मनमोकळा श्वास
मनमोकळा श्वास
गेले वर्षभर एका खोलीत,एका कपाटात बंदिस्त असलेले आम्ही म्हणजे वेगवेगळी खेळणी, कपडे ,पुस्तके अगदी मलूल झालो आहोत...हो ना ...सोनू तिच्या पुढील शिक्षणासाठी परगावी गेली आणि त्यानंतर त्या खोलीत कुणी यायचंच नाही... गेले वर्षभर फक्त आम्हीच या खोलीत एका कपाटात डांबले गेल्यासारखे राहात आहोत..
सुरवातीला आम्हाला वाटलं की येईल कुणीतरी आपली विचारपूस करायला...आपल्याशी गप्पा मारायला..आपल्याला प्रेमाने जवळ घ्यायला...पण कोणालाच वेळ नव्हता ...सोनू परगावी गेली आणि एकटेपण खायला उठलं.. मग आम्हीच फक्त आपापसात बोलायचो..कधी भांडायचो...कधी नुसताच अबोला धरत होतो पण त्यात गम्मत नव्हती..तेंव्हा वाटायचं की ..छे.. हे काय जिणे आहे का ? निर्जीव असलो तरी आम्हाला पण भावना आहेत ना ....कधी कधी वाटतं की फोडावी ती कपाटाची काच आणि यावं बाहेर...घ्यावा मनमोकळा श्वास..सतत कपाटात कोंडल्या अवस्थेत बसण्यापेक्षा जावे दार उघडून बाहेर...रमावे इतरांमध्ये...कधी एकदा सोनू येईल आणि आम्हाला प्रेमाने जवळ घेईल असे झाले होतं...अश्या रोज निराशेच्या गर्तेत खोल खोल जात असताना एक दिवस...
कर्रर्रर्रर्र,अरे बापरे ,कसला हा आवाज ?कुठून येतोय इतका उजेड ?दार उघडतेय कुणीतरी खोलीचं ...किती दिवसांनी ,जवळजवळ एक वर्षाने कोणीतरी येतंय या खोलीत... अहाहा...किती ती मंद वाऱ्याची झुळूक ...तो माणसाचा परिचित गंध...अरे..या तर आपल्या शांताबाई...आज बरं या कामवाल्या बाईंना वेळ मिळाला... आमची म्हणजेच सोनूची खोली साफ करायला ...इतका आनंद झाला की काय सांगू...
सोनूच्या खोलीतल्या कपाटात जवळपास एक वर्ष दाटीदाटीने बसलेले सोनूचे वेगवेगळे खेळ, तिचे असंख्य कपडे,तिची आवडती पुस्तकं यांची कुजबुज ऐकून शांताबाईना पण गहिवरून आले.. जिथे हात फिरवू तिथे त्यांना सोनूचे अस्तित्व जाणवू लागले...
कपाटातील तिची खेळणी एकमेकांसमवेत गप्पा मारता मारता भांडूही लागली होती...
सोनू खरं म्हणजे आता 20 वर्षांची झाली होती पण त्यातले एक टेडी बेअर ,त्याचे नाव होते सॉफ्टटी ...गुलाबी रंगाचं आणि अगदी मऊ मऊ ...सतत सोनूला जवळ लागायचे..रात्री झोपताना आलटूनपालटून एकेका टेडी बेअरला कुशीत घेऊन निजायची ती... त्यामुळे इतर खेळण्यांना दुस्वास वाटू लागला होता..आज सोनूच्या जवळ झोपण्याचा नंबर कोणाचा यावरून कधीतरी पूकी बेअर,चब्बी बेअर,फजी बेअर एकमेकात खूप भांडायचे ... आता सोनू परगावी गेली आणि गेले वर्षभर ही मंडळी ही कंटाळून गेली..
तीच गत सोनूच्या बाहुल्यांची... तिच्या बाबांनी तिला वेगवेगळ्या देशातून असंख्य बाहुल्या आणल्या होत्या...अमेरिकेहून बार्बी *डॉल*, रशियातून आणलेली बार्बी *मातूष्का*,जपानी बाहुली *निंन्गयो*, तिच्या आजीने तिला दिलेली छोटीशी *ठकी*...ही ठकी सोनूची खूप आवडती बाहुली होती...सोनू असेस्तोवर ती रोज त्या बाहुल्यांशी बोलायची..कधीतरी मजेत त्यांच्याबरोबर भातुकली सुद्धा खेळायची ..त्यांच्यासोबत गप्पा मारायची ...त्यांना बाहेर जाताना पण बरोबर न्यायची पण गेले वर्षभर एकाच खोलीत त्या डांबून बसल्या होत्या...मग एकमेकींसोबत कधी गप्पा मारायच्या किंवा कधी खूप भांडायच्या...
तीच गत तिच्या आवडत्या पुस्तकांची...खूप वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके तिच्याकडे होती...अधूनमधून सोनू त्यांना प्रेमभरे जवळ घेऊन त्यांच्याशी गप्पा मारायची.. एखादं प्रेम विषयावरचं पुस्तक वाचताना कुठेतरी स्वप्नात बघत राहायची..कधी एखादं पुस्तक वाचताना तिच्या डोळ्यात पाणी तरळायचं.. एखाद्या पुस्तकाबद्दल खूप छान रसग्रहण करायची...त्यांच्या साहायाने तिने अनेक वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या होत्या...रोज रात्री एक तरी पुस्तक वाचल्याशिवाय सोनू झोपायची नाही... आणि त्यामुळे तिच्या जवळच्या अस्तित्वाने पुस्तकं पण खूष व्हायची.. पण गेले वर्षभर त्यांच्या वरची धूळही कोणी झटकली नव्हती....त्यामुळे ती पुस्तकं पण त्यांची कोणी निगराणी न केल्याने खूप कावली होती...
एका खणातले सोनूचे खूप सारे विविध फॅशन चे कपडे...पण तेही एका वर्षात कुणीच न हाताळल्यामूळे जुनाट आणि मलूल दिसायला लागले होते...ते ही उद्विग्नतेने हमरीतुमरीवर येऊ लागले होते...अश्या तिच्या खोलीतल्या इतर अनेक गोष्टी जसे तिचा सिन्थसाईझर ,भिंतीवरचे घड्याळ की जे आता बंद पडले होते...तिचा पलंग,खुर्ची ...सर्वच खूप कंटाळले होते...
आता शांताबाईना बघून त्या सर्वांची आशा पल्लवित झाली...म्हणजे सोनू येणारे की काय ..त्या आनंदाच्या भरात खेळण्यांनी वेगवेगळे आवाज काढायला सुरवात केली...एकमेकांना टाळ्या देऊन,वेगवेगळ्या उड्या मारून त्यांनी धमालच करायला सुरुवात केली... पुस्तकांची पाने फडफडू लागली...आनंदाचा जल्लोष करत पुस्तकांचा गठ्ठा खाली कोसळला...आनंदाने कपड्यांची एकमेकात बाचाबाची सुरू झाली...मी की तू सोनूचा जास्त आवडीचा अशी त्यांच्यात स्पर्धा लागली...
एक वर्षभर कपाटात कोंबून राहिल्यामुळे त्यांच्या मनाच्या हळव्या झालेल्या कोपराची कोणालाच खंत समजू शकली नाही...
आणि शांताबाई झाडझुड करताना त्या सर्वांना एक धक्काच बसला..सोनू परगावी जाण्याअगोदर तिच्या खोलीच्या दरवाजावर एक बोर्ड तिने लावला होता *Do Not Disturb* आणि तो बोर्ड अजूनपर्यंत तसाच होता ...
आता त्या सर्वांना समजले की *Do Not Disturb* हे शब्द किती घायाळ करणारे आहेत.. माणसे सोडून जातात...आणि मागे राहतात त्या त्यांच्या आठवणी ...पण ही आठवण अशी आहे की ज्यामुळे त्या सर्वांना गेले वर्षभर कोणीच डिस्टर्ब केले नाही...का नाही काढला हा बोर्ड सोनूने परगावी जाताना...अशी कशी विसरली ती ...त्यामुळे कुणाच्याच कसं लक्षात आले नाही की ही खोली अधूनमधून उघडावी...
एकाच खोलीत एक वर्षाचा काढलेला कालावधी हा युगानुयुगं वाटणारा होता...ही महाभयंकर शिक्षा होती ...मग ती सजीव वा निर्जीव कोणालाही असू दे...एका खोलीत एक वर्षभर राहिल्यामुळे बाहेरचे जगच विसरायला झाले होते...वातावरणातला एकाकीपणा..हा एका खोलीत वर्षभर राहिल्यामुळे जास्तच गढूळ झाला होता... बाहेरचे जगच विसरायला झाले होते.
कवी द. भा. धामणकर यांनी त्यांच्या *भरून आलेले आकाश* या काव्यसंग्रहातील *वस्तू* या कवितेत म्हटल्याप्रमाणे ...निर्जीव वस्तूंचा सजीवपणा जपावा...त्यांचेही कधीतरी लाड करावेत...त्यांनाही जीव आणि मन आहे हे समजून त्यांनाही मान द्यावा...त्यांना समजून घेतले तर त्या वस्तू प्रचंड सुखावतात..
एका खोलीत,एक वर्षाचा कालावधी काढणे हे कोणत्याही सजीवाला शक्यच नाही परंतु निर्जीव वस्तू सुद्धा काळवंडून जातात...हेही त्यांच्या दृष्टीने *विलगीकरणचं* तर आहे आणि ते सुद्धा भयावह...दिवसरात्र आजूबाजूला फक्त काळोख... जवळ येत जाणाऱ्या विनाशाचीच तर जाणीव होते..म्हणजे खेळण्यांचे, पुस्तकांचे,कपड्यांचे रंगरूपच बदलून जाते...
मृत्यूची भीती ही सजीवांनाच नाही तर वस्तूंनाही असते...वातावरणातला सन्नाटा हा जीव पोखरतो... जगणं कितीही असुरक्षित असलं तरी येणारा *उद्या* ,उद्याची दिसणारी कोवळी पहाट, उद्यासाठी रचलेले वेगवेगळे मनोरथ हे एका खोलीच्या बाहेरचं जग किती सुंदर आहे हे दाखवून देतं ...*उद्या* ही जाणीवच मनाला पालवी फुटणारी आहे..
एका खोलीत एक वर्षाचा कालावधी हा शब्दच आपल्या सुरक्षित तटबंदीला सुरुंग लावणारा आहे... .त्यामुळे एका खोलीत एक वर्षाचा कालावधी कंठायला कोणालाच लागू नये... हवे स्वछंदी ,मनमोकळे आयुष्य...