आज्जो
आज्जो
एक होती राजकन्या. तिचे केस खूप लांब आणि सुंदर होते. ते विंचरण्यासाठी राजाने एक आजी ठेवली होती. ती आजी रोज राजकन्येचे केस विंचरत असे. अधूनमधून तेल लावून, स्वच्छ धुवून आणि धुपारा देऊन निगा राखत असे. ती आजी इतकी प्रेमळ होती की राजकन्या तिला "आज्जो" अशी लाडाने हाक मारत असे. अशी ही आजी हळूहळू म्हातारी होत चालली होती. थकत चालली होती. तरीही राजकन्येच्या केसांची काळजी स्वतः घेत होती.
एक दिवस राजाकडे बातमी आली की आजी देवाघरी गेली. राजकन्येला खूप वाईट वाटले. राजाने लगेच राज्यात दवंडी पिटवली की आजीचे काम करुन दाखवणारी व्यक्ती कायम महालात राहू शकेल. आजीचे काम कुणालाच ठाऊक नव्हते. दोन दिवसांनी एक लहान मुलगी राजाच्या दरबारात आली. राजासकट सगळ्यांना आश्चर्य वाटले कारण ती मुलगी म्हणाली मला राजाची अट मान्य आहे. राजाने त्या मुलीला सांगितले की दोन दिवस तू आजीचे काम करून दाखव. जर राजकन्
येला आवडले तरच मी हो म्हणेन. मग पुढचे दोन दिवस त्या मुलीने आजी करायची त्या सगळ्या युक्त्या केल्या. ज्या गोष्टी फक्त आजीच करते असे राजकन्येला वाटे त्याही केल्या. आजीच्याच हाताचा स्पर्श, आजीसारखेच लाघवी बोलणे आणि तसेच हसणे. राजकन्या तर भारावूनच गेली.
तिने राजाला सांगितले की हीच मुलगी माझ्या आजीची जागा घेऊ शकते. राजाने त्या मुलीला दरबारात बोलावले आणि विचारले, "तुला आजीच्या कामाची इत्यंभूत माहिती कशी? त्यावर ती मुलगी म्हणाली की मी आजीची नात आहे. आजी रोज मला राजकुमारीच्या गोष्टी सांगत असे. तिने तिच्या अंतिम क्षणी मला सांगितले होते की आता मी सांगितल्याप्रमाणे राजकुमारीचे काम करायचे आहे म्हणून मी इथे आले. हे सर्व ऐकून राजाचे डोळे भरून आले. त्याने फक्त त्या मुलीला आजीच्या जागी नियुक्तच नाही केले, तर आजी आणि तिची कामाची एकनिष्ठता बघून तिची आजन्म राहण्या-शिकण्याची जबाबदारीही घेतली.