीतून एक्सएक्सएक्सएल् असा टॅग असलेला शर्ट बाहेर काढून तिथल्या एका शिंप्याला त्याने स्वत:च्या मापाचा करून देण्यास सांगीतले. शिंप्याने नकार दिला. इतक्या मोठ्या आकाराच्या शर्टला तरूणाच्या आकाराचा करणे आणि त्यातही शोभेल असा करणे अशक्यच होते. शेजारच्या दोघांनीही लांबूनच नकार दिला आणि कोणाकडून होणार नाही असा सल्लाही दिला. विरूद्ध दिशेला एक थोडा वयस्कर 'चाचा' मान खाली घालून काम करत होता. "मै कर देगा!", त्याने मान वर न करताच सांगीतले. तरूणाने साशंक मनाने आपली पिशवी त्याच्याकडे दिली. चाचाने माप घेतले. कपड्यावर खडूने अगम्य खुणा केल्या. तासाभराने तरूण परत आला. बाजूच्या कपड्यांच्या गठ्ठयात त्याचे तीन शर्ट पडले होते. त्याने शर्ट घालून बाजूच्या दुकानाच्या काचेत पाहिले. शर्ट व्यवस्थित बसला होता, अगदी नव्यासारखा.
....................................................................................................
पायात काटा रुतून कालांतराने तिथे भोवरी होऊन मोठी गाठ झालेली. फार दुखत नसले तरी त्रास होताच. दोन चांगल्या डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी ऑपरेशनचा पर्याय सुचवला. तीन दिवस दवाखान्यात रहावे लागेल, जखम बरी होईपर्यंत चालता येणार नसल्याचेेही म्हणाले. कॉलेजची परीक्षा जवळ आली असल्याने, ऑपरेशनचा निर्णय होत नव्हता. कोणाच्यातरी सांगण्यातून एका लहान मातीच्या घरात दवाखाना चालवणाऱ्या ' फॅमिली फिजीशयन आणि सर्जन' असा बोर्ड लावलेल्या डॉक्टरांकडे तो रुग्ण गेला. डॉक्टरांनी एकदा गाठ पाहिली. "मी करतो!" म्हणाले. त्या जागेला भूल दिली. हळूवारपणे शस्त्रक्रीया करून गाठ काढली. ड्रेसिंग केले. औषधे लिहून दिली. शस्त्रक्रीयेनंतर तो तरूण चालत घरी गेला.
...................................................................................................
जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा चालू होत्या. यावर्षी पहिल्यांदाच 'ट्रिपल जंप' नावाचा प्रकार समाविष्ट झालेला. आपल्या प्रशिक्षकांसोबत स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेला एक विद्यार्थी कुतूहलाने स्पर्धेच्या वेळापत्रकातील 'ट्रिपल जंप' नावाकडे पहात होता. स्पर्धेची तयारी करणाऱ्या आयोजक मंडळींना त्याने हा काय प्रकार आहे म्हणून विचारले. त्यांनी थोडक्यात नियम सांगीतले. एकाने प्रात्यक्षिक दाखवले. "मी ट्रिपल जंप मध्ये भाग घेतो!", विद्यार्थ्याने आपल्या प्रशिक्षकांना सांगीतले. प्रशिक्षकांनी आश्चर्याने पाहीले. विद्यार्थ्याचे त्या क्रिडा प्रकारात नाव नोंदवले. स्पर्धा संपली. 'ट्रिपल जंप' मध्ये त्या विद्यार्थ्यांच्या वयोगटात अकरा स्पर्धक होते. त्यात त्याने पहिला क्रमांक मिळविला. पुढच्या स्तरावर निवडही झाली.
...........................................................................
ऑनलाईन निकालाची पद्धत नसतानाचा काळ. दहावीचा निकाल आणि गुणपत्रके फक्त छापील स्वरूपात मिळायची. शाळेतल्या शिपायाने निकालाचे सर्व दस्ताऐवज ऑफीसच्या टेबलवर आणून ठेवले होते. विषयशिक्षक आपापल्या विषयाचा निकाल पहात होते. वर्गातील सर्वाधिक हुशार गणला जाणारा आणि अगदी नापास होण्याची शक्यता असलेला अशांचे निकाल आधी पाहिले जात होते. अशावेळी मध्यम विद्यार्थ्यांकडे सहसा दुर्लक्ष होते. ऑफीसच्या खिडकीला डोके आणि डोळे लावून चिंतातूर विद्यार्थ्यांचा जत्था जमलेला. आतमध्ये गणिताच्या शिक्षकांना पाहून एकाने खिडकीतून डोकावत गणितात सर्वात जास्त किती आहेत म्हणून विचारले. वर्गातील सर्वात हुशार मानल्या जाणाऱ्या विद्यार्थ्याला दिडशे पैकी एकशे त्रेचाळीस मिळाले होते. गणिताच्या शिक्षकांनी 'एकशे त्रेचाळीस' असा आवाज दिला. "सर, माझा निकाल नाही बघितलात?", पलिकडून प्रत्युतर आले. शिक्षकांनी वैतागून त्याच्याकडे पाहीले. तो खिडकीला तसाच चिकटून होता. बाहेर निकालाची यादी लावण्यात आली. त्यावर्षी बक्षिस वितरण कार्यक्रमात गणिताच्या शिक्षकांनी शाळेत गणितात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला रोख रकमेचे पारितोषिक दिले. शाळेत दिडशेपैकी एकशे अठ्ठेचाळीस गुण मिळवणारा विद्यार्थी गणितात पहिला होता; तोच खिडकीतून डोकावणारा!
.......................................................................................................
या सर्व खऱ्या कथा आहेत; लेखकाने स्वत: पाहीलेल्या, अनुभवलेल्या. या कथांमधील व्यक्ती मोठ्या पदांवरील, थोर वगैरे नाहीत किंवा आपल्या स्वत:च्या आयुष्यात फार यशस्वी आहेत असेही नाही. हे तुमच्या-आमच्या सारखेच सर्वसामान्य लोक आहेत. पण या सर्व प्रसंगांमध्ये त्यांनी स्वत:च्या क्षमता ओळखल्या होत्या. यातूनच एका असामान्य आत्मविश्वासाची झलक त्यांच्यात दिसून आली. आपण कोणत्याही क्षेत्रात असू, स्वत:च्या क्षमता ओळखता यायला हव्यात!