निलेश कवडे

Drama Inspirational

4.5  

निलेश कवडे

Drama Inspirational

लग्नाला नक्की या सर

लग्नाला नक्की या सर

10 mins
901


सातपुड्याच्या पायथ्याशी लायणापूर नावाचे एक आदिवासी बहुल गाव होते. गावात काही जमातीचे लोक राहत होते. शेतमजुरी हा बहुतांश गावातील लोकांचा व्यवसाय होता. रोजगारासाठी अनेक लोकं टोळीने स्थलांतर करायचे. गावात विविध जमातीचे लोक राहत असले तरी सर्व लोक आपापल्या प्रथा-परंपरा जोपासत होते. गावातील एक जमात दुसऱ्या जमातीच्या प्रथा-परंपरेमध्ये कधीच हस्तक्षेप करत नव्हती उलट एकमेकांच्या परंपरांचा आदर करत होते. गावात शैक्षणिक वातावरणाचा अभाव होता. गावात सातवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा होती. दाखल पात्र सर्व विद्यार्थ्यांची नावे पटावर नोंदवलेली असत मात्र बहुतांश विद्यार्थी शाळेत दररोज येत नव्हती. शिक्षक आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना दररोज उपस्थित ठेवण्यासाठी पालकांना आवाहन करत मात्र पालक शिक्षकांचे आवाहन फारसे गांभीर्याने घेत नसत. रेकॉर्डवर आठवीपर्यंत अलीकडच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण झालेले होते मात्र गावातील वडीलधाऱ्या मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात निरक्षरता होती. मजुरी करून कमावलेल्या पैशातून एक वेळ घरात धान्य आले नाही तरी चालेल मात्र पोटात दारू गेलीच पाहिजे असा अलिखित नियमच गावात होता. शासनाकडून मिळालेले राशन आणि दारू पिऊन उरलेल्या रकमेच्या भरवशावर बहुतांश गावकऱ्यांचा संसार चालला होता. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे त्यांना महत्त्वाचे वाटत नव्हते. 


गावात रमेश जमुऱ्या नावाचा व्यक्ती राहत होता त्याला बबली, अनिता, बबिता आणि गणेश अशी चार मुले होती. चार मुलांपैकी अनिता, बबिता आणि गणेश यांची नावे गावातील जिल्हा परिषद शाळेत दाखल होती. अनिता सातवीत, बबिता पाचवीत आणि गणेश तिसरीत होता. तिन्ही मुलं शाळेत सोबत यायची एक जरी घरी राहिलं तर तिघेही घरी राहायची. एकदा गावातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाची बदली झाली त्याच्या जागेवर काकडे नामक शिक्षकाची बदली झाली होती. नवीन आलेल्या शिक्षकाबद्दल गावातील मुलांमध्ये बरीच उत्सुकता होती. नवीन सर कोण आहेत? कसे आहेत? त्या कुतूहलाने विद्यार्थी शाळेत येऊ लागले होते. काकडे सरांकडे पाचवी ते सातवीला इंग्रजी, मराठी आणि गणित विषय शिकवायची जबाबदारी होती. त्यांनी सुरुवातीला प्रत्येक विद्यार्थ्याची केस स्टडी केली. त्यांच्या लक्षात आले की उच्च प्राथमिक स्तरावर असूनही विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि गणित विषयाचे साधे प्राथमिक ज्ञान नाही. इंग्रजी विषय एबीसीडीच्या पलीकडे विद्यार्थ्यांना माहिती नव्हता. विद्यार्थ्यांचे दहापर्यंत पाढे मूकपाठ होते परंतु एकाही विद्यार्थ्याला पूर्ण दहापर्यंत पाढे लिहिता येत नव्हते. काकडे सरांनी गावाचा सामाजिक अभ्यास केला होता. शिक्षणाबाबत असलेली पालकांची अनास्था पाहून त्यांच्या संवेदनशील मनाला अत्यंत वेदना झाल्या. काकडे सरांनी गावातील सद्यस्थितीतील वातावरण बदलण्याचा निश्चय केला. सातपुड्याच्या पर्वतावरून गावात नवीन शैक्षणिक परिवर्तनाचे वारे वाहतील अशी शक्यता निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांना शाळेबद्दल अभिरुची निर्माण व्हावी यासाठी काकडे सरांनी विविध उपक्रम राबविणे सुरू केले. विद्यार्थ्यांची बोली भाषा त्यांनी आत्मसात केली. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्याच बोलीभाषेत काकडे सर संवाद साधत असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते आपले वाटतं. काकडे सरांनी विद्यार्थ्यांना अल्पावधीत जणू त्यांचे मित्रच बनवले. 


शाळेत झालेला बदल गावकऱ्यांच्या लक्षात येऊ लागला होता. शाळेतील इतर शिक्षकांनीसुद्धा काकडे सरांच्या उपक्रमांमध्ये त्यांना मदत करणे सुरू केले. शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण ९५ % च्या वर पोहोचले होते. इयत्ता सातवीमध्ये असलेल्या अनिताने फार कमी कालावधीत मराठी आणि गणित विषयाचे प्राथमिक ज्ञान तर मिळवलेच शिवाय ती आता इंग्रजीसुद्धा वाचू आणि लिहू शकत होती. त्यामुळे काकडे सरांना अनिताविषयी विशेष आत्मीयता वाटायची. एकदा काही दिवसापासून अनिता शाळेत येत नसल्याचे काकडे सरांच्या लक्षात आले. त्यांनी शाळेतील मुलांना विचारले, 

"अनिता शाळेत का येत नाही..."

"सर तिचे बाबा दिवसभर दारू पिऊन झोपून राहतात काम करत नाहीत, घरी पैसे नसतात म्हणून तिची आई तिच्या सगळ्या बहीण भावासह शेताच्या कामावर जाते..."

"बरं बरं ठीक आहे, मी पाहतो," असे म्हणून काकडे सर विद्यार्थ्यांना अभ्यास देऊन हेड मास्तरांकडे गेले. हेड मास्तरांसोबत अनिताबाबत चर्चा केली. मधल्या सुट्टीत रमेश जमुऱ्याला भेटायचे काकडे सरांनी ठरवले...


काकडे सर रमेश जमुऱ्याच्या घराजवळ गेले असता त्यांना दारूचा उग्र दर्प यायला लागतो. काकडे सरांनी रमेशच्या घरात प्रवेश करताच अंगणामध्ये दारूच्या नशेत असलेला रमेश अर्धनग्न अवस्थेत उताणा झोपलेला दिसला. सर रमेशच्या घरी आले असल्यामुळे त्याचे शेजारी तिथे एकत्र झाले. 

"रमेश भाऊ ओ रमेश भाऊ..." सर जोराने आवाज देऊ लागले परंतु दारूच्या गुंगीत असल्यामुळे रमेशने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. हे पाहून त्याचा शेजारी म्हणाला,

"मास्तर तो उठणार नाही त्याची दारू उतरली की आम्ही त्याला शाळेत घेऊन येतो..."

शेजाऱ्याने आश्वासन दिल्याने काकडे सर शाळेकडे निघाले...

बाजूची बाई काकडे सर जात असल्याचे पाहून गर्दीतल्या एकाला विचारते,

"मास्तर कशाला आला..."

"रमेश मुलांना शाळेत पाठवत नाही म्हणून मास्तर आले होते..."

"अं! बरोबर आहे मास्तराचे... आमच्या वेळी आम्हाला असं कोणी शिकवत नव्हतं आता शिकवतात तर रमेशसारखे पोरांना शाळेत पाठवत नाही..." त्या म्हातारीचा ओझरता आवाज ऐकून सर मागे पाहून स्मित हास्य करतात आणि म्हातारीला हात दाखवून प्रतिसाद देऊन पुढे निघतात. दुसऱ्या दिवशी काकडे सरांनी रमेशची वाट पाहिली परंतु रमेश काही शाळेत आला नाही. मात्र अनिता, बबिता आणि गणेश शाळेत आले होते. गृहभेट दिल्याचा सकारात्मक परिणाम झाला होता. 


एकदा अनिताची मोठी बहीण बबिता एका लहान मुलाला कडेवर घेऊन अनिताला डब्बा देण्यासाठी शाळेत येते. काकडे सरांनी बबलीचे वय पाहून अनिताला विचारले, 

"बबलीच्या कडेवरील बाळ कोणाचे आहे?"

"माझ्या बहिणीचे आहे"

अनिताने उत्तर दिले. अनिताचे उत्तर ऐकून बबलीचे लहान वयात लग्न झाले असल्याचे काकडे सरांच्या लक्षात आले. काकडे सरांनी त्वरीत दाखल खारीज रजिस्टर काढून बबली रमेश जमुऱ्या नावाच्या विद्यार्थीनीच्या जन्मतारखेची शहानिशा करून डोक्यावर हात मारला...

काकडे सर हेडमास्तरांना म्हणाले,

"सर बबलीचा बालविवाह झाला तेव्हा आपल्या शाळेतील शिक्षकांना माहिती नव्हते का?"

"सातवा वर्ग झाल्यावर बबली पुढे शाळा शिकलीच नाही ती बाहेरगावी नातेवाइकांकडे राहायला गेलेली असल्याचे आम्हाला माहीत होते यावर्षी आली तर तिचे लग्न झाल्याचे समजले..." हेड मास्तरांचे उत्तर ऐकून गावातील सामाजिक परिस्थितीपुढे शिक्षण व्यवस्था हतबल का झाली? हा प्रश्न काकडे सरांना सतावत होता!


बालविवाहाबाबत काकडे सरांनी गावात चौकशी केली असता त्यांना समजले की, 'त्या समाजात मुलगा त्याला पसंत असलेल्या मुलीला तिच्या संमतीने पळवून नेतो. नंतर काही दिवसांनंतर गावात परत आल्यावर त्या मुलामुलीचे आईवडील त्यांचा रितसर विवाह लावून देतात. मुलामुलींची संमती असल्याने लग्न करताना मुलीचे वय किती आहे? लग्नाच्या योग्य आहे की नाही हे  फारसे पाहले जात नाही. विवाहाच्या पूर्वापारपासूनच्या या प्रथेमुळे कधी कधी बालविवाहसुद्धा होतात.'

हे ऐकून काकडे सर मनातल्या मनात म्हणाले, "आजवर जे झाले ते झाले यापुढे गावात नकळतपणेसुद्धा एकही बालविवाह व्हायला नको..."


काकडे सरांनी शाळेत किशोरवयीन मुलींचे लग्नाच्या योग्य वयाबाबत समुपदेशन केले. लहान वयात लग्नामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. अंगणवाडी सेविकांची महत्वपूर्ण मदत घेतली. बघता बघता शैक्षणिक सत्र संपून गेले. अनिता सातवी उत्तीर्ण होऊन आठवीत गेली. तिने लायणापूरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात आठवीत प्रवेश घेतला. गावात शाळा होती म्हणून रोज शाळेत जायला लागलेल्या अनिताच्या नव्या शाळेत खंड पडणे सुरू झाले होते. हळूहळू ती शेतीच्या कामात व्यस्त होऊ लागली. ती अधूनमधून शाळेत जाऊ लागली. असे करता करता ती दहाव्या वर्गात पोहोचली. दहावीचे वर्ष असल्याने गांभीर्याने ती शाळेत जात होतीच. तिचे वडील रमेश यांचा अनिताच्या शिक्षणाला विरोध होताच मात्र आईला मनोमन वाटायचे की मुलगी शिकली पाहिजे. परंतु तिला गरीब परिस्थितीमुळे नाईलाजाने शेतीच्या आणि घरकामात अनिताची मदत घ्यावीच लागत असे. अशा वातावरणात अनिताने सर्व सहन केले मात्र शाळा सोडली नाही. जिद्दीने शिकत राहिली. 


दहावीला असताना अनिताचे वय सोळा झाले होते. किशोरवयात मुलींमध्ये होणारे शारीरिक आणि भावनिक बदल अनितामध्येही होऊ लागले होते. विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल तिला आकर्षण वाटू लागले होते. गावातील विनोद नामक मुलगा तिला खूप आवडू लागला होता. विनोदलासुद्धा अनिता खूप आवडायची... एकमेकांना चोरून चोरून पाहणे दोघांना खूप आवडत होते. दोघांच्या काळजात प्रेमाचा पळस फुलला होता. अनिता विनोदच्या इशाऱ्यांना प्रतिसाद देऊ लागली होती. काही दिवसांनी दहावीची परीक्षा सुरु झाली. विनोद दररोज अनिताला पाहण्यासाठी तिच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर जायचा. अनिताने दहावीचा शेवटचा पेपर दिल्यावर ती परीक्षा केंद्राच्या बाहेर आली असता  विनोदने अनिताला प्रेमाची मागणी घातली. सर्व काही इच्छित नकळत घडले असल्याने अनिता मनातल्या मनात खूष झाली. विनोदला प्रत्यक्ष होकार न देता होकारार्थी स्मित हास्य देऊन निघून गेली. 


उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्यादरम्यान जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक काकडे सर यांची बदली दुसऱ्या तालुक्यातील शाळेत होते. सरांची बदली झाल्यामुळे त्यांच्या आजी माजी विद्यार्थ्यांना दुःख होते. काकडे सर विद्यार्थ्यांना खरे जगणे शिकवून गेले होते. जून महिन्यात दहावीचा निकाल जाहीर झाला. अनिता चांगल्या गुणांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. आनंदाच्या या क्षणाचे निमित्त साधून विनोदने अनिताला लग्नाची मागणी घातली आणि त्याच्यासोबत पळून जाण्यासाठी तिला गळ घातली. अनिता आता चक्रव्यूहात सापडली होती. तिला विनोद आवडत होताच त्याच्याशी तिला लग्न करायचे होते पण तिला त्याच वेळी  काकडे सरांचे बालविवाहाबद्दलचे आवाहन आठवले. अनिताने विनोदला म्हटले, "मी सध्या सतरा वर्षाची आहे मला लग्नाच्या योग्य व्हायला अजून एक वर्ष वेळ आहे मी आता तुझ्या सोबत येऊ शकत नाही..."

अनिताचे उत्तर ऐकून विनोदचा पारा चढला… त्याने अनिताला म्हटले की, "जर एक वर्षाने आपण लग्न करणार आहोतच तर आताच केलं तर काय बिघडणार आहे..."

"आणि एक वर्ष थांबलो तर काय हरकत आहे..."

"एक वर्ष! मी तर एक दिवसही थांबायला तयार नाही, अनिता आता खूप झालं..." विनोद रागारागाने अनिताचा हात धरतो आणि तिला घेऊन पुढे निघण्याचा प्रयत्न करतो. अनिता जोरात त्याचा हात झटकते आणि त्याला रागाने पाहते. अनिताने हात झटकल्यामुळे नाराज झालेला विनोद तिच्यावर हात उगारतो. आणि म्हणतो, "तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीच तर मग प्रेम कशाला केलं माझ्यावर..." अनिता स्वतःच्या गालावर हात ठेवून रडत रडत म्हणते, "प्रेमाचा अर्थ तुझ्यासाठी केवळ लग्न होत असेल माझ्यासाठी नाही. जर तुझ्यात माझ्यासाठी थांबण्याची ताकद नाही तर तू प्रेम का केलंस..." असे म्हणून अनिता हुंदके देऊन रडू लागते. 

विनोद तेथून रागाने निघून जातो...


झालेल्या प्रकारामुळे अनिताच्या मनात खूप तणाव वाढतो. ती रात्रभर धड झोपू शकत नाही. तिचे विनोदसोबत वागणे चुकीचे होते की बरोबर होते हा प्रश्न तिला रात्रभर छळतो. सकाळी लवकर उठून ती कुठल्यातरी गावाला निघून जाते. अनिता अचानक गावाला गेल्यामुळे गावात उलट-सुलट चर्चेला पेव फुटतात. अशातच एक चर्चा विनोदच्या कानावर येते की, 'अनिता बाहेरगावच्या एखाद्या मुलासोबत पळून गेली.' विनोदला ही चर्चा ऐकून स्वतःचाच राग येतो. अनिताला रागारागाने बोलल्याचा त्याला पश्चाताप होतो. मात्र अनिता खरंच गेली कुठे या प्रश्नाने विनोद बेजार होऊन जातो. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. त्यात त्याला त्याचा एक मित्र सांगतो की, 'अनिताने विनोदवर प्रेम असल्याचे नाटक करून त्याला फसवले आणि दुसऱ्याच कुणासोबत तरी पळून गेली अशी पारावर चर्चा आहे.' हे ऐकून विनोद पुतपुटतो, "अनिता कोणासोबत पळून गेली हे काही दिवसात माहीत पडेलच तसंही तिला तिच्या लग्नाला मान्यता देण्यासाठी गावात नवऱ्यासोबत यावंच लागेल."


दिवसांमागून दिवस जातात मात्र अनिता काही गावात परत येत नाही. त्यात अनिताच्या घरचेसुद्धा कामाच्या निमित्ताने स्थलांतर करतात. त्यामुळे विनोदला अनिताविषयी माहिती मिळत नाही. अनिता गावातून निघून जाण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आलेले असते. काही दिवसांनी होळीचा सण जवळ येतो. होळीचा सण साजरा करण्यासाठी अनिताचे वडील गावात परत येतात. तेव्हाही त्यांच्यासोबत अनिता नसते. हे पाहून विनोदला राहवत नाही तो सरळ तिच्या वडिलांना जाऊन अनिताबद्दल विचारतो, मात्र तो दारू पिलेला असल्यामुळे त्याला काही सांगू शकत नाही. होळीला एक दिवस बाकी असताना अनिता, तिची आई, बहीण आणि भाऊ गावात येतात. विनोद अनिताला एकटी असताना पकडतो आणि विचारतो, "कोणासोबत केलं लग्न?"

अनिता नुसते पाहते काहीच बोलत नाही हे पाहून विनोद रागाने पुन्हा तोच प्रश्न विचारतो, "कोणासोबत केलं लग्न?"

"लग्न? तू केलं की काय?"

"मी कशाला करू मी नाही केलं लग्न बिग्न..."

"का बरं नाही केलं? तुला तर खूप घाई झाली होती लग्नाची!"

"तू नाही म्हटलं होत नं! म्हणून राहिलं, तू कोणासोबत गेली होती?"

"मी एकटीच गेली होती"

"एकटी कशासाठी अन् कुठे गेली होतीस"

"मी धारणीला गेली होती मावशीजवळ, लायणापुरात राहिली असती तर झालंच असतं नं माझं लग्न तुझ्यासोबत..."

"असं आहे ते, मी तुझ्यासोबत लग्न केलं नाही पाहिजे म्हणून तू दुसऱ्या गावाला राहायला गेलीस वा! रे वा! शिकलेली मुलगी! इकडे तुझ्या मैत्रिणीनी तर केलंपण अठरा वर्षाच्या वयाच्या आधी लग्न..."

"मी बोलली नेहासोबत तिला आणि तिच्या नवऱ्याला दोघांनाही त्यांची चूक लक्षात आली आहे..."

"लग्न झाल्यावर आता काय चुकीचं राहिलं..."

"नेहा आणि तिचा नवरा प्रवीण दोघेही नेहा अठरा वर्षाची होईपर्यंत वेगळे राहायला तयार झाले आहेत आणि तू लग्न न करतासुद्धा वेगळे राहायला तयार नव्हतास..." विनोदला त्याची चूक लक्षात येते, मग तो हसत हसत तिला विचारतो, "बरं अजून मला किती दिवस तुझ्यापासून दूर राहावे लागेल..."

"आता तुला मी दूरच ठेवते..." असं बोलून अनिता तेथून घरी जाऊ लागते. विनोद धावत तिच्या मागे येतो तेव्हा तिची आई विनोदला म्हणते, "ओ जावई ब्वा! तुमच्या आईबाबांनी आणि आम्ही  होळी झाल्यावर दहाव्या दिवशी अनिताच्या वाढदिवसाची तारीख ठरवली आहे तुमच्या अन अनिताच्या लग्नाची. लग्नाच्या तेवढ्या पत्रिका आणा लवकर छापून वेळ कमी आहे..." हे ऐकून विनोद आनंदी होऊन जातो आणि अनिताकडे पाहतो. अनिता लाजून घरात जाते. विनोद दुसऱ्याच दिवशी पत्रिका छापून आणतो. अनिता लग्नाच्या पत्रिका घेऊन शाळेत जाते. शाळेतल्या सर्व शिक्षकांच्या आणि काकडे सरांची पत्रिका अनिता मुख्याध्यापकांना देऊन म्हणते, "काकडे सरांना सांगा, अनिताचं लग्न आहे अन १८ वर्षाची झाल्यावरच लग्न करत आहे सर्वांनी लग्नाला नक्की या सर..." अनिताच्या बोलण्यातील शेवटचे चार शब्द 'लग्नाला नक्की या सर' मुख्याध्यापकांना गावात सामाजिक क्रांती झाल्याची प्रचिती देत होते. अनिताचा हा आत्मविश्वास पाहून मुख्याध्यापकांना खात्री पटते की, यापुढे गावात कोणताच बालविवाह होणार नाही. मुख्याध्यापक लगेच काकडे सरांना फोन करून सर्व हकीकत सांगतात आणि म्हणतात, "लग्नाला नक्की या सर..."


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama