कोरोना
कोरोना
नारायणचा २२-२३ ऑगस्टपासून घसा खवखवत होता. त्याला कणकण वाटत होती. आज सकाळी उठल्यावर त्याला शिंकांनी बेजार करून सोडले. त्याने आईला आवाज दिला,
"आई तेवढी डब्ब्यातली पॅरासिटेमल दे बरं!"
"नारायण, अनश्या पोटी पॅरासिटेमल घेनं चांगलं नाई, काई खाय मंग घे, दोन दिवसांपासून मी पाहून रायली तू दवाखान्यात जायाचं सोळून घरीच डॉक्टर होऊन रायला"
"बस शेवटची गोई घिऊन पायतो"
आई त्याला गोळी अन् पाणी देत म्हणते,
"पाय आता आराम नाई पळला तं तुले दवाखान्यातच धाळतो, आहो संध्याकाई याले डॉक्टरजोळ नेजा बरं"
नारायण गोळी घेऊन आराम करायला जातो. दुपारी नारायणला श्वास घ्यायला त्रास सुरू होतो. संध्याकाळी तर त्याचे अंग खूप तापते. तब्येत वाढत चालली पाहून त्याचे बाबा त्याला घरालगत जय हिंद चौकातल्या डॉक्टर जवळ घेऊन गेले... डॉक्टरांनी नारायणची ऑक्सिजन लेव्हल तपासली,
"भाऊ नारायणची ऑक्सिजन लेव्हल खूप कमी झाली आहे. याला कोरोनाचे सिमटन्स दिसत आहेत याला तुम्ही अर्जंट मेन हॉस्पिटलला न्या"
नारायणच्या बाबांनी लगेच नारायणला सरकारी दवाखाना मेन हॉस्पिटलला नेले. नारायण ची लक्षणे पाहून त्याला कोरोना वॉर्डात भरती केले जाते. त्याचा "स्वॅब" तपासणी करण्यासाठी पाठवला जातो. दुसऱ्या दिवशी २९ ऑगस्ट २०२० रोजी नारायण कोरोना पॉसिटीव्ह निघतो. तोपर्यंत त्याला ऑक्सिजन लागलेला असतो. नारायण कोरोना पॉसिटीव्ह निघाल्यामुळे त्याच्या घरच्या सर्वांची कोरोना चाचणी केली जाते. त्याच्या आई बाबा आणि भाऊ तिघांचा रिपोर्ट कोरोना पॉसिटीव्ह येतो. त्यांना सुद्धा दुसऱ्या कोरोना वॉर्डात भरती केले जाते. नारायणला आता १४ दिवस कोरोना वार्डात काढावे लागणार होते...१० सप्टेंबरच्या रात्री ड्युटीवरचे डॉक्टर नारायणला तपासतांना वार्ड बॉयला म्हणाले,
"बरं झालं याची तब्येत जमली मले तं वाटे की गळी जाते"
"हाव साहेब बीपी बी बम वाळला व्हता याचा"
"नारायणराव उद्या दुपारनंतर तुमाले सुट्टी देतो जमली तुमची तब्येत उद्यापासून तुमी कोरोना मुक्त!"
डॉक्टर गेल्यावर वार्डातील पेशंट आपापल्या कामात व्यस्त झाले. रात्री शहर शांत झाल्याने घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती मध्यरात्रीचे बारा वाजत होते नारायणची नजर घड्याळ खालच्या कॅलेंडरवर आली. घड्याळात मध्यरात्रीचे बारा वाजून गेल्याने सप्टेंबरच्या ११ तारखेवर नारायणची नजर स्थिरावली. नारायण झोप येत नसल्यामुळे एकसारखा ११ सप्टेंबर ची तारीख पाहत होता. मनातल्या मनात कोरोनाकाळातला स्वतःचा मागोवा घेत होता... रात्रभर जागरण केलेल्या नारायणाच्या डोळ्यांनी पहाटे कॅलेंडरवर ११ सप्टेंबर तारीख पाहत कधी विसावा घेतला त्यालाही कळले नाही...
आता त्याच्या डोळ्यासमोर प्रचंड अंधार होता. नारायण प्रवास करत असल्याचा भास त्याला होत होता. जणू तो त्याच्या काही जन्मा मागे चालला होता. हळूहळू त्याला जाणवू लागले की, तो अमेरिका देशात आला आहे. गाड्यांपासून ते माणसांच्या पेहरावापर्यंत सर्व काही १८ व्या शतकाच्या अखेरचे होते. एका सभागृहात शिरताच त्याला रंगमंचाच्या बाजूला तारखेचे हाताने लिहलेले बोर्ड दिसले त्यावर लिहले होते ११ सप्टेंबर १८९३. सभागृहात
सर्व धर्म परिषदेचे आयोजन केले गेले होते आणि तिथे जगातल्या विविध धर्माचे प्रतिनिधी जमले होते. नारायण ला काहीच कळत नव्हते तोच मंचावरील माईक समोर एक भगवे वस्त्र परिधान केलेला तेजस्वी व्यक्ती उभा झाल्याचे त्याला दिसले. निरखून पाहिल्यावर ती व्यक्ती साक्षात स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्र असल्याचे नारायणच्या लक्षात आले. सभागृह एकदम शांत झाले अन स्वामी विवेकानंदांनी भाषण सुरू केले,
"अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो..."
स्वामी विवेकानंदांचे हे शब्द ऐकताच संपूर्ण सभागृह उभे राहून टाळ्या वाजवू लागले... स्वामी विवेकानंदांनी सर्व धर्म परिषद जिंकल्याचे पाहून नारायण अवाक झाला. तो सभागृहाच्या बाहेर येताच त्याला नजरेपुढे अंधार दिसू लागला... चाचपडत एकेक पाऊल टाकत नारायण पुढे जाऊ लागला...
नारायणच्या डोळ्यासमोरचा अंधार हळूहळू दूर होत होता. त्याला गजबजलेल्या एका सभेचा आवाज ऐकू येऊ लागला. तो एका अनोळखी शहरात पोहचला. तो पुढच्या जन्मात पोहचला होता. त्याला काही सुचेना! आजूबाजूला पाहून त्याला दक्षिण आफ्रिकेत असल्याचं समजलं, मोठी हिम्मत करून त्याने एका व्यक्तीला विचारलं
"कोनतं गाव हाये हे"
नारायणचा चेहरा पाहून त्या व्यक्तीने नारायण ला इंग्रजीत म्हटलं, "इंडियन?"
नारायणने होकारार्थी मान हलवल्यावर त्या व्यक्तीने नारायणला बोटाने त्या दिशेने जाण्याची सूचना केली. नारायण तेथे पोहचताच त्याला एका नाटक शाळेत ट्रांसवाल एशियाटिक अध्यादेशचा विरोधात सभा सुरू असल्याचे दिसले. सभेत ट्रान्सवाल ब्रिटिश इंडियन एसोसियेशनचे अध्यक्ष श्री अब्दुल गनी भाषण देत होते,
"आज ११ सितम्बर १९०६ को जोहान्सबर्ग में इस नये और बाध्यकारी कानून का भारी विरोध दक्षिण अफ्रीका के भारतीय समाज द्वारा किया जा रहा हैं।"
मंचावर एक वकिलाचा कोट घालून मोहनदास नावाची व्यक्ती बसलेली होती. नारायणने लगेच खिशातील नोट काढून पाहली तर ती व्यक्ती ग
ांधीजी असल्याचे त्याला समजले. गांधीजींच्याच नेतृत्वात हा पहिला सत्याग्रह दक्षिण आफ्रिकी सरकार च्या काळ्या कायद्याच्या विरोधात अहिंसक मार्गाने ११ सितम्बर १९०६ रोजी सुरू असल्याचे पाहून नारायणही यात सहभागी झाला... ११ सप्टेंबर १९०६ महात्मा गांधींच्या सत्याग्रह संकल्पनेच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमात बसले असतांना नारायण यांनी वर सूर्याकडे पाहले त्यांचे डोळे चमकले. क्षणभर त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली.
नारायणने डोळे चोळून पुन्हा पाहिले तर त्याला ध्वजारोहणाची तयारी चाललेली दिसली. आजूबाजूला सैनिकांच्या वेशात भारतीय लोकं दिसली. पुढे एका बोर्डवर लिहलेले दिसले 'इंडो-जर्मन कल्चरल सोसायटी स्थापना सभा हॅम्बुर्ग ११ सप्टेंबर १९४२. नारायण जर्मनीत होता. जणू जन्माच्या पायऱ्या उतरत आहे असे त्याला समजले होते. भारताला स्वतंत्र्य करण्यासाठी आझाद हिंद सेनेची फौज नियोजन करत होती. फौजेचे नेतृत्व साक्षात नेताजी सुभाषचंद्र बोस करत असल्याचे पाहून नारायण ची छाती अभिमानाने फुगली. आझाद हिंद सेनेचे सैनिक शिस्तबद्ध ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उभे झाले. त्या दिवशी संपूर्ण वाद्यवृंदासह राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून देशाबाहेर 'जन गण मन' हे आपले राष्ट्रगीत प्रथम गायले जात होते. नेताजींच्या नेतृत्वात नारायणने 'जनगणमन' गाऊन झेंड्याला 'जय हिंद' म्हणून सलामी दिली... राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणारे नेताजींचे भाषण आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी पुढील मोहिमाची माहिती घेऊन नारायण तेथून निघाला... तोच त्याच्या नजरेसमोर मोठा धूर निघत असल्याचे त्याने पाहिले हळूहळू या धुरात नारायण हरवत गेला...
नारायणच्या चहूदिशांना फक्त काळा पांढरा धूर होता. धुरातुन रस्ता शोधत असताना नारायणला लोकांच्या रडण्याचा... वेदनांनी विव्हळतांनाचा... जीवाच्या आकांताने पळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. काही वेळ नारायणला काय सुरू आहे कळत नव्हते... नजरे समोरील धूर जसा धूसर झाला... इमारतीचा पडलेला ढाचा... त्यात अडकलेले लोकांचे मृतदेह आणि आजूबाजूला रक्तामासाचा चिखल पाहून नारायणच्या अंगावर काटे आले. नारायण हे दृश्य पाहून निशब्द झाला... एक बाई तिच्या जखमी लहान मुलाला मांडीवर घेऊन फोनवर कुणालातरी सांगत होती,
"टेररिस्ट हाईजॅक्ड एअरप्लेन्स अँड कॅरिड सुसाईड अटॅक ऑन वर्ड ट्रेड सेंटर"
सर्व प्रसंग पाहून त्याला कळून चुकले होते की, तो ११ सप्टेंबर २००१ च्या न्यूयार्क सिटी मधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी पोहचला आहे. जन्माच्या पायऱ्या उतरत उतरत नारायण न्यूयॉर्कमध्ये पोहचला होता. जन्माच्या पायऱ्या उतरण्याचा त्याचा हा प्रवास त्याला अनाकलनीय होता. नारायण भारतीय असल्याचे पाहून जीवाच्या आकांताने पळणाऱ्या एका भारतीयाने त्याला हिंदीमध्ये खडसावले
"अबे क्या देख रहा हैं , आतंगवादी और भी हमला कर सकते हैैं भाग"
नारायण सुद्धा घाबरून धावू लागला...दहशतवादी हल्ल्यामुळे झालेल्या प्रदूषणाची झळ पोहचू नये म्हणून धावता-धावता नारायणने खिशातील रुमाल काढून नाकातोंडावर मास्क सारखा बांधला आणि पळू लागला... तोच त्याला मोठ्याने ॲम्बुलन्सचा आवाज आला... आणि तो जागा झाला.
नारायणने डोळे उघडताच त्याला 'कोरोना विषाणू' चे चित्र दिसले. नारायण आता त्याच्या मूळ जन्मात परत आला होता. कोरोना विषाणूचे चित्र पाहून त्याने मनोमन कोरोना विषाणू साथीची तुलना न्यूयार्क च्या दहशतवादी हल्ल्याशी केली. त्याला कोरोना दहशतवादी वाटला. आज ११ सप्टेंबर २०२० असल्यामुळे नारायणने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १४ दिवसांचा दवाखान्यामधील कालावधी पूर्ण केला होता. डॉक्टरांनी नारायणला कोरोनावर मात केल्यामुळे निरोप देण्याची व्यवस्था केली होती.
दवाखान्याच्या बाहेर दवाखान्यातील स्टाफ दोन्ही बाजूंना उभे राहून एकसारखे टाळ्या वाजवून सन्मानपूर्वक निरोप देत असल्याचे पाहून, जणू नारायणनेच नरेंद्रसारखी सर्वधर्म परिषद जिंकल्याची त्याला जाणीव होत होती. दवाखान्यातून घरी येतांना त्याने पाहिले की, लोक मास्क घालून सामाजिक अंतर पाळत आपले काम करत आहेत. हे दृश्य पाहून कोरोनाच्या विरोधात अहिंसक मार्गाने सत्याग्रह चालला आहे आणि आपण मोहनदास म्हणजेच महात्मा गांधींसारखे त्याचे नेतृत्व करत आहो असे त्याला मनाला वाटू लागले. तो जय हिंद चौकातील घरी पोहचला. नारायणला शेजारच्या खिडकीतून दिसले की, शेजारच्या एका मुलाची ऑनलाइन शाळा सुरू होती आणि तो मुलगा भारताचे राष्ट्रगीत गाण्यासाठी सावधान स्थितीत उभा झाला होता. हे पाहून नारायण सुद्धा सावधान स्थितीत उभा राहिला आणि नारायणने त्या मुलासोबत 'जनगणमन' राष्ट्रगीत गायले. राष्ट्रगीत संपल्यावर जय हिंद चौकातील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला त्याने सलाम केला. हे पाहताच त्या मुलाने नारायणकडे पाहून स्मितहास्य केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्याप्रमाणे नीडर होऊन लढा दिला होता त्याप्रमाणे या कोरोना आणि कोरोना परिस्थितीशी भारत देशाला लढावे लागेल ही खात्री त्याला पटली. देशभक्तीच्या याच पवित्र भावनेने नारायण त्या मुलाकडे पाहत, "कोरोनाशी लढलो... लढू अन् लढत राहू..." असे मनातल्या मनात म्हणत घरात प्रवेश करण्यासाठी पुढे निघाला...