shw2 2

Tragedy

3  

shw2 2

Tragedy

चटका

चटका

5 mins
345


सूर्य तळपून चांगलाच माथ्यावर आला होता. अंगाची लाहीलाही होत होती. माठातील पाणी संपलं म्हणून किश्या विहिरीतून पाणी आणायला गेला. गावचे म्हातारे चौकात बसून एकमेकांशी गप्पा मारत होते. मध्येच कोणी पेपर चाळून कॉरोना संबंधी माहिती देत होत. किश्या जाताजाता त्यांची कुजबुज ऐकत होता. "च्यायला अजून २१ दिवस बंद असा आदेश आहे, मग आपण खायचं काय? श्रीमंत लोक करतील सपोर्ट, पण आपल्या गरिबांचे मरण होतंय त्याच काय?", आणखी २१ दिवस बंद, किशाच्या मनात हे शब्द तलवारीसारखे भेदून गेले. रणरणत्या उन्हात नकळत डोळ्यातून आसवं गळायला लागली. पण भावाचा विचार मनात येताच त्याने बाकी सर्व विचार झटकून टाकले. विहिरीतून घागर भरून खोपटाच्या दिशेला निघाला.


होय, गावाच्या वेशीजवळ. दोघे भाऊ छोट्या खोपट्यात राहायचे. किष्याच्या छोटा भाऊ रम्या झाला आणि आई गेली. वर्ष २ वर्ष होत नाहीत की बाप सुद्धा गेला. राहतं घर नातेवाईकांनी बळकावले. झोपडी बांधून राहण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. किश्या आणि रम्या मध्ये जेमतेम 6-7 वर्षाचं अंतर होतं. रम्या अजून बराच लहान होता. अजूनही बोबडे बोलायचा. दिसायला सावळा असला तरी त्याचे मोठे तपकिरी पाणीदार डोळे किश्याला मोहून टाकायचे. एक तो होता म्हणूनच तो आयुष्य कसंबसं ढकलत होता. एक आठवड्यापासून सर्व बंद असल्याने किश्याचे काम पण बंद झालं होतं. त्यात रम्याला आठवडाभरपासून ताप होता. आजूबाजूच्या लोकांच्या वार्ता ऐकून त्याला कळलं होतं की २२ मार्च २०२० रविवारी संध्याकाळी ५ वाजता घराच्या बाहेर येऊन टाळ्या वाजवायच्या होत्या. ठरल्याप्रमाणे सर्व संध्याकाळी घराच्या बाहेर निघून टाळ्या आणि थाळ्या बडवू लागले. प्रधानमंत्री आता आपल्या संपूर्ण देशाचा न्याय करतील अशी भाबडी आशा किश्यालासुद्धा लागली होती. २ दिवसा पासून अन्नाचा एक कण पोटात गेला नव्हता. तरी आजूबाजूच्या लोकांचे समाधानी चेहरे बघून नकळत तो सुद्धा टाळ्या वाजवू लागला.


तापाने फणफणलेला रम्या कधी बाजूला येऊन टाळ्या वाजवू लागला त्याचं त्यालाच कळलं नाही. आता काही न काही चांगलं होईल अशी आशा त्याच्या मनाला लागून राहिली. पण कसलं काय? उलट कायदे आणखी कडक होऊ लागले. विनाकारण कोणी घराच्या बाहेर दिसला की पोलीस बडवू लागले. किश्याचे पण घराच्या बाहेर पडणे कठीण झाले. त्याच्या सेठनेसुद्धा त्याला सुट्टी देऊन तो त्याच्या गावी म्हणजे गुजरातला मिळेल ती ट्रेन पकडून कुटुंबाला घेऊन गेला. जाता जाता फक्त १०० रुपये किश्याच्या हातावर टिकवले. बिचाऱ्याने रम्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन आठवडा कसातरी घालवला. पण ताप काही बरा होत नव्हता. खायला अन्नाचा कण नव्हता. रम्या भूक भूक म्हणून बिलगून बिलगून रडत होता.


शेवटी किश्याने धाडस केलं आणि घराच्या बाहेर पडला. नशिबाने पोलीस तिथे नव्हते. तडक नाऱ्या वाण्याच्या दारात येऊन उभा राहिला. गावात दुकानांना बंदी असली तरी तो पाठच्या दाराने लोकांना सामान द्यायचा. सकाळपासून रम्या भूक भूक म्हणून रडत होता. किश्या हातानेच इशारा करत त्याला बोलला की आज मी जातो कामाला, येताना तुला पेप्सी पण घेऊन येईल. तुला आवडते ना. असं म्हणत त्याचे पापे घेत तो निघाला होता. दारावरची गर्दी कमी झाल्यावर तो भानावर आला आणि इशारा करून तो म्हणाला, काहीतरी खायला द्या. वाणी म्हणाला," बाबा तूच दे मला, दिवस कसे आले आहेत ठाऊक नाही का तुला? मुकं कुठचं?",असं म्ह्णून त्याने त्याला बाजूला ढकललं आणि कसल्या तरी सामानाचा हिशेब करू लागला. तरी किश्या जागचा हलला नाही. वाणी म्हणाला,' बरं तुला एक काम देतो, केलंस तर १० रुपये देईल.' किश्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले. तो त्याला अंगणात घेऊन गेला आणि म्हणाला," इथे जी पोती आहेत ती आतल्या खोलीत ठेव.",


एक एक पोतं १०-१० किलोचं उचलून त्याला ग्लानी येऊ लागली. तरी भावसाठी तो ते सर्व विसरून काम करत होता. संध्याकाळ झाली काम संपायला. एक १० रुपयाचा डॉलर वाण्याने त्याच्या हातावर ठेवला आणि सोबत २ थंड पेप्सी. किश्या भलताच खुश झाला. १० रुपयाच्या कण्या घेतल्या. घरी गेल्यावर रम्याने लगेच त्याला मिठी मारली. हातात पेप्सी बघून त्याच्यावर तो तुटून पडला. कधीही न मिळाल्यासारखी पेप्सी घटघट पिऊ लागला. किष्याला सुद्धा एक दिली. कण्या रटरट करत चुलीवर शिजत होत्या. अल्युमिनिअमच्या ताटात त्याने गरम गरम वाढल्या. पण रम्या कसलं खातोय? तापामुळे तोंडाची चव गेली होती. तरी किश्याने त्याच्याच भाषेत चंद्र वगैरे दाखवत ४ घास त्याला खाऊ घातले. तापामुळे रम्याला लवकर झोप लागली. पण उद्या काय खायचं? हा विचार करत किश्या कुशीवर कुशी बदलत होता.


पहाटेच कोंबडं आरवलं तसं आजसुद्धा किश्या काम शोधायला निघाला. कालच्या वाण्याकडे गेला पण त्याने त्याला हाकलून लावला. करायचं तरी काय? पोटात भुकेचा आगडोंब, अनवाणी पाय, माथ्यावर तळपता सूर्य, खिश्यात एक दमडी नाही आणि घरात आजारी भाऊ. काहीच सुचेना. वाटेने रघु चालला होता. किष्याला चिंतेत बघून त्याच्या जवळ गेला." काय रे किश्या? काय झालं?", किश्याने हावभाव करून त्याच्या भाषेत सर्व परिस्थिती सांगितली. रघु बोलला,"बघ किश्या, आता पूर्ण देशात अशी परिस्थिती आली, त्याला आपण तरी काय करणार? पण एक काम आहे जे अजून चालू आहे. करशील का?", किश्याने होकारार्थी मान हलवली. एक गल्लीत एक झोपडीवजा खोली होती त्यात किष्याच्या वयाची मुलं काम करायची. रघुने त्याच्या दादाशी ओळख करून दिली. तिथलं सर्व चित्र पाहून किष्याला हे समजायला वेळ लागला नाही की तिथे गांजाचा व्यापार होत होता. छोट्या छोट्या मुलांना गांजा पॅक करून आणि लहान मुलांच्याच हातून ठिकठिकाणी पुरवला जायचा.


किश्या तिथून काढता पाय घेऊ लागला. तेव्हा दादाने त्याला जवळ बोलावलं आणि म्हणाला," बघ किश्या, तुझा भाऊ सोडून ह्या जगात कोणीच नाहीये तुला, आणि सरकार ने २१ दिवस अजून सर्व बंद ठेवायला सांगितलंय, तुला आता कुठे काम नाही मिळायचं. हे काम जर तू केलंस तर तुला काय ते दिवसाचे पैसे देईल मी आणि त्याच्याने तू तुझ्या भावाचा इलाज पण करू शकतोस.", किश्या परिस्थितीसमोर हतबल होता. त्याला रघु आणि दादाची गोष्ट मानावीच लागली. पहिल्या दिवशीच किश्याला बाजूच्या गल्लीत गांजा पोहोचवायचं काम मिळालं. दादाने त्या दिवशी ५० रुपये हातावर ठेवले. किश्या खूप खुश होता. आज तो रम्याच्या आवडीचं खायला घेऊन गेला. त्याचा ताप कमी होत नव्हता. जेवण जात नव्हतं. आजही जबरदस्ती त्याने त्याला खायला घातलं. आठवडा गेला, पण किश्याचे काम सुद्धा संथ गतीने चालू होतं. नवीन असल्याने त्याला जास्त बाहेरची काम दिली जात नव्हती. तो फक्त गांजा पॅक करायचा. त्यामुळे रोजचे १०-२० रुपयेच त्याच्या नशिबी असायचे.


एक दिवस अचानक एक मोठी डील दादाच्या हाताला लागली. पण काम जोखमीचे होतं. कारण जिथे गांजा पोहोचवायचा होता, तिथे पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. कोणीच तयार होईना. किश्या स्वतःहून पुढे आला. दादाने त्याला रस्ता व्यवस्थित सांगितला. हातात एक कापडाची पिशवी दिली. त्याच्या तळाला गांजाचं पाकीट आणि वर पालेभाजी. जेणेकरून पोलिसांनी चेकिंग केली तरी ते वरवर बघून सोडून देतील. किश्या मोठ्या सावधगिरीने पोलिसांची नजर चुकवत जात होता. तरी पोलिसांनी त्याला पकडलं आणि झडती घ्यायला सुरुवात केली. किश्या भलताच घाबरला होता. त्यामुळे तो पळू लागला. इथे रम्याचा जीव कासावीस होऊ लागला, घसा कोरडा पडला, डोळ्यांची उघडझाप मंद होऊ लागली, सर्व प्राण एकवटून तो दबक्या आवाजात म्हणाला, "दादा, लवकर ये, मला काहीच दिसत नाहीये. दादा माझ्या डोळ्यासमोर अंधारी येते. दादा मी तुला आता कधी काही मागणार नाही, दादा..!, त्याची आर्त किंकाळी सबंध आसमंतात घुमू लागली.


पक्ष्यांच्यासोबत त्याचा प्राणही हवेत उडून गेला. तापाने फणफणलेला देह आता थंडगार पडला होता. गावातल्या कोंबड्या येऊन त्याच्यावर टोच्या मारत होत्या. इथे पोलिसांनी किश्याला शुद्ध हरपेपर्यंत बेदम चोपला. तरी रम्याचा निष्प्राण देह अजूनही दादाच्या वाटेने दाराकडे डोळे लावून एकटक पडला होता..!


Rate this content
Log in

More marathi story from shw2 2

Similar marathi story from Tragedy