निलेश कवडे

Others

3.5  

निलेश कवडे

Others

कारुण्य माणसाला संतत्व दान देते

कारुण्य माणसाला संतत्व दान देते

6 mins
127


'कारुण्य माणसाला संतत्व दान देते' हा आदरणीय श्रीकृष्ण राऊत सरांचा गझल संग्रह 'सूर्यमुद्रा प्रकाशन' नांदेड यांनी मे २०१९ मध्ये प्रकाशित केला आहे. श्रीधर अंभोरे यांनी या संग्रहाला सूचक मुखपृष्ठ दिले आहे. 'श्रीकृष्ण राऊत' हे नाव समकालीन 'मराठी साहित्य क्षेत्रामध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. गेली चार दशकं गझलेची साधना करणाऱ्या राऊत सरांचा हा केवळ दुसरा गझलसंग्रह. 'गुलाल आणि इतर गझला ' ह्या त्यांच्या पहिल्या गझलसंग्रहाची दुसरी आवृत्ती देखील नुकतीच प्रकाशित झाली आहे.


गझलसम्राट सुरेश भट यांच्या मराठी गझलेची बाराखडी नंतर अनेक जाणकार आणि ज्येष्ठ गझलकारांनी मराठी गझल कारवा पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यात श्रीकृष्ण राऊत सरांनी योग्य वेळी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. त्यांनी वेळोवेळी मराठी गझलबाबत व्यक्त केलेल्या विचार मंथनाचा अनुकूल प्रभाव मराठी गझल अधिक दर्जेदार होण्यासाठी झाला आहे. त्यांचा 'माझी गझल मराठी' हा ब्लॉग, त्यांच्या संपादनातील 'सीमोल्लंघन' हा गझल विशेषांक आणि फेसबुकवरील त्यांची वॉल हे कायम मराठी गझलला समर्पित असते. गझल लेखनासोबत त्यांचे हे कार्य आजच्या आणि येणाऱ्या पिढ्यांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शक राहील. त्यांचा पुढील शेर पहा,


'किती भेटते गझल खरी 

अन् गझलेचे भास किती '


हा शेर गझलेचा 'भास' निर्माण करणाऱ्यांना आरसा दाखवतो. खरी गझल काळाच्या आणि रसिकांच्या कसोटीवर खरी उतरते. तिचे वलय क्षणिक नसते ती दीर्घ काळ असर दाखवते. तिच्या परिघाचा थांग लागत नसतो कारण तिच्यात येणारे संदर्भ शाश्वत असतात.


'मनाच्या द्वाड घोड्याला सदा ताब्यात ठेवावे

पुढे नसणार बाळा मी तुला सांभाळण्यासाठी '


असे शेर हा संबोध आणखी दृढ करतात. राऊत सरांच्या गझलेमध्ये रसिकांना कवितेशी समरसता साधण्याची शक्ती आहे त्यामुळे वाचक या संग्रहाशी एकरूप होऊन जातो.


'खोट्या-खऱ्यात आता उरला न भेद काही

निवडू कसे कुणाला, भांबावलो कधीचा '


म्हणूनच असे शेर द्विधा मनस्थिती असलेल्या माणसाचं प्रतिबिंब वाटतात. त्यांची गझल लेखनाची स्वतःची शैली आहे. त्यांची गझल कायम वेगळेपण जपत आली आहे. खयालांच्या बाबतीत ती श्रीमंत आहे. अस्सल कविता ही शब्दाच्या माध्यमातून मनात हळुवार उतरत जाणारी अनुभूती असते हा संग्रह वाचकांना अगदी हाच प्रत्यय देतो. 


'व्हायचे वाईट याहुन काय आता 

माय वागवणे मुलाला शक्य नाही '


हा शेर वाचताच माणूस स्तब्ध होतो. शेरात व्यक्त झालेली खंत आपल्याला आपल्या परिघातील अशा प्रवृत्तीच्या मुलांची उदाहरणे ठळकपणे नजरेपुढे आणतो. एखाद्याला त्याची खोटी प्रतिष्ठा, त्याचा बेगडी स्वाभिमान आणि श्रीमंतीचा माज आईपेक्षा मोठा वाटू लागतो तेव्हा त्याला स्वतःच्या आईची लाज वाटू लागते. समाजात उतारवयातल्या विशेषतः पती हयात नसलेल्या बाईचे तिच्या लेकरांना ओझे नकोसे वाटते. ही शोकांतिका प्रभावीपणे राऊत सरांची गझल मांडते. तिच्या या निर्भीड स्वभावामुळे ती मला वैशिष्ट्यपूर्ण वाटते. आईच्या वेदना मांडतांनाच ती आजच्या मुलांच्या आणि बापाच्या नात्यांमधील फोलपणा उघड करते. घरी जेव्हा लहान लेकरू ऐकत नाही तेव्हा मायबाप त्या लेकरांच्या शिक्षकाची मदत घेतात,


'वाह्यात कारट्याला शिक्षा करा गुरूजी, 

बापास लेक म्हणतो 'जा! जा! मरा कुठेही! '


एक काळ होता जेव्हा वडिलांच्या नुसत्या नजरेने लेकरू धाकात राहायचे मात्र आज राहणीमानात झालेल्या बदलामुळे लेकरांना वडिलांचा धाक राहिला नाही. ही बाब वरील शेर अधोरेखित करतो. त्याच वेळी लेकरांपासून अवास्तव अपेक्षा ठेवणाऱ्या पालकांना राऊत सर पुढील शेराच्या माध्यमातून कर्तव्याची जाणीव ही करून देतात,


'तुझा अवतार आहे रे, नसे तो रेसचा घोडा 

कधी नापास स्वीकारा, जरासा श्वास घेऊ द्या '


हा संग्रह म्हणजे राऊत सरांच्या व्यक्तित्वाचे दर्शन आहे. त्यांनी तटस्थपणे समाजातील बदलांची नुसती नोंद घेऊन लेखन केलेले नाही. प्रत्येक नोंदी मागे त्यांनी केलेलं चिंतन आपल्याला प्रत्येक शेरामधून अनुभवता येते. 


'किनारी चंद्रभागेच्या विकत घ्या प्लॉट मोक्याचे 

तुम्हाला सांगतो तुमच्या भल्यासाठी तुकारामा '


हा शेर त्याचे बोलके उदाहरण म्हणता येईल. गझल लेखन करतांना प्रत्येक 'शब्द' महत्वाचा असतो. केवळ मात्रापूर्तीसाठी भरीचा शब्द गझलेत आला तर तो संपूर्ण शेराची मजा खराब करतो. शब्दांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची गझल साकारलेली आहे. ती जीवनदर्शन घडवते. प्रसंगी ती प्रबलन देते तर काही ठिकाणी ती थेट भाष्य करते.


'कोण ठेवतो बंदुक खांद्यावरी तुझ्या 

असा तुझा का होतो वापर, चिंतन कर '


असा शेर वाचकांना चिंतन करायला भाग पाडतो तेव्हा राऊत सरांच्या गझलेचे खरे महत्त्व अधोरेखित होते.


या संग्रहाचा मानसशास्त्रीय दृष्टीने विचार केला तर या संग्रहातील गझल मनातून मनाचा प्रवास करणाऱ्या आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. कारण या गझलांमधून व्यक्त झालेल्या तत्वज्ञानाला मानसशास्त्रीय आधार आहे. त्यामुळे हा गझल संग्रह मनाला इष्ट वळण देतो.


'तलवारिचा कसाही चुकवेल वार तो 

खोट्या तुझ्या स्तुतीने होईल ठार तो! '


असे शेर व्यक्तीच्या मानसिकतेचा अचूक वेध घेतात.कविता ही कला आहे ती भावपूर्ण असते, राऊत सरांची गझल भावनिक नाते निर्माण करते. ती केवळ राऊत सरांची राहत नाही, ती 'भाववृत्ती' जपते. ती वाचणाऱ्या प्रत्येकाला आपली वाटते. 'गझल ही वृत्ती आहे' असे पु. ल. देशपांडे म्हणाले होते. त्याच 'वृत्ती'चा प्रत्यय देणारा हा गझल संग्रह आहे. त्यामुळे हा गझल संग्रह संपन्न वाटतो.


मराठी गझलच्या अंगभूत सौंदर्याचे दर्शन घडवणारा हा गझलसंग्रह आहे. राऊत सरांच्या गझल संवादी आहेत. त्या व्यक्तीला स्वतःशी बोलण्यासाठी सुद्धा मजबूर करतात.


'घरवालीशी तुझा अबोला 

मोबाइलवर किती बोलतो!'


या शेरामुळे आपला आभासी मुखवटा गळून पडतो. हा शेर छोट्या बहरात आहे. छोट्या बहरात त्यांचा आणखी एक शेर पहा,


'तीच माझी दवा शेवटी 

जा, तिला बोलवा शेवटी '


कमीत कमी शब्दांत जास्तीतजास्त आशय कसा मांडायचा याचा वस्तुपाठ हे शेर आहेत. 


या गझल संग्रहातील शेर जिज्ञासा ताणून ठेवतात उत्कंठा वाढवतात, कधी वाचणाऱ्याला आश्चर्याचा गोड धक्का सुद्धा देतात.त्यांचे पुढील शेर वाचा-


'टीका करून त्यांनी आम्हास शुद्ध केले 

मानू हजार वेळा आभार निंदकांचे '


'मोठमोठ्या चार बाता स्टेजवरती सांगणारा 

मागताना दोन टक्के केवढा लाचार बापू '


'वर्षामधुनी दोन-चारदा रस्ते झाडू, फोटो छापू 

संत गाडगेबाबा तुमचा रोज खराटा नको वाटतो! '


अशा शेरांमुळे त्यांची गझल, गझलेतील सहजता जपून अंतर्मुख व्हायला लावते. त्यांची गझल प्रवाही आहे, ती एक लख्ख उजेड पेरून मनाचा अंधार दूर करते. 


'भाग होते जिंकणे सैन्यास माझ्या 

कापला मी वापसीचा दोर होता '


आत्मबळ वाढवणाऱ्या अशा शेरांना चिंतनशील विचारांची बैठक आहे. या संग्रहातील गझल प्रेमातील अलवार भाव मांडतांना हळवी होते. ती प्रेमातील स्थायीभाव आपल्या अनोख्या शैलीत जपते.


'शेजेवरती सांगे ताबा घरी रुक्मिणी 

कोणी वेडी मीरा दारी प्रेम मागते'


हा शेर गझलचे नाते विचारांसोबतच भावनेशी असते याची जाणीव करून देतो. त्यांच्या गझलेतील 'गझलियत'ची ही कला राऊत सरांना कशी साधली याचे उत्तर जणू त्यांचा पुढील शेर देतो,


'ओठ माझे चुंबिण्या ओठांवरी आली गझल 

हात माझा घेत हाती प्रेयसी झाली गझल'


प्रेमातील पावित्र्याइतका शुद्ध भाव गझलेत सुद्धा जपला गेला पाहिजे हा त्यांचा आग्रह या शेरातून व्यक्त होतो. गझल ही साधना आहे, एक तपस्या आहे, त्यामुळे निर्मोही होऊन गझलेला समर्पित झाल्याखेरीज पर्याय नाही हे 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते' च्या माध्यमातून अधोरेखित होते. अलीकडच्या काळात गझल लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक मराठी गझलकार ताकदीने लिहीत आहेत नवीन विषय मांडत आहेत मात्र अजूनही काही कवी सहजता असलेलं लिहिण्या ऐवजी गझलेला सहजपणे घेत आहेत. राऊत सरांची गझल ही बाब प्रकर्षाने मांडते.


'पोटातल्या भुकेने लिहिले अनंत मिसरे 

कुरवाळतो कशाला शेरात गाल आता ? '


हा शेर गझल क्षेत्रात झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी हपापलेल्यांचा जणू समाचार घेतो. म्हणूनच गझल प्रामाणिक आणि निर्भीड होऊन लिहावी लागते असा काहीसा अनुभव राऊत सरांना त्यांच्या जीवनात आल्याचा पुढील शेर सूचकपणे सांगतो,


'छातीस लाव माती, शब्दात बांध हत्ती 

डरपोक माणसाला गझलेत स्थान नाही '


'कारुण्य माणसाला संतत्व दान देते' हा गझल संग्रह सामान्य माणसाच्या संघर्षाचे प्रतिबिंब आहे. या संग्रहात वेगवेगळ्या वृत्तातील जवळजवळ ७८ गझल आहेत संग्रहाच्या शेवटी काही सुट्या शेराचा समावेश आहे. संपूर्ण संग्रहात सहा गझल ह्या केवळ चारच शेरांच्या आहेत. काफियाला शरण जाऊन गझल लिहू नये याच्या जणू त्या द्योतक आहेत असे वाटते. गझलांचा क्रम अकारविल्हे आहे. या संग्रहातील गझलांची मांडणी वैविध्यपूर्ण आहे. तिच्या आशयात नाविन्य आहे. राऊत सरांची गझल संस्काराचे जिवंत प्रतीक वाटते. ती रसिकांच्या अंतरंगात अनुकूल बदल घडवून आणते. ती जीवनात रंग भरते त्यामुळे तिचे मराठी साहित्य विश्वात मानाचे स्थान आहे. त्यांच्या आजवरच्या गझल साधनेचे संचित हा गझल संग्रह वाटतो म्हणूनच या संग्रहातील गझलांची शैली राऊत सरांच्या आधीच्या गझलांपेक्षा मला थोडी वेगळी वाटते. हा संग्रह जगण्यासाठी सकारात्मक विचार पेरतो. असाच वैश्विक विचार असणाऱ्या राऊत सरांच्या शेराने समारोप करतो -


'कारुण्य माणसाला संतत्व दान देते 

आपापल्यापरीने हृदयात वाढवावे'


Rate this content
Log in