खजिन्याचा शोध
खजिन्याचा शोध
खरगपूरचे महाराज जयसिंह यांच्या राजवाड्यात मोठा हाहाकार उडाला होता. कारण त्यांच्या राजवाड्यातील खजिना कोणीतरी हातोहात लांबवला होता. खरेतर आता राजे गेले, राज्ये ही गेली. परंतु खरगपूर मात्र अजून संस्थान होते. जरी लोकशाही असेल तरी, राजा होता, राजवाडा होता, आणि खजिनादेखील होता. महाराज जयसिंहाना तेथील जनता मान देत असे कारण आपल्या प्रजेचे त्यांनी पुत्रवत पालन केले होते. त्यामुळे प्रजेला तेथील राजेशाही, लोकशाही असा काही फरक वाटत नव्हता. वर्षातून एकदा लक्ष्मीपूजनाच्या वेळी सर्व खजिना महाराज बाहेर काढत असत. त्यानंतर पुन्हा वर्षभर एकदा दरवाजा बंद केल्यावर त्या खजिन्याकडे बघतदेखील नसत कारण असा काही एकच खजिना तो नव्हता. शत्रूने जर हल्ला केला तर एकाच वेळी शत्रूला सर्व काही हाती पडू नये म्हणून प्रत्येकाच्या महालामध्ये स्वतःचा असा वेगळा खजिना होता. उंची वस्त्रप्रावरणे दाग-दागिने होते. आत्ताच्या प्रथेप्रमाणे महाराजांना एकच राणी होती, दोन राजकन्या आणि एक राजकुमार. परंतु प्रत्येकाच्या महालात आपला आपला वेगळा खजिना होता. त्यामध्ये हिरे-मोती, सोने, जडजवाहीर आणि प्रत्येकाच्या नावाने केलेली मुख्य कागदपत्रे असं काही होतं. चोराने मात्र महाराजांच्या खजिन्यावरच डल्ला मारला. अर्थात महाराजांचे याहीपेक्षा दोन मोठे खजिने होते ते त्यांनी कोणालाही दाखवले नव्हते. आता चोरीला गेलेला खजिना मात्र दिवाळीच्या दिवशी जनतेपुढेदेखील दाखवला जाई. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी प्रदर्शनासाठी ठेवला जाई. त्यामध्ये एक तीन फूट लक्ष्मीची सोन्याची मूर्ती होती आणि बाकीचे जडजवाहिर होते. लक्ष्मीची मूर्ती सोडता महाराजांचा कमीत कमी दहा ते बारा कोटींचा खजिना चोरीस गेला होता.
इन्स्पेक्टर महेश आता डीसीपी महेश झाला होता आणि लक्ष्या एका पोलीस स्टेशनचा इन्चार्ज झाला होता. तोदेखील आता इन्स्पेक्टर झाला होता. खरगपूरच्या महाराजांचा खजिना चोरीस गेल्याची बातमी रातोरात टीव्हीवर झळकली आणि सकाळी मथळेच्या मथळे सर्व पेपरमध्ये दिसू लागले. खरगपूरच्या पोलिसांवर आगपाखड होऊ लागली. जर शहरामधील राजाचा खजिनापण सुरक्षित नसेल, तर बाकीच्या जनतेने कोणाकडे पाहायचे. सर्व जनता असुरक्षित झाली आहे. हे खरगपूरच्या पोलिसांचे अपयश आहे, वगैरे वगैरे...
एसीपी महेश सर्व पेपरचे मथळे वाचत होता. या पत्रकारांचे नेहमीचच आहे काय नाही सापडलं की पोलिसांना झोडपायचं. आधी सुरुवात करू द्या!त्यानंतर लेट झाला तर मग बोला. महाराजांची कामगिरी असल्यामुळे महेश स्वतः निघाला होता परंतु लक्ष्याने ही कामगिरी स्वतःवर देण्यासाठी गळ घातली. आजपर्यंत प्रत्येक वेळी दोघांनी प्रत्येक कामगिरी जोडीने फत्ते केली होती. परंतु आता महेश एसीपी झाल्यामुळे त्याने स्वतः अशा कामगिरीवर जाणे योग्य नव्हते. त्यामुळे लक्ष्याने त्याला स्वतःवर कामगिरी सोपवण्यास सांगितले आणि तू येऊ नको, मी कामगिरी कशी फत्ते करतो ते बघ, शेवटी महेशने त्याला खरगपूरला पाठवले.
राजवाड्यामध्ये लक्ष्याचे चांगले शाही स्वागत झाले. त्याला चांगले चांदीच्या ताटामधून नाश्ता, फळे, ड्रायफ्रूट आणि चांदीच्या पेल्यामधून सरबत दिले. महाराजांना दहा-बारा कोटीचा खजिना म्हणजे विशेष गोष्ट नव्हती, परंतु दरवाजे बंद असताना, बाहेर पहारेकरी असताना आत चोरी कशी काय झाली? हा प्रश्न पडला होता. म्हातारी मेल्याचे दुःख नाही परंतु काळ सोकावता कामा नये, ही जयसिंग महाराजांची भूमिका होती. खजिन्याचा दरवाजा उघडून दाखवला. बाहेर लावलेले कुलूप तसेच होते. तिजोरीची खोली मोकळी बघितल्यानंतर महाराजांनी पुन्हा कुलूप लावून तसेच ठेवले होते. लक्ष्याने सर्व गोष्टींचा पंचनामा केला, त्यामध्ये बाहेरचे पहारेकरी तसेच उभे आहेत आणि दरवाजाला कुलूपदेखील तसेच होते. परंतु आत चोरी झाली होती. तिजोरी कसली जुन्या काळाचे दगडी बांधकाम होते. एक अख्खी खोली म्हणजे तिजोरी होती. फक्त तिच्या तळाशी एक वाटीएवढे भोक होते. आता त्यातून कोणी मनुष्यप्राणी आत येऊ शकत नव्हता. त्यामुळे चोरी कशी झाली हे समजायला मार्ग नव्हता. लक्ष्याने हाताखालचे कॉन्स्टेबल घेऊन पंचनामा केला. दरवाज्यावरील पहारेकऱ्यांच्या जबान्या घेतल्या, परंतु कुठेही कोणाचे हाताचे ठसे वगैरे काही मिळाले नाहीत.
शेवटी त्याने शक्तिमानची मदत घेण्याचे ठरवले. कारण शक्तिमान हा नेहमी पोलीस खात्याला मदत करीत असे. त्याच्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये संचार करण्याच्या शक्तीमुळे काही गुन्हे उकल करण्यात मदत होई. तसेच सीमेवरदेखील शक्तिमान टेहळणी करत होता. लक्ष्याने आपल्या कमरेचा बेल्टमधून एक छोटीशी चिप काढली आणि त्यावरती दोन वेळा स्वस्तिक चिन्हासारखा आकार केला, शक्तिवानला कॉल करण्याची ही सांकेतिक भाषा होती. त्याबरोबर लक्ष्याला शक्तिमानकडून मोबाईलवरती फोन आला. लक्ष्याने सर्व परिस्थिती त्याला ऐकवली आणि मदत करण्याची विनंती केली. खरेतर शक्तिमान सीमेवरती गस्त घालत होता. एक बोट वर करून सुदर्शन चक्रासारखे फिरले की शक्तिमान भिरभिरत पृथ्वीच्या कोणत्याही टोकाला जाऊ शकत असे. त्यानुसारच तो खरगपूरला आला. त्याचेदेखील महाराजांनी जंगी स्वागत केले. सर्वांना शक्तिमानला बघण्याची उत्सुकता होतीच. त्यानंतर शक्तिमान आपल्या कामाला लागला, त्याने सर्व बाजूंनी पाहणी केली पण कोठूनही काही सुगावा न मिळाल्यामुळे त्या वाटीएवढ्या आकाराच्या भगदाडातून आत शिरण्याचे त्याने ठरवले. पहिल्यावेळी शक्तिमान आत गेला. परंतु अर्ध्या रस्त्यातूनच जीव घुसमटल्यामुळे पुन्हा बाहेर आला. ते भगदाड एखाद्या भुयाराप्रमाणे पाच-सहा किलोम
ीटर लांब होते. दुसऱ्या वेळी भरपूर श्वास घेऊन आणि आपली ताकद दुप्पट वाढवून शक्तिमान त्या वाटीएवढ्या आकाराच्या भगदाडातून आत गेला.
तो शेजारी असलेल्या नंदनपुर नावाच्या जंगलामध्ये बाहेर आला. पण तेथे काही विशेष दिसले नाही ,थोड्या अंतरावर गेले असता त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये एक साधू बसलेला होता . शक्तिमानने एका खेडूताचे रुप घेतले आणि उगाच जंगलात वाट चुकल्याचे निमित्त करून साधू कडे येऊन रस्ता विचारू लागला, आणि त्याच्या झोपडीचे निरीक्षण करू लागला. परंतु त्यात कुठेतरी गडबड असल्याची त्याला जाणीव झाली. तसेच तो साधू त्याच्यावरती लालबुंद डोळे करून ओरडू लागला. तू येथे आत कशाला आलास? ताबडतोब चालता हो! नाहीतर तुझे भस्म करीन. परंतु त्याला साधू बाबाच्या झोपडीमध्ये 2/4 जाळीदार झाकणाच्या टोपल्या दिसल्या त्या बांबूपासून बनवलेल्या होत्या. त्यामध्ये आत मध्ये काहीतरी हालचाल जाणवत होती. बारकाईने निरीक्षण करत असता एका टोपलीखाली घोरपड असल्याचे दिसले. घोरपडीचे तोंड त्याला दिसले, तसेच काही टोपल्यात उंदीर, घुशीदेखील दिसले. त्या खेडूताची बोबडीच वळाली. ताबडतोब येथून निघून जा नाहीतर ह्या टोपलीतील साप तुझ्यामागे सोडेन, अशी धमकी दिल्याबरोबर खेडूत तेथून पळत सुटला.
शक्तिमान तेथील एका झाडावरती लपून बसला. आणि तोच साधू काय करतो त्यावर ती नजर ठेवून बसला. दिवसभर झाडावर बसून बसून शक्तिमान ला कंटाळा आला होता आता तिथून उतरून निघून जाणार, एवढ्या मध्ये त्याला तीन-चार उंचेपुरे आडदांड काळेकभिन्न डाकू सदृश्य लोक त्या झोपडीत शिरलेले दिसले. शक्तिमानने अदृश्यपणे आत मध्ये प्रवेश केला व त्यांचे बोलणे ऐकू लागला. त्यामध्ये त्यांनीच राज्याच्या तिजोरीवर हात मारला होता, हे लक्षात आले परंतु कसे आणि कोणाच्या मदतीने हे काही त्याला कळले नाही. शक्तिमान अदृश्यपणे त्या झोपडीतच राहीला. रात्री त्यांनी टोपलीतली घोरपड बाहेर काढली तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि काहीतरी विचित्र भाषेमध्ये मंत्र म्हटल्यासारखे म्हटले. त्याबरोबर ती घोरपड तुरूतुरू त्या बिळांमध्ये शिरली आणि जवळ जवळ तीन तासांनी आली तेव्हा तिच्या तोंडामध्ये एक सोन्याचा दागिना होता. यावरून चोरी कशी झाली असावी याचा शक्तिमानला अंदाज आला. काही मिनिटांमध्ये आपल्या वैश्विक गतीचा वापर करून शक्तिमान राजवाड्यात गेला आणि मला चोर सापडल्याचे सांगितले. परंतु त्या चोराला तुम्ही पकडून तुरुंगात ठेवू शकत नाही, असेदेखील सांगितले.
का नाही पकडू शकत? आमच्यात तेवढी हिम्मत आहे आणि आमचे तुरुंग मोठे आहेत, राजेसाहेब म्हणाले.
त्याबरोबर शक्तिमान मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला, ठीक आहे! तुम्ही चोराला पकडून तुरुंगात ठेवून तर दाखवा.
चला चला असे म्हणत सर्वजण आवेशाने निघाले.
सर्वांनाच चोर कोण आहे आणि राजसाहेबांच्या तिजोरीवर हात मारण्याची कोणी हिम्मत केली हे बघायचे होते. त्याच दिवशी संध्याकाळी राजेसाहेब आपली माणसे घेऊन आणि लक्ष्या आपला फौजफाटा घेऊन शक्तिमानच्या मागे त्या जंगलात येऊन पोहोचले. त्यांनी स्वतःच्या गाड्या दोन किलोमीटर लांब ठेवल्या होत्या आणि पायीपायी लपतछपत त्या झोपडीला वेढा घालून रात्र होण्याची वाट बघत होते. पुन्हा त्या रात्री कालची चार माणसे आली आणि आता आपले येथील काम झाले असून, इथून मुक्काम हलवला पाहिजे, असा विचारविनिमय त्यांच्यात चालला होता. चोरीचा माल गोण्यांमध्ये भरुन आपल्या खांद्यावर टाकून निघण्याची तयारी चालली असताना, त्यांना लक्ष्याने आणि पोलिसांनी मुद्देमालासह पकडले. आतील दागिने राजेसाहेबांचे होते. परंतु एवढ्याशा जागेतून चोर कसा आला याचे अजून सर्वांना कोडे होते. मग त्याने प्रात्यक्षिक दाखवले ती घोरपड टोपलीतून बाहेर काढली तिच्या डोक्यावर हात ठेवून काही सांकेतिक शब्द उच्चारले त्याबरोबर ती घोरपड त्या भगदाडामध्ये शिरली. दोन तासांनी ती आली तेव्हा तिच्या तोंडात एक सोन्याचा दागिना होता.
त्या भुयाराचे तोंड झोपडीमध्ये उघडत होते त्यामुळे ते एकच भुयाराला तेथून अनेक फाटे फुटत होते ते शहरातील विविध धनिक लोकांच्या तिजोरीपर्यंत जात होते. त्यासाठी त्याने मोठ्यामोठ्या उंदीर, घुशींचा वापर केला होता. सकाळी येऊन सीमारेषा आखून कुंदे टाकून देई, त्याच्यावरती एक विशिष्ट पावडर टाकत असेल आणि त्याच पावडरीचा वास उंदीर घुशीना दिला की बरोबर ते त्या त्या रेषेमध्ये खोदकाम करीत असत. एकदा का तिथपर्यंत भगदाड पडले की त्यानंतर तो घोरपडीला पाठवत राही. घोरपड बरोबर दोन-चार वेळा त्या रस्त्याने जाऊन येई, आणि जेव्हा एकदा तिजोरीपर्यंत पोहोचली की मग एखादा सोन्याचा दागिना तोंडात घेऊन घोरपड परत येत असे. त्यामुळे सॉरी कोणी केली हे कधीच कळले नसते परंतु शक्तीमानने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे महाराजांचा खजिना पुराव्यासहित सापडला. तसेच शहरातील इतर धनिकांच्यादेखील चोऱ्या होत होत्या. त्यांचादेखील चोर कोण आहे ते सापडला.
इन्स्पेक्टर लक्ष्याने सर्वांना मुद्देमालासह पकडल्यामुळे सर्व पेपरमध्ये त्यांची वाहवा झाली आणि त्यालादेखील दुसऱ्या जिल्ह्यामध्ये डीसीपी म्हणून प्रमोशनवर पाठवले. सदर घोरपडीला पोलीस खात्याने पाळायचे ठरवले जेणेकरून त्यांच्या गुन्ह्याच्या उकल करण्यासाठी तिचा उपयोग होईल. तिलादेखील एक पद देण्यात आले, कॉन्स्टेबल म्हणून. "कॉन्स्टेबल उमा" असे तिचे नाव ठेवण्यात आले. तिला रोजच्या खाण्यापिण्याचा भत्ता मंजूर करण्यात आला आणि तिला सांभाळण्याचा ताबा एका प्रामाणिक इन्स्पेक्टरला देण्यात आला.
********************** समाप्त