FEW HOURS LEFT! Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
FEW HOURS LEFT! Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

निलेश कवडे

Fantasy Thriller


4.0  

निलेश कवडे

Fantasy Thriller


भिकुंडचे रहस्य

भिकुंडचे रहस्य

8 mins 229 8 mins 229

२४ एप्रिलला मंगेशचा वाढदिवस असतो. संध्याकाळी मंगेशचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी त्याचे जिवलग मित्र अभय, इम्रान आणि अशोक वाढदिवसाच्या पार्टीसाठी साहित्य खरेदी करण्यात व्यस्त असतात. त्यांना मंगेशला वाढदिवसाच्या पार्टीचे 'सरप्राईज' द्यायचे असते. अशोक वेगवेगळ्या ब्रँडची दारू, सिगारेट, सोडा, मसाला आणि डिस्पोजल ग्लास वगैरे साहित्य बाजारातून खरेदी करतो. अभय एका हॉटेल वाल्याला रोस्टेड चिकन आणि चिकन मसाला ची अग्रीम ऑर्डर देऊन ठेवतो. तर इम्रान बेकरीवाल्याला केकची आणि वाढदिवसाला लागणाऱ्या वस्तूंची व्यवस्था करायला सांगतो. संध्याकाळी तिघेही सर्व साहित्य इम्रानच्या कार मध्ये घेऊन मंगेशच्या घरी हजर होतात. वाढदिवसाच्या सरप्राईज पार्टीचे आयोजन पाहून मंगेश खूप खुश होतो. मात्र घरी पाहुणे असल्याने घरी गच्चीवर पार्टी जमणार नाही असे सांगतो. आता जायचे कुठे? हा प्रश्न उपस्थित होतो. वेळेवर स्थळ कसं ऍडजस्ट करायचं? तेव्हा इम्रान त्यांना "अकोलासे २०-२२ किमी बाद राष्ट्रीय महामार्ग को से नजदीक भिकुंड के पास नदी के किनारे अच्छी जगह हैं वहां कोई डिस्टर्ब भी नहीं करेंगा" असे सांगतो. जागेचे वर्णन आवडल्या मुळे लगेच कार मध्ये पॉप म्युझिक लावून ते चौघे रवाना होतात.


उन्हाळा असल्यामुळे रात्रीचे सात वाजले तरी भिकुंड परिसरात संधीप्रकाश होता. नदी, सपाट गवताळ आणि निर्मनुष्य जागा पाहून चौघेही आनंदी होतात. गाडीचे हेडलाईत आणि चंद्र प्रकाशात मंगेशच्या बर्थडेचे सेलिब्रेशन जोरात सुरू होते. बाटलीवर बाटली रिचवली जाते. रात्रीचे साडे अकरा वाजले होते. चौघांनाही दारू प्रचंड चढली होती. त्यांना नीट चालताही येत नव्हते. मंगेश तर पार थकला होता. एका हातांनी जमिनीचा कसाबसा आधार घेऊन तो बसला. कसेबसे त्यांनी जेवण सुरू केले. कॉलेजच्या गमतीजमतीवर चर्चा सुरू होती. तेवढ्यात ढगाएवढा एक तेजपुंज ग्रह जमिनीच्या दिशेने अति वेगाने खाली येत असल्याचे त्यांना दिसले. आजूबाजूचे पक्षी जोरात आवाज करत उडू लागतात. त्यांना उल्का पडत आहे असे वाटते. ताऱ्यासारखा प्रकाश असणारी ती उल्का निळी नारंगी होऊ लागते. जोराने वीज पडावी असा खूप लख्ख प्रकाश होतो. सर्व मित्र घाईघाईने गाडीमध्ये बसतात. इम्रान गाडी अकोलाच्या दिशेने सुसाट घेतो. गाडीमधून त्यांनी मागे पाहिले तर त्यांना अजूनही लख्ख प्रकाश दिसतो. थोडे अंतर पार केल्यावर त्यांच्या लक्षात येते की, मंगेश तर गाडीमध्ये बसलाच नव्हता. इम्रान गचकन गाडीला ब्रेक लावतो. त्यांची दारू क्षणात उतरते. इम्रान म्हणतो, "आता काय करायचं? पहले ही देखना चाहीए था!"


"हाव यार पयले पाह्याले पाहिजे होतं हे बी बरोबर हाये पन त्याले तिथं एकटे सोळन बी बरोबर नाही त्यांच्या घरी काय सांगसान" अशोकच्या या बोलण्याला अभय दुजोरा देऊन म्हणतो, "जिगरी दोस्त हाये मंग्या आपला त्याले एकटे सोळन बरोबर नाई इम्रान गाडी पलटा मंग्याको लाऐंगे" कार पुन्हा भिकुंड च्या दिशेने जाते…


ते कारने भीत भीत त्या ठिकाणी पोहोचतात. चारही बाजूंनी दाट अंधार असतो. मघाचा वीज पडल्यासारखा प्रकाश आता गायब झालेला असतो. पार्टीचे सामान अस्ताव्यस्त पडलेले असते. रात्र किड्याचा किर्रर्र आवाज येत असतो. तिघेही इकडेतिकडे पाहतात… मात्र मंगेश कुठेही दिसत नाही. जवळच एका ठिकाणी त्याचा मोबाईल पडलेला दिसतो. तो मोबाईल ताब्यात घेतात. पुढे जिथे त्यांना तो प्रकाश दिसला होता तिथे त्यांना अंडाकार निशाण दिसते. मातीवर काळी निळी झालेली असते. एखाद्या पावलाचा ठसा पडावा तसा जमिनीवर मोठा अंडाकृती ठसा पडलेला पाहून तिघेही घाबरतात… अभय म्हणतो "अबे काय अशिन हे उल्का अशिन काय?" अशोक त्याला म्हणतो, "उल्का असती तं काई सबूत दिसलं असतं हे मले वेगळंच दिसून रायलं" घाबरलेला इम्रान त्यांना म्हणतो, "देखो यह समय सोचने का नहीं है मंगेश गायब हो गया है जल्दी पुलिस को बता देते है यही ठीक रहेंगा" तिघेही तेथून बाळापूरच्या पोलीस स्टेशनला निघतात…


पोलीस स्टेशनला पोहोचताच पोलिसांना ते घडलेली सर्व हकीकत सांगू लागतात मात्र तिघेही दारू पिलेले असल्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर विश्वास बसत नाही. तोपर्यंत रात्रीचे दोन-अडीच होतात… मंगेशचा मोबाईल दाखवून पोलिसांना मंगेश हरवल्याचे तिघे शेवटी पटवून देतात. एक पोलीस मंगेशच्या बाबांना फोन करून मंगेश घरी पोहोचला का याची खात्री करतो मंगेश घरी पोहोचला नसल्याचे पाहून पोलीस त्यांची गाडी काढतात आणि त्या तिघांना सोबत घेऊन भिकुंडकडे निघतात… रात्रीचे तीन वाजता पासून सकाळचे पाच साडेपाच वाजेपर्यंत पोलीस त्या तिघांसह संपूर्ण परिसर पालथा घालतात परंतु त्यांना मंगेश काही दिसत नाही. अंडाकृती ठसा पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटते. पोलीस अकोला कंट्रोल रूमला झालेली घटना कळवतात… थोड्या वेळात अकोला पोलिसांची एक अतिरिक्त तुकडी त्या जागेचा ताबा घेते. बाळापूर पोलीस त्या तिघांसह पोलीस स्टेशनला परत येतात.


मंगेश हरवला असल्याबाबत त्यांच्या घरी कळवले जातात त्याचे आई-वडील बाळापूर पोलीस स्टेशन गाठतात. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस त्या तिघांना ताब्यात घेतात. त्यांची वैद्यकीय तपासणी करून घातपाताच्या दृष्टीने तिघांची प्राथमिक चौकशी केली जाते. संपुर्ण अकोला जिल्ह्यात भिकुंडला एलियन्स येऊन त्यांनी सोबत मंगेशला नेल्याची चर्चा पसरते. भिकुंडच्या त्या जागेला पोलीस छावणीचे रूप घेऊन जाते. अकोला जिल्हाधिकारी त्या ठिकाणाला भेट देऊन आपल्या वरिष्ठांना अहवाल सादर करतात तोवर तेथे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे लोकं गर्दी करतात. उलट सुलट चर्चांना ऊत येते. मंगेशला खरंच एलियन्स सोबत घेऊन गेले का? दुपारपर्यंत हा विषय राष्ट्रीय पातळीवर गाजू लागतो. 


ती उल्का नसून यूएफओ... 'अन्आयडेंटीफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट' म्हणजेच ‘उडत्या तबकडय़ा’ असतील हा तर्क लोकांद्वारे लावला जातो. अकोलापासून जवळ लोणार सरोवर आहे त्याचा आणि या घटनेचा संबंध काही जण जोडतात… तर कोणी अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील लासूर गावातील आनंदेश्वर मंदिराच्या उघड्या गोल घुमूटाशी याचा संबंध असल्याचे बोलतात. तऱ्हेतऱ्हेचे तर्कवितर्क परिसरातच नाही देशात लावले जातात. 'इस्त्रो' या संस्थेशी निगडित असलेल्या शास्त्रज्ञांची एक चमू विशेष हेलिकॉप्टरने अकोल्याला पोहचते. शास्त्रज्ञ तिथल्या मातीचे आणि इतर काही नमुने घेतात… अंतराळातून काहीतरी या जागेवर येऊन गेल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला जातो. मात्र सद्या ठोस निर्णयापर्यंत पोहचता येणार नसल्याची कबुली शास्त्रज्ञ देतात. नमुने प्रयोगशाळेत पाठवले जाणार असल्याचे सांगितले जाते.


तिसऱ्या दिवशी दुपारी मंगेश घरी आल्याचे त्याचे वडील पोलिसांना कळवतात… तो सापडला असल्याने त्या रात्री नेमके काय घडले? त्याला कोणी आणि कुठे नेले? अशा ना ना प्रश्नांविषयी संपूर्ण देशात कुतूहल निर्माण होते. मंगेशच्या घराबाहेर पत्रकार आणि सामान्य नागरिकांची गर्दी जमा होते. पोलिसांद्वारे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाते. इस्रोचे वैज्ञानिक त्याची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे चौकशी करतात. त्याला प्रश्न विचारले जातात. मंगेश त्यांना आधी घडलेली इत्यंभूत माहिती देताना म्हणतो की, "त्या रात्री जेवायला बसल्यानंतर अचानक आकाशातून ढगाच्या आकाराची एक चमकदार वस्तू जमिनीकडे येत असल्याचे आम्ही पाहिले, तो डोळे मिचकावणारा प्रखर प्रकाश होता. माझे मित्र घाबरून गाडीत बसले मला मात्र लवकर उठता आले नाही. मी उठलो तोपर्यंत मित्र निघून गेल्याने मी घाबरलो. मी तेथून निघणार तोच वारा जोरात वाहू लागला. माती उडू लागल्याचा मला भास झाला होता. सोबतच कसलेतरी जळण्याचा उग्र दर्पसुद्धा येत होता. सर्वत्र केवळ लख्ख प्रकाश होता.


मी रस्ता शोधू लागलो. वाऱ्याच्या वेगाने माझा तोल गेला. मी खाली पडलो होतो. मी माझी पूर्ण ताकद लावून मातीवर उलटा लेटलो. गच्च डोळे मिटले. मागे पाहण्याची हिम्मत होत नव्हती. जमिनीवर काहीतरी आदळत असल्याचा आवाज ऐकू आला. काही वेळाने तो आवाज आणि तो प्रकाश आकाशात वर जात नाहीसा झाला. मी उभा राहिलो तेव्हा माती जळण्याचा आवाज ऐकू येत होता. नदीच्या तीरावर एका ठिकाणी पाण्याच्या वाफा निघत असल्याचे चंद्रप्रकाशात दिसले. मागे वळून पाहिले तर जमीन दाबली गेली असल्याचे पाहिले. मी जीवात जीव आणून रस्त्यावर आलो. रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हते थोड्या वेळाने एक ट्रक दिसला मला घाबरलेला पाहून त्या ट्रकवाल्याने लिफ्ट दिली… मला ट्रकच्या मागे बसायला सांगितले मी बसलो… मला येथून लवकर निघायचे असल्याने मी ट्रक ड्रायव्हरला काहीच सांगितलं नाही. थोड्या वेळाने त्या ट्रक मधून मला माझ्या मित्रांची कार भिकुंडकडे जाताना दिसली मी आवाजही दिला मात्र पोहचला नाही मोबाईल शोधतो तर तो तिथेच राहिल्याचे मला कळले नंतर मला झोप लागली. सकाळी उशिरा ट्रक वाल्याने मला आवाज दिला. बघतो तर मी नांदेड शहराच्या सीमेवर पोहोचलो होतो. माझी तब्येत बरोबर नव्हती. मला त्यांनी एका धाब्यावर उतरून दिले. त्यादिवशी मला प्रचंड ताप आला होता. मी त्या धाब्यावर आराम केला. नंतर मला बरे वाटले पोटात अन्नाचा तुकडा नव्हता खूप अशक्तपणा आला होता कसाबसा अकोला जाणाऱ्या एका ट्रक मध्ये बसलो. अकोल्याला पोहचलो तर ही चर्चा पेपरमध्ये दिसली आणि सरळ घरी आलो" त्याला आणखी काही प्रश्न विचारले जातात. तो सर्व उत्तरे देतो. 


मंगेशला टिव्हीवर सुस्थितीत पाहून त्यांच्याविषयी लोकांना वाटणारी काळजी कमी होते. त्याला एलियन्सनी नेले नसल्याचे जाहीर करण्यात येते. झालेल्या घटनेत घातपात झालेला नसल्याने मंगेशच्या मित्रांची सुटका होते. मंगेश सुध्दा चौकशी झाल्यावर घरी पोहचतो. ते चौघे मित्र एकत्र येतात. मंगेश पलंगावर लेटलेला असतो. कुणीही कुणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नसतो. चौघे धास्तावलेले असतात. मंगेश एक मराठी न्यूज चॅनल लावतो. त्या चॅनलवर भिकुंड च्या घटनेवर आधारित चर्चा सुरू असते. भिकुंडला मातीमध्ये मिळालेले धातूचे कण पृथ्वीवरील नसल्याचा दावा एक वैज्ञानिक करतो. मंगेश आणि त्याच्या मित्रांच्या स्टेटमेंटवरून भिकुंडचे रहस्य आणखी गुंतागुंतीचे बनले असल्याचे चॅनलवर सांगितले जाते. 'नासा' सारख्या संस्थेची मदत इस्रो ने घ्यावी असेही चॅनलवर लोकं भारत सरकारला सुचवतात. एक राजकीयनेता खरंच एलियन्सचे यान आले असते तर कोणत्या ना कोणत्या देशाच्या रडारवर दिसले असते ही शंका उपस्थित करतो. ही शंका एलियन्सचा अभ्यास करणारा एक अभ्यासक खोडून काढतो. रडार भेदने सहज शक्य असल्याने हा दावा फोल ठरतो. सोबतच तो एलियन्सच्या जुन्या घटना आणि भिकुंडच्या घटनेतील साम्यत्येकडे डोळेझाकपणा करणे चुकीचे आहे असे मत मांडतो. न्यूज चॅनलचा निवेदक चर्चेची वेळ संपत आली असल्याचे पाहून चर्चेबाबत समारोपीय मत व्यक्त करतो की, "भिकुंड च्या रहस्यमय घटनेवर पडदा पडणार की एलियन्सचे रहस्य एक रहस्य बनून राहील हे येणारा काळच सांगेल" टिव्हीवर जाहिरात लागते.


काही लोकांना… वैज्ञानिकांना व पोलिसांना चौघांनी केलेल्या स्टेटमेंटबद्दल शंका असली तरी चौघे मात्र आपल्या स्टेटमेंटवर ठाम होते. मंगेश टिव्ही बंद करतो. टिव्ही बंद होताच चौघे मित्र चर्चा करतात... इम्रान म्हणतो, "अगर वो सच में एलियंस होंगे तो इंसान के हाथ में कुछ भी नही लगेंगा क्योंकि एलियंस इंसान से कई गुना ज्यादा होशियार होते हैं" इम्रानचे हे वाक्य ऐकून अभय मंगेशकडे पाहून विचारतो, "तो लख्ख प्रकाश खरंच एलियन्सच्या यानाचा होता का?" तेव्हा अशोक म्हणतो, "आपण तिथं थांबलो असतो तर एलियन्स बद्दल अजून काहीतरी धागेदोरे नक्कीच आपल्या हाती लागले असते आणि भिकुंड चे रहस्य उलगडले असते" यावर मंगेश गमतीने म्हणतो, "पुढच्या महिन्यात इम्रानचा वाढदिवस आहे भिकुंडचे रहस्य जाणायला जायचं का पुन्हा तिथे वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी?" चौघेही हसायला लागतात… भिकुंडचे रहस्य आता त्या चौघांसाठीपण रहस्यमय बनले होते. 


Rate this content
Log in

More marathi story from निलेश कवडे

Similar marathi story from Fantasy