निलेश कवडे

Romance Fantasy

4.0  

निलेश कवडे

Romance Fantasy

डब्बा

डब्बा

4 mins
388


"अहो तुमच्या पूर्ण औषधी आणल्यात, ही पंधरा रुपयांची चिल्लर उरली आहे काय करू?"


"आपल्या जुन्या डब्ब्यात ठेव पेट्रोल ला कामात येतील"


"डब्बा तर कधीचा भरला आहे"


"भरणारच होता कित्येक दिवसांपासून मी घरीच आहे ना! फिरायला जाता आलेच नाही"


असे म्हणताच रवीचे डोळे पाणावले, त्याचे पाणावलेले डोळे पाहून डोळे शिल्पा त्याच्या जवळ आली आली त्याला बिलगून रडू लागली… रडता रडता ती स्वतःला सावरून उठली आणि रवी ला धीर देत म्हणाली,

"डॉक्टरांनी सांगितले आहे की तुम्ही 'वॉकर' च्या साहाय्याने थोडे थोडे चालणे सुरू करा. हळूहळू तुम्हाला व्यवस्थित चालता येईल.... आपण रोज पैदल फिरायला जात जाऊ…"

 

रवी वैतागून म्हणतो, "रोज फिरायला जाऊच पण ह्या वॉकर सोबत किती दिवस फिरू...वॉकर शिवाय मला केव्हा चालता येईल?" 


"चालता येईल ना! काही दिवस वॉकर वापरा, नंतर मी आहे ना तुमची 'पर्मनंट वॉकर' तुम्हाला चालवायला"


हास्य विनोद करून शिल्पा घरकामात व्यस्त होते. रवी आणि शिल्पा काही वर्षा आधीच नोकरीहून निवृत्त झाले होते. दोघांचा म्हातारपणाचा प्रवास एकमेकांना समजून धीर देऊन सुरू झालेला होता. सर्व काही ठीक असतांना एका दिवशी रवीला मॉर्निंग वॉक करताना एक अज्ञात व्यक्ती गाडी नियंत्रित न झाल्याने जबर धडक देतो. या अपघातात रवीच्या एका पायाला गंभीर दुखापत होते. त्यामुळे त्याला भविष्यात चालता येणार की नाही या तणावाखाली तो होता. पलंगावर बसून रवी विचार करतो… पेट्रोलवर विचार करता करता तो कधी भूतकाळात जातो त्यालाही कळत नाही.


रवी आणि शिल्पा या दोघांनी आंतरजातीय प्रेम विवाह केला होता. कॉलेजमध्ये रवी एम.कॉम ला असतांना एफ वाय बी. कॉम ला असलेली शिल्पा त्याला आवडली होती. युथ फेस्टिवलला सोबत असताना त्यांना प्रेम झाले होते. पुढे काही वर्षातच त्यांनी आपापल्या घरच्या मंडळींच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह केला होता. प्रेमविवाह केल्यानंतर त्यांना प्रचंड आर्थिक अडचणी सोसाव्या लागल्या होत्या. दोघेही विद्यार्थी असल्यामुळे बेरोजगार होते. जवळच्या मित्रांनी दिलेल्या मदतीवर त्यांचा संसार सुरू होता. शहरात एका ओळखीच्या ठिकाणी भाड्याच्या खोलीमध्ये त्यांनी संसार सुरू केला होता. पैसे सरत आल्यामुळे रवी एका कंपनीमध्ये कसाबसा तात्पुरता जॉब सुरु करतो. 


पगार अत्यंत कमी असल्यामुळे शिल्पा आणि रवी फार जपून एक एक रुपया खर्च करायचे. त्यावेळी रवी जवळ त्याची हिरो होंडा गाडी होती. मात्र पेट्रोल भरायला पैसे नसल्यामुळे ती गाडी त्याने उभी करून ठेवली होती. रवी शिल्पाला घरकामासाठी फार मोजके पैसे द्यायचा. शिल्पा त्या पैशामध्ये बचत करून उरलेले चिल्लर पैसे एका छोट्या डब्यात जमा करायची. महिनाभरात पेट्रोल पुरते पैसे जमा झाल्यावर दोघेही त्याच्या हिरो होंडा गाडीवर आनंदाने बाहेर फिरायला जात होते. पुढे त्यांना दोन मुली होतात. संसाराचे एक तप हा आर्थिक संघर्ष चालतो. दोघांनाही त्याचे कुटुंब स्वीकारत नाहीत. पुढे शिल्पा आणि रवी दोघांनाही चांगल्या पगाराची नोकरी मिळते. काही दिवसांत चारचाकी गाडी, आलिशान बंगला, चांगले बँक बॅलन्स असे ते आर्थिक दृष्ट्या संपन्न होतात. आर्थिक दृष्ट्या ते संपन्न होऊनही शिल्पा पैशांचा तो डबा जपून ठेवते. तो डब्बा त्यांच्या संघर्षाचे प्रतिक असतो. त्या डब्ब्याने दोघांचा संघर्ष जवळून पाहिला असतो. तो डब्बा त्यांना जुन्या परिस्थितीची  जाणीव करून देणारा असतो. तो डब्बा जणू त्यांच्या प्रेमाची निशाणी असतो. तेव्हापासून कित्तेक वर्ष त्या पैशांमध्ये जमा झालेल्या रकमेचे पेट्रोल गाडीमध्ये टाकून ते मुद्दाम फिरायला जात होते. त्या डब्यातील पैशांचे पेट्रोल भरून फिरायला गेल्यावरच्या आनंदाची बात काही औरच होती.


आज तो डब्बा पैश्याने भरला होता. मात्र रवी पायाला अपघात झाल्यामुळे गाडी चालवू शकत नव्हता. ही खंत त्याला खात होती. वॉकर च्या साहाय्याने रोज त्याचा चालण्याचा सराव सुरू होता. अपघात झाल्याची बातमी दोघांनीही मुलींपासून लपवून ठेवलेली असते. रवी आणि शिल्पा दोघेही फार स्वाभिमानी होते. मुलींना जावयांना आपला त्रास होऊ नये याची दोघेही काळजी घेत होते. एका दिवशी दोन्ही मुली सकाळीच त्यांच्या घरी हजर होतात. कोणीतरी त्यांना वडिलांचा अपघात झाला ही बातमी देतो. वडिलांचा त्रास पाहून दोन्ही मुली रडायला लागतात. वातावरण अत्यंत भावूक होते. रवी हे सहन न झाल्यामुळे वॉकर घेऊन चालायला निघतो. शिल्पा मुलींना सांगते की, "डॉक्टरांनी त्यांना बिना वॉकरचे चालायला सांगितले आहे परंतु त्यांच्या मनात धास्ती आहे की ते खाली पडतील" हे ऐकल्यानंतर दोन्ही मुली धावत जाऊन त्यांच्या बाबांचे वॉकर बाजूला काढून त्यांचे हात खांद्यावर घेऊन त्यांना चालायला सांगतात. हा प्रसंग पाहून शेजाऱ्यांच्या पापण्या सुद्धा पाझरू लागतात. दोन्ही मुलींचा आधार मिळाल्यामुळे रवी बिना वॉकरचा चालू लागतो. 


दोन्ही मुली त्यांच्या बाबांच्या सेवेसाठी माहेरी थांबतात. हळूहळू रवीचा पाय चांगला होत होता. बिना आधाराने तो चालू शकत होता मात्र गाडी चालवू शकत नव्हता. जुना पैशांचा भरलेला डब्बा पाहून रवीचे झुरणे सुरू होतेच. एका दिवशी रवी त्या डब्ब्या कडे एकटक बघत विचारात मग्न होतो. हे पाहताच दोन्ही मुलींना गहिवरून येते. त्यांच्या बाबांची खंत समजताच त्या तो पैश्याचा डब्बा उचलतात आणि रवीच्या ॲक्टिवा या दुचाकीने बाहेर जातात. रवी त्यांना जोराने आवाज देतो. मात्र गाडीच्या आवाजात त्याचा आवाज विरघळून जातो. 


थोडया वेळाने दोघी घरी येतात. मोठी मुलगी आईला जोरात आवाज देते, "आई! ए आई! चल बाहेर ये, बाबा तुला फिरायला नेणार आहेत." रवी आणि शिल्पा बाहेर येऊन पाहतात तर त्याच्या गाडीला आधार देणारी चाकांची दोन्हीं बाजूला स्टेपनी बसवलेली असते. छोटी मुलगी रवीला म्हणते, "बाबा तुमचा पाय चांगला होईपर्यंत ही स्टेपनी गाडीला असू दया, नंतर काढून टाका. आम्ही डब्यातल्या पैशांचे गाडीमध्ये पेट्रोल भरून आणले आहे, आईला फिरायला घेऊन जा" रवी आणि शिल्पा दोघांचे डोळे भरून येतात. पाणावलेल्या डोळ्यांनी दोघे गाडीवर आनंदाने बसून मुलींना 'बाय' करतात. एक मुलगी शिल्पाला गमतीने म्हणते, "नीट पकड बाबांना, लाजू नको हं!" चौघेही जोराने हसतात. आईबाबांना गाडीवर पाठमोरे बसलेले पाहून दोन्ही मुलींच्या मनाचे भरलेेले डब्बे त्याच्या डोळ्यातून वाहू लागले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance