निलेश कवडे

Action Crime Thriller

4.0  

निलेश कवडे

Action Crime Thriller

अति तिथे माती

अति तिथे माती

5 mins
655


अकोला शहराच्या मध्यवर्ती भागात गजबजलेल्या जुन्या वस्तीमध्ये 'जनता लॉज' होता. मुकेश हा जनता लॉजचा मालक होता. लॉजची इमारत तळमजला धरून चार मजली होती. लॉजच्या समोर 'राजेश्वर अलंकार' हे शहरातील सुप्रसिद्ध ज्वेलरीचे दुकान होते. लॉजच्या एका बाजूला नगरपालिकेची प्राथमिक शाळा तर दुसऱ्या बाजूला कपड्याचे दुकान होते. एकावेळी एकच कार येऊ शकेल इतक्या अरुंद गल्लीत ही दुकानं होती. गाड्या पार्किंग वरून मुकेशचे राजेश्वर अलंकार च्या महेश शेठ सोबत बऱ्याच वेळा वाद व्हायचा. याला जुन्या वादाची किनार सुद्धा होती.


काही दिवसांपूर्वी राजेश्वर अलंकारमध्ये अकोल्यातील काही स्थानिक चोरांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केलेला असतो. दुकानाची सुरक्षा मजबूत असते. दुकानचे शटर उघडतांना सायरन वाजल्यामुळे चोरीचा प्रयत्न फसतो. या घटनेमुळे महेश शेठ पोलिसांना ते चोर मुकेशनीच पाठवले असल्याचा संशय व्यक्त करतो. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरांना ओळखतात आणि पकडतात. हे चोर जागेची 'रेकी' करतांना मुकेश सोबत बोलून ज्वेलरी दुकानाची माहिती काढल्याचे कबूल करतात. महेश शेठला मुकेशवर संशय असतो की, 'मुकेश मुद्दाम दुकानात चोरी झाली पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहे'. मात्र पोलीस चौकशीत मुकेश निर्दोष सुटतो. पण तरीही महेश शेठला वाटायचे की, 'मुकेश एखादी मोठी चोरी दुकानात केल्याशिवाय राहणार नाही'. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे महेश शेठला मुकेशची भीती वाटायची. त्यामुळे तो मुकेशवर पाळत ठेवण्याचे काम शहरातील 'राज' नावाच्या एका गुप्तहेराला देतो. गुप्तहेर त्याचे काम सुरू करतो. मुकेशला याची जराही कल्पना नसते. मुकेश नेहमी चाळीतल्या दुकानदारांजवळ महेश शेठला एखादे मोठे नुकसान झाले पाहिजे म्हणजे तो सरळ होईल अशी विधाने करतो. कारण महेश शेठ चा सावकारीचा धंदा होता. व्याजाच्या रकमेवरून एकदा त्या दोघांचा वाद झाला होता. अव्वाच्या सव्वा व्याज लावून महेश शेठ लोकांना लुबाडत होता. महेश शेठने मुकेश ला सुद्धा लुबाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे तू महेश शेठवर नाराज होता. या घटनेबाबत गुप्तहेराला माहिती नसते. तो केवळ संशयित म्हणून मुकेशवर पाळत ठेवत होता. त्याच्यावर पाळत ठेवली जात होती हे मुकेशला माहिती नसते. मात्र त्याच्या प्रत्येक हरकती नोंदवल्या जात होत्या. मुकेशची बडबड ऐकून गुप्तहेराला त्याच्यावर दाट संशय येतो. त्याच्या लॉजवर येणाऱ्या ग्राहकांवर देखील गुप्तहेरामार्फत लक्ष दिले जात होते. 


अकोल्याला बाहेर गावावरुन कामानिमित्त आलेल्या बऱ्याच मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंत जनता लॉज असायची. लॉजवर निरनिराळ्या गावावरून प्रवासी यायचे मुक्काम करायचे. लॉजवर कायम वर्दळ असायची. अकोल्याला कामानिमित्त दहा ते पंधरा दिवस राहायचे काम पडले तरी संबंधित प्रवासी जनता लॉजवर राहणे पसंत करत होते. लॉजवर राहतांना एखाद्यावेळी ग्राहका जवळ आधार कार्ड नसले तरी मुकेश शेठ ऍडजेस्ट करायचा. एकदा मुंबईवरून दोघे ग्राहक आले होते. त्या दोघांना जवळ आधार कार्ड नसल्याने सुरुवातीला मुकेश त्यांना लॉजची खोली द्यायला नकार देतो. मात्र रात्री झालेला उशीर आणि त्या दोघांचे व्यक्तिमत्व पाहून माणुसकीचा धर्म निभावत मुकेश त्यांना खोली देतो. मात्र ते तळघरातील खोली द्या असा आग्रह करतात. कंपनीच्या कामानिमित्त सामानांची ने आण करायला त्रास होऊ नये म्हणून तळघरातील खोली मागत आहोत असे ते कारण देतात. अनामत रक्कम जमा करून त्यांना तळघरातील खोली देण्यात येते. घरातील खोली सहसा कोणी ग्राहक ती खोली हवेशीर नसल्यामुळे घेणे पसंत करत नव्हते. मात्र या दोघांनी ती खोली घेतल्यामुळे मुकेशला बरे वाटले. 


दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ते राजेश आणि रघुनाथ नावाचे ग्राहक आपल्या कामावर जातात. संध्याकाळी ते चार मोठ्या सुटकेस घेऊन लॉजवर परत येतात. सकाळी त्या सुटकेस घेऊन कामाला जातात. दुपारी थोडावेळ आराम करायला येतात आणि सुटकेस घेऊन परत जातात. रात्री पुन्हा लॉजवर परत येतात असे पंधरा दिवस चालते. लॉजचा मालक त्यांना "अजून किती दिवस राहणार आहात" हे विचारतो तर ते म्हणतात, "अकोल्याचे पाच - सहा माणसांचे कंपनीचे काम आम्ही दोघेच सांभाळत असल्यामुळे थांबावे लागत आहे. मुंबईला अकोल्याच्या जागांसाठी मुलाखती सुरू आहेत नवीन माणसं आली की आम्ही आमच्या गावालाच काम करू" हे ऐकून मुकेश त्यांना गमतीने म्हणतो, "काही हरकत नाही माणसं नाही भेटली तर मी मिळवून देईल तुमच्या कंपनीला" 


पुढच्या आठवड्यात बुधवारी दुपारी राजेश आणि रघुनाथ लॉजचे बिल अदा करून लॉज सोडण्यासाठी काउंटरवर येतात. मुकेश त्यांना विचारतो, "नवीन माणसं मिळाली की काय?" 

"होय, सोमवार पासून त्यांचे वर्किंग सुरू होणार आहे" असे राजेश सांगतो… लॉज सोडतांना त्याच्याकडील चार सुटकेस आणि काही सामान घेऊन ते रेल्वे स्टेशन कडे ऑटोनी निघतात… बुधवार असल्यामुळे त्याच्या भागातील ज्वेलरी आणि कपड्यांची काही दुकाने बंद होती. त्यामुळे वर्दळ कमी होती. 


गुरुवारी सकाळी राजेश्वर अलंकारमध्ये गोंगाट सुरू होतो. मुकेश माहिती घेतो. राजेश्वर अलंकारमध्ये मोठी चोरी झालेली असते. दुकानाचे शटर न उघडता तळघरात मोठी चोरी झालेली असते. सिने स्टाईल चोरी झाल्यामुळे पोलीस सुद्धा अचंबित झालेले असतात. कोणीतरी डुप्लिकेट चाव्या बनवून चोरी केली हा अंदाज लावला जातो. पोलिसांद्वारे संशयित आरोपी म्हणून गुप्तहेराच्या सांगण्यावरून मुकेशला अटक केली जाते. त्याचा पि.सी.आर. काढला जातो. चौकशी दरम्यान पोलिसांचा त्याला प्रचंड मार सुद्धा खावा लागतो. इकडे पोलीस चौकशीसाठी दुकान ताब्यात घेतात. ज्या ठिकाणी अवैध सावकारीचे पैसे आणि अवैध सोने ठेवले असते त्याच तळमजल्यात चोरी झालेली असते. सावकारीच्या संपूर्ण रेकॉर्डसोबत सोने आणि कोट्यवधी रुपये चोरी झाल्यामुळे महेश शेठ तणावात जातो. पोलिसांना त्याला खरे झालेले नुकसान सांगताही येत नव्हते. पोलीस तपासात जर तो अवैध सावकारीचा रेकॉर्ड पोलिसांच्या हातात लागला तर महेश शेठला शिक्षा होऊ शकत होती. त्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानापेक्षा चोरी गेलेल्या रेकॉर्डमुळे शेठचा बीपी वाढला होता.


पोलीस चौकशी करतांना त्यांना तळमजल्याच्या फरशीवर थोडी माती सांडलेली दिसते. पोलीस तपास करतात. ते एक एक फरशी वाजवून पाहतात तेव्हा त्यांना काही फरश्या सैल दिसतात त्या उचलून पाहिल्यावर तिथे एक मोठा भूमिगत बोगदा दिसतो. सर्व तो बोगदा पाहून आश्चर्यचकीत होतात. महेश शेठ तिथे त्वरित हजर होतो. पोलीस बोगद्यात श्वान पथकासह शिरतात. तो भूमिगत बोगदा ती अरुंद गल्ली ओलांडून मुकेशच्या लॉजच्या तळमजल्यामधील रूम मध्ये निघतो. पोलीस मुकेशला घटनास्थळी आणून चौकशी करतात. मुकेश तिथे काही दिवसापूर्वी कंपनीच्या कामानिमित्त राहत असलेल्या राजेश आणि रघुनाथ बद्दल त्यांना माहिती देतो. राजेश आणि रघुनाथ कोणत्याही कंपनीचे काम करत नव्हते तर ते राजेश्वर अलंकार या ज्वेलरी दुकानांमध्ये चोरी करण्याच्या उद्देशानेच जनता लॉजवर आले असल्याचे सर्वांना कळते. ते दोघे रोज थोडा थोडा बोगदा खोदून सुटकेसद्वारे माती बाहेर फेकत होते. मुकेशचा चोरीमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसल्यामुळे पोलीस त्याला जामीनावर सोडतात.


सिने स्टाईल झालेली ही चोरी अनेक लोकांचे सावकारी कर्ज फेडणारी ठरली होती. आजवर महेश शेठने सावकारी कर्ज देऊन अनेकांना अति लुबाडले होते मात्र आज त्याच्या अवैध संपत्तीची माती झाली होती. महेश शेठची ही हालत पाहून मुकेश पोलिसांचा मार खाऊनही आनंदी होता. झालेल्या प्रकरणात मुकेशचा काहीही दोष नसतो मात्र राज गुप्तहेराच्या चुकीच्या हेरगिरीमुळे मुकेश चे या प्रकरणात नाव येते. तो गुप्तहेर मुकेशला चुपचाप भेटून माफी मागतो. चुकीच्या मार्गाने संपत्ती गोळा केल्यास पापाचा घडा एक दिवस नक्की भरतो आणि अति तिथे माती या म्हणी प्रमाणे त्याला शिक्षा ही मिळतेच. पोलीस चोरांचे मुकेशनी सांगितल्या प्रमाणे एका चित्रकाराजवळून स्केच तयार करून जाहीर करतात. मुकेश या घटनेपासून आधार कार्ड घेऊनच लॉजवर ग्राहकांना प्रवेश देतो. तर महेश शेठने आता प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यामुळे सावकारी सोडून दिली होती. त्या दिवसापासून काही वर्षे चोरीचा तपास सुरूच आहे मात्र त्या दोन चोरांचा शोध अद्यापही लागलेला नाही. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Action