निलेश कवडे

Abstract Fantasy

4.0  

निलेश कवडे

Abstract Fantasy

३६६ दिवस

३६६ दिवस

6 mins
345


एका आघाडीच्या मराठी चॅनल ने 'एस एम बॉस २०२०' हा बिग बॉस सारखा रिऍलिटी शो आयोजित केला होता. त्यात विविध शारीरिक मानसिक कसोट्या मधून निवडलेल्या २० स्पर्धकांना एका वर्षासाठी एका खोलीमध्ये राहण्याचे 'टास्क' देण्यात आले होते. काही अटी आणि शर्थीसह एक वर्ष एका खोलीत एकटे राहणे सोपे काम नव्हते. या वीस स्पर्धकांमध्ये पंकज सुद्धा निवडला गेला होता. स्पर्धेचे बक्षीस ५ कोटी रुपये होते. दोन वेळचे जेवण, चहा, नाश्ता दरवाज्याच्या खालील झडप मधून मिळणार होते. दोन ड्रेस, वाचायला काही पुस्तके असे साहित्य सोडले तर बाकी काही मिळणार नव्हते. एकही खिडकी नसलेल्या खोलीचे दार एकदा बंद झाले की वर्षभरानेच उघडणार होते. स्पर्धक आजारी पडला तर स्पर्धेतून बाद होणार होता. त्यामुळे बंद खोलीत शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्य जपण्याची कसरत स्पर्धकांना करावी लागणार होती. स्पर्धकांना वर्षभर कुटुंब, मोबाइल, नातेवाईक आणि मित्रमंडळीपासून दूर राहायचे होते. बाहेरच्या जगात एक वर्षभरात काय होईल याची माहिती सुद्धा त्यांना मिळणार नव्हती. ऐकायला सोपे वाटणारे हे आव्हान सोपे नव्हते. एकाकीपण वाट्याला आल्यानंतर आपल्या शरीरात होणारे भावनिक आणि मानसिक बदल सहन करण्याच्या क्षमतेवर सर्व काही अवलंबून होते. प्रत्येक खोली मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे २४ तास हे स्पर्धक डॉक्टर आणि इतर महत्वाच्या व्यक्तींच्या देखरेखीखाली राहणार होते. दर महिन्याला एक स्पर्धक बाद होणार होता. 


१ जानेवारी २०२० रोजी वीस स्पर्धकांना त्यांना नेमून दिलेल्या खोल्यांमध्ये संध्याकाळी ७ च्या सुमारास प्रवेश देण्यात आला होता. सर्व स्पर्धकांनी बाहेरचे जग डोळे भरून पाहून घेतले होते. सर्व आठवणी डोळ्यात साठवून सर्व स्पर्धक आपापल्या खोलीत प्रवेश घेतात. पंकज खोलीच्या आत गेल्यावर रिकाम्या खोलीचे निरीक्षण करतो. पहिला दिवस असल्यामुळे त्याला फारसा त्रास होत नाही. त्याच्या मनात थोडी रुखरुख होती. झोपेची वाट पाहत मध्यरात्र उलटून गेली. रात्रभर तो विचार करत राहिला. ३६५ दिवस काय करायचे ह्या प्रश्नाने त्याला बेजार केले. पहाटे चार नंतर त्याला नीज आली. 


रात्री उशिरा पर्यंत जागल्यामुळे त्याचा दिवस सकाळी उशिरा सुरू झाला. सकाळी उठल्यावर मोबाईल पाहण्याची सवय असल्याने त्याला फेसबुक, व्हाट्सएप, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल साईटची आठवण आली. काही वेळ पलंगावर रेंगाळल्यानंतर त्याला वर्तमान पत्र वाचावे वाटले. मात्र तेही मिळणार नसल्यामुळे आता काय करायचे हा प्रश्न अगदी दुसऱ्याच दिवशी त्याला सतावू लागतो. तो आंघोळ वगैरे झाल्यावर दुपारी जेवण करतो. दुपारी झोपण्याचा असफल प्रयत्न करतो. चहाची वेळ होते. चहा पितो. विचार करत रात्रीची वाट पाहतो. असे आठवडाभर चालते.


सात आठ दिवसांनंतर त्याचा संयम ढासळू लागतो. मनातल्या मनात स्वतःवर तो चिडू लागतो. मनाचा कोंडमारा सुरू होतो. मात्र काहीही करून आपण जिंकलोच पाहिजे हा विचार करून स्वतः विरुद्धचे एक द्वंद्व तो सुरू ठेवतो. बाकी स्पर्धकांची सुद्धा परिस्थिती विपरीत असते. कुणाला आपल्या लहान मुलांची तर कुणाला जोडीदाराची आठवण येते. आपण नसल्यामुळे घर कसं चालत आहे. काही स्पर्धक व्यवसाय वा नोकरी वगैरे ठिकाणी काय परिस्थिती निर्माण झाली याची कल्पना करतात. घरची काळजी त्यांना सतावू लागते. आई बाबा मुलांच्या तब्येतीची चिंता त्यांना लागते. संसारी माणूस किती गुंत्यात असतो याची त्यांना जाणीव होते. अगदी लहान सहान गोष्टींची चिंता त्यांचे मन पोखरू लागते. घरी भाजीपाला, दळण गॅस वगैरे ची काय परिस्थिती असेल असे छोटेसे प्रश्न देखील त्यांच्या भोवती पिंगा घालतात. आर्थिक अडचणी तर बंद खोलीत ही स्पर्धकांचा पिच्छा सोडत नाहीत. पंकज अविवाहित असूनही संसारी चिंतांमुळे गोंधळात पडला होता.


महिनाभरात काही स्पर्धकांची अपुरी झोप आणि सतत विचार केल्याने तब्येत बिघडते. काही स्पर्धक सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे पाहून संवाद साधण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. मनातल्या मनात रडू लागतात. कुणाला तर असे एकटे राहिल्यापेक्षा मरून जाणे चांगले असेही नकारात्मक विचार येतात. तिसऱ्या महिन्याच्या अखेरीस गोंधळाची मनस्थिती असह्य झाल्यामुळे काही स्पर्धक स्वतःहून माघार घेतात. काहींना शारीरिक हालचाली मंदावल्याने शारीरिक व्याधी निर्माण होतात. शेवटी शरीर सुद्धा सहन करण्याची अतिउच्च पातळी गाठतोच ना! पंकज चे सुमारे ९० दिवस कसेबसे निघतात मात्र असेच नुसते बसून राहिलो तर बाकीचे उर्वरीत दिवस निघणार नाही याची पंकजला खात्री पटते.


हे विश्व अंतराळातील एक बंद खोली असल्याचा भास पंकजला होतो. सृष्टीचे नियमन जसे निसर्ग नियोजनाप्रमाणे करतो तसे आपणही या बंद खोलीत नियोजन केले पाहिजे याची खात्री त्याला पटते. बाह्य जगाशी जो पर्यंत गुंतून राहू तो पर्यंत या बंद खोलीत आपल्याला राहता येणार नाही हे सत्य त्याला पटते. स्वतःला गुंतवायचे कसे हा विचार तो करतो. बंद खोलीतही त्याला नवी क्षितिजे खुणावू लागतात. आता पंकजची वाटचाल स्पर्धकाकडून साधकाच्या दिशेने सुरू होते. साधनेचा मार्ग कठीण असला तरी अशक्य नसतो. देह असूनही विदेही अवस्था येण्यासाठी पंकजला आत्मसाक्षाकाराची गरज असते याची जाणीव होते. बंद खोलीत आत्मसाक्षाकारासाठी कुणी गुरू मिळणार नसल्याने पुस्तकांचाच आधार पंकजला घ्यावा लागणार होता. काही दिवस काय करता येईल या विचारात तो दिनचर्या आखतो. सकाळी उठल्यावर योगासने आणि ध्यान साधना करायची. शरीराला व्यायाम देण्यासाठी काही हालचाली आणि कसरती करायच्या नंतर दुपारभर पुस्तके वगैरे वाचून मनन चिंतन करायचे. संध्याकाळी पुन्हा थोडी कसरत करायची. नंतर ध्यान साधना करून रात्री वाचलेल्या पुस्तकावर मंथन करून झोपायचे असे नियोजन तो करतो. 


दुसऱ्या दिवसापासून ठरवलेल्या दिनचर्या नुसार त्याचे काम सुरू होते. नियोजित योगा कसरत वगैरे करतांना त्याचा आळस अंग वर काढतो. परंतु दृढनिश्चय असला की आळस निष्प्रभ होतो हा अनुभव तो घेत होता. दुपारी पुस्तक वाचतांना काय वाचावे हे ठरवले नसल्यामुळे नेमके कोणते पुस्तक वाचावे हे त्याला कळत नाही. तो सुरुवात 'श्रीज्ञानेश्वरी गूढार्थदीपिका' या पुस्तकापासून करण्याचा निर्णय घेतो. त्याचा आजचा दिवस ज्ञानेश्वरी समजून घेण्यात जातो. ज्ञानेश्वरी मध्ये एकूण अठरा अध्यायात सुमारे नऊ हजार तेहतीस ओव्या असल्याचे तो मोजतो. रोज दुपारी पस्तीस ओव्या पाठ केल्यास २५९-२६० दिवसात संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ करता येईल हे गणित तो मांडतो. संध्याकाळी ओव्यांवर चिंतन करायचे असे तो ठरवतो.  राहिलेले १५ दिवस ज्ञानेश्वरीवर स्वतःच्या शब्दांत निरूपण मांडू असे ठरवून कामास लागतो. सुरुवातीला काही दिवस त्याला ज्ञानेश्वरीतील ओव्या पाठ करायला अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो. त्याला पंधरा वीस दिवस अतिशय त्रास सहन करावा लागतो. हळूहळू महिनाभरात त्याची साधना व्यवस्थित सुरू होते. दुपारी पाठ झालेल्या ओव्यांचा अर्थ समजून घेतो. असे करता करता त्याला आत्मबलात वाढ होत असल्याची प्रचिती येते. ध्येय स्पष्ट असले की कामाचा ताण येत नाही. कामावर श्रद्धा ठेवून प्रामाणिक प्रयत्न केले तर यश समीप येत जाते ही अनुभूती पंकज घेत होता. 


तिकडे इतर स्पर्धक सुद्धा स्वतःला गुंतवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अकरावा महिना येईपर्यंत उरलेल्या स्पर्धकांची संख्या दहा पर्यंत येऊन पोहचली होती. त्यातील बरेच जण कलेचा आधार घेत स्पर्धेत टिकून होते. कुणी गायनाचा सराव करायचे कुणी नृत्याचा… कुणी चित्र काढत होते तर कुणी शरीर कमावण्यासाठी प्रयत्न करत होते. दर महिन्याला एक-एक स्पर्धक बाद होत होते. शेवटच्या महिन्यात केवळ कलेचे उपासक स्पर्धेत आव्हान कायम ठेवून होते. पंकज संपूर्ण ज्ञानेश्वरी मुकपाठ करतो. नंतर तो ज्ञानेश्वरी चे निरूपण करावयास सुरुवात करतो. पंकजने शेवटच्या पंधरा दिवसात सुरू केलेले ज्ञानेश्वरी चे निरूपण पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या अचानक वाढू लागली होती. आजवर अनेक लोकांनी ज्ञानेश्वरीचे पारायण करून निरुपण केले होते परंतु पंकजचे निरूपण काळाशी सुसंगत आणि जीवनाच्या अतिसूक्ष्म अंगाला स्पर्शून जाणारे असल्यामुळे ते प्रेक्षकांना विशेष भावत होते. खोलीच्या बाहेर काय सुरू आहे हे स्पर्धकांना माहीत नसल्यामुळे ते सर्व या गोष्टींपासून अनभिज्ञ होते. पंकज मध्ये झालेला हा बदल पाहून त्याचे कुटुंब नातेवाईक आणि मित्रमंडळी सुद्धा अवाक झाले होते. 


बारा महिने म्हणजेच ३६६ दिवस पूर्ण होताच बंद खोलीतील सर्व स्पर्धक बाहेर निघतात. स्पर्धेचा ग्रँड फिनाले असतो. स्पर्धकांना बाहेर आल्याबरोबर मास्क घालायला सांगितले जाते. त्यांना त्या कार्यक्रमाला एकही प्रेक्षक उपस्थित दिसत नाही. हे पाहून स्पर्धक अचंबित होतात. निवेदक अभिनेत्री त्यांना कोरोना विषाणूमुळे जगभरात झालेल्या दुष्परिणामांची माहिती देते. एका वर्षात जग कधी कल्पना न केल्याप्रमाणे सुद्धा बदललेले असते. कोरोना मुळे झालेली देशातील विदारक परिस्थिती चॅनल एका व्हिडिओ द्वारे दाखवतो. कोरोनामुळे जीव गमवावा लागलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली जाते. स्पर्धकांना परीक्षक प्रश्न विचारतात तेव्हा स्पर्धकाला जिंकण्याची धुंदी असल्यामुळे ते एक वर्ष एका खोलीत राहू शकले याची कबुली देतात मात्र पंकज सांगतो की, "आधी मी स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशाने खोलीत राहू लागलो मात्र नंतर मी स्वतःला जिंकण्यासाठी खोलीत राहिलो" असे सांगतो. या स्पर्धेनंतर इतर स्पर्धकांच्या पुढील जीवनशैलीत बदल सकारात्मक हो ना हो पण पंकजच्या जीवनशैलीत नक्कीच बदल होणार होता हे त्याच्या उत्तरावरून दिसत होते. कार्यक्रमाला आलेले मुख्य अतिथी 'एस एम बॉस' चा निकाल जाहीर करतात… पंकज या स्पर्धेचा महाविजेता बनतो. पंकज जिंकलेली पाच कोटींची पुरस्काराची रक्कम कोरोनासाठी मदत म्हणून 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' साठी देण्याची घोषणा करतो. पंकजची ही कृती 'एस एम बॉस २०२०' या बिग बॉस सारखा रिऍलिटी शो मध्ये तो स्पर्धक नसून साधक होता हे जगाला दाखवून देते… 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract