Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Jayashree Kelkar

Inspirational


4.4  

Jayashree Kelkar

Inspirational


आगळीवेगळी होळी

आगळीवेगळी होळी

4 mins 409 4 mins 409

गेले 2020 हे वर्ष ,कोरोनाच्या सावटातच गेले...कुठलेच सण धुमधडाक्यात साजरे करता आले नाहीत..यावर्षीची परिस्थिती त्याहून काही वेगळी नाही किंबहुना बिकटच आहे...तरीपण सण घरगुती का होईना पण आपण साजरे करू शकतो अर्थात काही नियम पाळूनच...

घरातील छोट्यांचाच काय मोठ्यांचा पण विरस न होऊ देता काय करता येईल असा विचारच करत होते, इतक्यात गच्चीतल्या कुंड्यांची रोपे मला खुणावू लागली...माझी गच्ची म्हणजे पूर्ण फुले उमललेला एक रंगीबेरंगी ताटवाच आहे...

आणि एक भन्नाट कल्पना डोक्यात आकार घेऊ लागली...खरं म्हणजे होळी म्हणजेच रंगांचा सण... नवीन उत्साह आणिमौजमस्ती....घरात छोटी नातवंडं..


त्यांना तर कधी आम्ही बाहेरच्या विकतच्या रंगांची साधी ओळखही करून दिली नव्हती कारण मनात असलेली एक प्रकारची भीती...त्या रंगांमुळे छोटुकल्याना काही त्रास झाला तर... मग फक्त केशराचं पाणी त्यांच्या अंगावर उडवायचं... हीच आमची होळी असायची ... पण यावर्षी मात्र ठरवलं की गेले वर्षभर घरात कोंडून राहिल्यागत असलेली ही बालगोपाळ मंडळी...यावर्षी त्यांच्याबरोबर थोडे हटके अशी होळी खेळायची..


गच्चीतल्या रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या छोट्यांच्या अंगावर उधळायच्या..त्या पाकळ्या केशराच्या पाण्यात बुडवून त्यांच्या गालावर त्याचे पाणी उडवायचे...म्हणजे रंगपंचमी पण खेळल्यासारखे होईल..इंद्रधनुषी रंगांची छटा सगळीकडे उधळेल...आणि या अश्या विविध रंगांचं कोलाज पाहून छोटी आणि मोठी मंडळी खुश होतील...


रंग कुठलेही असले तरी रंग पाहूनच ऊर्जा मिळते..विविध रंग हे खूप उत्साह देतात..भरपूर मजा घेऊन आनंदी जीवन जगायचे आमंत्रण देतात..

या सणाची लहान,मोठी सर्वच जण आतुरतेने वाट पाहात असतात.. विचार केला की त्यानिमित्ताने छोट्याना फुलांच्या होळी संबंधी माहिती द्यावी...

आजी गोष्ट सांगणार म्हटल्यावर छोटी मंडळी खुश...लवकर सांग,लवकर सांग असा घोशाच लावला की त्यांनी...मग एकेकजणाच्या डोळ्यातील उत्सुकता वाढली..मी माझी गोष्ट म्हणजेच आख्यायिका सांगायला सुरुवात केली..


होळीच्या सणाच्या वेळी ऋतूंचा राजा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागते.त्यामुळे होळीला हिरवेगार वातावरण असते जणू धरतीमाता हिरव्या रंगाचा शालू नेसून वेगवेगळ्या रंगीत फुलांचे अलंकार घालून इंद्रधनुष्याचे सप्तरंग आपल्या अंगावर लपेटून नटून थटून बसली आहे .

वसंतऋतूत उमलणाऱ्या विविध फुलांशी आपला परिचय व्हावा,निसर्गाशी जवळीक साधता यावी आणि आपापसातले प्रेमसंबंध अधिक दृढ व्हावे यासाठी मथुरा आणि वृन्दावनात *फुलोरा दुज* नावाने होळी खेळली जाते.. 


कृष्णाचा विवाह रुक्मिणीशी होऊनसुद्धा राधाकृष्ण हेच नाव आपल्या ओठी येते. त्यांच्या प्रेमात एक आंतरिक ओढ होती..याच ओढीमुळे एकदा राधा कृष्णावर रागावली कारण मथुरेच्या व्यापात कृष्ण अडकल्यामुळे त्यांची परस्परांशी भेट झाली नव्हती. राधा हिरमुसली..कृष्णाच्या विरहाने व्याकुळ झाली. तिची अवस्था पाहून गोपगोपिकासुद्धा श्रीकृष्णावर रागावल्या.. एवढेच काय तर वृंदावनातल्या लता,वेली सुद्धा कोमेजून गेल्या.ही वार्ता मथुरेत कृष्णाला कळल्यावर राधेची समजूत काढायला कृष्ण वृन्दावनी आला.त्याने राधेची भेट घेऊन तिला एक नुकतेच उमललेले सुंदर फुल भेट म्हणून दिले..आणि त्या दोघांना परस्परांना पाहून झालेला आनंद पाहता साऱ्या सृष्टीने दोघांवर पुष्पवृष्टी केली..तेंव्हापासून फाल्गुन द्वितीयेच्या दिवशी *फुलोरा दुज* म्हणून हा उत्सव मथुरा आणि वृन्दावनात साजरा केला जातो.. 


ही आख्यायिका सांगून संपताच नातवंडांनी गलका केला की आजी ,यावर्षी आपण पण फुलांनीच होळी खेळायची..आणि त्याआधी तू आम्हाला रंगांचे पण महत्व पटवून सांग..


मग काय..आजी एकदम फॉर्मातच आली आणि एकेक करून जे रंग विशेष करून होळीत वापरतात त्या त्या रंगांची माहिती सांगायला सुरुवात केली. प्रथम लाल रंग निवडला..लाल गुलाबाच्या पाकळ्या...अहाहा...भरपूर उल्हास देणारा हा रंग अग्नीचे द्योतक आहे...ऊर्जा,जोश याचं हा लाल रंग प्रतिनिधित्व करतो...


पिवळ्या झेंडूच्या पाकळ्यांमध्ये पिवळा हा सुंदरता आणि आकर्षणाचा रंग आहे..पवित्रतेचे द्योतक आहे...पहाटेची सोनेरी पिवळी किरणे ही समृद्धी आणि यशाचे प्रतीक तसेच सुख,संपदा आणि अध्यात्म यांनी भावले आहे...सर्व फुलांच्या झाडांची पत्री पण आणली.. हिरव्या रंगाची उधळण करायला...हिरवा रंग हा जीवनाचे द्योतक आहे...निसर्गाचा सर्वात आवडता रंग आहे..येणाऱ्या वसंतऋतु च्या आगमनी आजूबाजूला असलेला हिरवागार रंग हा नव्या जीवनाची सुरवात करण्याचा संदेश देतो..आनंददायी जगण्यासाठी नवीन प्रेरणा देतो..हिरवा रंग हा शीतलता,सकारात्मकतेचे प्रतीक आहे...डोळ्याला शांतता देणारा आल्हाददाई रंग आहे.


निळी गोकर्णाची फुले.. यातला निळा रंग शांती आणि स्थिरतेचे संकेतक आहे.पाणी आणि आकाश यांचा निळा रंग हा प्राण आणि प्रकृतीच्या संबंधीत आहे..पांढरी तगर ..यातील पांढरा रंग हा तर लहान मुलांच्या आवडीचा रंग आहे...सर्व रंगांचा तो जनक मानला जातो.. सर्व रंग सारख्याप्रमाणात एक सारखे मिसळले तर पांढरा रंग तयार होतो... यानंतर मात्र कोणीही आणखी इतर रंगांविषयी माहिती घेण्यास उत्सुक दिसले नाहीत..सर्वांना कधी एकदा फुलांची होळी खेळतो असे झाले होते.. 


मग काय, घरात नुसती धमाल सुरू झाली... वेगवेगळी फुले गच्चीतून आणून त्यांच्या पाकळ्या एकमेकांवर उधळून मनसोक्त होळी खेळून सर्वजण खूपच आनंदाने हरखले... केशराचे पाणी पिचकारीत भरून एकमेकांवर उडवून मनमुराद खेळून झाले.. त्यानंतर घरी केलेली लुसलुशीत पुरणपोळी,त्यावर साजूक तूप आणि कटाची खमंग आमटी अश्या जेवणाचा भरपेट आनंद प्रत्येकाने घेतला... अशी ही आगळी वेगळी फुलांची होळी खेळून लहानगे तसेच मोठे ही एकदम खुश झाले...त्यामुळे मला वाटतं की आपल्यावर कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता आहे त्यातुन मार्ग काढत स्वतःला आणि इतरांना खुश ठेवता आले पाहिजे...


होळीचा हाच तर संदेश आहे ना की चांगल्या गोष्टी आत्मसात करायला शिकलं पाहिजे..चला तर मग ..आपल्या घरापासूनच सुरवात करू या... लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच असेल त्या परिस्थितीत समाधान मानून एकमेकांना खुश ठेवू या..मनातील वाईट विचारांचे दहन करून सामाजिक बांधिलकी जपू या!


Rate this content
Log in

More marathi story from Jayashree Kelkar

Similar marathi story from Inspirational