Geeta Ghatge Patil

Fantasy

4.0  

Geeta Ghatge Patil

Fantasy

ही सांजवेळ नि याद तुझी

ही सांजवेळ नि याद तुझी

3 mins
188


संध्याकाळचे 5.30 वाजले असतील, हातात कॉफीचा कप घेऊन खिडकीतून दिसणाऱ्या मोकळ्या आकाशात पाहत बसलो होतो.मुग्ध करणार वातावरण निर्माण झालं होतं, स्वच्छ निर्मळ आकाश, निशारथावर स्वार होऊन नारायण परतीच्या प्रवासाला चाललेला, जाताना मुक्त हस्ते अनेक रंगांचे रंगीत, संमोहित देणे सृष्टीला देत जात होता.खग कोटरात परतत होते, डोंगरांच्या रांगा गडद होत होत्या हळूहळू सुस्ताईचा अंमल धरणीवर होत होत्या, नि अचानक हृदयाच्या कप्यात लपून बसलेली तुझी मूर्ती त्या गुलाबी, केशरी ढगातून माझ्याकडे पाहू लागली.आठवलीस तू, तू खास भावलेलं स्वप्न माझं. तू तेव्हा रोजच दिसायचीस, मैत्रिणींच्या घोळक्यात केंद्रस्थानी असायचीस, हसताना मधुबाला दिसायचीस, माझ्याकडे न पाहतच कलिजा खल्लास करायचीस!अल्लड वयात कळलच नाही की तुला माझ्याबद्दल काय वाटतं ते. आणि जेव्हा कळलं तेव्हा....

खूप काळ लोटून गेलाय, क्षणामागून क्षण,कित्येक घटिका नि कैक उमेदीची वर्षे!मध्येच तुझी याद व्याकुळ करून जायची.तुझे हास्य नि तुझा गोड आवाज घुमत राहायचा कानाजवळ. कस सांगू तुला?एकट्या, रिकाम्या क्षणांत, तुझ्याच असणाऱ्या काळजाच्या खणात मी किती शोधलंय तुला!तू दिसायचीस नि फक्त हसायचीस ,काहीच न बोलता दिसेनाशी व्हायचीस. कधी गर्द हिरव्या झाडात, कधी टिपूर चांदण्यात, कधी सुर्योदयात, कधी अस्ताईच्या अनाकलनीय रंगात, कधी कुठल्याश्या गाण्यात, कधी रानात, किर्रर्र काजव्यांच्या आवाजात तू माझं हृदय उलगडून बघायचीस. मी पाहत राहायचो तुला निसर्गाच्या अनंत रुपात. माझ्याच प्रतिबिंबात ,मी वेडा तुला शोधत राहायचो .तुझ्या कपाळावर रुळलेल्या केसांच्या बटेला निरखत बसायचा एकटाच, तासन तास.मी हरवून जायचो मनाच्या खेळात.'तू हसलीस की मोगऱ्याची शिंपण व्हायची, प्राजक्ताचा सडा पडायचा, केतकीच्या बनात अधिकच गडद रंगात नि गंधात रंगा गंधाची उधळण व्हायची, तुझ्या रुणूझुणू पैंजण नादाने भवताल माझा किणकिणू लागायचा, हृदयात कालवाकालव व्हायची.

     एकदा तुला साद घालायला हवी होती ,तू हाकेच्या अंतरावर असताना असच वाटलं!पण; आयुष्यातून सुटून गेलेला तो क्षण काही केल्या उणा व्हायला तयारच नाही. तो घुटमळतोय तुझ्याभोवती,तुझ्यासाठी टाळ्या पिटत. तुला दुसऱ्या कोणी पाहू नये म्हणून मनात देवाची करुणा भाकत, आणि पाहिलं की काळजातला कल्लोळ लपवत पुन्हा नॉर्मल होत,तुझ्या नकळत तुला पाहण्यात मी दंग!

तुला माझ्याबद्दल काय वाटत हे माहीत नव्हतं, तरीही मन पतंगाप्रमाणे पुनःपुन्हा तुझ्यावर, तुझ्याकडे झेपावत राहायचं.

       आवडलं असत मला तुझ्याबरोबर आयुष्याची रंगीत स्वप्न विणायला नि रंगवायला. आपण निवडलेही असते रंग एकमेकांच्या आवडीचे, पांढरे, आकाशी, निळे, सावळे, गुलाबी, तांबूस, राखाडी नि सजवल्या असत्या स्वप्नातील सावल्या सत्यात. धुक्याची दुलई पांघरली असती, रुपेरी उन्हात न्हालो असतो, संध्याकाळ तर रंगवली, पोर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाला कोणती छटा दिली असती??अमावस्येला लुकलूकणारे असंख्य तारे त्या गर्द सावळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर रेखाटले असते, हिरव्याकंच वनराईतून जाणारा नागमोडी रस्ता,त्यात असणारा धबधबा, खोल दऱ्या फेसळला समुद्र, गंधित वाऱ्याचा धुंद पाऊस, रोमरोम पुलकित करणारी गुलाबी थंडी,सगळेच ऋतु तुझ्या सोबतीने रंगतदार, स्वरमयी, इंद्रधनुषी, नि जिवंत रसरशीत झाले असते. मी प्रेम शिंपलं असत माझं नि तू तुझी अक्षरं दिली असतीस. म्हणायला सुरेख दिसायला अलौकिक असाच झाला असता आपला सहप्रवास.एकत्र खूप मनमुराद जगलो असतो आपण. दोघांची स्वतंत्र ओळख जपत ,अबाधित ठेवत. पण; जमलंच नाही ग!कधी जमवून आणता आलंच नाही हे.

       वाटा वेगळ्या झालेले मुसाफिर आपण, आपली मंजिल एक नाही ग!कळतंय मला; पण अंतर्मन तुझा जप करतं वारंवार!आर्त हाक देतं तुला, साद घालत राहतं, "येशील पुन्हा त्या अल्लड वळणावर??"

       "बाबा,चला ना फिरायला जाऊ!!" मुलाच्या आवाजाने मी पुन्हा भानावर आलो. 

       समोर गुलाबी ढगातून हसत होतीस नेहमीसारखीच !! मोती शिंपून गेली ती सांजवेळ ,मी त्या करड्या गुलाबी केशरसड्यात न्हाऊन निघालो. माझ्या मनातल तुझं पान ,त्या पानावरील तुझी स्मृती, तुझ्यासरखीच अवीट, ताजीतवानी!!

       आजही तशीच लख्ख इतक्या वर्षा नन्तरही.

       सांजवेळ नि तुझी याद हवीहवीशी !!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy