Smita Bhoskar Chidrawar

Fantasy

4  

Smita Bhoskar Chidrawar

Fantasy

अगम्य...

अगम्य...

6 mins
415


आजचा दिवस खूप खास होता ! पण फक्त वरद आणि त्याच्या आईसाठीच... वरदचा तेरावा वाढदिवस...वरद तेरा वर्षांचा झाला पण वागायचा अगदी लहान मुलासारखा... जन्मतः च एक ' स्पेशल चाईल्ड ' असा टॅग घेऊन आलेला वरद नितासाठी सर्वस्व होता.पण फक्त नितासाठीच...तिच्या जीवाचा तुकडा होता तो ...पण वरदचे बाबा मात्र त्याला एक ओझं मानत...नीताच्या " दुसरं मूल मी होऊ देणार नाही.तो माझ्या वरदवर अन्याय होईल ..." या निर्णयावर नाराज होऊन दोघांना कायमचे सोडून निघून गेले...आता वरद आणि निता यांचे एक वेगळे विश्व निर्माण झाले...आज वरदच्या वाढदिवशी त्याचा इच्छेखातर दोघे जंगलात फिरायला गेले... वरदला प्राण्यांचे विशेष आकर्षण होते...


वरदचे दोन मित्र आकाश आणि गगन मिळून जंगलात आनंदाने हुंदडत होते...एका झाडाखाली वरदला काहीतरी चमकताना दिसले.जवळ जाऊन बघताच एक वेगळाच प्राणी निपचित पडलेला बघून कुतूहलाने वरदने त्याला जवळ घेतले...तो प्राणी सुद्धा वरदला बिलागला...तितक्यात आईची हाक आली " चला मुलांनो घरी जायचं आता , चला लवकर मग केक कापायचा ना..." 


वरद , गगन , आकाश निघाले पण त्या प्राण्याच्या केविलवाण्या नजरने त्यांचा पाय काही निघेना..." आता काय करायचे ? याला घरी घेऊन जाऊया ? आईला सांगू काहीतरी ..." तिघांचे एकमत झाले आणि वरद त्या प्राण्याचा हात धरून निघाला...पण त्याला चालताच येत नव्हते ! एकच छोटासा पाय होता त्याला ...शेवटी त्याला पाठीवर घेऊन नीताला कळू न देता तिघे निघाले !


घरी जाताच छान सेलिब्रेशन झालं . वरदच कशातच लक्ष नव्हतं....त्याला सारखं त्या प्राण्याबद्दल आकर्षण वाटत होतं आणि कुतुहल निर्माण झाले होते...सगळे मित्र गेले ...निता आवराआवरी करत होती.संधी साधून वरद त्याच्या खोलीत गेला ...तो प्राणी पलंगाखाली निपचित पडलेला होता...

वरद हळूच त्याच्याजवळ गेला...तसा तो पुन्हा एकदा वरादला बिलगला ! विचित्र पण गोड असा तो प्राणी वरदने पहिल्यांदाच पाहिला होता...तो कोण आहे ? कुठून आलाय काहीच कळत नव्हतं...त्याच्याशी कसं बोलावं ह्याचा उलगडा होत नव्हता...तो प्राणी वरादचा हात हातात घेऊन काहीतरी अगम्य भाषेत पुटपुटू लागला तसा वरद घाबरला आणि दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला पण त्या प्राण्याने त्याचा हात खूप घट्ट धरून ठेवला होता ... वरदला काही केल्या सुटका करून घेता येत नव्हती त्यामुळे तो खूप घाबरला आणि जोरात ओरडणार इतक्यात...

"हॅलो ... घाबलू नकोस ...मी तुझा मितल आहे...मी एका मंचेस्टर नावाच्या ग्रहावरील प्राणी आहे..." असे मोडक्या तोडक्या भाषेत अडखळत बोलू लागला...

वरद एकदम एक्साईट झाला .हे खरं असेल असं त्याला वाटत नव्हतं... मग त्या प्राण्याने त्याची पूर्ण माहिती दिली...तो आणि त्याचे आई बाबा आणि एक छोटी बहीण भारतात संशोधनासाठी आले होते .पण त्याची बहीण जंगलात हरवली आणि तिला शोधण्यासाठी तो ही आई बाबांपासून दूर गेला...आई बाबा आम्हाला शोधत राहिले पण आम्ही भेटलोच नाही ...आम्ही सगळे एका बँड द्वारे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतो पण माझ्या बँड ची बॅटरी संपली आणि माझ्या बहिणीचा बँड मला झाडाखाली सापडला...त्यामुळे तिला शोधता आलं नाही .मी तुझा हात धरून माझ्या वेव्हज द्वारे तुझी भाषा शिकलो आणि आता तुझ्याशी बोलू शकतो ! 


मला मदत करशील का ? माझ्या बहिणीला शोधून मला माझ्या आई बाबांकडे परत जायचंय...

वरद ने त्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं...पण कसं करणार होता तो मदत ? तो स्वतः एक स्पेशल चाईल्ड होता ...

" माझं नाव वरद ...तुझं नावकाय रे मित्रा ?" यावर त्याने आपलं नाव ' अगम्य ' असल्याचं सांगितलं !


अगम्य ने त्याच्या ग्रहाची माहिती वरदला सांगितली.त्याला फारसे काही कळले नाही पण तो ग्रह पृथ्वी पेक्षा खूपच प्रगत होता इतके कळले...

अगम्य जरा दिसायला विचित्र होता...त्याला एक मोठा आणि एक छोटा डोळा होता ...कान खूपच मोठे आणि डोक्यावर छोटासा अँटेना होता...मान नावाचा प्रकारचं नव्हता आणि तीन हात पण पाय एकच होता ... मोठ्या पोटावर एक पॉकेट सारखं काहीतरी होतं... असा हा अगम्य नावाप्रमाणेच अगम्य असा होता.

" तू काय खातोस ? भूक लागली असेल ना तुला " 

" हो रे खूप भूक लागलीय...मला प्लास्टिक लागतं ...तुझ्याकडे काय आहे प्लॅस्टिकचा ते मला दे लवकर...आणि तोपर्यंत माझा हा बँड चार्ज करतो..." असे म्हणून अगम्य ने त्याच्या पोटावरच्या पॉकेट मधून एक छोटीशी पिन काढून बँड सोबत चार्जिंग ला लावली.


वरदने त्याचा प्लॅस्टिकचा टिफीन अगम्य ला दिला...अगम्य ने पुन्हा त्याचा पॉकेट मधून एक छोटा बॉक्स काढला , त्यात स्वतःच्या हाताने टिफीन चे बारीक बारीक तुकडे अगदी सहजपणे करून टाकले आणि पुन्हा तो बॉक्स पोटात ठेवून दिला...डोळे विस्फारून बघणाऱ्या वरदला त्याने समजावले " अरे हे माझं पोट आहे...आम्ही असेच खातो ...आता उद्यापर्यंत मला काही लागणार नाही..."


दुसऱ्या दिवशी शाळेत वरदने कमालच केली ...नेहेमी टीचर चा ओरडा खाणाऱ्या वरदने सगळ्या प्रश्र्नांची उत्तरे अगदी पटापट आणि अचूक दिली...आज त्यांची फुटबॉल मॅच होती...वरद नेहेमीप्राणेच एक्स्ट्रा प्लेयेर होता... बुध्दी बरोबरच वरद ची शारीरिक क्षमता सुद्धा कमी असल्यामुळे त्याला कोणी टीम मध्ये घेत नव्हते...पण आज एक मुलगा आजारी पडला आणि वरद ला खेळायचा चान्स मिळाला ! आज टीम नक्की हरणार असे वाटत असतानाच वरद ने एकावर एक असे गोल मारून टीमला जिंकवले...सगळेजण डोळे विस्फारून वरद ला खेळताना पाहून मंत्रमुग्ध झाले होते ! वरद ला सगळ्यांनी उचलून धरले आणि एकाच जल्लोष केला...इतकी शक्ती आणि बुद्धी अचानक कशी आली तेच वरदला कळेना ... वरदला त्याच्या परफॉर्मन्स साठी ट्रॉफी मिळाली ! 


खुशितच घरी जाताना त्याने आकाश आणि गगनला अगम्यचं सिक्रेट सांगितलं.दोघांनाही अगम्य ला भेटण्याची खूप घाई होती ...घरी जाताच वरद च्या हातात ट्रॉफी बघून नीताला आभाळ ठेंगणं झालं ! तिने डोळेभरून वरद ची दृष्ट काढली...थोड्या वेळातच आकाश आणि गगन आले .वरद च्या खोलीत अभ्यास करतो असे सांगून ते अगम्य ला भेटले ! आता तो त्यांचाही मित्र झाला होता. सगळ्यांनी मिळून आधी अगम्यच्या बहिणीला अग्नी ला शोधायचं ठरवलं...

' खेळायला जातो ..' असं घरी सांगून तिघेही जंगलात निघाले अर्थात अगम्य ला सोबत घेऊन ...पण लपवून...


सगळीकडे शोधतांना आकाश ला एका दरीत काहीतरी चमकताना दिसलं...सगळे जायला निघाले पण जाणार कसं खूप खोल होती ती दरी...आणि अगम्य ने त्याच्या पॉकेट मधून काहीतरी काढलं आणि सगळ्यांना काही कळायच्या आत एका मशीन च्या सहायाने ते दरीत पोचले...ती अग्नीच होती...पण तिची बॅटरी पूर्ण संपली होती...मग सगळे घरी आले ... अग्नीला खायला घालून तिला चार्ज केले आणि दोघा बहीण भावानीं छोट्या मित्रांचे खूप आभार मानले.


या एलियन्स कडे अनोखी शक्ती होती.त्यामुळेच वरद आता अगदी हुशार आणि चपळ झाला होता !  आता एलियन्सना परत त्यांच्या ग्रहावर पाठवायचे होते...पण या लहान मुलांवर कोण विश्वास ठेवणार ? वरदने मग त्याच्या आईला सगळं सांगितलं...आधी निताचा विश्वास नाही बसला पण मग प्रत्यक्ष पाहिल्यावर तिची खात्री पटली.


नीता मग त्यांच्या विज्ञान शिक्षकांना भेटली ...साठे सरांनी खूप प्रयत्न करून या घटनेची तपासणी केली...आपल्या गावात युएफओ आल्याची पुष्टी त्यांना काही शास्त्रज्ञ मंडळींनी दिली.त्यांचे या विषयावर संशोधन सुरूच होते ! या मुलांचे सगळ्यांनी भरभरून कौतुक केले.अगम्य आणि अग्नी च्या मदतीने सिग्नल पाठवायला सुरुवात केली आणि अथक प्रयत्नानंतर यश आले ! एका गूढ सिग्नल द्वारे अगम्य आणि अग्नी ला परत नेण्यासाठी त्यांचे आई बाबा येणार असल्याचे त्यांना समजले.पण हे अगदी गुप्त ठेवणे जरुरी होते ! अगम्य ने हे सगळे शास्त्रज्ञ मंडळीं पासून लपवले...वरद ला गुपचूप सांगून त्या दोघांना तिथून बाहेर काढण्याची विनंती केली.


वरदने शर्थीचे प्रयत्न करून अगम्य आणि अग्निला गुपचूप जंगलात नेले...त्याच्या सुपर पॉवर मुळे त्याला हे शक्य झाले...जंगलात अगम्य आणि अग्नीचे आई बाबा आले...वरद चे खूप आभार मानून त्यांनी त्याला सुपर पॉवर दिल्या आणि सोबत त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी बँड सुद्धा दिला...

अचानक आरडा ओरडा एकू आला...एलियन्सना पकडायला सगळे येत होते...वरद ने ताबडतोब त्या सगळ्यांना परत जायला सांगितले आणि एकट्याने लोकांना थोपवून धरले...


शास्त्रज्ञ या गोष्टीमुळे वरद ला खूप ओरडले ...त्यांना एलियन्सना पकडुन सगळी माहिती मिळवायची होती...फक्त निता आपल्या मुलाच्या बहादुरीमुळे खुश होती..आता त्यांच्या जीवनात आनंद परत आला होता...काही वर्षातच वरद एक नामांकित शास्त्रज्ञ झाला होता आणि यात सगळ्यात मोठा वाटा असणाऱ्या ' अगम्य ' ला तो कधीच विसरला नाही ...अजूनही या एलियन्सशी त्याची मैत्री अबाधित आहे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy