माँ... तुझे सलाम !
माँ... तुझे सलाम !




ती.सौ.आईस,
तुझ्यामागे कैलासवासी असं लिहायला अजिबातच मन धजावत नाही ग...तू अजून आमच्यातच वावरते आहेस ,कधी अचानक तुझी हाक कानावर येईल... असे भास होतायत...
कालच तुझा 13 वा दिवस पार पडला..मन बिलकुलच थाऱ्यावर नव्हतं ग...सहजच तुझं कपाट उघडलं ...वाटलं तुझी आठवण म्हणून एखादीतरी सुती साडी बरोबर न्यावी...तुला माहीत आहे की कितीही दुसरी पांघरुण घेतली तरी कुशीत तुझी साडी घेतल्याशिवाय मला झोपच येत नाही...मी तुझं कपाट उघडलं,एक मऊ सुती साडी काढली,तर त्यातून एक लिफाफा बाहेर पडला...
त्यावर माझंच नाव लिहिलं होतं... उत्सुकतेने मी तो उघडला आणि त्यातील मजकूर वाचून क्षणभर अवाकच झाले...
डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले...पुन्हा पुन्हा मी तो मजकूर वाचत होते आणि मला समजलं एक अनाकलनीय सत्य...की मी ज्याचा कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता...
एका प्रेमळ आईने माझ्यासाठी केलेला भावनिक त्याग...फक्त माझ्यासाठी...तिच्या पत्रातून मला अनेक गोष्टी उलगडत गेल्या... मी 6 महिन्यांची असताना माझी जन्मदात्री आई एका दुर्धर आजाराने मला आणि वडिलांना सोडून अचानक देवाघरी गेली...आणि माझा नीट सांभाळ व्हावा म्हणून माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या मैत्रिणीशी म्हणजे तुझ्याशी पुन्हा लग्न केलं...तशी अटच माझ्या जन्मदात्र्या आईने घातली होती... आणि केवळ माझ्या उत्तम संगोपनासाठी तू तुला स्वतःचं मूल होऊ दिलं नाहीस...बाबांचे काहीही न ऐकता तू स्वतःहून हा निर्णय घेतला होतास...सर्व नातेवाईकांकडून पण तू वचन घेतले होतेस की ही गोष्ट मला कधीच कळणार नाही...
नंतर बाबांची बदली झाली आणि आपण नव्या गावी आलो...इथे कुणाला काही कळण्याचा प्रश्नच नव्हता...माझ्या संगोपनात कुठलीही कसूर राहू नये, तुमच्या दोघांच्या प्रेमात वाटेकरी येऊ नये म्हणून तू खूप मोठा त्याग सोसलास...स्वतःच्या मुलावर केली असतीस, त्यापेक्षा काकणभर सरसच तू माझ्यावर माया केलीस... प्रसंगी रागावलीस सुद्धा... माझ्यावर उत्तम संस्कार करून माझं भवितव्य उज्वल केलंस... आजपर्यंत तू आणि बाबांनी मला ही गोष्ट कळूच दिली नाहीत की तू माझी खरी आई नाहीस...
खरी आई ...किती वेदनादायी शब्द आहेत ग हे...खरी आई...खोटी आई...असं कधी असतं का ग... आई ,तू मला वाढवताना मी तुला अनेक वेळा दुखावलं आहे ग...माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात खूप वेळा पाणी आलेलं मी पाहिलं आहे...त्याबद्दल आता क्षमा मागून काहीच उपयोग नाही...सतत मी तुला अध्याहृत समजत आले...मला खूप उशिरा कळलं की तू बाबांशी लग्न केल्यावर तुझी चांगली नोकरी,तुझं करिअर माझ्यासाठी सोडलसं...
माझं पूर्ण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तू तुझ्या अनेक छंदांना तिलांजली दिलीस...
मी तुझ्याकडे खूपदा आपल्याकडे एखादं बाळ आण म्हणून हट्ट करायची...तेंव्हा तुला किती वाईट वाटलं असेल ना...पण त्यावेळी तू माझी समजूत काढायचीस की, देवाकडे असलेल्या असंख्य बाळांमधून तुला फक्त मी आवडले...आणखी दुसरं बाळ नाही... त्यामुळे तूच फक्त माझं लाडकं बाळ आहेस... त्यावेळेस पण तुला किती मानसिक त्रास झाला असेल ना...
पण आई ,खरं सांगू .. आवडलं असतं ग मला एखाद भावंडं असतं तर...पण फक्त तुझ्या प्रेमात दुजाभाव होऊ नये म्हणून तू खूप मोठा त्याग केलास.... कितीतरी वेळा मी तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं आहे...पण तू मला एकदाही जाणवू दिलं नाहीस की तू माझी जन्मदात्री आई नाहीस... आई,आता मला कळतंय की फक्त जन्म देऊन आई होता येत नाही ग...
तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत...
आई, आता माझं लग्न झालंय...माझ्या लग्नात तू आणि बाबांनी किती हौसेनी माझे सालंकृत कन्यादान केलंत...मी सासरी जाताना तर तू धायमोकलून रडलीस... असं कसं ग खरं वाटेल मला की तू माझी जन्मदात्री आई नाहीस...आई,मी माझ्या नवऱ्याला पण ही गोष्ट आताच सांगितली... तोही खूप धन्य झाला तू केलेला त्याग बघून...आणि आम्ही दोघांनीही एकमताने निर्णय घेतलाय की आम्ही पण लवकरचं एक मुलगी दत्तक घेणार आहोत...तिला आपलं मानणार...तिचे हक्काचे आई-बाबा होणार... तिला तिची एक नवी ओळख मिळवून देणार आणि त्यामुळेच आम्ही पण आमचं स्वतःचं मूल होऊ देणार नाही...जी काय माया,ममता करायची ती त्या छोट्या मुलीवर करणार...
आई ,तू जो आदर्श आमच्यासमोर ठेवला आहेस ना त्याची पुन्हा लवकरच पुनरावृत्ती होईल...आणि हीच तुला आमच्याकडून श्रद्धांजली असेल...
तुझ्यासारख्या थोर आईची भाग्यशाली मुलगी...
तुझं सर्वस्व...