Geeta Ghatge Patil

Abstract Fantasy

4.8  

Geeta Ghatge Patil

Abstract Fantasy

भेट

भेट

4 mins
670


मे महिन्यातली रखरखती, उन्हाने हैराण करणारी ,घामाच्या धारा अंगातून वाहणारी ,नकोशी असणारी दुपार .

बस स्टॉप वर गर्दी झालेली, सावलीसाठी स्टॉप च्या शेड मध्ये दाटीवाटीने उभे असलेले लोक ,कोणी उन्हापासून बचावासाठी छत्री घेतलेली ,कोणी टोपी घातलेली ,scarf बांधलेले बरेच जण ,काही college तरुणी college सुटल्यावर घरी जायच्या घाईत तरीही दंगा मस्ती करणाऱ्या ,त्यांच्या हास्याच्या फवाऱ्यांनी तेवढंच वातावरण हलकं होत होतं.आयुष्याची रंगीत स्वप्न पाहणाऱ्या त्या मुली सोडल्या तर स्टॉपवर उभ्या प्रत्येकाला घरी परतायची ओढ होती. कोणाचं लहान मुलं घरी होतं, कोणाला जाऊन स्वयंपाक करायचा होता ,कोणाला बिझनेस कॉल साठी दुसऱ्या ठिकाणी वेळेत पोहोचायच होत ,कोणाच्या पाहुण्यांच्यात कसलासा कार्यक्रम होता ,पण सर्वांच्याच पोटात भुकेने कावळे ओरडत होते नि चेहरे तहानेने व्याकुळ झाले होते.

अश्या गर्दीत बराच वेळ ती उभी होती ,डोळे किलकिले करून सतत उजवीकडून डावीकडे मान फिरवत होती .

तिशीतली तरुणी असेल ती .खांद्याला पर्स ,साधीच पण नीटनेटकी साडी , नीट पिन अप केलेला पदर, एकंदर स्वच्छ असा पेहराव , हातात मोजक्या बांगड्या ,दोन वाट्यांच काळ्यामण्यांतील गळ्याबरोबरचं मंगळसूत्र ,हातात एक पिशवी , एकसारखी उजवीकडून डावीकडे आवाजाचा अंदाज घेत होणारी मानेची हालचाल तिला त्या गर्दीतून वेगळं करत होते. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. ती वाट बघत असावी बहुदा .तिचे हात एकसारखे मोबाईल च्या बटणांशी चाळा करत होते. अंदाजाने नंबर डायल करून मान वाकडी करून ,अगदी डोळ्यासमोर स्क्रीन घेऊन खात्री केली ,तिने फोन लावला ,कदाचित फोन लागला पण उचलला नसणार ती पुन्हा हताश झाली. इकडे तिकडे तिने अंदाज घेत,ती डोळ्याच्या कोपऱ्यातून मागे पाहत जमिनीला पाय घासून हळूहळू मागे सरकली .डोळे अर्धवट उघडे, पापण्यांची होणारी सततची उघडझाप, एकसारखी उजवीकडून डावीकडे जाणारी मान,अशी पार्शिअलबाईंड (अंशतः अंध )ताई माझ्याजवळ सरकून मला म्हणाली ,"यात रघु म्हणून नंबर आहे ,लावून देता का ताई?"

मी तिला तिच्याच फोन वरून फोन लावून दिला .ती माझ्याचजवळ थांबली ,फोन उचललाच नाही .पुन्हा ती हताश !

तिने फोन लावणं सुरूच ठेवलं. बराच वेळ हे असंच चालू राहील. "कोणत्या बसने जाणार?"मी तिला विचारलं

"इथेच महालक्ष्मी ला जाणार आहे. माझे मिस्टर येणार आहेत ,इथेच थांब येतो सांगितलं आहे ताई ,त्यांचीच वाट बघतेय." 

"खूप वेळ झालाय ,येतात आतापर्यंत!"

ती काळजीच्या स्वरात बोलत होती,

"महालक्ष्मी मंदिर जवळ आम्ही दोघे अगरबत्ती, धुपकांडी ,विकतो.ते लवकर येतात घरातून मी आता डबा घेऊन येते .इथून मिळून पुढे जातो." ती का कोणास ठाऊक मला सांगत होती .शक्यतो आपल्याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही हे त्यांच्यात ठरलेलं असतं. सगळेच लोक चांगले नसतात, गैरफायदा घेणारे भरपूर असतात. कदाचित मी एक बाई म्हणून ती मोकळेपणाने माझ्याशी बोलली असेल.

  माझी बस यायला अजून 15 min वेळ होता .आम्ही दोघी शेजारी शेजारी उभ्या राहिलो .मी तिला सावलीत थांबवलं नि मी बाजूला झाले.गर्दी वाढत होती ,कमी होत होती.तिची मान सतत हलणारी,तिची अस्वस्थता वाढत चाललेली. फोन करायचा प्रयत्न सुरूच! एकदाचा फोन लागला!पलीकडून आवाज आला ."चौकात गर्दी होती ,लक्षात आलं नाही त्यामुळे .तू थांब 5 मिनिटात येतो."

  हिने काही बोलायच्या आत तो सांगून आणि फोन कट करून रिकामा झाला .

  तिची नजर वाटेकडे लागलेली ,धूसर दृष्टीनी रस्त्यावरील हालचाली टिपणारी.फोन काळजीपूर्वक पर्स मध्ये ठेवून ती थांबली. तिला तिचा नवरा येताना दिसला. 

   स्वच्छ नेटका पोशाख ,क्रीम कलरचा शर्ट, डार्क कॉफी रंगाची पॅन्ट ,खांद्याला अडकवलेल्या पिशव्या,त्यात भरलेले निरनिराळ्या उदबत्या, धुपकांड्या यांचे पुडके, उजव्या हातात ब्लाइंड स्टिक ,डाव्या हातात सॅम्पल उदबत्या ,डोळ्यात बुबुळांचा पत्ता नाही.पापण्या एकमेकांना चिकटलेल्या ,प्रकाश आणि रंग यांचा आणि त्याचा दूरान्वये सम्बध नसलेला.फक्त आवाजाचा आणि स्टिक ने अडथळ्यांचा अंदाज घेत पायाखाली अखंड तुडवणारा रस्ता ,बेभरवश्याच्या ,घाईच्या ,गडबडीच्या गर्दीत स्वतःला सांभाळत तो आत्म्याच्या प्रकाशात चालणारा पथिक. कसा सांभाळत असेल तोल या मतलबी डोळस लोकांच्या फसव्या जगाचा .कर्कश वाहनांच्या हॉर्न चा त्याला किती त्रास होत असेल. सगळेच त्याला सहानुभूतीने बघणारे समजून घेणारे नसतील, कोणी महाभाग हिनवणारे ,मुद्दाम चिडवणारे, खोडी काढणारे, त्रास देणारे ,फसवणूक करणारे ,असुरी आनंदासाठी त्याच्या वस्तू हिसकावून घेणारे ही असतील .त्या सगळ्यात उभा राहून स्वाभिमानाने ,स्वकष्टाने ,स्वतःचा संसार सांभाळत या स्वार्थी मतलबी दुनियेत तो ताठ मानेने जगायला शिकला होता. इथपर्यंतचा त्याचा प्रवास नक्कीच खडतर होता.

   लाल पांढऱ्या रंगाची त्याची ती दिशादर्शक ,अडथळा दर्शक स्टिक, काठी नव्हे सोबती त्याचा !स्टिकच्या सहाय्याने तो इच्छित स्थळी येऊन पोहोचला, गर्दीतून त्याची अर्धांगिनी पुढे झाली .त्याच्या डाव्या हातातील उदबत्तीचे पुडके तिने स्वतःच्या डाव्या हाती घेऊन त्याचा हात  स्वतःच्या उजव्या हातात घट्ट पकडला ,दोघेही हर्षभरीत होऊन मंदिराकडे जाऊ लागले.अशी त्यांची कातर भेट रोजच होत होती .ओढ कायमच ,प्रेम ,काळजी रोज शतपटींनी होती.त्यांची उत्कट भेट झाली होती. मनाच्या डोळ्यांनी त्यांनी एकमेकांना पाहून ,अंध असूनही डोळसपणे ,सामंजस्याने ,जिद्दीने संसार करायचा निश्चय केला होता.

   ते दोघे पुढे जात होते.गर्दीत लोपले होते. माझ्या मनात मात्र असंख्य विचारांची जत्रा जमा झाली. देवाने आपल्याला सर्व अवयव दिलेत, तरीही आपण सतत व्यथित असतो.हे नाही ,ते नाही ,हे हवं ,ते हवं, निराशा आली तर सगळं सम्पल अस समजून गप्प बसून राहतो, कधी कधी जगण्याच्या आशा सोडून देऊन उदासीनतेत जगत बसतो. जोडीदाराला त्या दोघांइतकं प्रेम ,सहकार्य, आपुलकी देतो का ?त्याच्या असण्या नसण्यासह स्वीकारू शकतो का ?कितीदा एकमेकांच्या गुण अवगुणांवर पांघरून घालून निर्मळ निखळ आनन्द घेतो ?त्या दोघांसारखी उत्कट भेट घ्यायला ,समाधानाने जीवन जगायला जमेल आपल्याला?


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract