लढाई अस्तित्वाची..!
लढाई अस्तित्वाची..!
शाॅवरचं गरम पाणी तिच्या सर्वांगावरून उतरत होतं..बाथरूमच्या काचेवर पाण्याचे थेंब जमा झाले होते काचेतून तिची पुसटशी आकृती दिसत होती..शरीराला बाहेरून तापवणाऱ्या गरम पाण्याच्या वाफांपेक्षा तिच्या आत खदखदणारा तो वणवा कितीतरी पटीने तापला होता..इतका की तो आता कुठल्याही क्षणी इतकी वर्ष राखलेल्या संयमाचे बांध फोडून बाहेर पडणार होता...तिच्या बंद डोळ्याआड भुतकाळ आजही तसाच सरकत होता..तिने शाॅवर बंद केला आणि टाॅवेल अंगाभोवती लपेटून खोलीत आली, ती आरशासमोर उभी राहिली आणि टाॅवेल दूर केला..आणि आरशातल्या स्वतःच्या प्रतिबिंबाला एकवार डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळलं..कधीकाळी तिच्या कोवळ्या सुकुमार देहावर झालेल्या असंख्य जखमा आज भरून निघाल्या होत्या पण त्याचे व्रण आजही तसेच कायम होते आणि मनावर झालेल्या सतत भळभळणाऱ्या त्या जखमेचं काय...आजही तिचं मन आक्रंदून आक्रंदून तिच्याकडे न्याय मागत होतं आणि इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर तिच्यामते ही आता ती वेळ आली होती..स्वतःला न्याय मिळवून देण्याची.........
ती कपडे बदलून किचनमध्ये आली..तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं. नुकताच नऊचा टोला पडला होता..गार झालेलं जेवण पुन्हा गरम करून जेवायचं तिच्या अगदी जिवावर आलं होतं म्हणून तिने जेवायचा विचार बाजूला सारला आणि काॅफी बनवायला घेतली..काॅफी तयार होताच ती गरमागरम काॅफीचा मग घेऊन बाल्कनीत आली..बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती..काॅफीचा घोट घेत ती चौथ्या मजल्यावर असलेल्या तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून पावसाला न्याहाळत होती..वातावरण अगदी सामसूम होतं.. सोसायटी कंपाऊंडला लागून असलेला रस्ता सुध्दा खाली होता.. त्या पलिकडच्या स्ट्रीट लाईटस् चा अंधूकसा उजेड रस्त्यावर पडत होता..चुकार एखादी गाडी तिथून जाताना दिसत होती..तिच्या त्या बाल्कनीत छोटी छोटी फुलझाडं होती.. कोपऱ्यात असणारी ती मोगरीची वेल कळ्यांनी बहरली होती.. पावसाच्या गारव्यात सुटलेल्या हवेमध्ये त्यांच्या मंद मंद सुवास सुटला होता..त्या मुग्ध कळ्यांच्या सुगंधाचीच त्या शांत वातावरणात तिला सोबत होती..तिने त्या टपोऱ्या कळ्यांवरून हात फिरवला आणि येऊन तिने हौशीने बांधलेल्या झोपाळ्यावर येऊन बसली..समोरच्या टिपाॅयवर आजचं वर्तमानपत्र पडलं होतं त्याची हेडलाईन होती.. "xxx बलात्कार प्रकरणी xxx आरोपीची निर्दोष मुक्तता.. " त्यावर नजर जाताच तिचं मन भुतकाळात गेलं आणि तिला आठवू लागला सगळा घटनाक्रम.......
ही मैत्रयी प्रभु..चारचौघीत उठून दिसणारी..रेखीव बांधा,कमरेपर्यंत झरणारे दाट लांब केस, गोल चेहरा,काळेभोर डोळे,सरळ रेषेतलं इवलं नाक,अरूंद ललाट आणि लालचुटूक ओठांवर फुललेलं हसू असं तिचं व्यक्तिमत्व कुणाचंही लक्ष सहज वेधून घेई..मनोहर आणि मिनाक्षी यांची थोरली लेक..तिच्या पाठची मनाली,घरातलं शेंडेफळ..बाबा बँकेत मॅनेजर तर आई होममेकर असली तरी बी. ए पर्यंत शिक्षण झालेलं..मनाली काॅलेजच्या शेवटच्या वर्षाला होती आणि मैत्रयी नुकतीच गुन्हेगारी मानसशास्त्रात एम. ए च्या पदवी सोबत कायद्याची पदवी पुर्ण करून आता गुन्हेगारी मानसशास्त्रात डाॅक्टरेट करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत होती..असं हे सुखवस्तू कुटुंब हसत खेळत गोव्यातल्या म्हापशासारख्या शहराच्या ठिकाणी वास्तव्यास होतं..पण हे सुख कदाचित नियतीच्या डोळ्यात खुपत असावं म्हणूनच की काय पुढच्या संकटाची किंचितही चाहूल ही न लागू देता तिने त्यांच्या समोर तो भीषण डाव मांडून ठेवला होता......
त्या दिवशीची सकाळ उदास आणि निराशेचे भाव घेऊनच उगवली जणू...सकाळीच बाबांचे जवळचे मित्र गेल्याचा फोन आला त्यामुळे आई बाबांना तिथं जावं लागलं..जाताना आई रात्री उशीर होणार असल्याचं सांगून गेली..मैथिली काॅलेजला गेल्यानंतर घरी मैत्रयी एकटीच राहिली..सगळे गेल्यानंतर घरातली बारीक सारीक कामं करता करता दुपार होत आली..तिने जेवून घेतलं आणि आराम करायला आपल्या खोलीत आली..बऱ्याच वेळानंतर तिचा फोन वाजला आणि तिची झोपमोड झाली..तिने झोपेतच फोन उचलला आणि समोरून त्याचा गोड आवाज आला, "काय मॅडम कुठेयं आजकाल पत्ता आपला..ते पीएचडी वैगरे सगळ्याच्या नादात या पामराला विसरलात की हो.. " "काय रे मोहीत.. कधी नव्हे ती इतकी गाढ झोप लागली होती.. तुझ्या फोनमुळे मोडली ना.. " ती चिडचिडत बेडवरून उठत म्हणाली.. "ओह...आमच्या राणी सरकार चक्क घोडे बेच के झोपल्या होत्या..म्हणजे मग आता आम्ही शिस्तबद्ध व्हायला हवे.. " तो पुन्हा मिश्कीलपणे तिला चिडवत म्हणाला.."एवढं काही नको हं बोलायला.. घरी कोणी नव्हतं म्हणून जरा डोळा लागला..."ती म्हणाली.. "घरी कोणी नाही म्हणजे..??कुठे गेले सगळे..?? " "अरे ते.. बाबांचे एक मित्र गेले सकाळीच कळलं म्हणून आई बाबा दोघे तिकडे गेलेत.. " ती पुढे काही म्हणणार तोच तिचं वाक्य तोडत तो म्हणाला, "आणि ती कुठेयं शेंबडी... काॅलेजला गेली असेल ना.." "मनु ना.. हो.. आणि काय रे तिला चिडवतोस बिचारीला.. लहान आहे का ती आता.. येईलच इतक्यात भुक लागली भुक लागली करत... " ती हसत म्हणाली.. "अगं मज्जा येते तिला जरा चिडवायला नाकाचा शेंडा मस्त लालेलाल फुलतो तिच्या..आणि तु का मधे पडतेस आमच्या जीजा सालीच्या.. ते आमचं आम्ही बघू ना काय ते.. " तो पुन्हा अवखळपणाने म्हणाला.. "बरं बरं बघा काय ते.. चल बाय.. येईलच ती एवढ्यात.. मलाही आवरायचयं माझं.. "असं म्हणून ती फोन ठेवणार तोच तिला थांबवत तो म्हणाला, " अगं ऐक ना मैत्रा.. किती दिवस झाले आपण भेटलो नाही.. आज तुला पण निवांत वेळ आहे आणि मला पण.. भेटुयात ना प्लिज... " "नको अरे.. आता मनु येईल तिला पण भुक लागली असेल आणि त्यात घरी पण कोणी नाही...आपण उद्या भेटूया ना.. "ती त्याला विनवत म्हणाली.. " अरे यार प्लिज ना आणि आजच्या दिवस ती वाढून घेईल ना आणि जास्त वेळ नाही फक्त तासभर... प्लिज.. मी वाट बघतोय तुझी आपल्या नेहमीच्या ठिकाणी.. "असं म्हणत तिचं पुढचं काही ऐकून न घेता फोन ठेवला..
आता तिला जाणं भाग होतं...ती पटकन आवरून तयार झाली..मनुला आपण मोहीतला भेटायला जात असल्याचा मेसेज केला आणि गाडी घेऊन बाहेर पडली..आभाळ भरून आलं होतं कुठल्याही क्षणी पावसाची सर येऊन धडकेल असं वाटत होतं.. तिने गाडीचा स्पीड थोडा वाढवला.. मोहीत आणि ती एका मित्राच्या बर्थडे पार्टीला भेटले होते..मोहीत कामत असं त्याचं पुर्ण नाव..नावासारखाच मोहीत करून घेणारा..दिसायला देखणा, उंचपुरा, भरदार अंगकाठीचा आणि मुख्य म्हणजे त्याचा स्वभाव खूप खेळकर आणि मिश्किल होता...त्याने एमबीए पुर्ण केलं होतं आणि आता तो त्याच्या पप्पांना बिजनेसमध्ये जाॅईन झाला होता..मैत्रयी एम. ए फर्स्ट पार्टला असताना त्यांची भेट झाली.. मग हळूहळू मैत्री झाली..आणि कधी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांचं त्यांना ही कळलं नाही.. एकमेकांजवळ नात्याची कबुली दिल्यानंतर दोघांनी आपापल्या घरीही आपल्या नात्याबद्दल कल्पना दिली आणि दोन्ही घरून होकर आल्यानंतर मैत्रयीचं शिक्षण पुर्ण झाल्यावर लग्न करायचं हे संगनमताने ठरलं..दोघांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं सुध्दा होतं..मैत्रयी एका तासात त्यांच्या नेहमीच्या कॅफेमध्ये पोहचली.. "ग्लाॅरी'स कॅफे" असं त्या कॅफेचं नाव होतं..तो आधीच तिथे तिची वाट बघत थांबलेला...ती आल्यावर दोघे आपल्या नेहमीच्या टेबलवर जाऊन बसले.. काॅफी मागवली आणि गप्पा सुरू झाल्या.. गप्पा मारता मारता वेळ कसा निघून गेला दोघांनाही कळलं नाही..एकमेकांचा निरोप घेऊन दोघे परतीच्या वाटेला लागले...
कॅफेकडून साधारण पंधरा मिनटाचं अंतर कापल्यावर एक एकाकी रस्ता लागायचा त्यानंतर पाऊण तासाने हायवे आणि मग पंधरा मिनिटात मैत्रयीचं घर.. तो रस्ता दिवसाही तेवढा गजबजलेला नसायचा आणि रात्री तर अगदीच सामसूम..तसा तो रस्ता मैत्रयीच्या ओळखीचा होता त्यात पावसाचा वेगही वाढला होता हेल्मेटवर पावसाचे थेंब जोरात आदळत होते त्यामुळे समोरचं काही नीट दिसत नव्हतं..म्हणून मैत्रयी गाडी हळू चालवत होती..तिने अर्ध अंतर कापलं असेल नसेल तोच तिची गाडी बंद पडली.. तिने सर्व प्रयत्न करून पाहिले पण गाडी चालु होईना शेवटी नाईलाजाने गाडी बाजूला लावून तिने फोन बाहेर काढला पण तो ही नेमका डिस्चार्ज झाला होता..आता तिच्या पुढे एकच पर्याय उरला होता तो म्हणजे कुणाकडे तरी लिफ्ट मागून घरी जाणं..पण तिथून एखादं वाहन जाणं तसंही अशक्यच तरीही ती वाट बघत होती..एखादी तरी गाडी येईल या आशेने..आपण निघालो तेव्हा सात वाजत आले होते म्हणजे आता साडे सात च्या आसपास वाजले असतील असा तिने अंदाज केला कारण हातात घड्याळ असूनही अंधारात काही दिसत नव्हतं.. रस्त्यावर लाईटस् तर नाहीच पण दुतर्फा माळरान होतं त्यामुळे कुठे मनुष्य वस्ती देखील नाही..ती तशीच वाट पाहत उभी होती पण गाडी येण्याची चिन्हे काही दिसेनात त्यात पाऊस संततधार कोसळत होता.. तिला आता घरी एकटी असलेल्या मनुची काळजी वाटू लागली होती...
उभं राहून आणखीन काही मिनिटं गेली.. शेवटी तिने ठरवलं की सरळ चालत राहायचं..वाटेत कुठलीही गाडी मिळाली तर सरळ घरी जाता येईल नाही तर निदान मोहीतला तरी बोलवून घेऊ न्यायला..असा विचार करून पाऊल टाकणार तोच मागून एका गाडीचा आवाज ऐकू आला..तिने वळून मागे पाहिलं समोर एक फोर विलर उभी होती..गाडीच्या प्रकाशाने तिचे डोळे दिपत होते.. ती पुढे जाऊन मदत मागणार इतक्यात गाडीतली व्यक्ति खाली उतरली..तो पुरूष होता...भर पावसात भिजतच मैत्रयीच्या दिशेने येत होता..तो तिच्या समोर येऊन उद्गारला, "कशी आहेस मैत्रा..?? "आवाज ओळखीचा वाटला..पण नेमकं आठवत नव्हतं कोण..ती विचार करत असताना वीज कडाडली आणि त्या प्रकाशात तिला त्याचा चेहरा स्पष्ट दिसला..ती काही बोलणार तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला.." राॅकी तू...अजून सुधरला नाहीस..हात सोड माझा आणि तू तुझ्या वाटेने जा आणि मला माझ्या वाटेने जाऊ दे.. "असं म्हणत ती आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती..पण त्याची पकड मजबूत होती..." अरे वा..!!! बरोबर ओळखलसं तू...तोच मी रितेश उर्फ राॅकी.. रंगनाथ शिरसाठांचा मुलगा..माझे बाबा यशस्वी बिझनेसमॅन..घरी सात पिढ्यांचं वैभव आणि त्यात माझ्यातही काही कमी नव्हती.. मग का नाकारलसं मला..हो म्हणाली असतीस तर राणी बनवून ठेवलं असतं तुला...पण तू... तू चपराक मारलीस माझ्या गालावर ते ही पुर्ण काॅलेज समोर...ते मी कसं विसरणार होतो..तुझ्या चार बोटांचा ओरखडा अजूनही माझ्या गालावर ताजा आहे.. आज चांगली सापडलीस तावडीत.. आज नाही सोडणार तुला..."तो रागाने थरथरत तोंडाने वर्षांनुवर्षे धुमसत असलेली अपमानाची आग ओकत होता..."राॅकी झालं गेलं विसरून जा...सुधार आता...मी तुला नाकरण्याचं कारण तेव्हा ही तेच होतं.. तुझा परावलंबीपणा.. तुझ्यात स्वाभिमान नाही.. तू तुझ्या वडिलांवर अवलंबून आहेस.. तेव्हा ही होतास आणि आजही आहेस..."ती ही त्याच निकाराने बोलली...तिच्या उत्तराने त्याच्यातला सैतान अजून चवताळून उठला...आणि तिच्या हातावरची त्याची पक्कड अजून घट्ट झाली आणि तो दात ओठ चावत बोलला, "स्वाभिमान...
थांब तुला दाखवतो माझा स्वाभिमान.." असं म्हणत त्याने तिला जवळ ओढलं..पण असं करताना त्याची पकड ढिली झाली आणि याचाच फायदा घेऊन तिने त्याला हिसका दिला आणि माळरानाच्या दिशेने धाव घेतली...
पण एव्हाना उशीर झाला होता..आणि हिच कदाचित तिच्या दुर्दैवाची नांदी होती...ती जीव मुठीत घेऊन वाट दिसेल त्या दिशेने धावत होती..पायाखाली येणाऱ्या काट्याकुट्यांची तिला पर्वा नव्हती...संततधार कोसळणाऱ्या पावसात ती कधीच चिंब भिजली होती. कुठेतरी कोणीतरी मदतीला धावून येईल या आशेने ती भेदरलेल्या हरिणी सारखी धावत होती..पण त्या वासनांध राक्षसी वृत्तीपुढे तिचा किती निभाव लागणार होता..पायाखाली वेल आली त्यामुळे ती अडखळून पडली आणि ती इतकी धावली होती की तिच्यात उठण्याचं ही त्राण नव्हतं.. एव्हाना तिच्या जखमांमधून रक्त वाहू लागलं होतं..तरीही ती कशी बशी उठण्याच्या प्रयत्नात असताना त्याची गाडी समोर उभी ठाकली.. तो पुन्हा तिच्या जवळ आला आणि दात विचकत म्हणाला, "पळून पळून जाशील कुठे..???. भागली हौस...?? चल आता तुला दाखवतो अपमानाची भळभळणारी जखम काय असते... "असं म्हणत त्याने तिच्या दंडाला हात घातला..तिच्या चिंब भिजलेल्या शरीरावरून फिरत असलेली त्याची वासनेने बरबटलेली नजर तिला बोचत होती.. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या पुरूषी शक्ती पुढे तिचा प्रयत्न व्यर्थ ठरला...त्याने तिला फरफटत गाडीपाशी आणलं आणि निर्दयीपणे तिच्या शरीरावर तुटून पडला..तिला होणाऱ्या वेदना.. तिची सुटण्यासाठी होणारी धडपड..झटापटीत होणाऱ्या जखमा..तिचा जीवाच्या आकांताने ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश कशाचं ही त्याला भान नव्हतं... त्याला क्षमवायची होती फक्त अपमानाची आग त्यासाठी तो वासनांध नर बनला होता....!!!
अखेर तिची धडपड थांबली..ती निपचित पडली...ती गेली असं समजून तिला रस्त्याच्या कडेला फेकून तो तिथून निघून गेला आणि रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात, त्या माळरानावर चिंध्या झालेलं तिचं रक्तबंबाळ धड आभाळातून कोसळणाऱ्या धारांमध्ये तडफडत होतं..रक्ताचा अक्षरशः पाट वाहत होता पण तिथे तिला तारणारं कोणीच नव्हतं...ती गेली नव्हती ती बेशुद्ध होती..त्या अर्धवट शुध्दीत तिला आई बाबा, मनु, मोहीत सारे आठवत होते..पण रस्त्याच्या कडेला तडफडणारा सुन्न देह काहीच करू शकत नव्हता... रात्रभर तिच्या डोळ्यातून असंख्य आसवं वाहिली आणि पावसात रक्ताच्या पाटात वाहून गेली..पहाटेला ती थोडीशी सावध झाली आणि कुणास ठाऊक तिच्यात कुठून बळ आलं..ती कशीबशी गाडीजवळ पोहचली आणि सुदैवाने गाडी सुरू झाली..तिने बहिणीच्या काळजी पोटी घर गाठलं..तिच्या जवळच्या किल्लीने दरवाजा उघडला आत येऊन पाहिलं मनु शांत झोपली होती..ती आपल्या खोलीत आली.. दार लावून घेतलं आणि जमिनीवर कोसळली..सकाळी मनु उठली आणि हाॅलमध्ये आली.. जमिनीवर रक्त पाहून ती घाबरली..घराचा दरवाजा आतून बंद होता.. ती उघडून बाहेर गेली तिथे गाडी पाहून क्षणभर चमकली.. आत येऊन ती रक्ताचा माग काढत मैत्रयीच्या खोलीपर्यंत पोहचली.. तिने दार ठोठावलं, आवाज दिला पण आतून काही प्रतिसाद येत नसल्यामुळे तिने घाबरून मोहीतला फोन केला.. तो ही लगोलग येऊन पोहचला त्याने दरवाजा तोडला आणि समोर पडलेल्या मैत्रयीला पाहून तो अगदी गर्भगळीत झाला.. पण ही वेळ परिस्थिती सावरण्याची होती.. आपल्या ताईला अशा परिस्थितीत पाहून मनु देखील हेलावली होती.. ती रडू लागली पण त्याने तिला शांत केले आणि तातडीने मैत्रयीला घेऊन आपल्या फॅमिली डाॅक्टरांचा दवाखाना गाठला...
डाॅक्टरांनी तिला तपासून तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि त्यामुळे ती मानसिक धक्क्याने बेशुद्ध असल्याचे मोहीतला सांगितले..खरंतर अशा घटनेची कायद्याने लगेच तक्रार नोंदवली गेली पाहिजे पण मोहीतने हा प्रकार मैत्रयी शुध्दीवर येईस्तोवर लांबणीवर टाकला आणि तिच्या आई बाबांना तातडीने बोलावून घेतले..तोवर कुणालाही काहीही कळू देऊ नका अशी सक्त ताकीद मोहीतने सर्वांना दिली.. दोन दिवसांनी मैत्रयी शुध्दीवर आली..हाॅस्पिटलच्या रूममध्ये जमलेल्या सर्वांना पाहून तिला गहिवरून आले आणि उशाशी बसलेल्या आईला मिठी मारून तिने पुन्हा आपली आसवं आईच्या कुशीत रिती केली..ती थोडी सावध झाल्यावर तिने सारी हकीकत सांगितली..बाबा आणि मोहीत पोलीस तक्रार करायला निघाले असताना तिने त्या दोघांना थांबवलं आणि म्हणाली, "काय मिळणार आहे बाबा तक्रार करून...?? लोकांच्या डोळ्यातली सहानुभूती, कॅन्डल मार्च नि कोर्टाच्या वारंवारच्या तारखा,आणि आपण गुन्हा केल्यासारखे विरोधी वकिलाचे उलटसुलट जखमेवर मीठ चोळणारे प्रश्न,समाजात होणारी बदनामी आणि शेवटी पुराव्यांअभावी त्या नराधमाची निर्दोष मुक्तता...!!! हेच होणार असेल तर का करावी तक्रार..नको बाबा तक्रार नको... " "मग बाळा आपण काय हा अन्याय सहन करायचा.. मुग गिळून शांत बसायचं.. अशाने तो आणखीन शेफारेल... " बाबा तिला समजावत म्हणाले.. "नाही बाबा.. आपण अन्यायाविरुद्ध लढायचं पण आपल्या तर्हेने...तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे रहा.. मला साथ द्या... " ती निर्धाराने म्हणाली...बाबांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला त्यांचा स्पर्श आश्वासक होता... "या तुझ्या लढाईत मी ही तुझ्या सोबत आहे.. " तिचा हात हातात घेत मोहीत म्हणाला.. "पण मोहीत..." तिचे शब्द जड झाले होते.. "बलात्कार शरीरावर झालाय मनावर नाही आणि मी तर तुझ्या मनावर प्रेम केलयं मैत्रा..तुझ्या प्रत्येक सुख दुखात मी तुझ्या सोबत असेन आता केलायस निर्धार तर मागे हटू नकोस.." त्याच्या या शब्दांनी तिला अजून बळ आलं आणि ती सिध्द झाली लढाई लढण्यासाठी आपल्या अस्तित्वाची...!!!
एका महिन्यानंतर मैत्रयी ठिक होऊन घरी आली.. झाला प्रकार बघता ही खरतरं बरीच स्पीडी रिकव्हरी होती...पण त्यामागे तिच्या घरच्यांचे आणि मोहीतचे अपार कष्ट होते...परंतु तिच्यासाठी आता त्याजागी थांबणं घातक ठरू शकलं असतं कारण राॅकीच्या मते मैत्रयी गेली होती आणि आता त्याला जराही तिच्या जिवंत असण्याचा सुगावा लागला असता तर तो तिला अपाय करू शकत होता त्यामुळे यावर एकच उपाय होता तो म्हणजे मैत्रयीने आयसोलेट होणं...आणि याची सगळी व्यवस्था मोहीतने केली होती...गोव्यातच कोलव्याजवळच्या छोट्या शहरात मैत्रयीला राहाण्यासाठी एक फ्लॅट घेतला होता..मुख्य म्हणजे तिथे तिला कोणी ओळखणारं नव्हतं आणि ती बाहेरून पीएचडी करत असल्यामुळे तिच्या अभ्यासात पण व्यत्यय येणार नव्हता...त्यानंतर सुमारे पाच वर्षांचा काळ लोटला.. या काळात मैत्रयीने पुर्णपणे स्वतःला अभ्यासात झोकून दिलं होतं.. ती फोन द्वारे आपल्या कुटुंबाच्या आणि मोहीतच्या संपर्कात होती.. तशीच मोहीत करवी राॅकीच्या पुर्ण माहितीचा ट्रॅक ती ठेवून होती..तिने त्याची केस पुर्ण स्टडी केली होती...एक आठवड्यापूर्वीच तिची पीएचडी आणि कायद्याचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं होतं.. आता वेळ आली होती न्याय मिळवण्याची...असा सगळा तो घटनाक्रम आठवला आणि ती काहीश्या निश्चयानं उठली..आज तिचा कोलव्यातला शेवटचा दिवस होता उद्या ती पुन्हा घरी परतणार होती...
दुसऱ्या दिवशी सकाळीच मोहीत तिला न्यायला हजर झाला.. ती घरी आली.. आठवडाभर विश्रांती घेऊन नंतर ती आपल्या ध्येयाच्या दिशेने वळली..तिचा प्लॅन पुर्ण तयारच होता..त्याप्रमाणे तिने तोच दिवस आणि तेच ठिकाण निवडलं जिथं तिच्या अस्तित्वावर त्या सैतानाने घाला घातला होता..रात्र उजाडली..सोबत बाबा आणि मोहीत होतेच काही दगा जाणवल्यास ते मदत करणार होते...ते ठराविक अंतरावर थांबले होते..मैत्रयी त्याच ठिकाणी उभी होती रस्त्याच्या मधोमध...तिच्या प्लॅनिंग नुसार तिने बांधलेल्या वेळेत तिला गाडी येताना दिसली..गाडी तिच्या जवळ थांबली.. गाडीतून राॅकी खाली उतरला आणि झोकांड्या खात तिच्या समोर आला तो दारू प्यायला होता.. त्यामुळे त्याला धड उभंही राहता येत नव्हतं.."कसा आहेस राॅकी उर्फ रितेश शिरसाठ.??" मैत्रयी उद्गारली..आणि तो चमकला..तेवढ्यात तशीच वीज कडाडली आणि तिचा चेहरा पाहून त्याची नशा खाडकन उतरली.. आणि तो जवळ जवळ ओरडलाच..."तू.... तू जिवंत आहेस..???तुला तर मी... पाच वर्षापूर्वी... इथेचं...!!! "त्याला गोरामोरा झालेला पाहून ती छद्मी हसली आणि म्हणाली, " हो मी जिवंत आहे... पाच वर्षांपुर्वी इथेच.. याच ठिकाणी माझं स्त्रीत्व ओरबाडून जनावरांसारखं रस्त्यावर फेकून निघून गेला होतास... मला मरणाच्या दारात लोटून..पण मी.. मी जिवंत राहिले...माझ्या ओरबाडून फाडून फेकलेल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी...तुझ्या चुकीमुळे तुला मारलेल्या चपराकीमुळे तू माझं आयुष्य उध्वस्त केलसं..त्याची शिक्षा मी विनाकारण भोगली पण आता वेळ आलीये तुला शिक्षा देण्याची.. "त्याने घाबरून माळरानावर धाव घेतली ती ही त्याच्या मागून धावली...तिच्या हातात तलवार होती.. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पोरीबाळींवर हात टाकणाऱ्या नरधमाचा चौरंगा केला होता... आज जणू हाती तलवार घेऊन आई भवानीच तिच्यात संचारली होती... तिने पहिला वार केला..त्याचा हात खांद्यापासून वेगळा झाला सोबतच त्याची किंकाळी गगन भेदून आरपार गेली पण ती ही तशीच त्या माळरानावर विरून गेली...तिने क्षणाचाही विलंब न करता दुसरा हात कापला पुन्हा तो ओरडला...आणि रस्त्यावर गाडीच्या दिशेने धावू लागला तिने त्याचा एक पाय ढोपरापासून पाय वेगळा केला आता तो जमिनीवर पडून तिची माफी मागून जीवाची भीक मागू लागला..."मला माफ कर मैत्रयी.. मी तुझा गुन्हेगार आहे माझ्यामुळे तुझं आयुष्य बरबाद झालं.. पण मला मरायचं नाहीये मला माफ कर... "तो कळवळून सांगत होता.. पण आता खूप उशीर झाला होता तिने त्याचा दुसरा पाय ही धडापासून वेगळा केला आणि शेवटी त्याचे मस्तक छाटले आणि तिच्यातली जगदंबा पावन झाली....
पुढच्या काही दिवसात पोलिसांनी तपास करून तिला ताब्यात घेतलं आणि कोर्टासमोर हजर केलं...तिथे ती स्वतःचा खटला स्वतः लढली..खटल्याच्या शेवटी तिने कोर्टात आपलं म्हणणं मांडलं,"जज साहेब,माझ्या सारख्या साधारण स्त्रीला कायदा हातात घ्यावा लागतो,शस्त्र हाती घ्यावं लागतं कारण आपला कायदा पांगळा आहे..इथे पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटतो..कुणाला तरी कधीतरी न्याय मिळतो पण कधी सगळं संपल्यावर..तोपर्यंत ती स्त्री तिचं कुटुंब नरकयातना सहन करतात त्या कधी कधी अशा थराला जाऊन पोहचतात की ती स्त्री जीवन संपवून मोकळी होते तर बहुतेक जणी न्यायासाठी तात्कळत सरण चढतात..हे सर्व तेव्हा बंद होईल जेव्हा न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी जाऊन डोळसपणाचं शस्त्र हाती येईल आणि प्रत्येक गुन्ह्याला योग्य ती आणि योग्य वेळात शिक्षा मिळेल..तेव्हाच जिंकेल नारी ही लढाई नाहीतर ह्या सैतानांच्या संहारासाठी पुन्हा पुन्हा प्रत्येक नारीला जगदंबा व्हावं लागेल.."अश्या वक्तव्यानंतर ही वकिली डावपेच साधून पुराव्यांअभावी निर्दोष सुटली..सुटून घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी तिने वर्तमान पत्र वाचायला घेतलं त्याची हेडलाईन होती.... "अस्तुरी जिंकली लढाई अस्तित्वाची...!!! "