पितृछाया
पितृछाया


नमस्कार मी पितृछाया बंगला बोलतोय:-
मध्य आकाशातील मावळतीचा सुर्य पश्चिमेकडे झुकला होता, त्याच्या छान अशा मंद उबदार किरणांनी माझ्या अंगावर एक निराळाच सुवर्ण प्रकाश जाणवत होता. मी पितृछाया बंगला पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत म्हणजेच आजच्या भाषेत हाय सोसायटीमधे राहातो. पण मी तर येथे अनेक वर्षापासून राहतो. पूर्वी गडद वनराई, बहरलेला पारीजातक, पवित्र वटवृक्ष, कोकिळेचे साद, पक्षांचे नाद माधुर्य आणि पानाफुलांची अनोखी सळसळ जणू लपंडावच खेळत असे. नभातून होणारा ऊन पावसाचा खेळ व सुर्यप्रकाशाच्या वेगवेगळ्या रंगांची उधळण होत
असल्यामुळे माझ्या शरीरावरसुद्धा अनेक रंगांच्या छटा दिसत असे. कधी मंद वारा तर कधी
उधाणलेला वारा आणि त्यातुनच आलेला एक अनोखा सुगंध कितीही उंची व मोलाची किंमत
असलेल्या अत्तरापेक्षाही भिजलेल्या मातीचा सुगंध काही औरच नाही का ? थोड्याच अंतरावर
असलेल्या हनुमान टेकडी व वेताळबाबा टेकडी अशा प्रकारच्या विलक्षण रम्य निसर्गाच्या
सौंदर्यात मी रममाण होत असे. माझे मालक श्री जोशी व प्रतिभा जोशी या दोघांमुळे आजही मी येथे मोठ्या दिमाखात उभा आहे.
कधी कधी पावसाच्या पाण्यात पाहातो स्वतःचे प्रतिबिंब. माझ्यासारखे समृद्ध घर नाही असे मी माझ्या मनाला म्हणतो. गर्व नाही पण अभिमान मात्र नक्कीच आहे.
माझ्या येथे सुख दुःखाच्या घडलेल्या अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. मालक आणि मालकिण मला प्रत्येक सुख दुःखाची गोष्ट सांगत असे आणि मी पण ते मन लावून ऐकत असे. कधी हळूच कानात, कधी रागात, सगळया गोड - आंबट गोष्टी आम्ही एकत्रितपणे ऐकत आणि काही प्राॅब्लेम आल्यास, विचार विनिमय करुन सोल्युशन काढत असत. माझ्या मालकाने आणि मालकिणीने पितृछायेत येणारे प्रत्येकाचे हसतमुखाने स्वागत केले. हजारो लोकांच्या जेवणावळी येथे मोठ्या थाटामाटात पार पडल्या आणि आजही कोणीही माझ्या ह्या आनंद-निलयम पितृछायेतुन उपाशी जात नाही. याचा अतिउच्च आनंद मला आहे.
माझ्या घरात मित्रमैत्रिणी आले, नातेवाईक आले, प्रत्येकाचे सुख आणि दुःख मी ऐकले. सगळ्यांसोबत मी हसता हसता रडलो आणि रडता रडता हसलो असे फक्त माझ्या आणि माझ्याच भव्य दिव्य आवारामध्ये घडले. बाकी कुठेही नाही. दरवर्षी गणपती विघ्नहर्त्याचे स्वागत माझ्या घरात विविध प्रकारची आकर्षक सजावट करुन केले जाते. तसेच दिवाळीत सुध्दा रांगोळी, दिव्यांची रोषणाई, मिठाई, फराळ आणि उंच आकाशात रंगीबेरंगी आतिषबाजी केली जाते. आकाशातील तारे मला म्हणतात रोज तसा छान दिसतो, छान हसतो हं पण आज स्वारी जरा जास्तच खुश दिसतेय.
माझ्या आयुष्यात सर्वात मोठा दुःखाचा दिवस म्हणजे माझ्या मालकाचा झालेला अपघात, त्या दिवशी मी मालकिणीला म्हणालो ‘‘घाबरु नकोस, काहीही होणार नाही, अवघड प्रश्न आणि अवघड वळणंच तर इतिहास घडवितात, आठव तो श्रीरामाचा चौदा वर्षाचा वनवास, अगं वेळ आणि काळंच सर्वांचे उत्तर आहे. यासाठी तर देवांनापण परीक्षा द्यावी लागली. ज्या सकाळी प्रकाशमान सूर्याची किरणे येताच श्रीरामाला राज्य द्यायचे ठरले होते त्याच सकाळी वेळ व काळ बदलल्याने श्रीरामाला वनवासाला जावे लागले. तसेच श्रीकृष्णानेसुद्धा अनेक संकटं पार केली, समुद्र मंथनाच्यावेळी अमृतासोबत विषसुद्धा बाहेर आले हे तर तू जाणुन आहेसच!’’
कालाय तस्मै नमः!
मग आपण तर साधी माणसं आहोत बरोबर ना, मी तिला नेहमी सांगतो मी तुझ्या पाठीशी नव्हे तर सोबतच आहे.
एके दिवशी यमराज माझ्या मालकिणीला घ्यायला आले. मी क्षणात डोळे बंद केले आणि उघडले. अनंत सूर्य अस्तला गेल्यागत सर्वत्र अंधकार दाटल्यासारखे वाटले. मला निर्जीव आणि सजीव सर्वांचे अस्तित्व दिसते. त्यांचा आवाज, त्यांच्या वेदना, त्यांचा आनंद मी सर्वच सूज्ञ प्रकारे जाणतो. माझ्या मालकिणीने प्रथम यमराजांना विनंती केली की थोडे दिवस द्या मला, यमराज म्हणाले "मी नियमाप्रमाणे चालतो. मालकिण म्हणाली ठिक आहे. तुम्ही तुमचा नियम मोडू नका, मी तुमच्या सोबत येते पण एक शेवटची इच्छा पूर्ण करा ही नम्र विनंती." यमराज म्हणाले "मरणाऱ्यांची इच्छा तर देव पण पूर्ण करतो, मी तर त्यांचा दूत म्हणून आलो आहे,
बोल काय आहे तुझी शेवटची इच्छा?". मालकिण म्हणाली, "माझ्या पितृछायेतून कधीही
कोणीही जेवण केल्याशिवाय गेलेलं नाही, तर तुम्ही पण माझ्या घरी जेवण करावे मी तुम्हाला वाढते आसनस्थ व्हा या चंदनाचा पाटावर." यमराज म्हणाले, "तुझी शेवटची इच्छा आहे ना!, चल ठिक आहे." साक्षात यमराजांना माझ्या घरात चांदीच्या ताटात मालकिण सुग्रास गरम गरम स्वयंपाक करुन वाढत हाती आणि मी हे सर्व गदगद होऊन पाहात होतो. माझ्या एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू येत होते.
जसे जेवण झाले तसे मालकिणीने विडा व सुपारी देउन नमस्कार केला. ती म्हणाली, "चला यमराज" उंबरठा पार करताना तिने मलाही नमस्कार केला. यमराज तिला गेटपर्यंत घेऊन गेले आणि म्हणाले शेवटचे घे बघुन तुझ्याच घराला तुझ्याच नयनांनी. मी पण माझ्या मालकिणीला भरलेल्या डोळ्यांनी निरोप देतच होतो आणि तिला म्हणालो, "तुझ्या चर्मचक्षूंना जे दिसत नाही ते सर्व माझ्या प्रज्ञाचक्षुंना दिसते" आणि मालकिण शेवटच्या क्षणाला माझ्याकडे बघून म्हणाली मोठमोठ्या लढाया जिंकले मी या पितृछायेत अगदी आनंदात, आता काही दुःख नाही, काही
इच्छा नाही. काय मस्त जीवन जगले मी व्वा! खुप मजा आली. देवा अगदी मोक्ष देण्यापेक्षा अजून एकदा तरी जीवन नक्की दे." असे म्हणताच यमराज म्हणाले! "अंतर्ज्ञानाने मी सर्वच ऐकले आहे. मी आतापर्यंत ज्यांनापण घ्यायला गेलो त्या सर्वांनी मला म्हटले की, मला वेळ दया माझी महत्त्वाची कामे राहीली आहेत. मुलांना भेटण्याची इच्छा राहीली आहे, खाण्याची
इच्छा, संपत्तीची कामे राहीली आहेत म्हणून मला तुम्ही वेळ द्या. अनेकांनी केलेली विनंती मला आठवत आहे आणि कळवळून केलेली प्रार्थनापण आठवत आहे. अशा अनेकांच्या इच्छा मी ऐकल्या! पण या यमदुताला कधीच कुणीही जेवणासाठी विचारले नाही. फक्त तूच मला विचारले आणि तुझी इच्छा मी पूर्ण करतो. थोड्या वर्षांनी येईन पुन्हा कधीतरी!"
"न भुतो न भविष्यती, घे जीवन जगून!"
सांगण्यासारखे खुप आहे, पण रात्र कमी पडेल! पहातरी मी जेव्हा आत्मकथा सांगण्यासाठी सुरुवात केली तेव्हा मावळतीच्या सूर्यनारायणांची किरणे माझ्या अंगावर हळूवार स्पर्श करीत होती आणि आपण इतके मंत्रमुग्ध झालो की रात्री आकाशाच्या अंगणी अमर्यादित असलेल्या आणि सौंदर्यांनी नटलेल्या प्रकाशमान नक्षत्रांची झुंबरे कशा प्रकारे डोलत आहे हे समजलेच नाही. तसेच पौर्णिमेचा चंद्र कधी आला हे उमगलेच नाही.