निलेश कवडे

Tragedy Fantasy

3.5  

निलेश कवडे

Tragedy Fantasy

पिंपळास मोर्णा मायचे पत्र

पिंपळास मोर्णा मायचे पत्र

4 mins
144


प्रिय, पुराण पुत्र पिंपळ...

   फार वर्षापूर्वी सध्याच्या अकोला शहरातील जुनी वस्ती आधी एक ओबडधोबड टेकडी होती, त्या टेकडीला वळसा घालून मी वाहत होती. टेकडीवर हिरवीगार वृक्ष संपदा होती. कालांतराने या टेकडीवर मानवी हस्तक्षेप वाढला. आजूबाजूच्या गावातील काही लोकांनी या उंच टेकडीवर आश्रय घेतला. आजूबाजूच्या परिसरातील शेती कसने सुरू झाली तशी या टेकडीवर वर्दळ वाढली. तोपर्यंत अकोलसिंह नावाच्या एका रजपूत राजाच्या नावावरून या टेकडीला 'आकोला * हे नाव पडलेले होते. पुढे मुघल काळात या वस्तीचा ताबा औरंगजेबच्या सैन्याने घेतला. 'असदखान' या मुघल सरदारने टेकडी भोवताली मजबूत भिंती उभारून तटबंधी बांधली. टेकडीच्या सभोवताली बुरून उभारला आणि असदगड किल्ला नावारूपास आला. तोवर या छोट्याशा किल्ल्याला आकोला किल्ला म्हटले जात होते. या सर्व घटनांचे साक्षीदार मी होतेच पण सोबतच माझ्या किनारी तुझ्या रुपात असलेला पिंपळाचा एक भला मोठा वृक्ष होता. तुला मी माझा, म्हणजेच 'मोर्णा मायचा पुराणपुत्र पिंपळ' म्हणत असते. भूतकाळामध्ये तू वारंवार छाटल्या गेलास, कितीवेळा तोडल्या गेलास परंतु तरीही तू तग धरून होतास. किल्ल्यावर वस्ती स्थिरावल्यानंतरच्या काळात साधारणत १८५० पासून तू मोठे विस्तीर्ण रूप घेणे सुरु केले. २०१० नंतर जन्मलेल्या अकोलेकरांना प्रमाण मानले तर सुमारे सात - आठ पिढ्यांचा साक्षीदार तू पुराणपुत्र पिंपळ होतास. 


   माझ्या काठावर तुझे बालपण गेले. अकोला शहराच्या जडणघडणीचा तू साक्षीदार होतास. सद्याच्या अकोला महानगरात सर्वात उंचीचे भौगोलिक ठिकाण म्हणजे जयहिंद चौक जुने शहराचा परिसर होय. तू या भागात सर्वात उंचीचा वृक्ष होतास. तुझ्या सावलीत अनेक पिढ्यां लहानाच्या मोठ्या झाल्यात. तुझी सावली कातरवेळी थेट माझ्या पात्रापर्यंत पोहचायची. पूर्वेकडून अकोल्याला आलेल्या माणसांना त्यावेळच्या अकोल्याचे प्रतिबिंब माझ्या संथ, नितळ आणि स्वच्छ प्रवाहात दिसायचे, तुझी हिरवीगार प्रतिमा माझ्या पात्रामध्ये पाहून जणू या मोर्णामायला 'मोरपंखी मोर्णा' ही उपमा मिळाली होती. याचा किती अभिमान वाटायचा मला! तुझा गार वारा जीव लावायचा इथल्या प्रत्येक अकोलेकरांवर. "राजराजेश्वराच्या चरणी लीन होण्यास जाणारा शिवभक्त" असो वा "खिडकीपूरा मस्जिद मध्ये नमाज पठणास जाणारा मुस्लिम धर्मीय" तुझ्या सावलीने कुणाचा कधीच भेदभाव केला नाही. तुझा शितल वारा असदगडाच्या हवामहलात सुद्धा पोहचायचा. अकोल्याच्या अनेक पिढ्यांना तू आधार होतास… पोळा, नवरात्र, गणपती उत्सव, कावड पालखी महोत्सव , ईद आणि इतरही अनेक सण-उत्सव आजवर तुझ्याच छत्रछायेत आनंदाने साजरे झालेत. जेव्हा माझ्या पात्रावर एकही पूल नव्हता तेव्हा दहीहंडा वेशीतून अकोल्याला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना तुझं दर्शन व्हायचं जणू अकोल्याला आलेल्या पाहुण्यांचे तू स्वागत करायचा. जुन्या अकोल्याची तू ओळख बनला होतास.


   तुझ्या छायेखाली माझ्या अनेक लेकरांचे बालपण गेले. डाबडुबली, लपंडाव सारखे खेळ मुलं तुझ्या आधारानेच खेळत होते. तुझ्या सावलीत 'हुतुतू' खेळायचे. कुस्त्या लढवल्या जायच्या. देह जीर्ण झालेल्या म्हाताऱ्यांनाही तुझाच खरा सहारा होता. तुझ्या सानिध्यात अनेकांचे एकटेपण दूर होत होते. तुझ्या प्रत्येक पानांशी त्यांचा संवाद व्हायचा. तुझ्या पानांचे मधुर संगीत अकोलेकरांना मायेने कुरवाळत होते. तुझ्या पानांची लयबद्ध सळसळ ऐकून माझ्या पात्रात तरंग उठायचे. "शहराळलेल्या" अकोलेकरांना 'आता कोण मायेने कुरवाळणार?' तुझी कित्येक जाळीदार पानं इथल्या लेकरांनी काळजाच्या वहीत जपली आहेत. कित्येक चुलींना तू 'सरपन' पुरवले. तुझ्या पानांनी आजवर अनेक प्राण्यांची भूक भागवली. पक्ष्यांना तू हक्काचा निवारा दिलास. तू अकोला शहरातले अनेक पूर पाहिलेस. दुष्काळात तुझी हिरवळ या शहराला कायम दिलासा देत आली. इथल्या स्वार्थी माणसांना तुझी अडचण झाली तरी तू त्यांना शुद्ध प्राणवायूंची कधीही चणचण भासू दिली नाहीस. तुझ्यामुळेच जुन्या अकोल्याची सकाळ आल्हाददायक वाटायची. या शहरातले विविध क्षेत्रातील तू चढ-उतार अनुभवले आहेस. तुझ्या किती! किती! आठवणी आहेत माझ्या काळजात... मला तर गहिवरुन येत आहे. 


   आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर तुझ्या उंच फांदीवर फडकवलेला आपला राष्ट्रध्वज तिरंगा माझ्या आजही स्मरणात आहे. तू किती स्वाभिमानाने उंच गगणी डौलाने तिरंगा फडकवला होतास! स्वातंत्र्याचा जयघोष तुझ्या पानांनी उंच गगनात पोहचवला होता. शहरात झालेल्या अनेक आंदोलनांचा तू साक्षीदार होतास. काँक्रीटच्या अतिवापरामुळे जमिनीत तुझ्या मुळांना होणारी अडचण मी जाणून होती. तुझा भला मोठा विस्तीर्ण पसारा सांभाळतांना तुझ्या मुळांना करावी लागणारी कसरत मी जवळून पाहत आली आहे. तू आजवर अनेक वादळांना धैर्याने सामोरा गेलास, कित्तेक संकटं तू परतून लावलीस मात्र १९ मे २०२१ रोजी रात्री आलेल्या वादळाने घात केला आणि तुझ्या खोडाला तडा गेला. वादळ वाऱ्यात दुर्दैवाने तू खोडापासून उन्मळून पडलास. तू पडल्यानंतर लगेच तुझ्या तुटलेल्या खोडांना आणि फांद्यांना तोडून वेगळे करणे सुरू झाले. जेसीबी मशिनव्दारे तुझे अवयव उचलणे सुरु झाले. तुझी मूळं जमिनीत शाबूत असतांना ही माणसं आता तुला कायमचे तोडणार की काय? ही धास्ती आता मला वाटतं आहे. तुला पुन्हा मोहरायची संधी देणार की नाहीत या प्रश्नाने मी व्याकूळ झाले आहे. तुझे अस्तित्व जपण्यासाठी… अकोल्याच्या इतिहासाला जपण्यासाठी तुला पुन्हा संधी मिळालीच पाहिजे, तू पुन्हा मोहरावं ही या चिंताग्रस्त मोर्णा मायसह अनेक अकोलकरांची इच्छा आहे. उद्या काय होईल हे मला ठाऊक नाही मात्र तुझ्या मुळांमधून तू माझ्या किनारी पुन्हा एकदा डौलाने उभा राहा… जर सद्या आहे तिथे तुला मोहरण्याची संधी मिळाली नाही तर तू माझ्या काठावर कुठेतरी पुन्हा मोहर… ही या मोर्णामायची... एका आईची इच्छा आहे, माझ्या पुराण पुत्रा माझी ही इच्छा तू पूर्ण करशील ना !

….. तुझी मोर्णा माय


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy