2030
2030
"हॅलो, आई, तू केव्हा येणार आहेस?" रडवेल्या स्वरांमध्ये आशिष विचारत होता.
त्याला सकाळीच कळलं होतं, जेव्हा आई ऑफिसचे कपडे घालून त्यांच्या बंगल्याच्या गच्चीवरती गेली.
बंगल्याच्या गच्चीवरती बाबा महेंद्र आणि आई अनघा यांची विमान, इलेक्ट्रिक स्कूटर, आणि ड्रायव्हरशिवाय चालणाऱ्या गाड्या पार्क केल्या होत्या. कधीकधी बाबा आशिषबरोबर घरी थांबत, तर कधी आई. त्यांच्या ऑफिसच्या कामाने त्यांना कधीही स्विझर्लंड, कधी फ्रान्स, कधी जर्मनी असे जावे लागे. आशिषला जुळी भावंडे होती, हिना आणि मीना. दोघी चार महिन्यांच्या. त्यांना सांभाळण्यासाठी एक रोबो जॉर्ज घरामध्ये होता. दोघींच्या खाण्याच्या वेळा, डायपर बदलणे, गोष्टीसाठी कंप्यूटर चालू करून, त्यांची स्वयंचलित खेळणी लावून देणे, अशी सर्व कामे जॉर्ज करत असे.
हिना आणि मीना दोघी शांत, त्यांना सवय झाली होती एकमेकींची. आशिषला त्या दोघींबरोबर खेळायला फार मजा येई, पण मनुष्य सहवासाने मुले बिघडतात असं 2030 मधलं घोषवाक्य होतं, सगळ्यांना वेगवेगळे वाढवून त्यांच्या इंटरेस्टप्रमाणे अत्याधुनिक सवयींनी त्यांना तयार करणे यावर सगळ्या देशांचा भर होता.
बरोबरच आहे म्हणा, आशिष दहा वर्षांचा होता, अचानक सरकारने जनगणना केली, 2020 ते 25 या काळामध्ये आलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगाची संख्या निम्म्यावर आली होती, त्याच्यामुळे सरकारने पालकांना जास्तीत जास्त मुलं निर्माण करण्याची संधी दिली होती. म्हणून हीना आणि मीना आता घरात आल्या होत्या. आशिषला समजत होतं हिना आणि मीना यांना आणण्यासाठी त्यांची आई अनघा तिला जवळजवळ एक वर्षाची सुट्टी घ्यावी लागली होती, म्हणून आता अनघाला काम करणे भाग होते.
सकाळी दहा वाजले, आशिष हेडफोन घालून तयार झाला, हेडफोनवरच्या बटनमध्ये प्रत्येक विषयाचे बटन होते, बटन दाबले की टीचरचा आवाज यायला सुरुवात व्हायची आणि समोरच्या स्क्रीनवर टीचर दिसू लागे. सकाळी दहा ते दुपारी दोन असा वेळ अतिशय आनंदात जाई. वेगवेगळे विषय, वेगवेगळे टीचर, येणाऱ्या मुलांबरोबर मजा, उत्तर देताना होणारी चढाओढ, चुकीचे उत्तर दिल्यावर वर्गात येणारी मजा... क्रिएटिव्ह विषयाच्या तासाला तर खूपच मजा येई, सगळ्यांनी काढलेले वेगवेगळे चित्र, त्यांचे रंग, ओरेगामीच्या तासाला केलेल्या रचना, एकमेकांना दाखवण्यामध्ये आणि टीचरला सर्वात पुढे जाऊन दाखवण्यामध्ये आशिषचा वेळ आनंदात जाई.
सकाळी दहा ते दोन, आशिषची बडबड बडबड चालू असे, दोन तासांच्या मध्ये तो हळूच हिना आणि मीनाच्या खोलीत डोकावे, "काय करताय दोघीजणी?" त्या दोघी मस्त खेळत असत, एकाच क्रेडलमध्ये दोन तास तरी आणण्याची सूचना डॉक्टरांनी केली होती. त्याप्रमाणे जॉर्जमध्ये प्रोग्रॅम फिक्स करून ठेवला होता, एक आठवडा हिनाच्या क्रेडलमध्ये, आणि एक आठवडा मीनाच्या क्रेडलमध्ये, अशा या दोघी जणी खेळत. कधीकधी आशिषला त्यांचा हेवा वाटे, त्या एकमेकींना घट्ट धरून झोपत, हाताला हात लागला की खुदुखुदू हसत, आशिषने गालावरून हात फिरवला की त्याचा हात घट्ट धरुन ठेवत. छोट्या बाळमुठीमध्ये भरपूर ताकद असे, कधीकधी आशिष यांना उचलून घेई, जेव्हा जॉर्ज आजूबाजूला नसेल तेव्हा.
दुपारी दोन वाजता, उडणारा ड्रोन येऊन दरवाज्यापाशी दुपारचं जेवण ठेवून जाई. औषधाच्या गोळ्या, फळं, दुपारचं जेवण, अगदी साग्रसंगीत पद्धतीने, डॉक्टरच्या सूचनेनुसार, कारण सगळ्या मुलांची वाढ ही कम्प्युटरमध्ये नोंद केली जाई. जग भीषण संकटामध्ये सापडलं होतं, कोरोनानंतर आलेला व्हायरस लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक ठरला होता. जगाची लोकसंख्या भराभर घटली होती, लहान मुले त्याला बळी पडली होती, सगळ्या शाळा बंद झाल्या होत्या, आता सगळी मुले घरातूनच शिक्षण घेत होती, घरातल्या शिक्षणासाठी लागणाऱ्या सोयी करण्यासाठी आई-वडिलांना तुफान मेहनत करावी लागत होती.
मुले वाचवणे, आणि जास्तीत जास्त मुले ही सक्ती सर्व नवविवाहित दांपत्यांना केली होती. दोन मुलांनंतर सरकारतर्फे जॉर्जसारखा एक रोबो घरात बक्षीस म्हणून दिला जाई, छोट्या बाळाची व्यवस्थित काळजी घेतली जात असे. जॉर्ज आणि जिनी अशा रोबोटची मालिकाच महेंद्राची कंपनी करत होती. बाळंतपणाच्या तीन महिन्याच्या रजेनंतर आईला मुकाट्याने काम करण्यासाठी बाहेर जावे लागे, म्हणूनच आजी-आजोबांवर अवलंबून न राहता आता सरकारतर्फे जॉर्ज किंवा जिनी रोबो घरी पाठवले जात. बऱ्याच घरांमध्ये वृद्ध आजी-आजोबादेखील कोरोना काळात मरण पावले होते, सरकारने सगळ्या पाळणाघरात बंदी घातली होती कारण इन्फेक्शनचा धोका होता. सर्व घरातले किचन बंद करण्यात आले होते, सरकारतर्फे सर्व नागरिकांची नोंद करून कम्युनिटी किचनमधून त्या त्या वयानुसार तेथे जेवण प्रत्येकाच्या घरी ड्रोनमार्फत पाठवले जाई.
किचनमध्ये काम करून वेळ वाया घालवण्यापेक्षा जग वाचवण्याच्या दृष्टीने सगळ्याच आई-वडिलांना काम करावे लागत होते. सगळे वातावरणच एवढे भयानक होते की आई-बाबा परत आल्यावर, गच्चीवरच त्यांना, निर्जंतुक व्हावं लागायचं. गच्चीवरच्या एका खोलीमध्ये जाऊन उभं राहिलं की चहूबाजूंनी निर्जंतुक व्हायचे फवारे सोडले जायचे. असं दहा मिनिटे थांबल्यानंतर त्यांचे कपडे आणि सर्वकाही सामान निर्जंतुक व्हायचं, ते झाल्याशिवाय घरातील दरवाजा उघडायचा नाही.
तरी पण मागच्या वर्षी आजी-आजोबा आल्यामुळे घरामध्ये फ्रीज होता, अनघा फ्रीजमध्ये बरंच खाण्याचं सामान ठेवत असे, कधी आशिषला भूक लागली तर! तसेच आजीने पाठवलेले लोणचे, साखर आंबा, चुंदा, मसाले, पापड सगळे फ्रिजमध्ये असे. अनघा बऱ्याच वेळेला भरपूर दही आणून ठेवत असे, एखाद्या वेळेला अशिषला भाजी आवडली नाही तर तो दही-साखर खात असे. फ्रीज आणि मायक्रोवेव्ह घेण्यासाठी भरपूर खटाटोप करून परवानगी मिळवलेली होती, कारण घरात मुले एकटीच असायची, कोण जाणे काही अपघात झाला तर!
दोन दिवसांपासून येनेडी नावाचे वादळ काही शहरांमध्ये घोंघावत होते, त्याच्यामुळे अवकाळी तुफान पाऊस पडत होता. येनेडीमुळे जेवण घेऊन येणारा ड्रोनदेखील उशिरा आला होता. आज पण तसंच झालं अजून काही ड्रोन आला नव्हता, आणि आशिष हिना मीना सगळ्यांनाच भूक लागले होती.
जॉर्जने दोन वेळेला कम्युनिटी किचनला फोन पण केला, तिथला रेकॉर्डेड मेसेज ड्रोन थोडा उशिरा येईल हाच होता. तेवढ्यात दरवाजाची घंटी वाजली. अरेच्या! दरवाजा ची घंटी कोणीच वाजवत नाही, आणि ह्या वेळेला वादळात कोण आले बरं? आशिष च्या मनात प्रश्न आला. त
्यांच्या नियमानुसार जॉर्जने जाऊन दार उघडले, कारण आय पीसमधून कोणीच दिसत नव्हते. दार उघडले तर समोर एक 9-10 वर्षांची, काळ्या कुरळ्या केसांची, गोरी, गोबऱ्या गालाची, मुलगी,तिच्या कडेवर एक बाहुली.
"कोण पाहिजे तुला?" जॉर्ज
"माझा जेवण घेऊन येणारा ड्रोन आला नाही, मला खूप भूक लागली आहे, माझं नाव राधिका," राधिका म्हणाली.
"अरेच्या! आमचा पण ड्रोन आला नाही, कदाचित उशीर झाला असेल, तू आत ये ना." आशिष म्हणाला.
ताबडतोब जॉर्जने निर्जंतुकीकरणचा फवारा आणला, आणि राधिकावरून फवारला.
"तुझा जॉर्ज कुठे आहे?" आशिष ने विचारले.
"नाही मी एकटीच राहते, आई दोन दिवस झाले घरी आली नाही, आणि आमचा ड्रोनदेखील आला नाही. म्हणून आले, तू मला मदत करशील का?" राधिका
"हो, त्यात काय झालं, आत्ता माझा ड्रोन येईल, आपण बरोबर जेवू."
नाहीतरी ड्रोनने आणलेलं सगळे जेवण आशिषला जात नसे आणि राधिकाच्या रूपाने त्याला एक मैत्रीण मिळत होती.
राधिकाकडे बघताना आशिषला तिचा चेहरा ओळखीचा वाटला. त्याने एकदम विचारले,"तू पण छोटे गरुड शाळेमध्ये आहेस का?"
" हो" राधिका म्हणाली, तिच्या चेहर्यावर आश्चर्याचे भाव होते.
"अग तू माझ्या वर्गात आहेस, मला ओळखलं का? मी आशिष देशपांडे. तू राधिका गोखले का?" आशिष एकदम आनंदून म्हणाला.
राधिका डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत राहिली, आणि एकदम पुढे होऊन तिने त्याच्या गळ्याला मिठी मारली.
जॉर्ज जोरजोरात म्हणत राहिला, "नो नो नो, सोशल डिस्टन्स..."
एकदम आशिष भानावर आला, गेल्या तीन वर्षांमध्ये तो त्याच्या शाळेमध्ये गेलाच नव्हता. शाळा नेहमी कम्प्युटरवरती होत असे. त्यामुळे कुठल्याही मित्र-मैत्रिणी जमल्याच नव्हत्या. दुसर्या दिवशी तो आयटीत सगळ्यांना राधिकाबद्दल सांगणार होता आणि त्यांनी केलेल्या गमतीजमतीदेखील तो सगळ्यांना सांगणार होता. राधिका आणि आशिषने एकमेकांना आनंदाने टाळ्या दिल्या, आशिष नि राधिकाला सगळं घर हिंडून दाखवलं, हिना मीनाशी ओळख करून दिली, जॉर्ज यांच्या पाठीमागे होता. आजही राधिकाच्या घराबाहेर ड्रोनने जेवण ठेवलं नाही.
प्रत्येक घरामध्ये कंप्यूटर प्रोग्राम असे, घरात किती लोक आहेत हे किचनला आपोआपच कळत असे, राधिका घराबाहेर पडल्यामुळे घर रिकामे होते त्यामुळे ड्रोनने चक्कर मारून जेवण परत नेले. अर्धा तास मजेत कसा गेला कळलंच नाही. हिना मीनादेखील आनंदात होत्या, कारण त्यांना आशिष व्यतिरिक्त दुसरं कोणीतरी बघायला मिळालं होतं. राधिकाला तर खूपच आनंद झाला, नाहीतरी घरात ती एकटीच असायची, तिला कोणीच भावंडं नव्हती, आणि हो, तिचे डॉक्टर बाबा पण देवाघरी गेले होते.
थोडा वेळ गेल्यानंतर ड्रोनने जेवण ठेवलं. आशिषने खिडकीतून बघितलं, आश्चर्य म्हणजे न सांगतादेखील ड्रोनने अजून एका माणसाचे जेवण ठेवले होते. म्हणजे कम्प्युटरने किचनला राधिका या घरात असल्याबद्दल कळवले होते. खरं म्हणजे एकत्र बसून जेवायची, तेदेखील घराबाहेरील माणसासोबत, परवानगी नव्हती, पण लहान मुलांना याची कल्पनाच नव्हती. आशिष, राधिका, हिना, मीना सगळ्यांनी मस्तपणे एकत्र बसून जेवण केले. हिना मीना फक्त दूध प्यायच्या, त्यांना फळांचे ज्यूस, आणि सॉफ्ट भात-वरण असं दिलं जायचं, ते काम जॉर्ज करायचा. आज हिना मीनादेखील पटापट जेवल्या. त्यांनी काहीच मस्ती केली नाही, कारण आज राधिका आली होती आणि ती त्यांना खूप आवडली होती.
बाहेर धो धो पाऊस पडत होता. आज संध्याकाळी आजी-आजोबांबरोबर बोलण्याचा कार्यक्रम असायचा. याप्रमाणे पाच वाजता जॉर्जने कंप्यूटर चालू करून आशिषला कनेक्शन दिले. आजी-आजोबांनीदेखील राधिकाचे स्वागत केले, तिच्या आईची, बाबांची चौकशी केली, आशिषला गोड आशीर्वाद दिले, त्याच्या शाळेमध्ये काय काय चालतं, आज काय काय शिकला, नवीन काय गोष्टी त्याला येतात याची मस्त मजेत चर्चा चालू होती, वेळ कसा गेला कळलेच नाही. राधिकाला ओरिगामीची फुले करायला खूप छान जमतं, तिने फुले करून एक फुलांचा गुच्छ आजीला दाखवला. तसेच राधिकाने गोष्टीचे पुस्तक वाचून हिना मीनाला सांभाळले. तिने आईने शिकवलेले श्लोक म्हणून आजीला दाखवले. त्यामुळे आजी-आजोबा अजूनच खुश झाले.
अचानक परत दरवाज्यावरची बेल वाजली, जॉर्जने दार उघडले, तर बाहेर पोलिस उभे होते. राधिका च्या आईने नेहमीप्रमाणे तासातासाला घरात फोन केले होते, पण फोन कोणी उचलले नव्हते, त्यामुळे काळजीने तिने पोलिसांना कळवले होते. आजूबाजूच्या घरात डोकावून पोलीस आशिषच्या घरी आले होते. राधिकाला सुखरूप बघून पोलिसांना बरे वाटले, ताबडतोब चित्रफितीवरून राधिकाच्या आईला कळवण्यात आले. पोलिसांबरोबर एक डॉक्टर रोबो पण होता, त्याने आत येऊन सगळ्या लहान मुलांना तपासले, आणि राधिकामुळे कोणाला काही इन्फेक्शन झाले नाही, हे डिक्लेअर केले. पोलिसांनी आतमध्ये येऊन आशिषचे घर पूर्णपणे निर्जंतुक केलं. कारण राधिका दुसऱ्या घरातून आली होती.
दुसऱ्या दिवशी महेंद्र-अनघा घरी आले, घरात लावलेल्या सीसीटीव्हीवरून त्यांनी घरात आलेल्या पाहुण्याला बघितलं होतं. आशिष, हिना, मीना आनंदात असलेले बघून त्यांना फार बरे वाटले, राधिकाला आपल्या घरी येऊन खेळायची त्यांनी खूप आनंदाने परवानगी दिली. महेंद्र आणि अनघाने जरी परवानगी दिली असली तरी सरकारने मात्र या गोष्टीला परवानगी दिली नाही. राधिकेची आई डॉक्टर असल्यामुळे तिला कायमच हॉस्पिटलमध्ये हजर रहावे लागत होते, पाळणाघरं बंद झाली होती, त्यामुळे राधिका दिवसभर एकटीच असायची. सरकारने राधिकेच्या घरीदेखील एक जीनी पाठवली. ती आता तिच्याबरोबर राहत असे आणि खेळत असे. सरकारने दयाळू होऊन राधिकेला आठवड्यातले तीन दिवस आशिषच्या घरी येऊन खेळण्याची परवानगी दिली.
आई-वडिलांच्या गोष्टीमध्ये आणि आजीने सांगितलेल्या गोष्टीवरून, शाळा म्हणजे मित्र मिळवायचे ठिकाण, खूप खेळ, खूप गप्पा, खूप गोष्टी, खूप नवीन शिकणे, पण मध्ये आलेल्या रोगामुळे मुलांचं लहानपण हरवून गेलं. शाळा बंद झाल्या, घरातूनच शिकावं लागतं, अजूनही काही देशांमध्ये मुलांना एकत्र खेळू देतात, पण काही देशांमध्ये ज्यांची लोकसंख्या खूपच कमी झाली आहे तिथे परवानगीच नाही.
राधिका वाट बघते, आठवड्यातल्या तीन दिवसांची जेव्हा ती आशिषच्या घरी येऊन खेळू शकेल, तसेच आजी-आजोबांनी [आशिषच्या], तिलादेखील इंडियामध्ये बोलवले आहे. रोज रात्री झोपताना ती देवाजवळ प्रार्थना करते, तिला लवकरात लवकर इंडियामध्ये आजी-आजोबांकडे जायला मिळू दे.