निलेश कवडे

Drama Romance

4.0  

निलेश कवडे

Drama Romance

रियालिटी शो - भाग 2

रियालिटी शो - भाग 2

4 mins
289


गौरवने एका मित्रा जवळून कशीबशी बाईक मॅनेज करतो आणि रश्मीला तिच्या हॉटेल वरून पीक अप करतो. ती त्याच्या बाईक वर एका बाजूला दोन्ही पाय ठेऊन बसते. दोघांच्या मनात भावनांचा प्रचंड कोलाहल सुरू होता. अशा पद्धतीने डेटवर ते दोघे आपापल्या खर्‍याखुर्‍या पार्टनरसोबत सुद्धा कधी गेले नव्हते. एका हॉटेलमध्ये पोहचल्यावर दोघे आमोरासमोर बसतात. एकमेकांच्या आवडी-निवडी बाबत प्रश्न विचारून झाल्यावर ते जेवायची ऑर्डर देतात. तोवर दोन टोकांवर बसलेल्या दोघांना गोलाकार टेबलची अडचण निर्माण होते. बोलतांना हळूहळू दोघांची खुर्ची सरकू लागते. दोघांच्या खुर्च्या बाजूला सरकत सरकत आजूबाजूला येऊन जातात. जेवण सर्व्ह केले जाते. दोघे एकमेकांना लडिवाळ आग्रह करत जेवतात. जेवण आटोपते. आलेले बिल दोघे सहमतीने शेअर करतात. दोघांनाही एकमेकांसोबत घालवलेल्या या क्षणांचा मोह आवरता येत नाही. ते होटेल मधून निघतात. बाईकवर बसतांना सकाळी असलेला रश्मीचा संकोच बराच कमी होतो तिच्या चेहऱ्यावर तो जाणवतो. 


बाईकवर बोलतांना एकमेकांच्या घरची परिस्थिती ते जाणून घेतात. तेवढ्यात रश्मीला 'स्ट्रीट डान्सर थ्री डी' या चित्रपटाचे पोस्टर दिसते. रश्मी गौरव ला बोट दाखवून ते पोस्टर दाखवते. पोस्टर पाहून तो तिला हा चित्रपट पाहायचा का विचारतो, ती होकार देताच गौरव बाईक पलटवतो. टॉकीज मध्ये जाताच लगेच दोन प्लॅटिनम तिकीट काढतो. शो ची वाट पाहत ते गॅलरीत बसतात. आता दोघांमधले अंतर गळून गेलेले असते. बोलतांना हास्य विनोद सुद्धा सुरू होतात… शो सुरू होणार असल्याचा गजर होतो. दोघे आपल्या जागेवर जाऊन बसतात. हळूहळू अंधार अधिक गडद होतो. चित्रपट सुरू होतो. तिचे डोके नकळत गौरवच्या खांद्यावर विसावते. हाताला हाताचा स्पर्श होतो. तळहात तळहातात घेतला जातो. चित्रपटात प्रणायदृश्य येताच दोघेही लाजतात. तिरप्या नजरेने एकमेकांना पाहतात. नजरानजर होताच दोघेही लाजतात. ती त्याच्या कुशीत शिरते. थोड्या वेळाने 'इंटरवल' होतो तेव्हा दोघांचे ओठ विलग होतात. ती विस्कटून गेलेले केस नीट करते. क्षणभर दोघेही निःशब्द होतात. काय बोलावं दोघांना सुचत नाही. इंटरवल नंतर चित्रपट पुन्हा सुरू होताच पुन्हा हातात हात जातो…


चित्रपट संपेपर्यंत संध्याकाळ झालेली असते. दोघे टॉकीज मधून बाहेर येतात. आता बाईकवर बसताना ती दोन्ही बाजूला पाय टाकून बसते. तिला त्याचा सहवास आवडू लागला होता. त्याच्या पाठीवर डोकं टेकवून दोन्ही हातांनी त्याला पाठमोरी बिलगते. ती बिलगल्यामुळे त्याच्या काळजाच्या सागराला आनंदाची भरती येते. तो तिला न सांगता मुंबईतील एका बीच वर तिला घेऊन जातो. कातरवेळी समुद्राच्या किनाऱ्यावर दोघे निवांत बसतात. एका नव्या नात्याची सुरुवात होते. दोघांना त्यांच्या स्वप्नांचे क्षितिज खुणावू लागते. मुंबईच्या चौपाटीवर दोघे हातात हात घालून फिरतात. रात्री उशिरा तो तिला तिच्या हॉटेलवर पोहचवून देतो. ती बाईकवरून उतरून हॉटेलच्या गेटमधून जातांना वळून बघते. तो अजूनही तिला बघत असतो. हे पाहून ती धावत त्याच्याकडे येऊन त्याला बिलगते आणि उद्या डान्स प्रॅक्टिस ला भेटू असे म्हणून हॉटेलकडे वळते. 


दोघे आपापल्या रूममध्ये विचार करतात सकाळी एकमेकांना फसवण्याचा विचार करणारे दोघे नात्यांच्या एका वेगळ्याच बंधनात कधी फसतात त्यांचे त्यांनाही कळत नाही. ते दोघे एकमेकांमध्ये इतके कसे गुंतले? की त्यांनी स्वतःच गुंतणे पसंत केले हा प्रश्न त्यांना सतावत राहतो. या नात्याचा बेस काय ? हे लव्ह आहे… लस्ट आहे… अट्रक्शन आहे की गरज? दोघेही हे ठरवू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी डान्स प्रॅक्टिसला दोघांमध्ये झालेला बदल पाहून त्यांचा डान्स गुरू आशिष हैराण होऊन जातो. त्या दोघांची केमिस्ट्री इतकी चांगली होते की बेस्ट डान्सर च्या प्राथमिक फेरीसह चांगल्या गुणांनी ते दोघे 'ग्रँड फिनाले' पर्यंत पोहचतात. 


डान्स च्या प्रॅक्टिस च्या व्यस्ततेमुळे गौरव चा नीता सोबत आणि रश्मी चा नितीन सोबतच संवाद अगदीच कमी होऊन जातो. 'ग्रँड फिनाले' ला आलेले नामांकित परीक्षक रश्मी आणि गौरवचा डान्स प्रवास पाहून विशेष प्रभावित होतात. त्यांची जोडी प्रेक्षकांची फेव्हरेट जोडी बनते. बॉलीवूड मधला नामांकित हिरो निकाल जाहीर करण्यासाठी स्टेजवर येतो. प्रेक्षकांनी केलेले मतदान आणि परीक्षकांनी दिलेल्या गुणांची सरासरी च्या आधारे तो 'जोडी तेरी मेरी' बेस्ट डान्सर च्या सिजनचे विजेते रश्मी आणि गौरव असल्याचे जाहीर करताच दोघेही एकमेकांना गच्च मिठी मारून आनंद साजरा करतांना अश्रूंना वाट मोकळी करून देतात. प्रेमात दुसऱ्याला फसवण्यासाठी निघालेले स्वतःच फसतात. त्यांचे अश्रूं त्यांना हे नाते गरज नसून खरं प्रेम आहे याची जाणीव करून देतात. 'जोडी तेरी मेरी' बेस्ट डान्सर च्या पुरस्काराची ट्रॉफी हातात घेऊन गौरव रश्मी ला जाहीरपणे प्रपोज करतो. रश्मी त्याला 'आय लव्ह यू' म्हणून त्याचा गुलाब स्वीकारते. दुसरीकडे हा प्रसंग पाहून नीता आणि नितीन यांना जाणीव होते की त्यांचे  गौरव आणि रश्मी सोबतचे नाते खरं प्रेम नसून केवळ आकर्षण होते. प्रेमासाठी आत्मिक अनुभूती आवश्यक असते जी त्यांना कधी अनुभवताच आली नव्हती. ती गौरव आणि रश्मीच्या अश्रूंतून अवघी दुनिया अनुभवत होती. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama