पाऊस
पाऊस


"नमस्कार पाऊसा! कसा आहेस तू.? तुझी खुपखुप आठवण येतेय मला! सारखी तुझ्या येण्याची वाट बघते मी,अन् तुझा पत्ताच दिसत नाही.तू कुठे दडला आहेस कोणास ठावूक,तुझ्या येण्याच्या ध्यासात कोणत्याच कामात लक्ष लागत नाही बघ ! इतकी आमची परिक्षा पाहू नकोस राजा.! जिकडे पहावे तिकडे तुझ्या नावाचा जप करतांना दिसातात लोकं .पृथ्वीवरती पान्यावाचून किती ससेहोसपट होते आहे.तुझ्याविणा आम्ही जगण्याचा विचारच करू शकत नाही.आमची काळी माती तुझ्या रुसण्यापायी कशी पांढरी फट्टक निस्तेज दिसतिया.! मानसं काय पशुपक्षू सुद्धा तुझ्या येण्यीची वाट पाहून कोमेजले उदास आहेत .!
निसर्गाच तर काही सांगुच शकत नाही,कसेतरी मोठाले वृक्ष तग धरून जीवंत दिसतात ,पण नाजुकश्या लतावेली,फुलझाडे तुझ्या नसण्याने संपल्या रे पाऊसा,तुला त्याच काहिच कस वाटत नाही रे! तू इतका निष्ठूर कधी पासुन झालेला आहेस.?
राग येवू देवू नकोस रे पावसा मला तुझी चिंता आहे! म्हणुन मी तुला पत्र लिहिते आहे.! सारे आबाल वृद्ध कशी आतुरतेनी तुझी आस डोळ्यात तेल घालून बघत आहेत. वृद्ध लोक तर तुझी खुप वानवा गात असतात . म्हणतात कशी, आमच्या वेळी काय पाऊस यायचा,महिनो गिनती झड राहायची,कधी पेरणी करू देईना तर कधी वावरातल तन काढू देई ना!ह्यां लोंढा येय ,असा नदीले पुर राहे ,कां वावरातून घरीबी यायची पंचाईत राहे! पोराईले शायेत जाणबी मुहाल करून टाके. बाजारहाट बी भरे नाही,ना खावाले भाजीपाला भेटे, जागच्या जागेवर गुरढोर हंबरत राहे , तुमच्या सरखे सिलापचे घरबी नोवते तव्हा ,कौलाचे घर सरखे गयतच राहे,बर होत दायदाना भरून ठेवो आम्ही ,अन काड्या गवऱ्याबी अटाऱ्यावर रचून ठेवो ,तव्हा कुठ आमची चूल पेटे बाप्पा! ईहिरी तलाव नदी नाले सारे टमटम वाहे,सडका नोत्या तव्हा ,रस्यावर सारा चिखलच राहे,चालता येईना बैलबंडीचे चाक चिखलात जावून फसे,अन् आमची काढता-काढता का नाही खुप फजिती होये,असा बरपे का न्हाय हा पाऊस का साऱ्याचे तीन तेराच वाजवे ! पण शिवारात जावात लागे ,कडबा कुटारात काय अन् घरात काय साप ईचू धसे ,साप घराच्या मयालिले येटोळी मारून राहे, पोराबायाईले निजाचे भय वाटे.!अन् आताशी कुठ लपते का जावून बिचारा ह्या पाऊस.!
पाऊसा तुझ्या प्रेमात तर सार विश्वच आहे,पण तू कोणाचा आहे हेच समजत नाही.कुठे कुठे तर वेड्यासारखा बरसतो आणि कुठे येतच नाही . तुझ्या लहरी वागण्याने आम्ही सारे लोक बुचकळ्यात पडत असतो,तू चांगला झमझम बरसला तर तुला निसर्ग देतो ना साथ ,तो तुझ्यावर सदा प्रेम करतोय.पण तू त्याला नेहमी छळतो! तुझे लक्षण काही बरे दिसत नाही.तुझ्यासाठी आम्ही लोक काय-काय नाही करत,
नविन-नविन वृक्ष लावतो,त्यात पानी घालतो, जोपासना करून जगवितो ,किती सरोवरे ,तलाव , बंधारे बनविले,पण तू नाही आला की सर्वे सुर्याच्या किरनांनी सुकुन जातात,लोकांना किती लांबून पानी भराव लागत. कैक जनावरं पान्याविणा तडफडून मरतात रे! पाऊसा ,तुझ्याविणा जगण्याची कल्पनाही करू शकत नाही रे आम्ही.!
खर सांगू कां तुझ्या प्रेमात मोठमोठे संत,कवी
साहित्यिक गाण गावून ,लिहून मग्न झाले,असे दिव्य वर्णन करतात काय सांगू तुला,अशेच रमनिय दिव्य वर्णन संत कालीदासाने शाकुंतलंमध्ये केलेल आहे.संत तुलसीदासाने रामायण ग्रंथात केलेले आहे. अनेक लेखक ,कविंनी युगानुयूग तुझे भरभरून कोड कौतूक केलेले आहे. अद्भूत विलोभनिय वर्णन केले आहे.! तानसेनच्या आलापाने पाऊसा तु धावून येत होता.पण आता तानसेन राहिला नाही ना त्यासारख कोणी राहिल .तसा नाही म्हंटल तरी तू येतो मधामधात पण लोकसंख्या खुप वाढली नां! पृथ्विवर,पाणी लागणारच ना! मोठी कारखाणे ,विमाने,जहाज विजनिर्मिती करीता प्रत्येक गोष्टीसाठी पावूस हा हवाच असतो नां.?पाऊसाविणा कसे जगणार आम्ही लोक , तुझ्या येण्यासाठी अजून कोणते प्रयत्न करायला पाहिजे ते तरी सांगना तू,तसा वागण्याचा प्रयत्न करू आम्ही .! पाऊसा तुझी किमया फारच मोठी आहे. बघ मनुष्य,पशु,पक्षी मोठ्या आशेने तुझी वाट बघती. वसंत ऋतूसुद्धा तुझी सारखी चातक पक्ष्याप्रमाने वाट बघत असतो.! वाखाणन्याजोगा तुझा स्वच्छ इतिहास आहे त्याला तू डागाळू नकोस तू महादानी व जीवन भरणारा आहे.तुझ्या येण्याने मराठी नववर्षाची सुरवात होते. तुझ्या येण्याने मानवी मनावर उमटणारे अतिशय गोड भाव चेहऱ्यावर दिसतात. ही उमटणारे भावतरंग भुरळ घालणारे सुगीेचे दिवस घेवून येतात. आश्चर्य करण्यासारखे म्हणजे हा निसर्ग मानवी सृष्टीला प्रफुल्लित,उत्कर्षित करत असतो.शिवाय मनाला आनंदाची पर्वणी ही अशी वेळोवेळी मिळत असते. त्या तुझ्या बरसणाऱ्या पावसात कोकिळेचे मंजूळ स्वर मनाला कसे आल्हादित करतात.गुलाबी शितल वाऱ्यासवे कोकिळ,मैनेचे ही दर्शन होवून ती मंजूळ नाद कानावर येतात. हे सार तुझ्या शुभ आगमणाने आपल्या पाऊलाने रूनुझूनु चाळ वाजवत येतो तेंव्हा होत असते रे पाऊसा!
तू सर्व जनामनाला आपल्या वलयात गुरफटतोय. वृक्षावरती पानगळती होवून नवपालवी फुटायला सुरवात होत असते.ती वृक्षांची कोमल पालवी नवीन उल्हास घेवूनच येत असतोय. मनोमनी भरत असतो.सर्वत्र त्यावेळी आपल्या भारतिय मराठी संस्कृतीप्रमाने भरपूर सण उत्सवाची नांदी असतेय. नवविवाहिता, नवयौवना अगदी अतुलनिय आंनदाच्या सोहळ्यांमध्ये भाग घेत असतात. प्रत्येक सोहळ्यात नाविन्यपूर्ण रसरसलेला आल्हाददायक धुंद करणारा सूगंध दरवळ पसरलेला असतोय. प्रत्येक वस्तू मोहक वाटते. आबाल वृद्ध ही सतेज दिसतात.पाऊसा, तू आल्यावर काही निराळीच आभा निसर्गात भरत असतेय.तुझी चाहूल लागताच सारी सृष्टी आनंद अनुभवत असते. पशुपक्षी आपल्या बालकांना खेळवते.झोके देते .शहारून कुंजन करते..त्यात वाऱ्याचा शितल झोका झकझोर करून लपंडाव खेळत असतो.!
अरे माझ्या प्रिय पावसा आमच्यावरी तुझी नेहमी कुपादृष्टी असावी ,अशी मी तुला प्रार्थना करून वीनवनी करीते,आणि माझे हे छोटेखाणी पत्र संपविते. .
लोभ असावा.! लगेच उत्तर द्यावे.